जानकीच्या या ओरडण्यात भीती आणि काळजी होती. पण सुधीरला मात्र काकूंचे शब्द आठवले—’सावत्र आई तुझा छळ करेल.’ त्याला वाटले की ती त्याच्यावर उगीचच ओरडत आहे. एवढ्यात बाहेरून दोन्ही काकू आल्या. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि आगीत तेल ओतण्याची संधी साधली.
मोठी काकू म्हणाली, “बघा गं बायकांनो, पोरगं भुकेने व्याकुळ झालं म्हणून स्वतः करायला गेलं. तर ही नवीन आई त्याच्यावरच डाफरतेय! स्वतः तर वेळेवर खायला देत नाही अन् पोरगा गेला तर त्याच्यावरच खेकसतेय.”
“सावत्र ती सावत्रच! सख्खा असता तर पोटाशी धरून रडली असती, ओरडली नसती.” दुसरी काकू पुटपुटली.
त्या दिवशी सुधीरच्या मनात जानकीबद्दलचा राग आणखी वाढला. त्याने ठरवून टाकले की या बाईशी कधीच बोलायचे नाही. हिला आई मानायचे नाही. आई म्हणायचे सुद्धा नाही. अण्णांनीही या लहान-सहान गोष्टींकडे कधी लक्ष दिले नाही. ते आपल्याच तापात असायचे.
हळूहळू सुधीर मोठा झाला. आठवी-नवीनंतर त्याने अभ्यासाचे कारण सांगून शहरातल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला. तो घरापासून दूर निघून गेला. अण्णांशी तो कामापुरता बोलायचा आणि जानकीशी तर त्याने पूर्णपणे नाते तोडून टाकले होते.
काळ कोणासाठी थांबत नाही. सुधीर शिकला, मोठा झाला आणि त्याला शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. काही वर्षांनंतर सुधीरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुलगी पसंत पडली—संध्या. संध्या एक समंजस, शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती. लग्न ठरले, पण लग्नाच्या वेळीसुद्धा गावी जानकीसोबत सगळे परक्या सारखेच वागले होते.
सुधीरच्या काकू आणि आत्याने लग्नाची सूत्रे आपल्या हातात घेतली. “आम्हीच सुधीरच्या आईची जागा घेणार, या सावत्र बाईला पुढे मिरवू देणार नाही,” असे म्हणून त्यांनी जानकीला लग्नाच्या मुख्य विधींपासून दूर ठेवले. लग्न पत्रिकेत नाव छापण्यापासून ते मांडवातल्या पूजेपर्यंत जानकीला एका कोपऱ्यात ढकलण्यात आले.
जानकीने ते सर्व मुकाट्याने सहन केले. तिच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती अण्णांच्या रागाला घाबरायची, म्हणून शांत राहायची. लग्न झाल्यावर संध्या जेव्हा पहिल्यांदा गावी आली, तेव्हा ती आठ-दहा दिवस गावी राहिली. संध्याला सुधीरच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची थोडीफार कल्पना होती. पण तिचे मन साफ होते. ती जानकीशी खूप आदराने आणि प्रेमाने बोलायची. स्वयंपाकघरात तिची मदत करायची.
“सासूबाई, तुम्ही बसा, मी करते,” संध्या जेव्हा असे म्हणायची, तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी यायचे. इतक्या वर्षांत त्या घरात तिला ‘सासूबाई’ म्हणून असा मान कोणीच दिला नव्हता. पण संध्या आणि सुधीर आठ-दहा दिवसांतच शहरात निघून आले. त्यानंतर सणावारालाच त्यांची गावी फेरी व्हायची.
आता सुधीरच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती. या १२ वर्षांत जानकी शहरात सुधीरच्या घरी फक्त चार ते पाच वेळा आली होती. तीही जेव्हा त्याच्या आत्या किंवा काकू काही कामानिमित्ताने जायच्या तेव्हा त्यांच्यासोबत जाऊन यायची. सुधीर तिच्याशी कधीच मनमोकळेपणाने बोलला नाही. तो नेहमी तिच्या उपस्थितीत अस्वस्थ असायचे आणि घर सोडून बाहेर निघून जायचा.
पण सुधीरला जानकीच्या आयुष्याची दुसरी बाजू कधीच समजली नव्हती… किंबहुना त्याने ती समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता.
जानकीचे हे दुसरे लग्न होते. तिच्या पहिल्या लग्नात काय घडले होते, हे सुधीरला कधीच माहित नव्हते.
जानकी तरुण असताना तिचे पहिले लग्न एका साध्या घरात झाले होते. पण लग्नानंतर तीन-चार वर्षे झाली तरी तिला मूल झाले नाही. वैद्यकीय चाचण्यांबद्दल कोणाला काही माहिती नव्हती. खापर अर्थातच स्त्रीवर फुटले. पहिल्या नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी जानकीचा छळ केला. “वांझोटी” म्हणून तिला रोज टोमणे मारले गेले आणि शेवटी एका दिवशी नवऱ्याने तिला घरातून हाकलून दिले.
माहेरच्यांनी काही दिवस तिला सांभाळले. पण गरिबी आणि समाजाच्या टोमण्यांमुळे माहेरच्यांनाही ती ‘गळ्यातला भार’ वाटू लागली. त्यांनी घाईघाईने तिच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. अण्णा विधुर होते, त्यांना एक लहान मुलगा (सुधीर) होता. माहेरच्यांनी आपला भार दूर करण्यासाठी जानकीचे लग्न अण्णांशी लावून दिले. पण जानकीच्या नशिबात सुख लिहिलेलेच नव्हते.
क्रमशः