सावत्र आई – भाग १

गावाकडच्या त्या जुन्या, कौलारू घराच्या पडवीत बसून सुधीर सुन्नपणे बाहेर पसरलेल्या अंधाराकडे पाहत होता. आज १५ दिवस झाले होते. त्याच्या वडिलांचे, म्हणजे अण्णांचे निधन होऊन १५ दिवस पूर्ण झाले होते. श्राद्धाचे सगळे विधी आजच पार पडले होते. पाहुणेरावळे, नातेवाईक एक-एक करून आपापल्या घरी निघून गेले होते. घरात आता एक शांतता पसरली होती, पण ती शांतता सुधीरच्या मनाला सुख देणारी नव्हती; उलट ती त्याला खात होती.

 

सुधीरचे अण्णांशी कधीच फारसे जडले नाही. लहानपणापासूनच दोघांमध्ये एक प्रकारचा तुटकपणा होता. अण्णा तापट स्वभावाचे आणि सुधीर आपल्याच विश्वात रमणारा. पण अण्णांच्या जाण्याने सुधीरच्या मनातील एक कोपरा अचानक रिकामा झाला होता. माणसाचे अस्तित्व संपल्यावर त्याच्याबद्दलचा सगळा राग कसा अचानक निवळून जातो, याचा अनुभव सुधीर आज घेत होता.

 

इतके दिवस तो गावी थांबला होता, विधींमधील व्यस्ततेमुळे त्याला स्वतःच्या भावनांचा विचार करायला वेळ मिळाला नाही. पण आता जेव्हा शहरात परतण्याची वेळ आली होती, तेव्हा त्याच्या मनात एका विचित्र अस्वस्थतेने घर केले होते.

 

सकाळी सकाळी सुधीरने आपली बॅग भरली. गाडीची चावी हातात घेतली आणि तो पडवीतून बाहेर पडला. अंगणात उभे राहून त्याने एकदा त्या जुन्या घराकडे पाहिले. तिथेच, स्वयंपाकघराच्या उंबऱ्याजवळ जानकी – त्याची सावत्र आई – उभी होती.

 

तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती आणि अंगावरची पांढरी साडी तिच्या आयुष्यातील एकाकीपणाची साक्ष देत होती. जेव्हा सुधीर बाहेर पडला, तेव्हा जानकीने अतिशय आशेने, एका काकुळतीला आलेल्या नजरेने सुधीरकडे पाहिले.

 

सुधीरची नजर तिच्या नजरेला भिडली. एका क्षणासाठी त्याचे पाऊल अडखळले. त्याला मनातून वाटले की जावे, तिच्याशी बोलावे, म्हणावे—”आई, काळजी घे.” पण त्याच्या आतल्या जुन्या, साचलेल्या गैरसमजांच्या भिंती अचानक उभ्या राहिल्या. एवढ्या वर्षांचा अबोला, लहानपणापासून मनावर बिंबवलेला राग आणि नात्यातला दुरावा एका क्षणात संपणार तरी कसा होता. सुधीरने चेहरा दुसरीकडे वळवला, तिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखे केले, गाडीचे दार उघडले, आत बसला आणि गाडीचा वेग वाढवून तो निघून गेला.

 

गाडी चालवत असताना सुधीरचे मन मात्र गावीच अडकले होते. त्याच्या मागच्या काचातून त्याला जानकीचा तो केविलवाणा चेहरा दिसत होता. आपल्याला तिच्याबद्दल वाईट वाटत आहे, हे सुधीरला मान्य होते. पण मनात असूनही तो तिच्याशी एक शब्दही बोलू शकला नव्हता. या अबोल्याची मुळे खूप खोल रुजलेली होती. शहराकडे जाणाऱ्या महामार्गावर गाडी धावत होती आणि सुधीरचे मन भूतकाळात धावत होते.

 

तो केवळ १३ वर्षांचा होता, जेव्हा त्याची स्वतःची आई – कावेरी- या जगातून निघून गेली. आईच्या आजारपणाच्या त्या दिवसांत सुधीर लहान होता, पण त्याला स्पष्ट आठवत होते की आई सतत खोकायची, वेदनेने विव्हळायची. अण्णा शेतातल्या आणि शेताबाहेरच्या कामात इतके व्यस्त असायचे की त्यांना आईकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. आई गेली त्या दिवशीपासून सुधीरच्या मनात एक गोष्ट पक्की बसली की अण्णांच्या हलगर्जीपणामुळेच आईचा जीव गेला.

 

आईच्या जाण्यानंतर घर पोरके झाले. पण अण्णांना घराला आणि शेताला सांभाळण्यासाठी स्त्रीची गरज होती. आई जाऊन अवघे सहा महिने झाले असतील, अन अण्णांनी दुसरे लग्न केले. त्यांनी घरात आणले ते जानकीला.

 

सुधीरला अजूनही आठवतो तो दिवस, जेव्हा जानकी पहिल्यांदा त्या घरात पाऊल ठेवत होती. लहानगा सुधीर कोपऱ्यात उभा राहून तिच्याकडे पाहत होता. पण त्याच वेळी त्याच्या सभोवताली त्याच्या काकू आणि आत्या जमल्या होत्या.

 

मोठी काकू सुधीरच्या कानशीलाजवळ तोंड आणून म्हणाली होती, “बघ सुधीर, ही तुझी सावत्र आई आली. सावत्र आई कधीच कोणाची सख्खी होत नसते. आता तुझा छळ करेल ती. तुझ्या आईची जागा ही कधीच घेऊ शकत नाही. जपून राहा तिच्यापासून”

 

लहान, संस्कारक्षम आणि आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सुधीरच्या मनावर काकूंचे शब्द कोरल्या गेले होते. जानकीचे प्रत्येक बोलणे, प्रत्येक कृती तो संशयाच्या नजरेने पाहू लागला. आणि मग तो दिवस आला, ज्याने सुधीर आणि जानकीच्या नात्यावर कायमचा पूर्णविराम दिला.

 

सुधीर त्यावेळी १४-१५ वर्षांचा असेल. दुपारी घरात कोणी नव्हते. सुधीरला भूक लागली होती. तो एकटाच स्वयंपाकघरात गेला. चुलीवर कढई ठेवून तो भजी तळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अंदाज आला नाही आणि कढईतले गरम तेल थेट त्याच्या उघड्या हातावर पडले.

 

“आई गं!” सुधीर मोठ्याने ओरडला.

 

त्याचा आवाज ऐकून मागच्या दारातून जानकी धावत आली. सुधीरचा हात भाजलेला पाहून ती घाबरली. तिने पटकन त्याला नळाखाली नेले, थंड पाणी ओतले आणि घरातले औषध आणून त्याच्या हाताला लावू लागली. हे सर्व करताना तिच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. जर मुलाला काही झाले असते तर? याच काळजीपोटी आणि घाबरलेल्या अवस्थेत ती सुधीरवर खेकसली,

 

“डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काही काम होतं तर मला सांगायचं ना? स्वतः कशाला चुळबुळ करायची स्वयंपाकघरात जाऊन? उद्या काही भलतं-सलतं झालं असतं तर अण्णांनी माझा जीव घेतला असता”

क्रमशः

सावत्र आई – भाग २

Leave a Comment