राँग नंबर – भाग ४

सुमित खोलीत आला. त्याने समिधाकडे पाहिले. समिधा बेडवर बसून खाली पाहत होती आणि अस्वस्थपणे तिच्या पदराला मुरड घालत होती.

सुमित तिच्या शेजारी येऊन बसला, पण त्याने ठरावीक अंतर ठेवले.

 

“समिधा,” सुमितने अत्यंत शांत आवाजात सुरुवात केली. “मला माहित आहे की आजचा दिवस तुझ्यासाठी खूप थकवणारा होता. नवीन घर, नवीन माणसे… या सर्वांचा ताण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.”

 

समिधाने सुमितकडे पाहिले. तिने या आधी जेव्हा या क्षणांचा विचार केला होता तेव्हा तिला भीती दाटून यायची. पण आज सुमितकडे बघून भीती कमी आणि त्याच्याबद्दल विश्वास व आदर जास्त वाटत होता.

 

“सुमित… मी…” समिधाला काय बोलावे ते सुचत नव्हते.

 

“तू काहीही बोलू नकोस,” सुमित हसला. “मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो. आपल्या नात्याला सुरुवात करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडले आहे. मी तुझ्यावर कोणताही हक्क गाजवायला किंवा दडपण आणायला आलो नाहीये. जोपर्यंत तू मनातून या नात्याचा स्विकार करत नाहीस, तोपर्यंत आपण केवळ चांगले मित्र राहू. तू आराम कर.”

 

सुमितने कपाटातून एक उशी आणि चादर काढली आणि तो सोफ्यावर झोपण्यासाठी गेला.

सोफ्यावर झोपण्यापूर्वी तो वळला आणि म्हणाला, “गुड नाईट, समिधा. उद्या सकाळी तुझ्या माहेरचे लोक तुला मांडव परतणी साठी घेऊन जायला येतील. तू निवांत झोप.”

 

समिधा तशीच बसून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ‘हा माणूस इतका चांगला कसा असू शकतो?’ असा विचार तिच्या मनात आला. सुमितचे हे वर्तन, त्याचा हा आदर तिच्या हृदयाला भिडला होता. त्याच्याशी असा विश्वासघात करताना तिला स्वतःचीच प्रचंड गृणा वाटू लागली.

 

‘पण मी हे सर्व माझ्या प्रेमासाठी करतेय… प्रीतमचे माझ्यावर प्रेम आहे, मला त्याच्याकडे जावेच लागेल,’ समिधाने स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा खोटे समजावले आणि डोळे मिटले.

 

 

 

दुसरा दिवस उजाडला. माहेरचे लोक आले आणि मांडव परतणी च्या विधीसाठी समिधा आणि सुमित समिधाच्या माहेरी गेले.

दिवसभर घरात पै-पाहुण्यांची वर्दळ होती. सुमित सर्वांशी अतिशय आदराने आणि प्रेमाने वागत होता. समिधाच्या बाबांशी बोलताना त्याने दाखवलेला नम्रपणा पाहून समिधाच्या बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

 

“समिधा, तू खूप भाग्यवान आहेस पोरी,” समिधाची आई तिच्याजवळ येऊन म्हणाली. “सुमितसारखा मुलगा मिळायला भाग्य लागते.”

 

समिधा काहीच बोलली नाही. तिचे लक्ष सारखे तिच्या फोनकडे होते, जो तिने कसातरी स्वतःजवळ ठेवला होता. रात्रीचे ९ वाजले होते. सुमित आणि समिधा माहेरच्या घरीच थांबले होते. रात्री १० वाजता प्रीतमचा फोन येणार होता आणि ठरल्याप्रमाणे समिधाला मागच्या दाराने बाहेर पडायचे होते.

 

समिधा तिच्या जुन्या खोलीत गेली. तिने एक लहान बॅग तयार केली होती, ज्यामध्ये तिचे काही कपडे आणि ओळखपत्रे होती. ठिक १० वाजता तिच्या फोनवर एक अनोळखी नंबर वरून मेसेज आला: ‘मी बाहेर गल्लीच्या कोपऱ्यावर गाडी घेऊन उभा आहे. फोन कर.’

समिधाने त्या नंबरवर फोन लावला

 

“प्रीतम, मी निघतेय,” समिधा अत्यंत हलक्या आवाजात म्हणाली.

 

“समिधा! शेवटी तो क्षण आला,” प्रीतमचा आवाज पलीकडून आला. पण त्याच्या आवाजात प्रेमापेक्षा एक वेगळीच घाई आणि उत्सुकता होती. “तू निघतीयेस ना? सर्व दागिने घेतले आहेस ना?”

 

“काय? कसले दागिने? “समिधा थबकली.

 

“कसले काय म्हणजे? तुला एवढे सुद्धा कळत नाही का. तुझ्या लग्नात तुझ्या माहेरून दिलेले आणि सुमितच्या घरच्यांनी तुला घातलेले सर्व सोन्याचे, हिऱ्याचे दागिने! ते सगळे एकत्र कर आणि घेऊन ये.” प्रीतमचा आवाज जरा कठोर झाला.

 

“प्रीतम, तू काय बोलतोयस? ते दागिने माझे नाहीत. सुमितच्या घरच्यांनी त्यांचे पिढ्यानपिढ्या जपलेले दागिने मला दिले होते. आता मी त्या घरची सून राहणार नाही. त्यामुळे त्या दागिन्यांवर माझा काही अधिकार नाही. आणि माहेरचे दागिनेही बाबांनी कर्जाने पैसे काढून केले आहेत. मी ते दागिने आणणार नाही! मी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी आणि माझ्या बॅगेसह एकटीच येत आहे.”

 

“समिधा, तू काय वेडी आहेस का?” कपड्यांनिशी येऊन आपण काय करणार आहोत? पुढे आयुष्य जगायला, नवीन शहरात सेटल व्हायला पैसे लागत नाहीत का? तुझ्या सासरचे लोक करोडपती आहेत. त्यांनी तुला लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने दिले आहेत. ते सर्व घेऊन ये! त्या दागिन्या विकून किंवा गहाण ठेवूनच आपण पुढे काहीतरी करू शकू.” प्रीतम चिडून म्हणाला.

 

“प्रीतम… पण ते दागिने चोरणे होईल. मी चोरी नाही करू शकत. आणि आपण कामाला लागू ना. तू नोकरी कर, मीही नोकरी करेन. आपण स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवूया. चोरी करून मिळवलेल्या पैशांवर मला आयुष्य जगायचे नाही,” समिधाने ठामपणे सांगितले.

 

“अगं मूर्ख मुली, तुला काय वाटते, मी तुला सहज पळवून नेतोय? उद्या तुझ्या घरचे आणि सासरचे माझ्या मागे लागतील, पोलीस केस करतील, माझा शोध घेतील. हा सर्व रिस्क मी कशासाठी घेऊ? जर हातात दागिने आणि पैसेच नसतील, तर मला काय फायदा? तू गप्पपणे ते सर्व दागिने बॅगेत भर आणि बाहेर ये, नाहीतर विसरून जा सर्व. या अशा प्रेमाचं काय करू मी जे मला कफल्लक करून सोडेल.” प्रीतम आता पूर्णपणे स्वतःच्या मूळ रूपात आला होता. त्याचा संयम सुटला होता.

 

समिधा सुन्न झाली. तिच्या कानात प्रीतमचे शब्द फिरत होते—’मला काय फायदा?’

 

आता तिच्या डोळ्यांसमोरून सर्व प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे फिरू लागले:

 

जेव्हा तिने घरच्यांना सांगायला सांगितले, तेव्हा प्रीतमने हात वर केले होते. जेव्हा तिचे लग्न ठरले, तेव्हा त्याने कोणताही प्रयत्न केला नाही.

पण जेव्हा तिचे लग्न एका श्रीमंत घरात झाले आणि तिच्याकडे लाखांचे दागिने आले, तेव्हा अचानक त्याला तिची आठवण आली!

 

लग्नाआधी न पळता, लग्नानंतर सासरहून पळण्याचा त्याचा अट्टाहास केवळ यासाठीच होता, कारण लग्नात मिळालेले सर्व भारी दागिने तिच्याकडे असणार होते!

 

प्रीतमचे तिझ्यावर कधीही प्रेम नव्हतेच. तो केवळ एक स्वार्थी, लोभी आणि कपटी माणूस होता, जो तिच्या भावनांशी आणि तिच्या श्रीमंतीशी खेळत होता.

 

“समिधा! ऐकतोयस ना? पटकन ते दागिने घे आणि बाहेर ये. माझ्याकडे जास्त वेळ नाही!” प्रीतम फोनवरून ओरडत होता.

क्रमशः

राँग नंबर – भाग ५ (अंतिम भाग)

Leave a Comment