” विशेष असे काहीही झाले नाही…फक्त आपण ज्या घरात इतकी वर्षे राहीलो आहोत ते घर सोडवत नाहीय हो…” कावेरी ताई म्हणाल्या.
पण कावेरीताईंच्या अशा अचानक बदललेल्या निर्णया मागे हे कारण निश्चितच नाहीय हे सुधाकररावांना मनोमन कळले होते. पण त्यांनी ते कारण त्यांना सगळ्यांसमोर विचारले नाही. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. त्यानंतर सुधीर म्हणाला.
” मला वाटतंय आई की तू तुझा निर्णय बदलावा…म्हणजे आम्ही इथे नसताना तूम्ही दोघेच कसे राहणार इथे…?”
” आम्ही अजून इतके जास्त म्हातारे झालेलो नाही की स्वतःच करू शकणार नाही…जेव्हा आमच्या कडून काम होणार नाही तेव्हा नक्कीच तुझ्या सोबतच येऊ राहायला…आता तुम्ही दोघं काही दिवस तुमचा संसार करा…आम्ही येत जाऊ तुमच्या कडे अधून मधून…” कावेरी ताई म्हणाल्या.
” अहो पण तुम्ही दोघांनी इथे राहायची गरज तरी काय आहे…या घराला चांगली किंमत द्यायला तयार झाले आहेत बिल्डर…शिवाय माझ्या आईच्या घराजवळच चांगलं घर पाहून ठेवलेच आहे ना…हे घर विकलं की सरळ त्या घरात जाता येईल…” सुजाता म्हणाली.
” अगं पण आपल्याला सद्ध्या एवढ्या मोठ्या घराची गरज नाही आणि तुम्हा दोघांपुरते एखादे लहान घर आताही सहज घेऊ शकतो आपण…” सुधाकर राव म्हणाले.
” पण मला तेच घर हवंय…मला आवडलंय ते…आणि माझ्या मम्मीच्या घराजवळच आहे अगदी…” सुजाता हट्टाने म्हणाली.
” बाळा… सध्या ते महत्वाचं नाही…आता तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तुला त्या महाराजांनी सांगितल्या प्रमाणे वास्तू बदलून बघ…पुढे तुम्हाला मुलं झालीत की आपण घेऊया की मोठं घर…” सुधाकर राव तिला समजावत म्हणाले.
” तुम्ही अजिबात आमचा विचार करत नाही आहात…तुम्ही स्वार्थी पणाने फक्त स्वतःचाच विचार करत आहात…तुमच्या मुलाला आणि सुनेला अजूनही मुल नाही ह्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला…फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा आहे…”
” सूनबाई…?” सुधाकर राव म्हणाले.
पण सुजाता गप्प बसायचं नावच घेत नव्हती. ती सुधीर कडे पाहून म्हणाली.
” तुम्हाला सांगते सुधीर…आईंनी कधीच मला तुमच्या घरातलं मानलेच नाही…मला नेहमीच परक्या सारखी वागणूक देत राहिल्या आई…घरात सगळीकडे फक्त त्यांचाच हुकूम चालत रहावा असे वाटते त्यांना…या घरात स्वयंपाक सुद्धा माझ्या आवडीचा बनत नाही कधी…” सुजाता म्हणाली.
” मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई…तू सुजाता च्या मनाचा थोडा तरी विचार करायला हवा होता…सुजाता मला नेहमीच सांगत आलीय की तू तिला परक्या सारखी वागणूक देतेस म्हणून…पण मी कधीच तुला काही म्हटलं नाही…पण आता मला सगळंच दिसतंय आई…तू फक्त स्वतःचाच विचार करतेस…” सुधीर म्हणाला.
” आणि आता तर ह्यांना आपल्या भविष्याची थोडी सुद्धा काळजी वाटत नाही… मुळात ह्यांना मनापासून वाटतच नाही की आपल्याला मुलं असावीत…” सुजाता म्हणाली.
इतक्या वेळ गप्प असलेल्या कावेई ताई अचानकच म्हणाल्या.
” माझं सोड सुजाता…तुला तरी वाटतं का तुला मुलं व्हावीत म्हणून…?”
त्यांच्या प्रश्नाने गोंधळलेली सुजाता म्हणाली.
‘ ह्यात विचारायचं काय आहे…त्यासाठीच तर इतकं सगळं करतेय ना मी…”
” मग हे काय आहे…?” असे म्हणून कावेरी ताईंनी आतापर्यंत आपल्या पदरा आड लपवून ठेवलेलं गर्भ निरोधक गोळ्यांच पाकीट काढलं.
ते पाहून सुजाताची बोबडीच वळली. काय बोलावे आणि का नाही ह्या विचारातच ती म्हणाली.
” हे कुठं मिळालं तुम्हाला…?”
” तुझी खोली आवरताना मिळालं…शिवाय बरीच रिकामी पाकीट आहेत तिथे…बहुधा तू बाहेर फेकायचं कष्ट नाही घेतलं कधी…” कावेरी ताई म्हणाल्या.
” तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही…हे तर….” या पुढे काय बोलावं हे सुजाताला कळतच नव्हते. त्यावर कावेरी ताई म्हणाल्या.
” हे मी सगळ्यांसमोर बोलणार नव्हते पण तूच मला बोलायला भाग पाडलंय…तुला तुझ्या आईच्या घराजवळच असणारं घर घ्यायचं होतं तर तू सरळ सरळ सुद्धा सांगू शकली असतीस…आम्ही विचार सुद्धा केला असता…पण त्यासाठी तू इतकी खोटं बोललीस…इतकी वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करून सुद्धा मी केवळ तुझं मन राखाव म्हणून तुझ्यासोबत दुसऱ्या वास्तूत यायला तयार झाले…पण तू मात्र आमच्या भावनांचा जरा सुद्धा विचार केला नाहीस…इतकं जास्त खोटं बोलताना तुला जराही काहीच वाटलं नाही का…?”
कावेरी ताईंचे बोलणे ऐकून सुजाता तिथे गप्प उभी होती. नेमकं काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. कावेरी ताई पुढे म्हणाल्या.
” मला मुलगी नाही…म्हणून मी तुझ्यातच मुलगी शोधत आले…मला वाटलं तुझ्या येण्याने घर कसं भरून जाईल…आम्हाला आधार मिळेल…पण तू मात्र सुधीर ऑफिसला गेला की सरळ तुझ्या आजच्या घरी निघून जायचीस…त्यामुळे घरात हुकूम चालवायला तू घरात असायला तर हवीस ना…तू कायम या घरात परक्या सारखी वागलीस…
पण आज ना उद्या तू सगळं स्वीकारशील असेच वाटायचे मला…म्हणूनच तुझं मन राखायला म्हणून मी तयार झाले तुझ्यासोबत यायला…आणि ह्यांना सुद्धा बळेच तयार केले…पण तुझ्याकडे मला खरंच ही अपेक्षा नव्हती…तुला इथे राहायचे नसेल तर खरंच इथे राहू नकोस तू…आणि तू सुद्धा तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस सुधीर…पण मी मात्र या पुढे सुजातावर विश्वास ठेवू शकत नाही…आणि आणखी एक…आम्ही हे घर सोडून कुठेही राहायला जाणार नाही…” कावेरीताई म्हणाल्या.
सुजाता अजूनही गप्पच होती. सुधाकरराव सुद्धा हे ऐकून अगदी गप्प होते. त्यानंतर कावेरीताई आणि सुधाकरराव दोघेही आपापल्या रूम मध्ये निघून गेले.
आपण सुजाताचे ऐकून आईला नको ते बोललो ह्याची जाणीव झालेला सुधीर अपराधी भावनेने आई वडिलांची माफी मागायला त्यांच्या मागे निघून जातो.
केवळ आईच्या घरा जवळ राहायला जावं म्हणून सुजाता एवढं सगळं खोटं बोलली होती. आणि एकूण परिस्थिती पाहता सुजाताला आता आपण घरच्यांशी इतकं मोठं खोटं बोललो ह्याचा खूप पश्चात्ताप होत होता. पण आता ह्या सगळ्यासाठी बराच उशीर झाला होता. नात्याचा, विश्वासाचा नाजूक धागा उसवला होता.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.