वृंदा हातात भलीमोठी बॅग घेऊन घराबाहेर निघत होती. तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने विनयकडे पाहिले. तो मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. कारण तिच्या नजरेत त्याच्यासाठी असंख्य प्रश्न होते. आणि विनयकडे तिच्या प्रश्नांना ना उत्तरे होती ना तिच्यासाठी दोन धीराचे शब्द.
आज पहिल्यांदा असे झाले असेल की वृंदा घरातून बाहेर पडताना थोरामोठ्यांच्या पाया पडली नसेल. घरातील उंबरठ्यावर येताच वृंदा क्षणभर थांबली. तिला जुने दिवस आठवले. आठ वर्षांपूर्वी ती हेच माप ओलांडून घरात आली होती. घरी आल्यावर तिचं, तिच्या कलागुणांच, तिच्या कामांच नेहमीच कौतुक व्हायचं. विनय सुद्धा सतत तिच्या मागेपुढे करायचा.
दोघांचंही लव मॅरेज. अगदी कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात होते. लग्नाचा विषय काढल्यावर तिच्या घरून सुरुवातीला थोडा विरोध झाला. कारण विनयच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आणि विनयची नोकरी सुद्धा साधारण होती. वृंदाच्या घरचे त्यामानाने श्रीमंत होते. आणि म्हणूनच वृंदाच्या आईबाबांना वाटायचं की वृंदा त्या घरात जमवून घेऊ शकणार नाही.
पण वृंदाने तिच्या घरच्यांना विनयबद्दल खात्री दिली आणि म्हणाली की ती आहे त्या परिस्थितीत संसार करायला तयार आहे. शेवटी वृंदाच्या हट्टापायी तिच्या वडिलांनी तिच्या आणि विनयच्या लग्नाला परवानगी दिली आणि थाटामाटात वृंदा आणि विनयचे लग्न झाले.
वृंदाने म्हटल्याप्रमाणे अगदी नेटाने संसार केला होता. तिने तिच्याकडून कुठलीच कसर शिल्लक ठेवली नाही. ना कधी विनयकडे मला हेच हवं तेच हवं म्हणून हट्ट केला. उलट एकत्र कुटुंबात येऊनही तिने लवकरच घरातील सर्व कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काटकसरीने संसाराला सुरुवात केली.
सुरुवातीचे दिवस अगदी पंख लावल्या प्रमाणे निघून गेले. वृंदाच्या सासुबाई वृंदाची स्तुती करताना थकत नसत. नव्याची नवलाई संपली आणि सर्वांना आता वृंदा आणि विनयच्या बाळाची आस लागली. लग्नाला दोन वर्ष झाली तरीही अजून गोड बातमी मिळाली नव्हती.
वृंदाच्या सासूबाईंनी वृंदाला एका चांगल्या डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी वृंदा ला तपासले आणि सांगितले की तिच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आज ना उद्या बाळ होईलच म्हणून. सगळे निश्चिंत झाले. पुन्हा एक वर्ष गेलं तरीपण घरचा पाळणा काही हललाच नाही. तेव्हा मात्र एक दोन दवाखाने बदलून पाहिले पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी तिच्या घरच्यांनी देवांना नवस केले. तिने सुद्धा देवाला साकडे घातले बाळ होऊ दे म्हणून. पण तिच्या पदरात मुलाचं दान पडलं नाहीच.
दिवसामागून दिवस जात होते. आता तिच्या घरच्या लोकांचे तिच्याशी वागणे बदलले होते. पूर्वी प्रत्येक कामात जीचे कौतुक व्हायचे ती आता कुठल्याही कामात त्यांना नकोशी झाली होती. सासूबाईंनी तिच्याशी बोलणे सोडले होते फक्त टोमणे मारण्यापुरते त्या तिच्याशी बोलत.
आधी सगळे म्हणायचे की आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला वृंदा सारखी सून मिळाली आहे पण आता तेच लोक म्हणायचे की हिने विनयला नादाला लावले आणि आमची सून झाली. घराला साधं एक मूल देऊ शकत नाही म्हणून सतत तिला हिणवले जायचे.
सुरुवातीला विनयने तिला खूप साथ दिली पण नंतर त्याच्या आईसमोर त्याचे काही चालेनासे झाले. त्यामुळे तो बरेचदा वृंदाचा अपमान होत असतानाही गप्प राहायचा. तिला खूप दुःख व्हायचं. पण विनय वर खूप प्रेम असल्याने ती सगळे काही निमूटपणे सहन करत होती.
अशातच तिचे वडील सुद्धा हार्ट अटॅकने गेले. वडिलांच्या जाण्याने आधीच दुःखात असलेली वृंदा आणखीनच खचली. पण तिच्या मोठ्या भावाने तिला त्या काळात खूप आधार दिला. आणि सोबतीला विनय सुद्धा होताच. अशीच दुःखात, सासूबाईंचे टोमणे आणि समाजाची वांझोटी म्हणून अवहेलना सहन करत आपल्याला ही उद्या बाळ होईल या आशेवर वृंदा जगत होती. मात्र तिच्या आयुष्यात पुढे यापेक्षाही काहीतरी वाईट घडेल ह्याची तिला कल्पना नव्हती.
एके दिवशी तिची नणंद घरी आली आणि तिच्या नात्यातील कुण्यातरी मुलीचे स्थळ विनयसाठी सुचवले. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या वृंदाला ऐकू जावे म्हणून मुद्दाम जोरजोरात बोलले जात होते.
विनयचे दुसरे लग्न हा विषय ऐकूनच वृंदाच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरत आपण जणू काही ऐकलेच नाही असे दाखवत ननंदेसाठी चहा घेऊन आली.
तिला माहिती होते की नणंद कितीही म्हणाली तरी विनय कधीच यासाठी तयार होणार नाही. पण तिचा हा गोड गैरसमज देखील लक लवकरच दूर झाला जेव्हा सासू आणि ननंदेने समजल्यावर विनय सुद्धा मुलासाठी दुसऱ्या लग्नाला तयार झाला. वृंदावर चारही बाजूने संकटे आली होती. आधी आई होण्याचं सुख तिला मिळालं नव्हतं आणि आता बायकोचे अधिकार सुद्धा तिच्याकडून काढून घेण्याची तयारी सुरू होती.
ज्या व्यक्तीवर प्रेम करून आपलं सर्वस्व ज्याला दिलं, ज्या व्यक्तीसाठी आई वडिलांशी भांडली त्यानेच आपल्याला असे अर्ध्या संसारात सोडून दिल्याने वृंदा दुःखी होती मात्र जेव्हा विनयने तिला म्हटले की त्याचं दुसरं लग्न झालं तरीही तो तिला वागवायला तयार आहे तेव्हा तर तिला त्याची चीड आली. तिने तडक तिच्या भावाला फोन केला आणि तिला घ्यायला तिच्या सासरी आला.
वृंदा तिच्या भावासोबत माहेरी निघून आली होती. वृंदाच्या माहेरी सुद्धा या आठ वर्षात बराच बदल झाला होता. जिथे आधी तिच्या आईची सत्ता होती तिथे तिच्या वहिनीच राज्य होतं. वृंदाच्या येण्याने तिची वहिनी फारशी खुश नव्हती.
ती कायमची माहेरी राहायला आली हे तिच्या वहिनीला अजिबात रूचल नव्हतं. नवर्यापुढे ती वृंदाला काही बोलत नसे मात्र मागून वृंदाला टोमणे मारणे, घालून पाडून बोलणे सुरूच असायचे. वृंदा मात्र कधीच तिच्या भावाकडे वहिनीची तक्रार करत नसे. आपल्यामुळे त्यांच्या संसारात विघ्न नको म्हणून ती सगळं काही मुकाट्याने सहान करायची.
त्यामध्ये घरात आता तिच्या आईचे सुद्धा जास्त चालत नव्हते. वृंदाला अगदी किचनमध्ये कशाला हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती. वृंदाची परिस्थिती आता खूप दयनीय झाली होती. तिच्या आईला तिचे दुःख कळत असूनही ती काही करू शकत नव्हती. एकदा भावाने वहिनीला तिच्या वृंदाशी असलेल्या वागणुकीबद्दल जाब विचारला तेव्हा वहिनीने भांडून संपूर्ण घराला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आता तिचा भाऊही जास्त काही बोलू शकत नव्हता.
अशातच एके दिवशी एका जवळच्या नातेवाईकाने वृंदासाठी एका विधुर मुलाचे स्थळ आणले. कुणाल त्या मुलाचं नाव. कुणालला एक चार वर्षांचा मुलगा होता. आणि एका वर्षांपूर्वी एका छोट्याश्या आजाराचे निमित्त होऊन त्याची बायको हे जग सोडून गेली होती.
आधीच एक मुलगा असल्याने त्याला आता मुलं झाली नाहीत तरीही चालणार होते. म्हणूनच वृंदाच्या घरच्यांना कुणालचे स्थळ वृंदा साठी अनुरूप वाटत होते. पण वृंदाला आता लग्न आणि संसार या गोष्टीत जराही रस राहिला नव्हता.तसे तिने स्पष्टपणे घरच्यांना सांगितले की ती सगळं काही सहन करेन पण दुसरं लग्न करणार नाही.
पण वृंदाच्या भावाला आणि आईला मात्र खूप मनापासून वाटत होते की वृंदाने कुणालशी लग्नाला तयार व्हावे. कारण त्यांना माहिती होते की वृंदासाठी संपूर्ण आयुष्य एकटीने काढणे सोपे नाही. एकतर पदरात मुलबाळ नाही आणि भरीस भर म्हणजे तिची वहिनी तिला सुखाने माहेरी राहू देणार नाही. पण कुणाल सोबत ती सुखाने राहील. कारण कुणालला तिच्याबद्दल सर्वकाही माहिती असूनही तो तिच्याशी लग्न करायला तयार होता.
आई आणि भावाने वृंदाला खूप समजावले. वृंदालाही त्यांची तगमग समजत होती. शिवाय वृंदाच्या वहिनीला ती घरात नकोशीच होती. आपल्यामुळे आपल्या भावाचा संसार तुटायला नको म्हणून वृंदा सुद्धा दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली.
तिला वाटले की तिला या लग्नातून सुख मिळो वा ना मिळो पण त्या आई नसलेल्या मुलाला तिच्यामुळे आईचं प्रेम मिळेल. शिवाय आपल्यालाही मुलाचं सुख मिळेल म्हणून नाराजीनेच का होईना ती या लग्नाला तयार झाली. घरात सर्वांना आनंद झाला. आई आणि भावाला तिचा संसार नव्याने सुरू होईल ह्याचा आनंद अन् तिच्या वहिनीला नणंद एकदाची घरातून निघून जाईल ह्याचा आनंद.
दोन्ही कुटुंबांनी मिळून पुढील बोलणी केली आणि अतिशय साधेपणाने वृंदा आणि कुणालचे लग्न झाले. आपल्या पहिल्या लग्नामध्ये अवहेलना आणि दुःख सहन केल्यामुळे ह्या दुसऱ्या लग्नापासून वृंदाला फार काही अपेक्षा नव्हत्या. ती लग्न करून घरात आली आणि कुणाल चा मुलगा ओजस तिच्या समोर येऊन म्हणाला.
” आई…आजी ने शांगितलय तू माझी नवीन आई आहेस…मी तुला आई म्हटले तर चालेल ना..?”
त्या लहानग्याच्या तोंडून आई हे शब्द ऐकताच वृंदाचा उर आनंदाने भरून आला. जी हाक ऐकण्यासाठी ती इतकी वर्षे आसुसलेली होती ती हाक कानी पडताच तिचा संकोच क्षणार्धात नाहीसा झाला. तिने त्याला आपल्या मिठीत घेतले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते. तो क्षण पाहून क्षणभर घरातल्यांना सुद्धा गहिवरून आले.
आणि त्या क्षणापासून ती ओजसची आई झाली. दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारले होते. सावत्रपणाचा लवलेश सुद्धा नसलेल्या या नात्याने तिघांचेही आयुष्य समृद्ध केले होते. वृंदा कुणालला देखील समजून घेत होती. हळूहळू कुणाल आणि वृंदामध्ये ही प्रेम बहरू लागले. आणि दोघांचा संसार बहरू लागला.
अशातच एके दिवशी अंगणात कपडे वाळत घालताना वृंदा चक्कर येऊन पडली. लगेच तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. कुणाल आणि ओजस तर खूप घाबरले होते. पण डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की वृंदा आई होणार आहे तेव्हा मात्र ओजस आणि कुणालला खूप आनंद झाला. वृंदाला तर क्षणभर तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
पण जेव्हा तिला कळले की ती खरंच आई होणार आहे तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. समाजाने वांझोटी म्हणून जो कलंक तिला लावला होता तो आता पुसला गेला होता. ज्या दिवसाची ती इतके दिवस वाट पाहत होती तो दिवस आज असा अनपेक्षितपणे आला होता. वृंदाच्या आई अन् दादाला तर खूपच आनंद झाला.
काही महिन्यांनी वृंदा ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ओजसने मोठ्या हौसेने आपल्या या बहिणीचे नाव परी ठेवले होते. परीच्या येण्याने वृंदा आणि कुणालची फॅमिली पूर्ण झाली होती. दोघा बहीण भावांमध्ये खूप प्रेम होते. मुलांच्या बाललीला पाहून वृंदा आणि कुणाल भरून पावले होते.
इकडे वृंदाचा पहिला नवरा विनय मात्र अजूनही वृंदाची आठवण काढत असतो. आपल्यात दोष असतानाही सर्व शिक्षा मात्र वृंदाला सहन करावी लागली हे आठवून त्याला अजूनही नीट झोप लागत नाही. वृंदा गेल्यावर त्याच्या आणखी दोन बायकासुद्धा त्याच्या घरात टिकल्या नाहीत आणि आज आयुष्याच्या या टप्प्यावर तो एकटा आहे ह्यासाठी सुद्धा तो स्वतःलाच कारणीभूत मानतो.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
Khup chaan story👌