सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा प्रकाशरावांना कळत होत्या. ते म्हणाले.
” मला कळलंय की माझं चुकलं…खूप चुकलं… मी उषा सोबतच तुम्हा साऱ्यांचा गुन्हेगार आहे…मी तुमचं मन दुखावलंय…”
” अहो तुम्ही माफी का मागताय…जे झालं त्यात तुमची चूक नव्हतीच…सगळं काही त्या वेळच्या परिस्थितीमुळे झाले…आपण सगळेच हतबल होतो…” उषाताई म्हणाल्या.
” हो ना…तुमच्या जागी आणखी कोणी असते तर त्यांनी सुद्धा त्यावेळी तेच केले असते…” सुधीर म्हणाला.
” हो पण उषाने ज्या प्रकारे परिस्थीती हाताळली त्याप्रकारे मी सुद्धा हाताळू शकलो असतो…निदान तुला साथ तरी द्यायला हवी होती… ” प्रकाशराव खिन्नपणे म्हणाले.
” जाऊद्या…जे झालं ते होऊन गेलं…आता पुन्हा त्या गोष्टी उगाळण्यात काही अर्थ नाही…” उषाताई म्हणाल्या.
” नाही ग…इतक्या सहजासहजी माफ नकोस करू मला…माझा गुन्हा खूप मोठा आहे ग…मी फक्त माझ्या बहिणीवर विश्वास ठेवून माझ्या एकुलत्या एका मुलीला लग्नाच्या बेडीत बांधून एवढ्या दूर पाठवणार होतो…ते ही मुलाला न पाहता…जर त्या दिवशी तू नंदिनीच्या बाजूने उभी राहिली नसतीस अन् ते लग्न झाले असते तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो…” प्रकाशराव म्हणाले.
” अहो पण तुम्ही काय जाणूनबुजून केलेत का ते…तुमच्याकडून सुद्धा त्यांना ओळखण्यात चूक झाली म्हणून ना…” उषाताई म्हणाल्या.
” नाही ग… मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवला नाही ही माझी चूक होती…तुझ्यापेक्षा अन् नंदिनी पेक्षा जास्त महत्त्व बाहेरच्यांना दिले…मुलीच्या आयुष्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीच्या मानापमानाची काळजी होती…” प्रकाशराव पुन्हा खिन्नपणे बोलले.
” जाऊद्या भाऊजी…तुम्हाला तुमची चूक कळली ह्यातच सगळं आलं…” सुधीर म्हणाला.
” आणि मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत… मी जेव्हा उषाला माहेरी जायला सांगितले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तिला साथ दिलीत… खरं तर तुम्हा बहीण भावांच कौतुक करावं तेवढं कमी आहे…म्हणजे प्रत्येक बाबतीत तुम्ही एकमेकांना किती साथ देता…देव करो प्रत्येकालाच अशी भावंडं मिळो…” प्रकाशराव म्हणाले.
प्रकाशराव सगळ्यांची भरभरून माफी मागत होते. ऊषा ताईंना मात्र कळून चुकले होते की त्यांच्या मनात नक्कीच कसलीतरी कालवाकालव सुरू आहे. या आधी एवढ्या खिन्न मनाने बोलताना तिने त्यांना कधीच पाहिले नव्हते. प्रकाशराव उषाताईंना घ्यायला आले होते.
उषाताई सुद्धा लगेच तयार झाल्या. घरच्यांनी त्यांना एक दिवस थांबण्याची विनंती केली पण पुन्हा कधीतरी येऊ म्हणून प्रकाशरावांनी त्या दिवशी निरोप घेतला. उषाताईंनी भावुक पणे माहेरच्यांचा निरोप घेतला. निखिल, उषाताई आणि प्रकाशरावांना त्या दिवशी घरी परतायला बराच उशीर झाला.
प्रकाशरावांना उषा आणि निखिल सोबत पाहून आजीला मनातून बरे वाटले. त्यांना माहिती होते की आता उषा घरातील कामे पूर्वीप्रमाणे सांभाळेल म्हणून. पण वरवर आपला आनंद न दाखवता त्या करड्या आवाजात उषाताईंना म्हणाल्या.
” या बाईसाहेब…आल्यात…छान आराम सुरू होता तिकडे माहेरी… इथली तर आठवण सुद्धा आली नसेल…इकडे सासू खपतेय… मरतेय काम करून…पण तुम्हाला आयते खायला भेटतेय म्हटल्यावर तुम्ही कसल्या स्वतःहून येताय घरी परत…”
यावर उषाताई गप्प बसल्या. प्रकाशराव मात्र त्यांच्या आईला म्हणाले.
” ती का येईल आई स्वतःहून परत…इथून अपमानित करून जायला सांगितल्यावर तिने स्वतःहून परत येण्याची आपण का म्हणून अपेक्षा करावी…”
” एकाच दिवसात काय जादू केली हिने… आजपर्यंत कधी आपल्या आईला उलट उत्तर नाहीस दिले तू…” त्यांची आई त्यांना म्हणाली.
प्रकाशराव मोठ्या आवाजात काही बोलणार इतक्यात उषाताईंनी नजरेनेच त्यांना आईला काहीही न बोलण्याची खूण केली. त्या सरशी प्रकाशराव गप्प बसले. उषाताई लगेच जाऊन स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. स्वयंपाक झाला अन् उषाताईंनी जेवायला वाढले.
पण प्रकाशराव मात्र त्या दिवशी जेवलेच नाहीत. काहीतरी बिनसलंय हे उषाताईंनी त्यांना पाहताक्षणीच ओळखले होते. रात्री प्रकाशरावांना झोप येत नव्हती म्हणून ते बाहेर अंगणात चकरा मारत होते. उषाताई त्यांना पाहून तिथे आली आणि त्यांना विचारले.
” काय झालंय…तुम्ही नीट जेवले सुद्धा नाही…आणि आता झोपत सुद्धा नाही आहात…?”
” झोप उडाली ग माझी…काहीच सुचत नाहीये मला…” प्रकाशराव म्हणाले.
” काय झालं…?” उषाताईंनी काळजीने विचारले.
” मी शालूताईच्या घरी गेलो होतो…” प्रकाशराव म्हणाले.
” हो…मला कळलं होतं ते…” उषाताई म्हणाल्या.
” शालू ताईंनी हट्टाने मला बाहेर नेले…कुठे जातोय ते मला कळत नव्हते पण अचानक रवीची आई दिसल्यावर मला कळले की शालू ताई मला रवीच्या घरी घेऊन गेलीय म्हणून…” प्रकाशरावांनी सांगितले.
” रवीच्या घरी…?” उषाताई आश्चर्याने म्हणाल्या.
” हो…” प्रकाशराव म्हणाले.
” मग तिथे काय झाले..ते लोक काही बोलले का तुम्हाला…?” उषाताईंनी काळजीने विचारले.
” नाही…ते माझ्याशी जरा जास्तच चांगले बोलले…रवीची बायको आहे सुजाता…तिची ओळख करून दिली…छान पाहुणचार केला…घराची श्रीमंती अगदी ओसंडून वाहत होती…” प्रकाशरावांनी सांगितले.
” मग…त्यांचे वैभव पाहून तुम्हाला वाईट वाटतंय का की नंदिनीचे लग्न त्याचाशी झाले नाही म्हणून…” उषाताईंनी प्रश्न केला.
” आधी तर तसेच वाटले होते…पण जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला माझ्या ह्याच विचाराची भीती वाटली ग…” प्रकाशराव म्हणाले.
” सत्य…कोणते सत्य…?” उषाताईंनी विचारले.
आणि मग प्रकाशरावांनी उषाताईंनी सगळेच सांगितले. उषाताई आणि त्यांच्या जाऊबाईंमध्ये जी बोलणी झाली होती ते सगळे प्रकाशरावांनी जसेच्या तसे उषाताईंना सांगितले. सगळं काही ऐकून घेतल्यावर उषाताई म्हणाल्या.
” काय…शालू ताई असेही वागू शकते…मला तर विश्र्वासच नाही बसत आहे या सगळ्यावर…” उषाताई उद्विग्णपणे म्हणाल्या.
” पण हेच सत्य आहे… शालूताई अशीच वागली आहे आपल्यासोबत… मी सुद्धा एखाद्या आंधळ्या माणसा सारखा विश्वास ठेवला ताईवर…” प्रकाशराव म्हणाले.
” विश्वास ठेवणं काही वाईट नाही…पण आंधळा विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे…” उषाताई म्हणाल्या.
” हो…बरोबर बोलत आहेस तू…आणि मला तुझं यासाठी सुद्धा खूप कौतुक वाटते…तू माझ्यावर विश्वास ठेवलास पण योग्य वेळी माझ्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेतलास…आज फक्त अन् फक्त तुझ्या निर्णयामुळे आपल्या नंदिनीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचलंय…तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत…” प्रकाशराव हात जोडत म्हणाले.
” जाऊद्या…जे झालं ते होऊन गेलं…ह्या सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की आपल्या नंदिनीचे आणि त्या रवीचे लग्न झाले नाही…बाकी आता कुठल्या गोष्टीचा आपण फारसा विचार करायचा नाही…” उषाताई म्हणाल्या.
” हो ग…नंदिनीचे लग्न झाले नाही ते एकाप्रकारे चांगलेच झाले…पण ती बिचारी सुजाता…ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना…देव करो अन् तिचं भलं होवो…त्या रवीची दारू सुटो आणि त्या दोघांनी सुखाने संसार करावा हीच प्रार्थना आहे देवाकडे…” प्रकाशराव म्हणाले.
आणि मग दोघेही शांतपणे झोपले. खूप दिवसांपासून मनावर असलेले ओझे उतरले होते. प्रकाशरावांना आता खूप हलके झाल्यासारखे वाटत होते. उषाताईंचा त्यांना खूप आधार वाटत होता. आता फक्त एकदा नंदिनीला भेटून तिची ख्याली खुशाली जाणून घ्यायची होती. सरला ताई आणि सुनील रावांना भेटून त्यांचे आभार मानायचे होते.
उषाताईंच्या मनाला सुद्धा नंदिनीची काळजी लागून होतीच. पण सोबतच त्या अनोळखी सुजाता बद्दल सुद्धा राहून राहून विचार येत होते. त्या अनोळखी मुलीसाठी ह्या दोघांचा जीव तुटत होता मात्र सुजाता च्या आईवडिलांना मुलीच्या सद्य परिस्थिती बद्दल फारशी कल्पना नव्हतीच.
सुजाताची परिस्थिती जैसे थे होती. रवी मध्ये काहीच सुधारणा नव्हती. रात्रभर बाहेर हुंदडणे आणि दिवसभर घरी बेडवर लोळत पडणे हीच त्याची दिनचर्या होती. रवीचे आई बाबा अन् बहीण सुजातावर सतत दबाव टाकायचे. रवीची दारू सोडव म्हणून.
सुजाताने सुद्धा एक दोनदा रवीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यासमोर तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. शेवटी आणखी एक प्रयत्न म्हणून त्या दिवशी सुजाताने त्याच्या दारूच्या बाटल्या बाथरूम मध्ये जाऊन खाली केल्या होत्या.
हे जेव्हा रवीला कळले तेव्हा त्याने इतर कशाचाही विचार न करता तिला मारायला सुरुवात केली. आजवर कधीच अशा परिस्थितीचा सामना केलेला नसल्याने सुजाता खूप जास्त घाबरली होती. ती भीतीने ओरडत होती पण रवीचे आई बाबा तिच्या मदतीला आले नाहीत. ना त्यांनी रवीला थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्या दिवशी नंतर सुजाता रवीपासून जास्तच घाबरायला लागली. रवीच्या आई बाबांना वाटायचे की सुजाताने रवीची दारू सोडवण्याचा प्रयत्न करावा पण त्या प्रयत्नात त्यांना तिची कुठलीही साथ द्यायची नव्हती. ते आता रवीच्या बाजूने निश्चिंत झाले होते.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
सुजाता रवीची दारू सोडवू शकेल का…? प्रकाशराव आणि उषाताई नंदिनीला भेटतील तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल…? नंदिनी आणि नकुलच्या आयुष्यात ही सुखाची नांदी असेल का…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.