” आई…पूजेत बसल्याने खरंच कुणी थकत असतं का…आणि मी दिवसभर सांभाळले ना सगळे काही… जशी ती थकते तशीच मीही थकतेच ना…मग आज जर माझी तब्येत बरी नाही तर तुम्ही किंवा विशाखा ने केला एक दिवस स्वयंपाक तर काही बिघडणार का…?” राधा म्हणाली.
आता मात्र सासूबाईंचा पारा चढला. त्या रागानेच राघवकडे पाहत म्हणाल्या.
” बघितले तुझ्या बायकोचे कारनामे… तिला घरातील कामे करायची नाहीत पण सासुशी उलट बोलणे बरे जमते…ही अशीच वागते नेहमी…घरात तर अजिबात लक्ष नसतं हीचं आणि तोंड मात्र बरोबर चालतं…”
आता मात्र राधाला वाईट वाटत होतं. कारण आजवर तिने कधीच सासूला उलट उत्तर दिले नव्हते. आणि राघव ला सुद्धा हे आवडणार नाही हे देखील ती जाणून होती. आता मात्र राघव आपल्याला बोलेन ह्या गोष्टीची तिला भीतीही वाटत होती. तेवढ्यात राघव शांतपणे म्हणाला.
” आई…आज राधाला खरंच बरं नाही आहे…तिला थोडा आराम करू दे…”
आता मात्र आईला आणखीनच वाईट वाटले. राघव ने आजवर कधीच आईचे म्हणणे टाळले नव्हते. आईला वाटले होते राघव तिचीच बाजू घेईल. पण राघव ने मात्र राधाची बाजू घेतली होती. दुखावलेली आई म्हणाली.
” बघितलंस…आता तू देखील तुझ्या बायकोच्या तालावर नाचू लागला आहेस… तिच शिकवत असेल तुला असे बोलायला…एक विभास आहे जो कधीच माझ्या शब्दा बाहेर जात नाही…”
” अगं पण आई…राधाला खरंच ताप आलाय…” राघव म्हणाला.
पण सासुबाई मात्र काहीच ऐकायला तयार नव्हत्या. आणि यात मग आईच्या बाजूने बोलायला विभास आणि विशाखा देखील आले. आणि छोट्याशा गोष्टीचे मोठ्या भांडणात पर्यावसान व्हायला वेळ लागला नाही. सासुबाई मात्र सतत एकच गोष्ट म्हणत होत्या की जर हिला एकत्र राहायचं असेल तर की जसे म्हणेल तसेच राहावे लागेल. नाहीतर वेगळं राहा म्हणावं. राघव चे बाबा सुद्धा आईच्या बाजूने बोलायला लागले होते. राघव आणि राधा मात्र एकीकडे गप्प उभे होते. शेवटी राघव शांतपणे म्हणाला.
” ठीक आहे आई…जर तुला वाटतं असेल की आम्ही दोघांनी वेगळं राहावं तर मला मान्य आहे…”
राघव चे उत्तर ऐकून घरातील सगळे चकित झाले. अगदी राधा सुद्धा. राघव असे काही म्हणेल असे त्याच्या आईलाही नव्हते वाटले. त्यांना वाटले होते की झाल्या प्रकाराबद्दल राघव राधाला सगळ्यांची माफी मागायला लावेल आणि पुन्हा कधीच राधाची हिम्मत होणार नाही घरात कुणालाही उलट उत्तर देण्याची. पण राघव ने मात्र आता ठरवले होते.
तो तसाच बोलून त्याच्या रूम मध्ये निघून गेला. त्याच्या मागे राधा सुद्धा रूम मध्ये आली. आणि त्याला म्हणाली.
” मला खरंच माफ करा…माझ्या बोलण्यामुळे प्रकरण इतक्या दूरवर जाईल असे मला कधीच वाटले नव्हते…हवे तर मी सर्वांची माफी सुद्धा मागते…पण तुम्ही असे वेगळे व्हायच्या गोष्टी करू नका…”
” तुला काय वाटतंय राधा… मी रागात येऊन हा निर्णय घेतला असेल का…असे नाही आहे…मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे…” राघव म्हणाला.
” पण का…?” राधा ने विचारले.
” माझ्यासोबत घरातल्या व्यक्तींनी काहीही भेदभाव केला तरी मी समजू शकतो… विभास आधीपासूनच घरात सर्वांचा लाडका आहे…अगदी माझासुद्धा…त्यामुळे मला ह्याचं कधीच काही वाटलं नाही…पण हे सगळं माझ्यामुळे तुझ्या वाट्याला देखील आलंय ह्याच वाईट वाटतं ग मला…मी खूप दिवसांपासून पाहत आहे…फक्त कधी काही बोलू शकलो नाही…पण कुठवर…कधी ना कधी तरी हे थांबायलाच पाहिजे ना…निदान तुला तरी हे सगळं आयुष्यभर सहन करायला लागू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे…आता जरी तुला माझा हा निर्णय पटला नसेल तरी पुढे काही दिवसांनी तुला पटेलच…” राघव म्हणाला.
” पण मला काही वाटत नाही ह्याचं…” राधा म्हणाली.
” पण मला वाटतं ना…एक मुलगा, एक भाऊ म्हणून जशी माझी काही कर्तव्ये आहेत तशीच एक नवरा म्हणूनही आहेतच ना…आणि जोपर्यंत दुरावा येत नाही तोपर्यंत नात्यांची किंमत कळत नाही…घरच्यांना तुझी किंमत कळावी म्हणूनच हे गरजेचे आहे…आणि तू प्लिज नाही म्हणू नकोस…” राघव म्हणाला.
आता मात्र राधाचाही नाईलाज झाला. आणि दोन दिवसातच राघव आणि राधा घराच्या वरच्या मजल्यावर वेगळे राहू लागले. राघवच्या आईला वाईट वाटले पण त्यांनी त्या दोघांना अडवले नाही. विभास आणि विशाखाला मात्र कोणताही फरक पडलेला नव्हता.
काही दिवसातच राघवच्या वडिलांनी राघवला वेगळे दुकान सुरू करून दिले. राघव आणि राधा दोघांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली. अर्थातच आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन. आणि काही दिवसातच राघवचे दुकान थोडेफार का होईना चालू लागले. राघव मुळातच मेहनती होता. बोलायला सुद्धा लाघवी होता. त्यामुळे लवकरच त्याचे दुकान चांगले चालायला लागले होते.
पण इकडे त्याच्या वडिलांना मात्र आता कामाचा ताण जाणवू लागला होता. काही दिवसातच त्यांना कळून चुकले की राघवने हे दुकान खूप चांगल्याप्रकारे सांभाळले होते. विभास फक्त दाखवण्या पुरते काम करायचा हे सुद्धा त्यांच्या चांगलेच लक्षात आले होते. राघव प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त स्वतः जातीने लक्ष द्यायचा. गिऱ्हाईक लहान असो वा मोठे.
त्यांच्या गरजेची प्रत्येक वस्तू जातीने त्यांना काढून द्यायचा. दुकानात नवीन आलेल्या मालाची नोंद आणि रोजचा हिशेब तर त्याला अगदी तोंडपाठ असायचा. विभास मात्र कॅश काउंटर वर बसायचा आणि दुकानातील नोकराला हुकूम सोडायचा. आपण राघवच्या बाबतीत कायमच चूक केली हे आता राघवच्या वडिलांच्या लक्षात आले होते.
इकडे त्याच्या आईची सुद्धा तीच परिस्थिती होती. राधा घरी नसल्याने सगळी जबाबदारी आता त्यांनी विशाखा कडे सोपवली होती. त्यांना नेहमीच खात्री असायची की विशाखा ही राधा पेक्षा प्रत्येक बाबतीत सरस असेल. पण विशाखा ने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले होते.
जिथे राधा सकाळी सहाला उठायची तिथे विशाखा नेहमीप्रमाणेच आठला उठत असे. स्वयंपाक तर राधासारखा जमायचा नाहीच पण जे करेल त्यालाही खूप उशीर व्हायचा. उलट बोलण्यात तर ती एकदमच पटाईत होती. जोवर सासुबाई तिचा लाड करायच्या तोवर सारखी त्यांच्या मागेपुढे करायची. पण आता तिच्या अंगावर जबाबदारी पडल्यावर मात्र तिने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली होती.
तिने सासूला न विचारता घरातील सगळ्याच कामासाठी मोलकरीण सांगितली होती. अर्थातच सासूबाईंना ह्या सर्वांचे वाईट वाटलेच होते. पण आता काही इलाज नव्हता. कारण त्यांनी स्वतःच नेहमी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये आणि सूनांमध्ये फरक केला होता.
राघवच्या आई वडिलांना आता त्यांच्या वागण्याचा खरंच पश्चात्ताप होत होता. राघव आणि राधा मात्र दोघेही सुखात होते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.