लक्ष्मीच्या सासूबाईंना आणि तिच्या दिराला ही सगळी संपत्ती हवी होती. त्यांच्यामते लक्ष्मीने पुढे चालून हे सगळं तिच्या माहेरच्या कुणाला दिलं तर त्यांना काहीच मिळणार नाही. आणि त्यांच्या मुलाच्या संपत्तीवर त्यांचा आणि त्यांच्या नातवांचाच अधिकार आहे. तसेही लक्ष्मी त्यांना फारशी आवडत नव्हतीच. त्यांना वाटलं की आधी सगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या आणि नंतर लक्ष्मीला घरातून काढून द्यायचे.
आणि सगळं काही अगदी त्यांच्या मनाप्रमाणे झालं. लक्ष्मी ने आपल्या दुःखात सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. तिच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की घरातील सगळेच अशा कठीण प्रसंगी तिच्या मदतीला आहेत. इकडे जाऊच्या मुलांनी सगळा व्यवहार आपल्या हाती घेतला आणि लक्ष्मीला यात काहीच गैर वाटले नाही. कारण तिला संपत्ती चा कधीच मोह नव्हता. तुला माहिती होते की आपल्याकडे जे काही आहे ते सगळे ह्यांचेच आहे. अगदी आज माधव आपल्यात असता तर त्यालाही असेच वाटले असते असेही तिला या क्षणी वाटत होते.
पण एके दिवशी लक्ष्मीच्या सासूने लक्ष्मीचे सामान तिच्या नकळत बाहेर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गोठ्यात नेऊन ठेवले. पूर्वी घरी गाई होत्या तेव्हा हा गोठा त्यांच्यासाठी बांधला होता. पण आता गाई नव्हत्या पण गोठा मात्र सुस्थितीत होता. म्हणजे जरा बरा होता. पण तिथे कुणी माणूस जाऊन राहू शकेल या परिस्थितीत तर अजिबात नव्हता. कारण मागच्या बाजूला सहसा कुणाचा वावर होत नसे.
इकडे यापासून अनभिज्ञ असलेली लक्ष्मी घरात जेव्हा तिचं सामान शोधत होती तेव्हा तिची सासू तिला म्हणाली.
” काय शोधत आहेस..?”
” मी माझे कपडे शोधत आहे आई…मिळतच नाही आहेत..” लक्ष्मीने उत्तर दिले.
” मीच नेऊन ठेवलेत ते मागच्या गोठ्यात…” सासुबाई म्हणाल्या.
” अहो पण का…म्हणजे चांगलेच कपडे आहेत ते…माझ्या रोजच्या वापरातले…” काहीही न कळल्याने लक्ष्मीने प्रश्न केला.
” हो…वापर ना…पण तिथेच वापरायचे आता…म्हणजे आजपासून तू तिथेच राहणार आहेस…” सासुबाई म्हणाल्या.
सासुबाई काय म्हणतात हे नक्की न कळल्याने लक्ष्मी गोंधळली आणि तिने विचारले.
” पण आपलं इतकं मोठं घर असताना मी तिथे का राहणार आई…?”
” कारण इथे सुनिता ( लक्ष्मीची जाऊ), प्रभाकर ( लक्ष्मीचे दिर) आणि अजय, विजय( लक्ष्मीचे पुतणे ) राहायला येणार आहेत…म्हणून घरातल्या सगळ्या खोल्या तेच वापरतील…आणि या खोलीत मी राहते…मग तू कुठे राहणार ?…म्हणून तुझी सोय मागच्या गोठ्यात केली आहे…” सासुबाई म्हणाल्या.
” नाही आई…तुम्ही माझ्यासोबत असे नाही करू शकत…मी एकटी कशी राहणार आई…मला एकटं राहायला लावू नका…मी इथे राहील ना… तुमच्या सोबत तुमच्या खोलीत…पण मला इथून जायला नका सांगू आई…मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहीन…” लक्ष्मी म्हणाली.
” तू इथे राहणार नाहीस…आधीच वांझ आहेस…माझ्या मुलाला सुद्धा गिळलस…निघ आता इथून…नाहीतर माझ्या नातवांना पण अवदसा लागेल तुझ्यामुळे…माझ्या माधवने जे काही कमवले आहे त्याच्यावर आमचा हक्क आहे…तुला यातलं काहीच आम्ही मिळू देणार नाही…आणि मागच्या गोठ्यात तुला राहायला ठेवतोय हे आमचे उपकार समज…नाहीतर कधीच तुला घराबाहेर काढलं असतं…” सासुबाई म्हणाल्या.
त्यानंतर लक्ष्मीने सासूबाईंसमोर हात जोडले. मला बाहेर काढू नका म्हणून विनवणी केली. पण सासूबाईंनी तिला गोठ्यात राहायला जायला भाग पाडले. लक्ष्मी आता पार कोलमडून गेली. आधीच माधवच्या जाण्याचे दुःख त्यात घरच्यांचे हे वागणे तिला सहनच होत नव्हते. बराच वेळ ती नुसती रडतच बसली होती. रडत रडत ती भिंतीला टेकून उपाशीच झोपी गेली.
आणि स्वप्नात तिला माधव दिसला. तो सुद्धा तेवढाच व्यथित दिसत होता जितकी लक्ष्मी व्यथित होती. त्याच्या डोळ्यात जणू तिला होणाऱ्या वेदना तिला स्पष्ट दिसत होत्या. त्याचे डोळे तिला सांगत होते की मी तुला दुःखात पाहू शकत नाही. लक्ष्मी झोपेतच त्याला स्पर्श करायला गेली आणि स्वप्नातून खडबडून जागी झाली.
पाहते तर समोर कुणीच नव्हते. पण माधव तिच्या स्वप्नात का आला होता हे तिला कळले होते. माधव कधीच तुला दुःखात पाहू शकला नव्हता आणि म्हणूनच आज जेव्हा ती दुःखात होती तेव्हा तो सुद्धा जिथे कुठे असेल तिथे दुखातच असेल हे तिला कळले होते. माधवने आजवर तिला प्रत्येक दुःखातून सावरले होते. तिच्यासाठी त्याने त्याच्या आईचे घर सुद्धा सोडले होते.
इतकंच नव्हे तर तिच्या माहेरी तिचा अपमान झाला म्हणून तिच्या माहेरच्या लोकांशी कायमचे संबंध तोडले होते. आणि आज तिला इतक्या मोठ्या दुःखात पाहून त्याला किती वाईट वाटले असते ह्याची जाणीव लक्ष्मीला झाली. तिचं असं हताश होणं त्याला कधीच पाहवणार नाही हे देखील तिला माहित होते. निदान आपल्या माधव साठी आपल्याला हातपाय गाळून चालणार नाही हे लक्ष्मीने जाणले आणि ती पदर खोचून उठली. तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला दूर करण्यासाठी.
कारण तिला तिच्यासाठी आणि पर्यायाने माधवसाठी हे करणे गरजेचे होते. ती निर्धाराने उठली. आणि सकाळ होताच तयारी करून बाहेर पडली. इकडे लक्ष्मी आपल्या मार्गातून बाजूला झाली म्हणून घरचे सगळेच आनंदात होते. त्यांना वाटले होते की लक्ष्मी काहीही करू शकत नाही. कारण मुळातच भित्री असलेली लक्ष्मी फार तर फार रडत असेल आता असे त्यांना वाटले होते. आणि अवघं आयुष्य घराचा उंबरा न ओलांडलेली लक्ष्मी एकटीने आपला सामना करूच शकणार नाही असा त्यांना विश्वास वाटत होता.
पण लक्ष्मी मात्र संध्याकाळच्या वेळी घरी परत आली तेव्हा सोबत पोलिस आणि वकिलांना घेऊनच. त्यांना पाहून लक्ष्मीच्या घरच्यांना धक्काच बसला. लक्ष्मी असे काही करेल असे त्यांना अजिबातच वाटले नव्हते. त्यांच्याकडे पाहत लक्ष्मी त्यांना म्हणाली.
” साहेब…ह्यांनी माझ्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे आणि मला माझ्याच घरातून बाहेर काढलंय…”
हे ऐकून घरच्यांना काय बोलावं आणि काय नको असे झाले होते. शेवटी लक्ष्मीची सासू म्हणाली.
” हे माझ्या मुलाचं घर आहे साहेब…त्याच्यानंतर सगळं माझं आणि माझ्या मुलांचं आहे…ही तर परक्या घरून आलेली आहे…आणि आम्ही तिला घराबाहेर नाही काढलं…तिला तर मागच्याच बाजूला राहायची सोय करून दिलेली आहे…”
लक्ष्मीच्या सासूबाईंचे बोलणे ऐकुन वकील तिला म्हणाले.
” हे बघा आजी…पहिली गोष्ट म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर त्याच्या बायकोचा अधिकार असतोच…आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाने आधीच त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या बायकोच्या म्हणजेच श्रीमती लक्ष्मी ह्यांच्या नावे केली आहे…आणि तुम्ही त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर कधी शकत नाही…आणि तुम्हा सर्वांना इथे राहायचं असल्यास त्यासाठी लक्ष्मीजींची परवानगी असणे सुद्धा गरजेचे आहे…”
” पण साहेब…तिला या सगळ्यांचं काय काम…तिला ना मुल आहे ना नवरा… तिला या सगळ्याच काय काम…?” लक्ष्मीची सासू म्हणाली.
” त्यांना ह्या सगळ्याच काय करायचं आहे हे त्या ठरवतील पण तुम्ही मात्र त्यांना असे त्यांच्या घराच्या बाहेर काढू शकत नाही…” वकील म्हणाले.
त्यानंतर लक्ष्मीच्या घरच्यांनी लक्ष्मीला चुकीचं ठरवण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. कारण कायदा नेहमी सत्याच्या बाजूने असतो. आणि यावेळी कायदा लक्ष्मीच्या बाजूने होता. लक्ष्मी मनाने स्वतःच्या घरात परत गेली. आणि घराचा सगळा व्यवहार स्वतःच्या हातात घेतला.
शेवटी स्वतःच्या कृत्याने खजील झाल्याने लक्ष्मीची जाऊ, दिर आणि त्यांची दोन्ही मुलं ते घर सोडून गेली. पण लक्ष्मीने तिच्या सासूबाईंना मात्र कधीच तिथून जायला सांगितले नाही. कारण तिच्या मते हे घर त्यांच्या मुलाचं आहे. आणि ह्या घरावर त्यांचाही तेवढाच अधिकार आहे जेवढा तिचा आहे. तिचा चांगुलपणा पाहून तिच्या सासूबाईंना सुद्धा आपल्या विचारांची लाज वाटली. आणि त्यांनी तिची माफी सुद्धा मागितली.
लक्ष्मी ने सुद्धा मोठ्या मनाने सगळे काही विसरून पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि पुढील आयुष्य स्वतःला कधीच लाचार होऊन जगणार नाही अशी स्वतःलाच ग्वाही दिली. आज तिचं मन समाधानी होतं. आणि कुठेतरी माधव सुद्धा आपल्या लक्ष्मीला असं समाधानात पाहून तृप्त होत होता.
समाप्त.
आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका
खुपच छान आणि हृदयस्पर्शी