आज लक्ष्मीला उठायला पुन्हा उशीरच झाला होता. रात्रभर रडून डोळे पार सुजले होते. तिने मनातून बरेचदा प्रयत्न केला की आता आणखी अश्रू नाही गाळणार. पण हा तिचा प्रयत्न नेहमीच फसायचा. माधवची आठवण आली की तिला रडू यायचेच. त्याला जाऊन आता दोन महिने झाले होते. संसाराची वीस वर्षे सोबत घालवल्यावर पुढील प्रवासा करिता तो एकटाच दुसऱ्या जगात निघून गेला होता. माधव म्हणजे लक्ष्मीच संपूर्ण जग. त्याच्याशिवाय जगात तिचं आपलं असं कोणीच नव्हतं. लग्नाला वीस वर्षे झाली तरी ना पदरात मूलबाळ होतं ना माहेरच कोणी राहिलं होतं.
तिच्या वहिनीने एकदा तिला वांझ म्हटलं तेव्हा माधवला तो शब्द खूप जिव्हारी लागला. त्याने लगेच त्याची नाराजी बोलून दाखवली आणि त्वेषाने लक्ष्मीचा हात पकडुन तिला घरी परत घेऊन आला होता. त्या प्रसंगा पासून तिचं माहेर तिला दुरावले होते. अधून मधून आई तिला भेटायला तिच्या घरी यायची पण ती गेल्यावर नाही कायमचं तुटलच.
सासरी तर त्याहून वाईट परिस्थिती होती. तिच्या धाकट्या जाऊला मुलं झाली तरीही हिला मुल नाही म्हणून हिच्या सासूने हीचा अतोनात छळ केला. त्यावेळी माधव सुद्धा बरेचदा कामानिमित्ताने गावापासून दूर शहरात राहायचा. पण शनिवार रविवार तो आवर्जून घरी यायचा तेव्हा लक्ष्मी ला पाहूनच त्याला कळायचं की तिला खूप त्रास होतोय.
पण ती माधवला काहीच सांगायची नाही. तिला वाटायचे की आधीच आपण माधवला मुलाबाळांचे सुख देऊ शकत नाही आहे आणि आता त्याला आणखी काही सांगितले तर त्याला उगाच मनस्ताप होईल म्हणून ती निमूटपणे सगळंच सहन करायची.
पण एके दिवशी कहरच झाला. तिच्या जाऊचा मुलगा आजारी पडला आणि सासूने हिच्या नावाने खडी फोडायला सुरुवात केली. हिनेच मुलाला काहीतरी केलं असावं असा कांगावा त्यांनी केला. आणि लक्ष्मीला नको ते बोलल्या. लक्ष्मी खाली मान घालून एकसारखी रडत होती आणि नेमका त्याच दिवशी माधव काहीही कल्पना न देता घरी लवकर आला होता.
त्याने सगळं काही ऐकलं. आणि आईजवळ जाऊन तिच्या या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पण आईने उलट त्यालाच लक्ष्मी विरुद्ध भडकवायला सुरुवात केली. लक्ष्मी अपशकुनी आहे. ती तुला मुलाचं दुःख देऊ शकत नाही असे म्हणून तिला कायमचं तिच्या माहेरी सोडून यायला सांगितलं. पण माधवचे लक्ष्मीवर जीवापाड प्रेम होते. आणि तो काहीही झाले तरी लक्ष्मीला स्वतःपासून वेगळं होऊ देणार नव्हता.
म्हणून मग त्याने लक्ष्मीला घेऊन वेगळं राहायचं ठरवलं. अर्थातच लक्ष्मीने सुरुवातीला वेगळं राहायला विरोधच केला. तिला माय लेकाला वेगळं करायचं नव्हतं. एक क्षण तर असा आला जेव्हा लक्ष्मी माधवला म्हणाली की तुम्ही मुलासाठी दुसरं लग्न करा म्हणून. पण माधवने तिला हे म्हणून गप्प केले की जर त्याच्यात काही दोष असता तर तिने त्याला सोडलं असतं का म्हणून.
आणि माधव आणि लक्ष्मी वेगळे राहू लागले. आपल्या घराच्या गोठ्याजवळ एक लहानशी झोपडी बांधून तिथे त्यांनी स्वतःचा संसार उभा केला. त्या दोघांना घरून कोणतीच मदत मिळाली नाही. माधवच्या आई बाबांच्या मते माधव आणि लक्ष्मीला मुले नाहीत तर त्यांना घरच्या संपत्तीतील कवडी सुद्धा मिळणार नाही.
उलट माधवच्या घरच्यांनी त्या दोघांशी बोलणे सुद्धा सोडून दिले होते. पण माधवने हार मानली नाही आणि परमेश्वर कृपेने माधवला त्याच्या कामात यश मिळू लागले. नंतर माधवने शेती करण्यासाठी उपयुक्त असलेले यंत्र विकत घेतले आणि त्याचे दिवसच पालटले. लवकरच दोघांनी त्यांच्या झोपडीच्या जागी सुंदर घर उभे केले आणि शेतीसाठी सुद्धा आणखी काही यंत्रे विकत घेतली. आणि कामावर दोन माणसे सुद्धा ठेवली.
ह्यांची परिस्थिती पालटल्यावर माधवच्या घरच्यांनी पुन्हा माधवशी बोलायला सुरुवात केली होती. माधव आणि लक्ष्मीने सुद्धा मागील सगळे काही विसरून सगळ्यांना मनापासून स्वीकारले होते. पण अजूनही माधवच्या घरच्यांच्या मनात लक्ष्मी बद्दल राग होताच. फक्त ते तिच्यासमोर गोड बोलायचे पण मनात मात्र तिच्याबद्दल अढी होतीच.
माधवने आता बरीच संपत्ती जमवली होती. माधव आणि लक्ष्मीच्या गरजा मात्र त्यामानाने मर्यादित होत्या. त्यामुळे माधव आपल्या भावासाठी, त्याच्या मुलांसाठी त्याला जमेल ते सगळेच करायचा. त्याला वाटायचे की भावाची मुलं म्हणजेच त्याची मुलं.
पण आपली आई आणि घरचे लक्ष्मीला अजूनही ती जशी आहे तशी स्वीकारू शकले नाहीत आणि मनातून तिचा तिरस्कार करतात हे देखील माधव चांगलेच जाणून होता. पण तो सगळ्यांचं मन जपायचा प्रयत्न करायचा. आणि एकंदरीत त्याचे आयुष्य आता चांगलेच स्थिरस्थावर झाले होते. आता उतारवयात त्याला लक्ष्मी सोबत शांततेत जगायचे होते.
पण ऐन पंचेचाळीसव्या वर्षी माधवला हार्टअटॅक आला आणि होत्याच नव्हतं झालं. लक्ष्मीचा आधारच जणू काळाने हिरावून घेतला होता. लक्ष्मी एकटीच कशीबशी जगत होती. माधव ने जो कामाचा एवढा सारा व्याप वाढवून ठेवला होता तो देखील तसाच पडला होता. लक्ष्मी सारखाच. निराधार.
कामावरील माणसे यायची आणि लक्ष्मीला विचारायची की आता पुढे काय करायचं. काम पुन्हा कधीपासून सुरू करायचं. पण लक्ष्मी काहीही करण्याच्या बा समजण्याच्या मनस्थिती त नव्हतीच. मग तिची अवस्था त्यांना सुद्धा कळायची आणि ते काहीही न बोलता निघून जायचे. लक्ष्मी आता फक्त माधव च्या आठवणीत राहायची. तिला ना वेळेवर जेवण करण्याचे भान असे ना इतर गोष्टींचे.
आजही लक्ष्मी तशीच काहीशी उठली होती. घराबाहेर असलेल्या झोपाळ्यासमोर एकटक पाहत बसलेली होती. इतक्यात गेटचा आवाज आला. आता कोण आलं असेल म्हणून लक्ष्मी lने तिकडे पाहिले तर समोर सासुबाई उभ्या होत्या. त्यांना पाहून लक्ष्मी जरा अवघडूनच उभी राहिली. त्यांचं यावेळी इथे असणं लक्ष्मीला जरा अनपेक्षित च होतं.
कारण इतक्या वर्षांत त्यांच्यामध्ये फक्त जुजबी बोलणं व्हायचं. ते ही माधव हा दुवा होता म्हणून. माधव गेल्यावर सुद्धा सासुबाई तिच्याशी फार काही बोललेल्या नव्हत्या. पण आज त्या अचानक तिच्याकडे आल्या होत्या. आणि सोबत एक कपड्यांची पिशवी सुद्धा होती. लक्ष्मीला काही कळलं नाही. म्हणून मग तिने त्यांना विचारलेच.
” आई…तुम्ही इथे…?”
” हो…म्हटलं तू एकटीच राहतेस इथे…तुला असावी कुणाची तरी सोबत म्हणून इथेच राहायला आले…” सासुबाई म्हणाल्या.
आणि सासूबाईंचे बोलणे ऐकून लक्ष्मीला खूप आनंद झाला. आज इतक्या वर्षांनी तिच्या सासूबाईंनी तिच्या मनाचा इतका विचार केला होता. आणि या एकटेपणाला सुद्धा ती कंटाळली होती. माधव असताना सासुबाई इथे राहायला आल्या असत्या तर त्याला किती आनंद झाला ही कल्पना देखील तिला खूप सुखावून गेली.
तिने आज जरा उत्साहाने च सासूबाईंची बॅग स्वतःच्या हाती घेतली आणि त्यांना आतमध्ये घेऊन गेली. इतके दिवस वेळेवर स्वयंपाक न करणाऱ्या लक्ष्मीने आज मात्र अगदी वेळेवर जेवण बनवले. आणि आग्रहाने सासूबाईंना जेवण वाढले. सासूबाईंच्या येण्याने थोडाफार का होईना तिचा एकटेपणा दूर झाला होता.
लक्ष्मी आता सकाळीच उठायला लागली होती. सासूबाईंसाठी वेळेवर चहा नाश्ता आणि जेवण बनवायची. सासुबाई सुद्धा घरात चांगल्या मिसळल्या होत्या. आता त्या घरातील कामांकडे सुद्धा लक्ष देऊ लागल्या होत्या. काय हवं काय नको ते बघत होत्या. लक्ष्मीची जाऊ सुद्धा दिवसातून दोन तीनदा येऊन जायची. लक्ष्मीच्या जाऊची दोन्ही मुले सुद्धा आता रोजच घरी यायची. सासूबाईंनी त्या दोघांच्या सोबतीने मजुरांना सुद्धा व्यवस्थित कामाच्या सूचना देत होत्या. लक्ष्मीचं घर आता बऱ्यापैकी स्थिर स्थावर होत होतं.
पण हे वरवर जितकं साधं, सरळ आणि चांगलं दिसत होतं तितकं चांगल ते नक्कीच नव्हतं. आजवर लक्ष्मीचा राग राग करणारी सासू आणि जाऊ तिच्याशी अचानक चांगल्या वागू लागल्या होत्या. लक्ष्मीला तर हे बघून चांगलच वाटत होतं. पण प्रत्यक्षात जे जसं दिसत होतं तसं ते नक्कीच नव्हतं.
क्रमशः
मी कात टाकली – भाग २ (अंतिम भाग)