आजीला आज खरोखरच खूप जास्त पश्चात्ताप होत होता. शालू ने जे काही केले ते उषा ला माहिती होते तरीही ती गप्प राहिली. तिच्या जागी कुणी दुसरी असती तर ह्या गोष्टीचा फायदा घेऊन घरात कलह केला असता. उषा आधीपासून खूपच सहनशील आणि संयमी व्यक्ती आहे हे आजी आधीपासूनच जाणून होत्या.
पण त्यांना ते कबूल करायचे नव्हते. त्यांच्या मते त्यांनी जर उषा ला चांगले म्हटले तर तिचं घरातील महत्त्व वाढेल अन् त्यांचं कमी होईल म्हणून. पण खऱ्या अर्थाने उषा घर जोडणारी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे ह्याची आज जाणीव झाली होती नंदिनीच्या आजीला.
उषाताई सुद्धा मोठ्या मनाने झाले गेले ते सगळं विसरल्या. सासूबाईंना सांगितलं की मला तुमच्या बोलण्याचे वाईट वाटायचे नाही. फक्त त्यामुळे आपल्यात कधी सुसंवाद होऊ शकला नाही ह्याचं वाईट वाटतं. आजीला सुद्धा याची जाणीव झालेली होतीच. माधवरावांना सुद्धा रवीच्या जाण्याने धक्का बसला होता.
या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेली नंदिनी आपल्या रोजच्याच दिनक्रमानुसार चालत होती. नकुल सोबत कॉलेज ला जायची. संध्याकाळी त्याच्यासोबत घरी यायची. कॉलेज सुरू होऊन आता आठवडा उलटला होता. दोघांमध्ये बोलणं व्हायचं पण नकुल आता थोडा कमीच बोलायचा. हिच्या मात्र ते लक्षातच यायचं नाही.
एके दिवशी नंदिनी बाहेर ओट्यावर बसलेल्या नकुल ला चहासाठी बोलवायला म्हणून बाहेर आली. ती त्याला आवाज देणार इतक्यातच एक मुलगी समोरून एकदमच उत्साहात धावत आली. नंदिनी तिच्याकडे पहातच होती आणि एकदमच ती मुलगी नकुलच्या जवळ आली. नकुलला म्हणाली.
” हाय नकुल्या…काय करत आहेस…?”
तिला पाहून नकुल आश्चर्याने म्हणाला.
” तू…तू कधी आलीस…? मला सांगितलं सुद्धा नाहीस…आणि हे नकुल्या नको ना म्हणत जाऊस मला…”
” का रे.. आवडत नाही वाटतं तुला…” ती म्हणाली.
” नाही आवडत…” नकुल म्हणाला.
” पण छान वाटतं म्हणायला…” ती म्हणाली.
” आता काय आपण एवढे लहान नाही आहोत ना चिडवायला…” नकुल म्हणाला.
” चिडवायला नाही म्हणत आहे रे…छान वाटतं म्हणायला म्हणून म्हणते…पण एक मात्र तू खरं बोललास बरं का…आपण आता लहान राहिलो नाही ते…आईने सांगितलं मला तुझं लग्न झाल्याचं…” ती म्हणाली.
” हो का…” नकुल थंडपणे म्हणाला.
” हो…लग्नात बोलवायचं तर दूर पण लग्न झाल्याचं कळवलं सुद्धा नाही तू मला…” ती म्हणाली.
” अगं ते इतक्या घाईघाईने झालं ना की कळवताच आलं नाही…” नकुल म्हणाला.
” ते जाऊदे आता…पण मी आता आली आहे ना… चल भेटव तरी तुझा बायकोशी…” ती म्हणाली.
” चल ना…आत चल…” असे म्हणून नकुल आतमध्ये यायला निघाला. इतक्यात त्याचे लक्ष नंदिनी कडे गेले. तिला पाहून तो म्हणाला.
” अगं नंदिनी..” तो काही बोलणार त्या आधी ती मुलगी मध्येच बोलली.
” अच्छा…तर ही आहे आमच्या नकुल्याची बायको…”
नकुल ने तिच्याकडे पाहिले आणि तो तिला म्हणाला.
” हो…ही नंदिनी आहे…” आणि मग तिच्याकडे पाहत म्हणाला.
” आणि नंदिनी ही मुग्धा आहे…माझी मैत्रीण…”
” हाय नंदिनी…कशी आहेस… आई सांगत होती त्याप्रमाणे तू खरंच खूप सुंदर आहेस…” मुग्धा म्हणाली.
त्यावर नंदिनी गालातल्या गालात हसत तिला थँक यू म्हणाली. त्यानंतर नकुल आणि मुग्धा आत निघून आले. नंदिनी सुद्धा आत मध्ये आली. तिला पाहून सरला आत्या म्हणाली.
” अगं मुग्धा…आलीस होय…यावेळेला खूप दिवसांनी आलीस…”
” हो काकू…आधी खूप साऱ्या सुट्ट्या जमा करून ठेवल्यात आणि आता त्या सुट्ट्या खर्च करणार आहे…म्हणजे गौरी गणपती साठी मुद्दामहून जास्त सुट्ट्या घेऊन आलीय…” मुग्धा म्हणाली.
” बरं केलंस…अगं सणवार आपल्या घरातल्या लोकांसोबतच साजरे करायचे असतात…तू आल्याने बघ किती छान वाटतंय…” सरला आत्या म्हणाली.
” हो काकू…म्हणूनच आलेय…” मुग्धा म्हणाली.
मग आत्याने नंदिनी कडे पाहिले आणि त्या म्हणाल्या.
” नंदिनी… जा…नकुल आणि मुग्धा साठी चहा घेऊन ये…”
” हो आत्या…”
असे म्हणून नंदिनी चहा ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. काम सगळं लक्ष मात्र या दोघांकडेच लागले होते. त्या दोघांच्या बोलण्यावरून तरी त्या दोघांची चांगलीच जवळची मैत्री असल्याचे वाटत होते. स्वयंपाकघरातल्या खिडकीमधून तिचं लक्ष वारंवार बाहेरच्या खिडकी कडे जात होतं.
दोघेही अगदीच मोकळेपणाने बोलत होते. दोघांमध्ये खूप चांगली बाँडींग वाटत होती. नंदिनीच्या मनात विचार आला की हा आपल्याशी बोलताना कधी एवढा आनंदी नसतो हा. आज बरा खुशीत दिसतोय. पण चेहऱ्यावर तसे काही न दाखवता ती दोघांसाठी सुद्धा चहा घेऊन आली.
त्यानंतर ती घरातील बाकीच्या कामांमध्ये लागली. मुग्धा आणि नकुलच्या गोष्टी अजूनही सुरूच होत्या. नंदिनीचे मात्र कामात लक्ष लागत नव्हते. थोडा वेळ थांबून मुग्धा घरी जायला निघाली. जाताना आठवणीने नंदिनीला बाय केले आणि आपल्या घरी यायचे आमंत्रण सुद्धा दिले.
मुग्धा घरातून गेली असली तरी नंदिनीच्या मनातून मात्र गेली नाही. मुग्धा आणि नकुल ची मैत्री पाहून नंदिनीच्या मनात कुठेतरी काहीतरी जळत होतं. पण तिला त्याची सध्यातरी जाणीव होत नव्हती. तिला मुग्धाचं असं अचानक तिच्या घरी आणि तिच्या आयुष्यात येणं फारसं आवडलं नव्हतं.
मात्र मुग्धाचं घरी येणं सुरूच होतं. नकुल ऑफिसमधून आला की मुग्धा कधीतरी घरी यायची. आणि मग पुन्हा दोघांच्या गप्पा रंगायच्या. दोघांना एकत्र हसताना आणि बोलताना पाहून नंदीनीचा जळफळाट व्हायला लागला होता.
इकडे रवीची तेरवी आटोपली आणि दुसऱ्या दिवशी घरातील बहुतांश पाहुणे मंडळी निघून गेली. सुजाताचे आई, बाबा सुद्धा आले होते. ते सुद्धा जायला निघाले. सुजाता तर जणू आपल्या शुद्धितच नव्हती. इतक्या कमी वयात तिने खूप संकटे पहिली होती आणि रवीच्या जाण्याने ती पार कोलमडून गेली होती.
आई बाबा घरी जात असताना सुजाताला आपले अश्रू थांबवता येत नव्हते. सुजाता रडतच होती. आपण चाललोय ते सुजाताच्या सासू सासर्यांना सांगून मग निघावे म्हणून ते दोघेही त्यांच्याकडे आले. त्यांना पाहून म्हणाले.
” जे झालं ते खूपच वाईट झालं…देवाने रवी रावांच्या बाबतीत खूप घाई केली…तशी तर या दुःखाच्या घडीला तुम्हा सर्वांच्या सोबत राहावे अशी आमचीही खूप इच्छा आहे पण आम्हाला आता निघावे लागेल…आमच्या सुजाताला सांभाळून घ्या…काही चूक झाली असेल तर पदरात घ्या…आता तुम्हीच तिचे सर्वकाही आहात…”
त्यांचे बोलणे ऐकून रवीची आई म्हणाली.
” काय म्हणालात तुम्ही…? सुजाताला सांभाळा…म्हणजे तुम्ही तिला सोबत घेऊन जाणार नाही आहात का…?”
आता मात्र सुजाताचे आई अन् बाबा दोघेही एकदम चमकले. ते त्यांना म्हणाले.
” अहो आम्ही असे कसे नेणार…? ती आता तुमच्या घरची सून आहे…या दुःखाच्या घडीत तुमच्यासोबत असायला हवी ना ती…”
” आता आमचा मुलगाच नाही राहिला तर ही सून कसली…? आणि आम्हाला आमची मुलगी आहे सांभाळायला…ही तुमची अपशकुनी मुलगी नको आम्हाला आमच्या घरात…आमच्या मुलाला तर गिळले हिने…आता काय आमच्या जीवावर उठणार आहे का..?” रवीचे बाबा म्हणाले.
” अहो असे नका म्हणून…ती कुठे जाईल…आता हेच तिचे घर आहे…तुम्हीच तिचे पालनकर्ता आहात…लग्न झाल्यावर मुलीचे सासर हेच तिचे घर असते…तिला आम्ही माघारी घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील…आम्हाला आणखी चार मुली आहेत…त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल ना आम्हाला…” सुजाताचे बाबा म्हणाले.
” तो तुमचा विचार आहे…काय करायचे कसे करायचे ते तुमचं तुम्ही बघा…पण आम्ही आता हिला आमच्या घरात ठेवून घेणार नाही…आता तिचा उपयोग काय घरात…?” रवीची आई म्हणाली.
” असे नका म्हणू…तिचा काही त्रास होणार नाही तुम्हाला…जसे तुम्ही ठेवाल तशी राहून घेईल ती…काही तक्रार करणार नाही…घरातली कामे सुद्धा करेल…पण तिला कायमचं माहेरी घेऊन जायला नका सांगू…” सुजाताचे वडील म्हणाले.
बाजूच्या खोलीतून सुजाताला आपल्या आईवडिलांचे आणि सासरच्या लोकांचे बोलणे ऐकू येत होते. सासरच्या मंडळींकडून तिला हीच अपेक्षा होती पण वडिलांचे बोलणे ऐकून सुजाताला धक्काच बसला. तिला असे वाटले की आता ह्या जगात तिचे सख्खे कुणी उरलेच नाही.
सासरचे ठेवून घ्यायला तयार नाहीत. माहेरचे सोबत घेऊन जायला तयार नाहीत. ती सगळ्यांना नकोशी झालीय. इतके दुःख सहन केल्यावरही इतका दुस्वास सहन करावा लागणे या सारखे दुःख आणखी कोणते असेल. ती दुःखातिवेगाणे खाली जमिनीवर बसली.
इकडे सुजाताची आई हळूच तिच्या बाबांना म्हणाली.
” आपण जाऊया ना सुजाताला सोबत घेऊन…हे लोक पोरीला खूप त्रास देतील हो…”
” काहीही नको बोलूस…लोकांना काय तोंड दाखवणार आहोत…सुजाता ला इतकं श्रीमंत सासर मिळालं म्हणून आजवर सगळ्या नातेवाईकांमध्ये, गावातल्या लोकांमध्ये किती मिरवलो होतो आपण…आता हिला सोबत घेऊन गेलो तर लोक किती नाव ठेवतील…म्हणतील सासरच्यांनी घरातून काढून दिले हिला…
ही इथे राहील तर आपली इभ्रत तरी बनून राहील…आणि आता हे लोक रागात आहेत म्हणून असे म्हणत आहेत…काही दिवस सुजाता ला त्रास सुद्धा देतील…अनेक मुलींना सासरी जाच सहन करावा लागतो…पण काही दिवसांनी सगळं नीट होईल…स्वीकारतील तिला…तू काळजी नकोस करू…” सुजाताचे वडील म्हणाले.
मग सुजाताची आई सुद्धा गप्प बसली.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
सुजाताचे सासू सासरे तिला घरात ठेवून घेतील का…? तिला आता कोण आधार देईल…?” मुग्धाच्या येण्याने नकुल आणि नंदिनी च्या नात्याला कोणते वेगळे वळण येईल…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग पाहायला विसरू नका.