कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून चुकून तिच्या मावशीला धक्का लागला आणि तिच्या अंगावर चहा सांडला. तर मावशी लगेच आनंदीला ओरडून म्हणाली.
” काय गं…जरा पाहून चालत जा ना…आजी नुसती धावत का आहेस इकडून तिकडे…एका जागी शांत बस ना…”
तिचे ओरडणे कावेरीला ऐकू आले पण ही नेहमीचेच म्हणून कावेरी काही बोलली नाही. आनंदी मात्र जरा घाबरली आणि आईजवळ येऊन आईच्या कुशीत शिरली. कावेरीला मात्र खूप वाईट वाटले होते. कावेरीचा नवरा गेल्यापासून तिने आनंदीला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देण्याचा प्रयत्न केला पण काही प्रसंग असे यायचे ज्यामुळे तिला वाटून जायचे की आनंदी चे वडील असते तर बरे झाले असते.
ती विचारत गुंतलेलीच होती इतक्यात तिची मामी ती असलेल्या खोलीत आली आणि तिला पाहून म्हणाली.
” तू इथे आहेस होय… बरं झालं इथे आहेस ते…बाहेर नवरीसाठी मानाचं सामान पॅक करत आहेत…त्याला तुझा हात न लागलेलाच बरा…ते झालं की मी आवाज देते तुला…”
मामीचे बोलणे ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. पण आनंदीला दिसू नये म्हणून ते तिने अलगद टिपून घेतले. बाहेर सगळ्यांचा हसण्याचा, खिदळण्याचा आवाज येत होता पण कावेरी तिथे असावी असे बहुधा कुणाला जास्त वाटत नव्हते. कावेरीच्या आईने पण तिला बाहेर ये म्हणून आवाज दिला नव्हता. कदाचित तिच्या आईला पण वाटत होते की नवरी ला पाठवायच्या साहित्यावर तिची सावली पडू नये म्हणून. हा विचार करून कावेरीला इतक्या लोकांमध्ये सुध्दा खूप एकटे वाटत होते.
कावेरी घरात लाडाची लेक होती. तिचे लाड जरी होत असले तरी घरात कडक शिस्तीचे वातावरण होते. कावेरीला एक मोठी बहीण नयना आणि तिच्यापेक्षा लहान भाऊ सचिन हे भावंडं होते. कावेरी दहावीपर्यंत गावातच शिकलेली आणि मग तालुक्याच्या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीत चांगले मार्क्स पडले. तिला पुढे इंजिनियरिंग चे शिक्षण घ्यायचे होते. पण त्याला जास्त वर्ष लागतील आणि मुलींना एवढं शिकून काय करायचंय म्हणून घरून परवानगी भेटली नाही. पण डी एड करायची परवानगी मात्र तिच्या वडिलांनी दिली होती. मग तिने डी एड ला ॲडमिशन घेतले आणि डी एड सुद्धा चांगल्या मार्कांनी पास झाली. लवकरच एका शाळेत शिक्षिका म्हणून तिला नोकरी सुद्धा लागली. सगळं काही सुरळीत चाललेलं.
पण एके दिवशी तिला तिच्या घरून तातडीचा फोन आला आणि लगेच घरी ये म्हणून सांगितले. ती घाईनेच घरी पोहचली तेव्हा तिला कळले की तिची मोठी बहीण नयना ने एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केले आहे म्हणून. तिच्या घरच्यांना ह्या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. गावात प्रतिष्ठित अशा घराण्याला नयनाच्या पाळून जाण्याने मान खाली घालावी लागली होती.
तिच्या आजीला तर ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आणि आजीने अंथरूण धरले. घरचे सगळे काळजीत होते. आता पुढे काय हा प्रश्न त्यांना सतावत होता. नयना अशी पळून गेल्याने पुढे कावेरी आणि तिच्या भावाच्या लग्नात अडचण निर्माण होणार होती. गावात अन् भावकीत तोंड दाखवायला जागा उरली नव्हती.
शिवाय आता घरच्यांनी कावेरीला नोकरी करण्यास साफ मनाई केली होती. कावेरीला काही कळत नव्हते. पण घरच्यांची परिस्थिती पाहून तिने घरच्यांना नाराज करायचे नाही असे ठरवले आणि घरच्यांनी परस्पर तिचा राजीनामा लिहून तिची सही घेतली आणि शाळेत तिचा राजीनामा पाठवून सुद्धा दिला.
आता घरच्यांनी गेलेली इभ्रत सावरायची असेल तर कावेरी चे लग्न करून देणे हा उपाय त्यांना बरा वाटत होता. म्हणून त्यांनी घाईघाईने तिच्या लग्नासाठी मुलगा शोधणे सुरू केले. मोठी मुलगी पळून गेल्याने कावेरीचे लग्न लवकर जुळत नव्हते. अशातच रणजीतचे स्थळ स्वतःहून कावेरीला चालून आले.
रणजितला दारूचा खूप नाद होता. घरचा भरपूर श्रीमंत असलेल्या रणजीतचे ह्यामुळे लग्न जुळत नव्हते. त्यांना कावेरी बद्दल कळले तेव्हा रणजीत च्या घरच्यांनी स्वतःहून कावेरी साठी मागणी घातली आणि कावेरी च्या घरच्यांना रणजीत बद्दल सगळे माहिती असूनही केवळ आपल्या इभ्रत वाचवण्यासाठी त्यांनी कावेरीचे लग्न रणजीत सोबत लावून दिले.
लग्नात कावेरी नाजूक आणि सुंदर दिसत होती तर तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेला रणजीत तिला अजिबात शोभून दिसत नव्हता. पण ह्या लग्नाने कावेरी च्या माहेरचे लोक जरा निश्चिंत झाले होते. कावेरीने सुद्धा आपल्या नशिबात हेच लिहिले होते असे समजून तिच्या संसाराला सुरुवात केली होती. पण लवकरच तिला रणजीतच्या दारूच्या नादाबद्दल कळले.
रणजितला दारूसोबतच बाहेरच्या बायकांचा सुद्धा नाद होताच. कावेरी ने ही सगळे तिच्या माहेरी सांगण्याचा प्रयत्न केला पण माहेरून तिला खूपच थंड प्रतिसाद मिळाला. माहेरचे म्हणाले की लग्न म्हटल्यावर थोडफार सहन करावंच लागतं. शिवाय रणजितरावांनी लग्न करून त्यांची इभ्रत वाचवली. मग दिल्या घरी सुखी रहा आणि माहेरी परतण्याचा तर विचार सुद्धा करू नको. मग कावेरी फार काही करू शकली नाहीच.
तिने रणजितला बदलण्याचा प्रयत्न केला पण रणजीतने तिच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिलाच नाही. अशातच तिला मातृत्वाची चाहूल लागली. अनेक प्रयत्न करूनही न सुधारलेला रणजीत तो वडील होणार आहे हे कळल्यावर मात्र हळूहळू सुधारायला लागला होता. कावेरी सुद्धा त्याच्या अशा बदलण्याचे खुश होती. मग आनंदीचा जन्म झाला. आनंदी रणजीतची अगदी लाडकी बनली होती. तिला कुठे ठेवू आणि कुठे नव्हे असे झाले होते त्याला.
कावेरीच्या आयुष्यात आता कुठे सुखाचे दिवस यायला लागले होते. आनंदी दोन वर्षांची झाली तेव्हा रणजीतला एक असाध्य आजाराचे निदान झाले. ही कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या दारूच्या व्यसनाने एक दिवस आपण आपल्या आयुष्याला मुकणार ह्याची कधी कल्पना ही नाही केलेल्या रणजीतला आजाराबद्दल कळल्यावर धक्काच बसला.
कावेरीची गत सुद्धा फार काही वेगळी नव्हती पण तिने रणजितला सावरायला म्हणून स्वतःचे दुःख मनातच ठेवले आणि रणजितला सावरायचा प्रयत्न केला. पण त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करून सुद्धा एक दिवस रणजीत तिला सोडून एकटाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला. आनंदी तेव्हा जेमतेम साडेतीन वर्षांची होती.
आनंदीला पाहून कावेरीला ह्या धक्क्यातून सावरावे लागले. त्यानंतर चे दिवस तर कावेरीसाठी आणखीनच संघर्षपूर्ण होते. रणजीत गेल्यानंतर काही दिवसांनी रणजीतच्या मोठ्या भावाने रणजीतच्या वाट्याची वडिलोपार्जित संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने रणजितने स्वतःची सगळी संपत्ती कावेरीच्या नावाने केली होती.
हे कळल्यावर रणजीतच्या मोठ्या भावाने घरच्यांच्या मदतीने तिच्यावर सर्वकाही त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. मग नाईलाजाने कावेरीने तिच्या माहेरी मागितली. तेव्हा घरच्यांनी तिला नाईलाजाने माहेरी आणले होते. कावेरीला माहेरचा आधारच होत होता पण कावेरीचा संसार असा अर्ध्यावर उद्धस्त झाल्याने तिच्या माहेरच्या लोकांना आपली इभ्रत कमी झाली असे वाटायला लागले होते.
अशातच कुठेतरी एक कार्यक्रमात नयनाताई आणि सचिन ची भेट झाली. सुरुवातीला सचिन तिच्याशी काही बोलला नाही पण तिथून निघताना नयनाताई जेव्हा स्वतःहून त्याच्याशी बोलायला आली तेव्हा मात्र तो जरा नॉर्मल होऊन तिच्याशी बोलला. त्यानंतर मग नयनासोबत घरच्यांचे कॉल वर बोलणे व्हायला लागले. हळूहळू घरच्यांनी नयनाला माफ करून पुन्हा स्वीकारले.
तिच्या दोन मुलांचेही आता घरी लाड होऊ लागले होते आणि त्या मुलांसमोर आनंदीला दुय्यम वागणूक मिळायला लागली होती. नयनाचा सुद्धा कावेरीवर राग होताच. घरच्यांसोबतच कावेरी ने सुद्धा तिच्याशी बोलणे टाकले होते ह्याचा तिला राग होता. कावेरी ने तिला बरेचदा समजावून सांगितले की आधी आई बाबांनी बोलायला मनाई केली होती आणि नंतर रणजीत चा सुद्धा विरोधच होता म्हणून. पण नयनाचा राग काही कमी झाला नाही.
पुढे जसजशी नयना पुन्हा माहेरी यायला लागली तसतशी घरच्यांनी कावेरीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आता मात्र नयना आणि तिची नवऱ्याचे घरात फार लाड व्हायला लागले होते आणि कावेरी मात्र दुर्लक्षित होत होती. सोबतच आनंदीला सुद्धा नयनाच्या मुलांसमोर दुय्यम वागणूक मिळायला लागली होती. अशातच जेव्हा सचिनचे लग्न ठरले तेव्हा मोठी बहीण म्हणून नयनाला घरात मान दिल्या जात होता आणि कावेरीला मात्र विधवा म्हणून वारंवार हिणवले जात होते. आनंदीला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडा दिला जात होता. पण हा आपल्याच नशिबाचा दोष आहे असे मानून कावेरी सगळं काही ऐकून घेत होती.
सचिनचे लग्न थाटामाटात पार पडले. सचिनची बायको घरात आली तेव्हा काही दिवस ती सगळ्यांशी फार गोड वागायची. पण हळूहळू आपली विधवा नणंद आणि तिची मुलगी तिला घरात जड वाटायला लागली होती. त्यामुळे कावेरी आणि आनंदीवर तिची चिडचिड वाढत चालली होती. कावेरीची आई सुद्धा सुनेला काहीच बोलायची नाही.
अशातच एके दिवशी कावेरी काही कामानिमित्ताने बँकेत गेली असता अचानक तिला कोणीतरी आवाज दिला. तिने वळून पाहिले तर समोर आदित्य उभा होता.
” कावेरी, तू काय करतेस इथे ??”
” काही नाही अरे…अकाउंट मध्ये फोन नंबर अपडेट करायचा म्हणून आले होते…पण तू इथे कसा…आणि किती वर्षांनी दिसतोयस…” कावेरीने विचारले.
” हल्ली बँकेत नोकरी करतोय…ह्याच शाखेत बदली मिळाली आहे मागच्याच आठवड्यात…” आदित्य म्हणाला.
” अरे वा… बरंय की…आईला पण आधार झाला असेल तुझी इथे बदली झाल्याने…” कावेरी म्हणाली.
” हो…घरापासून जवळ आहे म्हटल्यावर तिला खूप आनंद झाला बघ…” आदित्य म्हणाला.
” छान आहे…चल निघते मी…माझी मुलगी वाट बघत असेल घरी…” कावेरी म्हणाली.
एवढे बोलून कावेरी तिथून निघाली. पण आदित्य मात्र जुन्या आठवणीं मध्ये रमून गेला. आदित्य बारावी पर्यंत तिच्यासोबत शिकला होता. पुढे कावेरीने डी एड ला ॲडमिशन घेतली आणि आदित्यने बी कॉम ला ॲडमिशन घेत बँकिंगच्या परीक्षांची तयारी सुरू केली होती. आदित्यला अगदी लहानपणीपासूनच कावेरी खूप आवडायची.
पण ती काय विचार करेन म्हणून त्याने कधी तिला ते जाणवू दिले नाही. तिच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती आणि आदित्य मात्र अगदी साधारण घरातील मुलगा होता. तो लहान असतानाच त्याचे बाबा छोट्याश्या आजाराचे निमित्त होऊन वारले आणि मग आदित्यच्या आईने खुप कष्ट घेऊन त्याला लहानाचे मोठे केले होते. त्यामुळे त्याला आईच्या ह्या सगळ्या कष्टांचे चीज करायचे होते.
त्यामुळे कावेरीवर जडलेले प्रेम मनातल्या एका कोपऱ्यात ठेवून तो मोठ्या कष्टाने अभ्यास करत होता. पुढे कावेरीने डी एड केले आणि शिक्षिका म्हणून नोकरीला लागली हे त्याच्या कानावर आले होते. पण त्याला मात्र अजूनही नोकरी लागली नव्हती. म्हणून त्याने कावेरीशी काही कॉन्टॅक्ट केला नाही.
पुढे कावेरीची बहिण पळून गेली आणि तिच्या घरच्यांनी तिचे तडकाफडकी लग्न लावून दिले हे सुद्धा त्याने ऐकले होते आणि ही ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला होता. पण त्याचा नाईलाज होता. ती जिथे असेल तिथे सुखी असू देत असा विचार करून त्याने तिचा विचार सोडून दिला होता. पण इतक्या वर्षांनी कावेरीला पाहून त्याच्या मनात दडलेले प्रेम पुन्हा बाहेर डोकावू पाहत होते.
तो कावेरीच्या विचारातच घरी गेला. कावेरीचा नवरा आता ह्या जगात नाही ह्याची त्याला कल्पना होतीच. पण नेमके काय घडले ते काही पूर्णपणे माहीत नव्हते. म्हणून मग त्याने आई जवळ कावेरीचा विषय काढला. तेव्हा आईने त्याला सांगितले की नयना पळून गेल्यावर लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून तिच्या घरच्यांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा जवळपास पंधरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका दारुड्या पण श्रीमंत माणसाशी लावून दिले. पण एक मुलगी झाल्यावर तो आजारपणाने गेला.
मग कावेरी माहेरी आली आणि आता मात्र तिच्या घरच्यांनी नयनाचा स्वीकार केला. तिच्या घरच्यांनी आधीच नयनामुळे कावेरीवर लग्नाची जबरदस्ती नसती केली तर कावेरीचे आयुष्य आज एकही वेगळेच असते. आदित्यच्या आईला सुद्धा कावेरीबद्दल खूप सहानुभूती होती. मग हळूच आदित्यने आईला आपला कावेरीशी लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला.
त्याला वाटले की आई तयार होणार नाही किंवा खूप आढेवेढे घेईल. पण त्याची आई ही ऐकून आनंदी झाली. कावेरी चांगली मुलगी आहे हे त्यांना ठावूक होते शिवाय आदित्यचे वडील सुद्धा लहानपणीच गेल्याने एक विधवेच्या आयुष्यात किती संघर्ष असतो ह्याची त्यांना जाणीव होती. त्या अगदी आनंदाने कावेरीला सून करून घ्यायला तयार झाल्या.
मग फार उशीर न करता दोनच दिवसांनी आदित्य कावेरीच्या घरी गेला आणि तिच्या वडिलांशी कावेरीसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा तिचे वडील त्याला म्हणाले.
” कावेरी विधवा आहे…तिचे गावातल्या गावात लग्न लावून दिले तर लोकांना वाटेल की तुमचं आधीपासूनच काहीतरी प्रेमप्रकरण सुरू असेल…लोक नावं ठेवतील आम्हाला…त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही…”
कावेरीचे वडील असे काहीतरी बोलतील ह्याचा आदित्यने विचार सुद्धा केला नव्हता. त्यांना कावेरीच्या भविष्यापेक्षा लोक काय म्हणतील ह्याची काळजी होती. कावेरीच्या बाबतीत असा आततायी निर्णय घेणाऱ्या तिच्या वडिलांनी नयनाला मात्र सोयीस्कर रित्या माफ केले होते. त्यांच्या इभ्रतीचा भार फक्त कावेरीच्या खांद्यावर होता. काहीही चूक नसताना तिच्या आयुष्यात एवढे काही घडत होते.
कावेरीच्या वडिलांच्या निर्णयामुळे आदित्य अगदीच नाराज झाला होता. कावेरीला सुद्धा आदित्यच्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल कळले तेव्हा तिला सुद्धा धक्काच बसला होता. आदित्यच्या मनात असे काहीतरी असेल ह्याची तिने कधी कल्पना सुद्धा केली नव्हती.
इकडे कावेरीच्या घरच्यांनी मात्र आदित्यच्या लग्नाच्या प्रस्तावानंतर वेगळ्याच हालचालींना सुरुवात केली. त्यांनी लवकरात लवकर कावेरीचे दुसरे लग्न लावून देण्याचे ठरवले. त्यांना वाटत होते की आदित्य ने लग्नाचा प्रस्ताव ठेवला हे गावात कळले तर सगळ्यांना वाटेल की आदित्य आणि कावेरीचे एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणून त्यांना लग्न करायचे आहे. आणि त्यामुळे त्यांची बदनामी होईल. म्हणून मग कावेरीच्या दुसऱ्या लग्नाच्या हालचालींना वेग आला. कावेरीला ही कळल्यावर कावेरीने दुसऱ्या लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. पण घरचे तिला वेगवेगळया प्रकारे समजावून सांगत होते. दुसऱ्या लग्नासाठी दबाव आणत होते. घरच्या इभ्रतीचा विचार करून दुसरं लग्न कर म्हणत होते.
अशातच कावेरीसाठी पुन्हा एक स्थळ चालून आले. पन्नास वर्षांचा एक विधुर माणूस. त्याला एक मुलगा आणि मुलगी. मुलगी जवळपास कावेरीच्याच वयाची होती. पण कावेरी च्या माहेरच्यांनी कावेरीच्या वतीने हे स्थळ पसंत केले होते आणि अगदी साधेपणाने हे लग्न लावून देणार होते. कावेरी लग्न करून तिच्या नवीन संसाराला लागेल म्हणून तिचे आई वडील खुश होते.
तर नणंद आणि तिची मुलगी कायमची घरातून निघून जाईल म्हणून सचिनची बायको खुश होती. नयनाला तर कावेरीची लहान बहिण म्हणून ना काळजी होती ना आपल्या पळून जाण्यामुळे कावेरीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ह्याबद्दल काही अपराधीपणाची भावना होती. तिने सुद्धा कावेरीसाठी आपला आवाज उठवला नाही. नेहमीप्रमाणे कावेरी स्वतःसाठी काहीच करू शकत नव्हती.
पण एके दिवशी घरातले लोक बोलत असताना तिने अनवधानाने त्यांचे बोलणे ऐकले. लग्न झाल्यावर आनंदीची जबाबदारी कोण घेईल ह्याबद्दल सगळे बोलत होते. आनंदीच्या नावावर तिच्या वडिलांनी बरीच संपत्ती करून ठेवली होती त्यामुळे आर्थिक प्रश्न नव्हताच. पण कावेरीच्या होणाऱ्या सासरच्यांना आनंदीची कुठलीच जबाबदारी नको होती. त्यामुळे सध्यातरी आनंदीला लग्न झाल्यावर माहेरीच ठेवायचे अशी चर्चा सुरू होती. हे ऐकून मात्र कावेरी हिम्मत करून घरच्यांसमोर गेली आणि म्हणाली.
” तुम्ही ही काय बोलताय…मी आनंदीला सोडून कुठेही जाणार नाही…आनंदी माझी मुलगी आहे आणि ती नेहमी माझ्या जवळच राहील…आणि मला हे लग्न करायचे सुद्धा नाही आहे…माझा नकार आहे ह्या लग्नाला…”
” आम्ही तुझ्या भल्यासाठीच हे करत आहोत…आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला…आणि तू किती दिवस माहेरी राहणार आहेस…रणजीतच्या घरी जाऊन तू राहू शकत नाहीस कारण ते तुला त्रास देतील…त्यामुळे हे लग्न केल्यावाचून दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे…” कावेरीचे वडील म्हणाले.
“आणि लग्न झाल्यावर तू काही दिवसांनी घेऊन जा ना आनंदीला तुझ्याकडे…तू एकदा स्थिरस्थावर झाली तुझ्या नवीन घरात की घरच्यांना समजावून सांग नीट आणि त्यांनी होकार दिल्यावर आनंदीला घेऊन जा सोबत…” आई म्हणाली.
” हे माझं घर नाहीये का आई…आणि आम्ही दोघी मायलेकी इथे आयुष्यभर राहू शकत नाही का… आणि तुम्ही विचार तरी कसा केला की मी आनंदीला सोडून लग्न करायला तयार होणार म्हणून…”
” हे बघ…आम्ही तुझ्या भल्याचा विचार करूनच हे लग्न ठरवलंय…आणि तुला हे लग्न करावेच लागेल…” आई म्हणाली.
तेव्हा कावेरी काही बोलली नाही पण तिने मनात कसलासा निर्धार केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती बाहेर पडली आणि तडक आदित्य काम करत असलेल्या बँकेत गेली. तिला तिथे पाहून आदित्य आश्चर्यचकित झाला. तिने जेव्हा त्याला सांगितले की तिला त्याच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे तेव्हा त्याला कळत नव्हते की कावेरीला नेमके काय बोलायचे आहे. पण कावेरीने फार वेळ न घेता त्याला सरळ प्रश्न केला.
” तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे ? मी एक विधवा आहे…मला एक मुलगी सुद्धा आहे…तुला चांगली नोकरी आहे…तुला तर कोणतीही चांगली मुलगी मिळेल लग्नासाठी…”
” मला तू अगदी शाळेपासून आवडायचीस…पण तू काय विचार करशील म्हणून कधी तुला बोलू शकलो नाही…मग पुढे तुझ्या लग्नाची बातमी कळली तेव्हा मी माझ्या मनातील विचार मनातच ठेवले…पण आता तुझ्याबद्दल कळले तेव्हा पुन्हा जुनं प्रेम आठवलं आणि मनात विचार आला की एकदा प्रेमात नशीब आजमावून बघावं…आणि विधवा असण्याचा विचार करशील तर मला तू आजही तू माझं पहिलं प्रेम आहेस…आणि तुझ्यासोबत मी तुझं प्रत्येक सुख, दुःख आणि जबाबदारी स्वीकारायला तयार आहे…मग आनंदीच्या रुपात तू एक गोड लेक माझ्या पदरात टाकणार आहेस तर ते कसे नाकारणार मी.” आदित्य म्हणाला.
आदित्यचे बोलणे ऐकुन कावेरीचा निर्धार पक्का झाला. ती आदित्यला म्हणाली.
” मला तुझा लग्नाचा प्रस्ताव मान्य आहे. मी आजवर घरच्यांच्या विरुद्ध जाऊन कोणताच निर्णय घेतला नाही. पण आज मी हा निर्णय नाही घेतला तर माझ्या मुलीवर अन्याय होईल. तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं मी कधी करू शकणार की नाही माहीत नाही. पण मी आपल्या नात्याची आयुष्यभर प्रामाणिक राहिन आणि तुला कधीच कुठली तक्रार करायला जागा देणार नाही.”
हे ऐकून आदित्य खूप खुश झाला. त्याने तर कावेरीशी लग्न होईल ही आशाच सोडून दिली होती. पण आज नशिबाने कावेरी स्वतःहून त्याच्या आयुष्यात चालून आली होती.
त्या दिवशी तिने आदित्यला संध्याकाळी आपल्या घरी यायला सांगितले. योगायोगाने त्या दिवशी नयना सुद्धा घरी आलेली होती. संध्याकाळी आदित्य घरी आला तेव्हा घरच्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले. तेव्हा कावेरी स्वतःहून समोर येत म्हणाली.
” मी बोलावलंय त्याला.”
” तू बोलावलंय ?? अगं पण का ??”
” मी आदित्यशी लग्न करायचं निर्णय घेतलाय.”
” काय ? तुझ्या लक्षात येतंय का काय बोलत आहेस तू ते ?” नयना पुढे येत म्हणाली.
” होय. मला माहिती आहे मी काय बोलत आहे ते. तुम्ही जिथे लग्न ठरवलंय तिथे मला लग्न करायचं नाही आहे. आणि तुम्हाला मला या घरात राहू द्यायचं नाही आहे त्यामुळे मी आदित्यशी लग्न करायचं ठरवलं आहे.”
” तुला आई बाबांच्या इभ्रतीचा काही विचार आहे का नाही. लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला आहेस का तू. ह्या वयात इतक दुःख देणार आहेस का तू त्यांना ?” नयना ताई ओरडत म्हणाली.
” आई बाबांच्या इभ्रती बद्दल तू तर काही बोलूच नकोस ताई. तू घेतलेल्या निर्णयामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीही मी तुला दोष दिला नाही पण तरीही तू माझा राग राग करत आली आहेस. बाबांच्या इभ्रतीचा विचार करून मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला, त्यांनी सांगितले त्या मुलाशी लग्न केले. त्यांनी माझ्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय मी नशिबात लिहिलेले असेल म्हणून मान्य केला. पण आज फक्त माझ्या नाही तर माझ्या आनंदीच्या आयुष्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे ह्यापुढे मी स्वतःसोबत कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेईल. निदान मला पुढे पश्चात्ताप होणार नाही की मी स्वतःसाठी काहीच करू शकले नाही.”
कावेरीच्या बोलण्याने नयनाला तिची चूक कळून आली. खरंच नयनाच्या एका निर्णयामुळे काहीही चूक नसताना कावेरीला खूप काही भोगावे लागले होते.
पुढे कावेरी बाबांना पाहून म्हणाली.
” मी कधीच तुमच्या निर्णयाच्या विरोधात गेले नाही बाबा. कारण मला वाटायचे की तुम्ही जे काही कराल ते माझ्या भल्यासाठीच. पण तुम्ही नेहमीच माझ्यापेक्षा लोकांचा विचार केला बाबा. ताईने पळून जाऊन लग्न केले पण तुम्ही त्याची शिक्षा मला दिली. पण ताईला मात्र माफ केले. मला वाटले की आता तुम्हाला लोकांपेक्षा जास्त तुमच्या मुलींच्या सुखाची काळजी जास्त असेल. पण तुम्ही यावेळी पुन्हा माझ्यावर अन्याय करताय. मला ओझं समजून पुन्हा मागचा पुढचा काही विचार न करता माझं लग्न लावून देताय. तुम्हीच विचार करा बाबा ते लोक आज माझ्या आनंदाला स्वीकारायला तयार नाहीत ते उद्या का म्हणून स्वीकारतील. एवढ्याशा आनंदीला मी कशी एकटी सोडू बाबा. तुम्ही तुमच्या या लेकीला एकटं पाडताय म्हणून मी सुद्धा माझ्या मुलीचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ पहायचा का ?”
कावेरीचे बोलणे ऐकुन तिच्या बाबांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांनी कावेरीच्या बाबतीत केलेल्या चुकांची त्यांना जाणीव झाली. त्यांनी काहीही न बोलता साश्रू डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मग थोड्या वेळाने म्हणाले.
” माफ कर बाळा. मी लोकांचा विचार माझ्या पोटच्या लेकीपेक्षा जास्त करत आलो आजवर. तू माझ्या प्रेमापोटी माझे सगळे निर्णय मान्य केलेस पण मी मात्र तुझा विचारच केला नाही. माझ्या सगळ्या इभ्रतीचा भार मी तुझ्या एकटीवर टाकला आणि नयना आणि सचिनला मात्र त्यांच्या चुकांसाठी माफ करत आलोय. त्यांच्या चुकांची शिक्षा मात्र तुला मिळाली. मला माफ कर पोरी. आजपासून मी लोकांचा नाही तर माझ्या लेकीचा विचार करणार आहे. ”
मग आदित्यकडे पाहून म्हणाले.
” आदित्यराव. तुम्ही आईला घेऊन घरी या. आपण लग्नाचा मुहूर्त काढू आणि थाटामाटात लग्न करून आमच्या कावेरीला घेऊन जा तुम्ही. ”
त्यांच्या या निर्णयावर मात्र सगळेच खुश झाले. आदित्य तर खूप खुश होता. कावेरी सुद्धा पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली होती आणि तिच्या बोलण्यामुळे घरच्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. लवकरच कावेरी आणि आदित्यचे थाटामाटात लग्न झाले. लग्नात आई बाबा, नयनाताई, सचिन आणि त्याची बायको हे सगळेच खूप खुश होते.
लग्नानंतर आदित्यने कावेरीला एवढे सुख दिले की कावेरी तिच्या पूर्वायुष्यातील दुःख विसरून नव्याने आदित्य च्या प्रेमात पडली. आनंदी सुद्धा तिच्या नवीन बाबांच्या सोबत खूप खुश होती. लवकरच कावेरी आणि आदित्यला एक मुलगा झाला आणि त्यांचे कुटुंब पूर्ण झाले. आणि कावेरीच्या कथेचा शेवट अगदी एखाद्या परीकथेप्रमाणे गोड झाला.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.