“आई…” सुधीरचा थरथरणारा आवाज त्या अंधाऱ्या खोलीत घुमला.
जानकीने मान वर करून पाहिले. तिला वाटले तिला भास होत आहे. पण समोर खरोखरच सुधीर उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
सुधीर धावतच पुढे गेला आणि त्याने जानकीच्या पाया पडण्याऐवजी थेट तिच्या पायांजवळ जमिनीवर बसून तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.
“आई… मला माफ कर! मला माफ कर आई!” सुधीर लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला.
जानकी चकित झाली. तिने इतक्या वर्षांत सुधीरला कधीच असे रडताना पाहिले नव्हते. “सुधीर… काय झाले? तू असा का रडतोयस?” तिने थरथरत्या हाताने सुधीरचे डोके स्पर्श केले.
“आई, मी खूप वाईट आहे. मी आयुष्यभर तुला सावत्र मानले, तुझ्या प्रेमाचा तिरस्कार केला. काकूंच्या आणि इतरांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी तुला दुरावलो. तो तेलाचा दिवस… तू माझ्यावर रागावली नव्हतीस, तू माझी काळजी करत होतीस! मला आज समजले आई… मला आज समजले” सुधीरचे शब्द अश्रूंमध्ये विरघळत होते.
जानकीच्या डोळ्यातूनही पाण्याचा लोट वाहू लागला. इतक्या वर्षांचे तिचे दुःख, तिचा एकाकीपणा, तिच्यावर झालेले अत्याचार—या एका शब्दाने, “आई” या हाकेने धुवून निघाले.
“सुधीर… माझी काहीच तक्रार नव्हती रे. तू मला काहीही बोलला नाहीस तरी मी तुला माझ्या पोरासारखाच मानला. देव उशिरा का होईना, माझ्या लेकाला माझे सत्य समजले,” जानकीने सुधीरला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
एवढ्यात संध्या आणि सोहमही त्या खोलीत आले. संध्याच्या डोळ्यातही पाणी होते.
“सासूबाई, चला उठा. आता या अंधाऱ्या खोलीत राहायची गरज नाही,” संध्या म्हणाली.
सुधीरने जानकीचा हात धरून तिला त्या अडगळीच्या खोलीतून बाहेर आणले. पडवीत बसलेल्या दोन्ही काकू आणि चुलत भावांनी जेव्हा सुधीरला जानकीचा हात धरून बाहेर आणताना पाहिले, तेव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या.
“हे काय चालले आहे सुधीर? तिला कुठे घेऊन चाललास?” लहान काकू ओरडली.
सुधीर त्यांच्याकडे वळला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.
” मी आईला माझ्या घरी घेऊन जात आहे ?” तो म्हणाला.
” आई? तुझ्या घरी ? आजपर्यंत एकदाही तिच्याशी नीट बोलला नाही तू. अन् अचानक घरी घेऊन जायला आलास. आज घेऊन जाशील अन् दोनचार दिवसात पुन्हा परत आणून सोडशील. मग हिची कामाची सवय पण मोडून जाईल त्यामुळे. त्यामुळे तू राहूदे तिला इथेच. आम्ही खायला घालू तिला इथेच.” मोठी काकू म्हणाली.
” बास झाले आता काकू” सुधीरचा आवाज घरात घुमला.
“लहानपणापासून तुम्ही माझ्या मनात या आईबद्दल विष पेरलेत. तिच्या निष्पापपणाचा फायदा घेतलात. अण्णा जिवंत असताना त्यांचे कान भरून या आईचा छळ केलात, आणि आता अण्णा गेल्यावर तिला अडगळीच्या खोलीत टाकून दिलेत?” तो म्हणाला.
“अरे पण ती सावत्र आई आहे तुझी. सावत्र आईसाठी सख्ख्या काकूला सुनावतोस तू ?” मोठी काकू बोलायला गेली.
“सावत्र ती नाही, सावत्र तुमचे विचार आहेत. जिने स्वतःचे सुख मारून या घराला सांभाळले, तिला तुम्ही वांझोटी आणि सावत्र म्हणून हिणवले. आजपर्यंत मी तुमच्या जाळ्यात अडकलो होतो, त्यामुळे मी आईच्या मायेला मुकलो, पण आता नाही. जर तुम्ही यापुढे माझ्या आईशी जरा जरी वाईट वागण्याचा प्रयत्न केलात, तर माझ्याशीगाठ आहे” सुधीर म्हणाला.
क्रमशः
———