आज ऑफीस मधल्या मैत्रिणींनी प्रियाला लग्नाची पार्टी मागितली होती. म्हणून तिने ऑफिस सुटल्यावर सगळ्या मैत्रिणींना पाव भाजी ची पार्टी दिली. ह्या सर्वात आजही तिला घरी यायला अर्धा तास उशीर झाला. आज सासू तर रागात होतीच पण मोहित सुद्धा आज लवकर घरी आला होता.
” आज तुला घरी यायला पुन्हा उशीर झाला…” मोहित म्हणाला.
” ते आज माझ्या मैत्रिणींनी मला लग्नाची पार्टी मागितली होती ना म्हणून…” प्रिया म्हणाली.
” मग दिलीस का पार्टी…?” सासूबाईंनी मध्येच विचारले.
” हो आई…सर्वांना आज पावभाजीची पार्टी दिली…” प्रियाने हसत सांगितले.
” अन् पैसे उडवून आली असशील…” सासुबाई रागाने म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकुन प्रिया ने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.
” उडवून नाही आली आई…त्या माझ्या मैत्रिणी आहेत…त्यांच्या आयुष्यात जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा त्या सुद्धा आम्हाला पार्टी देतात… मग मी त्यांना पार्टी दिली तर काय झालं…?” प्रिया म्हणाली.
” का…तुझ्या लग्नात जेवण नाही केलं का त्यांनी…आणि हे पार्टी बिर्टी म्हणजे फक्त पैसे उडवण्याचे धंदे आहेत… ह्यापुढे तू सुद्धा त्यांच्या पार्टीत जाऊ नकोस म्हणजे तुला सुद्धा पार्टी द्यायची गरज पडणार नाही…?” सासुबाई म्हणाल्या.
” पण एवढं मोठं काय झालं आई…छोटीशी तर गोष्ट आहे…तू सांग ना मोहित आईंना…” प्रिया मोहितकडे पाहत म्हणाली.
” मी काय सांगू प्रिया…आई काही चुकीचं बोलत नाही आहे…आपण पैशांची बचत करायला हवी की नको…उद्या तेच पैसे कमी येतील आपल्या…” मोहित म्हणाला.
मोहीतचे बोलणे ऐकून प्रिया गप्प बसली. इतक्यात तिची सासुबाई म्हणाली.
” जा आता…स्वयंपाकाला सुरुवात कर…आम्हाला काही आज कुणी पार्टीला बोलवणार नाहीय…”
सासूबाईंचे बोलणे ऐकुन प्रिया लगेच स्वयंपाक घरात निघून गेली.
मोहित आजच्या काळातला तरुण असूनही असा विचार करतो ह्याचे प्रियाला नवल वाटले. तिला वाटले की आज ना उद्या ती मोहितशी या विषयावर बोलेन आणि त्याला समजावून सांगेल. तिला विश्वास होता की मोहित नक्कीच समजेल. आणि हळूहळू सासुबाई सुद्धा तिला समजून घेतील अशी तिला आशा होती.
असाच एक महिना संपला. प्रियाला घरातील सगळी कामे आटोपून रात्री झोपायला बारा वाजत आणि सकाळी पुन्हा पाचला उठावे लागायचे. घरातील कामे, ऑफिस ची कामे आणि अपूर्ण झोप ह्यामुळे प्रिया खूप थकायची. तिने ठरवले की घर कामासाठी एखादी बाई सांगावी. तिने याबद्दल मोहितशी बोलायचे ठरले.
एके दिवशी मोहित चा मूड चांगला आहे हे बघून प्रिया त्याला म्हणाली…
” मी काय म्हणते मोहित…आपण घरकामासाठी एखादी बाई बघितली तर…नाहीतर आधी ज्या मावशी यायच्या त्यांनाच पुन्हा बोलावू…”
” पण का..? तुला काम जास्त वाटतंय का..?” मोहित म्हणाला.
” तसं नाही…पण ऑफिस मधून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटते ना म्हणून…स्वयंपाक वगैरे मी करत जाईल…पण भांडी आणि लादी पुसणे अशा वरच्या कामांसाठी सांगुयात ना…” प्रिया म्हणाली.
” आणि पैशांचा अपव्यय होईल त्याचं काय…” मोहित म्हणाला.
” अहो… आपण दोघं पण चांगलं कमवतो…आणि एका कामवाल्या मावशीला आपण आरामात अफॉर्ड करू शकतो…” प्रिया म्हणाली.
” आपण चांगलं कमावतो हे मला माहिती आहे…पण आपण बचत करायला नको का… आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे…आपल्याकडे पैसा असेल तर आपण ह्यापेक्षा मोठं घर घेऊ शकतो…आणखी कितीतरी गोष्टी करू शकतो…” मोहित म्हणाला.
” पण जीवाला सुख पण मिळायला हवं ना…माणसाने किती काम करावं ह्याला पण सीमा असतात ना…आणि आधीपण आपल्या इथे एक मावशी यायची ना कामासाठी…मग आता आली तर काय हरकत आहे…” प्रिया म्हणाली.
” हे बघ…आईला हे अजिबात पटणार नाही…आजपर्यंत तिने घरातील सर्व कामे केली…आणि तू महिन्याभरातच थकली…आधी तू नव्हतीस म्हणून मावशी यायच्या पण आता तू आहेस ना…आणि काम करून कधी कुणी मरत नाही…बायकांना तर कामाची सवयच असते…काही दिवसात तुला सुद्धा होईलच सवय…”
एवढे बोलून मोहित कुस बदलून झोपी गेला. प्रियाला मात्र मोहीतकडून ही अपेक्षा नव्हती. इतका शिकलेला मोहित बायकांबद्दल असा विचार करतो. काय म्हणे तर बायकांना कामाची सवयच असते. त्या सुद्धा थकतात. कधी शरीराने तर कधी मनाने. त्यांना समजून घेणारं, त्यांना मनाने सोबत करणारं कुणीतरी असलं की हा थकवा थोडा कमी होतो. पण इथे तर जन्माचा जोडीदार च तिला समजून घेत नव्हता. विचारांमध्ये हरवलेल्या प्रियाला रात्री लवकर झोप लागली नाही. पहाटे कधीतरी प्रियाचा डोळा लागला.
रात्री उशिरा झोपल्याने प्रिया त्या दिवशी सकाळी लवकर उठली नाही. सकाळी सात वाजता जेव्हा प्रिया उठली ती तिच्या सासूबाईंच्या आवाजानेच. तिची सासुबाई किचन मध्ये काहीतरी मोठमोठ्याने बडबडत होती. प्रिया त्या आवाजाने दचकून जागी झाली आणि पटापट आवरून किचन मध्ये गेली. पाहते तर सासूबाईंनी चहा नाश्ता बनवला होता. प्रियाला पाहताच त्या म्हणाल्या…
” या सूनबाई या…आपण कशाला बेडरूम मधून बाहेर यायचे कष्ट घेतले…मला सांगितलं असतं तर मीच आले असते तुमचा नाश्ता घेऊन…”
” आई…ते काल रात्री जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपायला उशीर झाला…” प्रिया म्हणाली.
” आता बहाणे पण बनवायला लागली आहेस का…महिना नाही झाला तुला घरात येऊन आणि मला पुन्हा किचन मध्ये पाय टाकावा लागला…घरात सून असूनसुद्धा या वयात मला काम करावं लागत आहे…सकाळपासून चहा आणि नाश्ता बनवत आहे…हेच दिवस बघायचे राहिले होते आता…” सासुबाई म्हणाल्या.
” सॉरी आई…पुन्हा नाही होणार असे…मी काळजी घेईल…” एवढे बोलून तिच्या सासूबाईंच्या उत्तराची वाट न पाहता प्रिया स्वयंपाकाला लागली. खरंतर सासूबाईंच्या बोलण्याचा तिला राग आला होता. आजवर तिने रोज सकाळी उठून घरातील कामे केली तेव्हा कुणीच कौतुक केले नाही पण एक दिवस उठायला उशीर झाला तर ह्यांनी किती सुनावले होते तिला. तिने सासुबाईंशी एक शब्द ही न बोलता कामे आटोपली आणि ऑफिसला निघून गेली.
तिला दिवसभर सासूबाईंचे बोलणे आठवत होते. पण त्यानंतर आपण रागातच होतो आणि सासूबाईंशी अजिबात बोललो नाही याचेही प्रियाला वाईट वाटले. संध्याकाळ पर्यंत तिचा राग सुद्धा शांत झाला होता. संध्याकाळी ती ऑफिस मधून घरी परतली तेव्हा मोहित अजुन घरी आला नव्हता. तिने आज मोहित च्या आवडीचा स्वयंपाक तयार केला.
क्रमशः
सांग कधी कळणार तुला भाग ३
लेखिका – आरती खरबडकर.
(सर्व हक्क लेखिकेचे अधीन)
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Nice story
Waiting for Next part