माहेरी लाडाकोडात वाढलेली. चांगली शिकलेली आणि घरकामात निपुण. एका खाजगी ऑफिस मध्येच काम करायची पण कामात चोख होती. मित्र मैत्रिणीं मध्ये रमणारी. चंचल, अवखळ, बोलकी मधुरा आज लग्न होऊन सासरी पहिले पाऊल ठेवत होती.
सासरी आल्यावर सुद्धा तिचे खूप कौतुक झाले. तिचं सासर तिच्या माहेरा पासून जरा लांब असलं तरी मागच्या चार महिन्यांपासून ती महेश आणि त्याच्या कुटुंबियांशी फोन वर सतत बोलायची त्यामुळे तिला आता त्याचं काही वाटत नव्हतं.
सासरी आपल्याला केवळ प्रेमच मिळेल आणि आपण सुद्धा सगळ्यांना आपलंसं करून घेऊ या भाबड्या आशेवर मधुरा होती. माहेर सुटल्याने साहजिकच तिची आधीची नोकरी सुद्धा सुटली होती. पण मधुराने ठरवले होते की आधी ती संसारात लक्ष देईल आणि नंतरच नोकरीचा विचार करेन. तसेही तिला नवीन घरातील चालीरीती समजून घ्यायला जरा वेळ लागणारच होता. आणि महेश तर चांगली नोकरी करायचा. त्यामुळे तिला सध्या फारशी काळजी नव्हती.
सासरी आल्यावर सुरुवातीचे काही दिवस अगदी चांगले गेले. महेश सुद्धा तिचं खूप मन जपायचा. तिला हवं नको ते बघायचा. सासुबाई सुद्धा तिला घरकाम आणि स्वयंपाक शिकण्यात मदत करायच्या. सगळं कसं अगदी छान सुरू होतं.
पण लग्न होऊन महिना झाला तरी महेश ऑफिस मध्ये जायचं नावच घेत नव्हता. लग्नानंतर सुट्टी घेतली असेल म्हणून मधुरा ने सुरुवातीला काहीच विचारले नाही. पण आता महिना होत आला तरीही तो ऑफिस ला जात नाही म्हणून मधुरा त्याला म्हणाली.
” अहो…तुम्ही ऑफिसला कधीपासून जाणार आहात…? म्हणजे तुमच्या सुट्या कधी संपणार आहेत…?”
मधुराच्या प्रश्न ऐकुन गोंधळलेला महेश तिला म्हणाला.
” तुझ्यासाठी मी इतके दिवस घरी आहे ह्याचा तुला आनंदच व्हायला हवा…पण तू मात्र मला ऑफिस ला जायला सांगत आहेस…तुला ना इतक्या चांगल्या नवऱ्याची कदरच नाही…” महेश लाडीकपणे म्हणाला.
महेशचे बोलणे ऐकुन मधुरा सुद्धा पुढे काही बोलू शकली नाही. त्यानंतर महेशचे रोजचेच रूटीन सुरू होते. दुपारी बारा वाजता उठायचा. मग चहा आणि जेवण ह्यातच दुपारचे दोन वाजत असत. मग थोडावेळ पुन्हा आराम करून संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे आणि रात्री उशिरा घरी येणे.
मधुराला त्याचे वागणे काही नीट कळत नव्हते. असेच दोन महिने निघून गेले. मधुराने पुन्हा एकदा त्याच्यासमोर ऑफिस ला जायचा विषय काढला तेव्हा तो जरा चिडला. त्याच्या घरातील लोक पण त्याला ऑफिस ला जाण्याबाबत काहीच म्हणत नसत. मधुराला हे सगळं जरा विचित्रच वाटायचं.
त्यानंतर एके दिवशी महेश ने सकाळी आठ वाजताच स्वतःचा टिफीन तयार करायला सांगितले. मधुराला खूप आनंद झाला. तिला वाटले की आता महेश जबाबदारीने स्वतःच्या कामा कडे लक्ष द्यायला लागला आहे. तिने उत्साहाने सकाळीच उठून त्याचा डबा तयार केला. आणि महेश डबा घेऊन चांगले कपडे वगैरे घालून ऑफिस ला निघून गेला.
संध्याकाळी मधुरा ने महेश च्या आवडीचा स्वयंपाक तयार केला होता. ती चांगली तयार होऊन महेश ची वाट पाहत होती. पण महेश लवकर आलाच नाही. तिने महेशला कॉल सुद्धा केले पण त्याने मधुराचे कॉल सुद्धा उचलले नाहीत. मधुरा त्याची वाट पाहत न जेवताच बराच वेळ जागी होती.
महेश चे आई बाबा मात्र त्यांना काहीच काळजी नसल्यासारखे झोपून गेले होते. मधुराला नवल वाटले. रात्रीचे दहा वाजले तरीही महेश घरी आलेला नाही आणि त्याच्या आई बाबांना त्याची काळजीही वाटत नाही ह्याचे तिला आश्चर्य वाटत होते. आणि सोबतच महेशची काळजी सुद्धा वाटत होती.
रात्री साडेदहा चे सुमारास महेश घरी आला. त्याला पाहून मधुराच्या जीवात जीव आला. तिने त्याला काळजी ने विचारले.
” अहो…खूप उशीर झालाय तुम्हाला आज…तुम्ही फोन पण नाही उचलला माझा…मला खूप काळजी वाटत होती…”
” जेव्हा घरी राहत होतो तेव्हा तर विचारत होती की मी ऑफिस ला केव्हा जाणार आहे आणि आता जेवण ऑफिस मध्ये काम करत होतो तेव्हा विचारत आहेस की उशीर का केलात…” महेश वैतागून म्हणाला.
” सॉरी…पण मला काळजी वाटली म्हणून मी विचारलं…”
एवढे बोलून मधुरा ने त्याला जेवायला ताट वाढले. महेश ने जेवण केले आणि तो मधुराशी जास्त न बोलता झोपून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मधुरा ने वेळेवर महेश साठी डबा तयार केला पण महेश त्या दिवशी ऑफिसला गेलाच नाही. महेश चा मूड चांगला नसल्याने मधुराने त्याला जास्त विचारले नाही.
त्यानंतर महेश असाच दोन तीन दिवसाआड ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. आणि मधुराने ऑफिस बद्दल काही विचारलं तर तिच्यावर चिडचिड करायचा. मधुराला त्याचे नवल वाटायचे. महेश नेमकं काय काम करतो की त्याला दोन दिवस आड गेलेलं सुद्धा चालतं आणि रात्री घरी यायला खूप उशीर होतो हे तिला कळत नव्हतं. शेवटी न राहवून तिने विचारलेच.
” तुम्ही अशा कुठल्या ऑफिस मध्ये काम करता जिथे तुम्हाला दोन दोन दिवस आड जावं लागतं आणि रात्री इतका उशीर होतो यायला…आणि मी काही विचारलं तर मला सांगत सुद्धा नाही तुम्ही…”
” तुला खरं ऐकायचं आहे ना…?”
” हो…”
” मग ऐक…मी कुठल्याही ऑफिस मध्ये जॉब करत नाही…मी एका गाडीवर ड्रायव्हर असतो…आणि मला जेव्हा काम असतं तेव्हा मी जातो…आणि रोज रोज कामावर जायला मला आवडत नाही…” महेश म्हणाला.
आणि महेश चे बोलणे ऐकुन मधुरा थक्क झाली. आधी तर तिचा आपल्या कानांवर विश्र्वासच बसला नाही. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती तिच्यासमोर बेफिकिरी ने उभ्या असलेल्या महेशला म्हणाली.
” तुम्ही ड्रायव्हर चे काम करता हे तुम्ही मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं…तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करता म्हणून…”
” त्याचा इथे काहीही संबंध नाही…आता लग्न झालंय ना आपलं…आणि तू इथे काय उपाशी आहेस का…आपल्याला काय हवं आणि काय नको ते बघतात ना माझे बाबा…आणि माझे बाबा चांगलं कमवत असताना मला कामाला जायची गरज वाटत नाही…म्हणून मी फक्त कधी कधीच जातो कामाला…” महेश तितक्याच बेफिकिरी ने म्हणाला आणि तिथून निघून गेला.
मधुरा मात्र महेश चे हे बोलणे ऐकून आतून बाहेरून हादरली होती. लग्न जुळवताना आपल्याला खोटं सांगण्यात आलंय हे तिच्या लक्षात आलं. आणि त्याहूनही तिला वाईट वाटलं ते याचं की आपण दिवसभर काहीही काम न करता घरीच असतो ह्याचं महेशला अजिबात वाईट वाटत नाही. बाबांच्या पगारावर तो अगदीच निर्धास्त आहे. बाबा रिटायर्ड झाल्यावर पुढे त्यांचा आणि आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा ह्याचा पण महेश अजिबात विचार करत नव्हता. पुढे मुलं झाल्यावर कसं होईल हे तर त्याच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं.
मधुराने ह्या सर्व गोष्टी तिच्या सासूच्या कानावर घातल्या आणि लग्न जुळवताना तुम्ही आम्हाला आधी काहीच कल्पना का दिली नाही ह्याबाबत विचारणा केली. त्यावर तिची सासू उलट तिलाच म्हणाली.
” अगं आम्ही त्याला एवढा मोठा केला…लग्न करून दिलं…आता तुझी जबाबदारी आहे त्याला व्यवस्थित समजावून सांगायची आणि त्याला योग्य मार्गावर आणायची…तुलाच त्याला सुधारावे लागेल…त्याची बायको आल्यावर सुद्धा जर आम्हालाच त्याला समजावून सांगावं लागतं असेल तर तुझा काय उपयोग…?”
सासूचे बोलणे ऐकून मधुराला आणखीनच वाईट वाटले. तिला एका क्षणाला वाटले की आताच बॅग भरावी आणि आपल्या माहेरी निघून जावे. पण दुसऱ्याच क्षणी आपल्या लहान बहीण भावांचा विचार आला आणि तिला वाटले की आपल्या लग्न तुटण्याचा परिणाम त्या दोघांवर नको व्हायला. आणि आईवडिलांनाही हा धक्का सहन होणार की नाही हे ही तिला कळत नव्हते.
क्रमशः
फसवणूक – भाग २ (अंतिम भाग)
छान