राँग नंबर – भाग ५ (अंतिम भाग)

समिधाच्या डोळ्यांतील अश्रू अचानक थांबले. तिच्या मनातील खोट्या प्रेमाचा तो अंधार एका क्षणात नाहीसा झाला आणि तिथे एक तीव्र प्रकाश पडला. तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीची जाणीव झाली होती.

 

“प्रीतम,” समिधाचा आवाज आता थरथरत नव्हता. तिच्या आवाजात एक अभूतपूर्व कठोरपणा आणि स्पष्टता आली होती.

 

“काय? निघतीयेस ना?” प्रीतम म्हणाला.

 

“नाही,” समिधा शांतपणे म्हणाली. “मी येत नाहीये.”

 

“काय? डोके फिरले आहे का तुझे?”

 

“माझे डोके आता ठिकाणावर आले आहे, प्रीतम. आज मला कळले की तू माझ्यावर नव्हे, तर दागिन्यांवर आणि पैशांवर प्रेम करत होतास. तू एक नीच आणि लाचार माणूस आहेस. मी तुझ्यासारख्या माणसासाठी सुमितसारख्या चांगल्या आणि प्रामाणिक माणसाला सोडून येणार होते? ही माझी सर्वात मोठी चूक होती. पण आता ती चूक दुरुस्त झाली आहे.” समिधा म्हणाली.

 

“समिधा, माझं प्रेम धुडकावून तू पश्चात्ताप करशील आणि आज तू आली नाहीस तर मी तुला तसा सोडणार नाही. मी सुमितला सगळं सांगून टाकेन आपल्याबद्दल.” प्रीतमने एक शेवटचा प्रयत्न केला.

 

“आता तू काय करशील याने मला काहीही फरक पडत नाही. आजनंतर जर तू मला फोन केलास किंवा माझ्या आसपासही दिसलास, तर मी स्वतः सुमितला आणि पोलिसांना सांगून तुझ्याविरुद्ध तक्रार करेन,” समिधाने ठामपणे सांगितले.

 

तिने प्रीतमचे बोलणे पूर्ण होण्याआधीच फोन कट केला.

 

इतक्यात तिची मावशी तिथे आली. आणि तिला म्हणाली की आईने तिला तिच्या खोलीत बोलावले आहे. ती मावशी सोबत गेली. तिथे पुन्हा प्रीतमचा फोन आला. तिने कट केला.

 

 

” अगं कोणाचा फोन येत आहे ?” आईने विचारले.

 

” काही नाही आई, अनोळखी नंबर आहे. राँग नंबर.” ती म्हणाली.

 

तिने लगेच तो अनोळखी नंबर आणि प्रीतमचा जुना नंबर फोनमध्ये ब्लॉक करून टाकला.

आता तिला मनावरच ओझं निघून गेल्यासारखं वाटत होतं. आपण किती मोठी चूक करणार होतो ह्याचा विचार करून ती हादरली होती.

 

समिधा आईच्या खोलीतून बाहेर आली. हॉलमध्ये सुमित तिच्या बाबांशी गप्पा मारत बसला होता. सुमितच्या चेहऱ्यावरचे ते निर्मळ हसू पाहून समिधाचे मन कृतज्ञतेने भरून आले.

 

‘या माणसाने मला मान दिला, मला वेळ दिला, माझ्यावर विश्वास ठेवला… आणि मी एका भलत्याच माणसाच्या प्रेमात आंधळी होऊन या नात्याचा बळी देणार होते?’ समिधा स्वतःशीच म्हणाली.

 

तिने देवाचे मनापासून आभार मानले की वेळेतच प्रीतमचा खरा चेहरा तिच्यासमोर आला आणि ती एका मोठ्या संकटातून आणि पापामधून वाचली. सुमितने समिधाकडे पाहिले आणि हसून म्हणाला,

 

“काय झाले समिधा? खूप थकलेली दिसतेस?”

 

“नाही सुमित… मी अगदी ठीक आहे,” समिधाने प्रथमच सुमितच्या डोळ्यात थेट आणि प्रेमाने पाहिले.

 

“उद्या सकाळी आपण लवकर घरी निघायचे आहे ना? मी तयारी करून ठेवते.”

सुमितला समिधाच्या आवाजातील आणि तिच्या वागण्यातील तो सकारात्मक बदल जाणवला. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य उमटले.त्या रात्री, समिधाने मनातून प्रीतमचे अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकले. ज्या माणसाने तिच्या आत्मसन्मानाचा आणि प्रेमाचा व्यापार करण्याचा प्रयत्न केला होता, तो तिच्यासाठी आता कायमचा अनोळखी झाला होता.

काही दिवसांतच, समिधा आणि सुमित त्यांच्या नवीन जगात रमले. समिधाने सुमितचे घर, त्याचा व्यवसाय आणि त्याचे कुटुंब या सर्वांना पूर्ण आत्मियतेने आपलेसे केले. सुमितचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव दिवसेंदिवस समिधाला त्याच्या अधिक जवळ घेऊन जात होता.

एका संध्याकाळी, बंगल्याच्या टेरेसवर दोघे एकत्र बसले होते. मंद वारा सुटला होता.

समिधाने सुमितचा हात आपल्या हातात घेतला. सुमितने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.

“सुमित, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.”

“काय समिधा?” सुमित ने विचारले.

“मी आयुष्यात अनेक चुका केल्या असतील, पण तुमच्याशी लग्न होणे आणि या घरात येणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सुंदर गोष्ट घडली आहे. मी तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करते, सुमित.”

सुमितने समिधाचा हात हातात घेतला. तिच्याकडे पाहून हसून म्हणाला.

” मी पण खूप प्रेम करतो तुझ्यावर.”

समिधाला आता तिच्या आयुष्याचा खरा, सुरक्षित आणि सुंदर किनारा मिळाला होता. त्यानंतर, सुमित आणि समिधाने एकत्र मिळून विश्वासाचा, आदराचा आणि प्रेमाचा एक सुखी संसार उभा केला.

तिने वेळीच सावध होऊन आपल्या आयुष्याचा लागणारा राँग नंबर कायमचा ब्लॉक करून आपले आयुष्य वाचवले होते.

समाप्त.😊

©® आरती निलेश खरबडकर.

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा 👇

मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग १

लग्नगाठ

मानलं तर जावा, जाणलं तर बहिणी

Leave a Comment