अवघ्या दीड वर्षांच्या अर्णवला सोडून वैदेही देवाघरी गेली. अर्णव वर्षभराचा होता तेव्हाच वैदेहीच्या किडनीला इन्फेक्शन झाल्याचे कळले होते. त्यानंतर बरेच उपचार केलेत. किडनी साठी डोनर पण शोधला. वैदेही च्या वहिनीची राधाची किडनी वैदेही ला मॅच पण झाली होती. पण ऑपरेशनच्या आधीच वैदेहीची तब्येत खूप खराब झाली. अन् वैदेहीला वाचवता आले नाही. अजय तर बायकोच्या जाण्याने खूप दुःखी होता. आता कुठे तर वैदेही अन् त्याने संसाराची सुरुवात केली होती आणि ती त्याला अशी एकट्याला सोडून गेली होती.
अजय स्वतःच्याच दुःखामध्ये गुरफटून गेला होता. लहानग्या अर्णवकडे त्याचे जास्त लक्ष नव्हतेच. वैदेहीचे दिवस कार्य होईस्तोवर वैदेहीच्या आईने आणि वहिनीने अर्णवला फुलासारखे जपले होते. पण अधून मधून निमाताई यायच्या आणि अर्णवला जवळपास जबरदस्तीच स्वतःजवळ घ्यायच्या.
अर्णवच्या बाबतीत त्यांच्या मनात एक अनामिक भीती होती. अन् एके दिवशी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले सुद्धा. वैदेहीचे दिवस कार्य आटोपल्यावर घरी जायला निघालेल्या तिच्या माहेरच्या माणसांनी जरा घुटमळतच विषय काढला. सर्वात आधी वैदेहीची आई म्हणाली.
” निमाताई…झालं ते खूपच वाईट झालं…माझ्या लेकीच्या जाण्याने आयुष्यभराचे दुःख माझ्या वाट्याला आले…तुम्हीसुद्धा तुमची सून गमावलीत…पण यात सगळ्यात जास्त वाईट कुणासोबत झाले असेल तर ते अर्णवसोबत… जन्मल्यावर आईचा सहवास जराही नाही भेटला त्याला…आईविना पोर कसं राहील ह्याचीच काळजी वाटते…तुमची काही हरकत नसेल तर माझी एक विनंती आहे…”
” काय…?” निमाताईंनी साशंकतेने विचारले.
” मी अर्णवला माझ्या सोबत घेऊन जाऊ का…? मी अन् राधा त्याची काळजी घेऊ…जरा मोठा झाला की तुम्ही घेऊन जा हवं तर…” वैदेहीची आई चाचरत म्हणाली.
यावर अतिशय रागाने नीमाताई म्हणाल्या.
” मला वाटलेच होते की तुमची नजर माझ्या नातवावर आहे…म्हणूनच इतके दिवस त्याला अजिबात सोडत नव्हत्या…तो आमच्या घराचा वारस आहे…त्याला का म्हणून आम्ही तुमच्या सोबत पाठवू…माझा मुलगा समर्थ आहे अर्णवला सांभाळायला…तुम्ही त्याची काळजी नका करू…”
” हे बघा…तुम्ही चुकीचं समजताय…तो खूप लहान आहे…त्याला सध्या खूप जपावं लागेल…तुमच्या एकटीच्याने नाही होणार म्हणून म्हणतेय…हवं तर तुम्ही सुद्धा अधून मधून येत जा…आणि तो जरा मोठा झाला की त्याला घेऊन जा…पण यावेळी त्याला खूप जपायला हवे…” वैदेहीची आई जवळपास काकुळतीला येत म्हणाली.
” तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळणार नाही असे समजू नका…मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे ते…तुम्हाला तुमच्या या वांझ सुनेसाठी बाळ हवंय म्हणून तुम्ही माझ्या नातवावर नजर ठेऊन आहेत हे न कळण्याईतकी भोळी नाही मी…माझ्या घराचा वारस मी तुम्हाला देईल असा स्वप्नातही विचार करायचा नाही…” निमाताई फणकार्याने म्हणाल्या.
निमाताईंचे बोलणे वैदेहीच्या वहिनीच्या म्हणजेच राधाच्या जिव्हारी लागले. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ती तिथून निघून बाहेर अंगणात आली. पाठोपाठ वैदेहीचा भाऊ विजय सुद्धा बाहेर आला आणि तिची समजूत काढू लागला. वैदेहीच्या आईने मात्र एक शेवटचा प्रयत्न म्हणून अजयकडे पाहिले आणि म्हणाल्या.
” अजयराव…तुम्ही तरी समजून घ्या…अर्णवला आता आपल्या सगळ्यांचीच गरज आहे…आपण हवं तर सगळे मिळून त्याची काळजी घेऊ…”
त्यावर अजय खिन्नतेने म्हणाला.
” तुमचं म्हणणं मला कळतंय…पण आई सुद्धा बरोबर बोलतेय…आम्ही सुद्धा अर्णवची काळजी चांगली घेऊ शकतो…तुम्ही काळजी करू नका…माझ्या अन् वैदेही च्या बाळाला मी काहीच कमी पडू देणार नाही…”
आता मात्र वैदेहीच्या आईचा नाईलाज झाला. खिन्न मनाने त्या तिथून बाहेर पडल्या. बाहेर आल्यावर राधाला पाहिले आणि त्या म्हणाल्या.
” राधा…तू त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस…”
” नाही आई…त्या बोलल्या त्याच एवढं वाईट नाही वाटलं मला…आजकाल हे ऐकण्याची सवय झाली आहे मला…पण वाईट त्या लहान जीवासाठी वाटतंय…कसा राहणार तो आईशिवाय…त्याच्या आजीचं सुद्धा वय झालंय…त्या कशा सांभाळणार त्याला…आणि अजय दादा कितीही म्हटलं तरी पुरुषच आहेत ना…आईच्या मायेने कसे सांभाळणार आहेत ते त्याला…” म्हणता म्हणता राधाच्या डोळ्यात पाणी आले.
वैदेहीची आई सुद्धा मुलीच्या आठवणी ने सैरभैर झाली होती. पहिल्या बाळंतपणात माहेरी पाठवा म्हणून खूप विनंती केली होती त्यांनी. पण वैदेहीच्या सासूबाईंना म्हणे त्यांचा वारस त्यांच्या घरीच जन्म घ्यायला हवा होता. मग वैदेही बाळंतपणात माहेरी येऊच शकली नाही.
वैदेहीने बाळाच्या येण्याचे खूप स्वप्न पाहिले होते. मुलगा झाला तर अर्णव आणि मुलगी झाली तर आनंदी हे नाव तिने आधीच विचार करून ठेवले होते. पण नियतीच्या समोर कुणाचे काही चालले नाही आणि वैदेही तिचे मातृत्व जगण्याच्या आधीच या जगातून निघून गेली.
निमाताई आणि अजयने नकार दिल्याने वैदेहीच्या माहेरचे लहानग्या अर्णवला सोबत घेऊन जाऊ शकले नाही. सुरुवातीला मोठ्या जोशात येऊन निमाताईने अर्णवची जबाबदारी घेतली. पण त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना ती जबाबदारी व्यवस्थित झेपत नव्हती.
लहान बाळाची आंघोळ करणे, त्याला खाऊ घालने, त्याच्या तब्येतीला जपणे, त्याला खेळवणे एवढे करून त्या पार थकून जायच्या. त्यामध्ये अजयला स्वतःच्या दुःखातून बाहेरच यायचं नव्हतं म्हणून त्याच्याकडून अर्णवला सांभाळण्यात निमाताईंना काहीच मदत होत नव्हती.
एका क्षणी तर त्यांच्या डोक्यात विचार सुद्धा तरळून गेला की अर्णवला काही दिवसांपूरते वैदेहीच्या माहेरी पाठवले असते तर बरे झाले असते. पण आपल्या घराण्याचा वारस असा त्यांच्या घरी ठेवणे ही कल्पना सुद्धा त्यांना करवत नव्हती. म्हणून मग त्यांनी अजयचे दुसरे लग्न लावून द्यायचे ठरवले. तसे त्यांनी नातेवाईकांना सुद्धा सांगितले की एखादी मुलगी सुचवा म्हणून.
अजय ने तर सुरुवातीला नकारच दिला. पण निमाताईंनी वारंवार विचारल्यावर त्याने अर्णवसाठी म्हणून त्याने होकार दिला. मग दोन चार मुली पाहून झाल्यानंतर कल्पना त्यांच्या पसंतीस उतरली. कल्पना एका साधारण घरातील मुलगी होती. म्हणूनच अजय सारख्या बिजवर आणि एका मुलाच्या बापाला द्यायला तिचे घरचे लगेच तयार झाले.
अजय दिसायला सुद्धा चांगलाच रुबाबदार आणि परिस्थितीने संपन्न होता. नोकरी सुद्धा चांगली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाला फारशी अडचण येणार नव्हतीच. बीजवर आणि एका मुलाचा बाप असला तरीही. दोन्हीकडची पसंती पार पडली आणि एक चांगला मुहूर्त पाहून दोघांचेही साधेपणाने लग्न लावून दिले.
कल्पना सून म्हणून निमाताईंच्या घरात आली. सुरुवातीला तिने घरच्यांची मने जिंकण्याचे बरेच प्रयत्न केले. निमाताई तर लगेच तिच्यावर प्रसन्न झाल्या आणि घराची आणि अर्णवची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवून मोकळ्या झाल्या. हळूहळू अजय सुद्धा वैदेहीच्या आठवणींना मागे ठेवून कल्पनाच्या प्रेमात आकंठ बुडाला. काहीही झालं तरी पुरुषच तो.
कल्पना सुद्धा अर्णवला छान सांभाळत होती. लहानग्या अर्णवला कल्पनाचा लळा लागला होता. अशातच एके दिवशी अजयने सांगितले की तो आणि कल्पना आठ दिवसांकरिता बाहेर फिरायला जाणार आहेत. निमा ताईंना बरे वाटले की अजय आता त्याच्या संसारात रुळतो आहे.
म्हणून त्यांनी आठ दिवसांपूरती घरादाराची आणि अर्णवची जबाबदारी सहर्ष स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दोघांना बाहेर फिरायला पाठवले. वय झाल्याने आणि बऱ्याच दिवसांपासून कामांची सवय नसल्याने त्यांना आता जरा कठीण जात होते. पण आठ दिवसांचाच प्रश्न असल्याने त्यांनी ते ही निभावून नेले.
आठ दिवसांनी अजय आणि कल्पना परत आले. पण या आठ दिवसात अजय मध्ये बराच फरक पडला होता. अजयच्या बोलण्यात आता फक्त कल्पनाचाच उच्चार व्हायचा. सुरुवातीला ऑफिसवरून आला की अर्णव ला जवळ घेऊन बसणारा आणि आईशी गप्पा मारणारा अजय आता ऑफिसमधून आला की सरळ किचनमध्ये कल्पना जवळ जाई. अन् जेवण आटोपले की लगेच बेडरूम मध्ये.
त्याच्या विश्वात आता जणू कल्पना आणि फक्त कल्पनाच महत्त्वाची होती. त्यामुळे आता कल्पना सुद्धा घरच्या कामात आणि अर्णवला सांभाळण्यात कुचराई करू लागली होती. घरकामात सुद्धा ती निमाताईंकडून मदत घ्यायला लागली होती. बरीच कामे ती तशीच राहू देई आणि दुपारी आराम करायला खोलीत जाताना निमा ताईंना सांगायला लागली की मी झोपायला जातेय. मी उठेस्तोवर भांडी घासून घ्याल, वगैरे.
क्रमशः
मराठी कथा / वारस – भाग ३