सावत्र आई – भाग ३

त्या दिवशी जानकी त्याच्यावर रागावली नव्हती! ती घाबरली होती! जसा आज तो सोहमवर धावून गेला, अगदी तशीच ती त्या दिवशी एका १४ वर्षांच्या लेकराच्या काळजीपोटी त्याच्यावर डाफरली होती! तिच्या मनात त्याच्याबद्दल राग नव्हता, तर भीती होती की अण्णांच्या अनुपस्थितीत या मुलाला काही झाले तर काय होईल.

 

आणि त्या एका ओरडण्याला काकूंनी सावत्रपणाचे नाव दिले… आणि मी? मी मूर्खासारखा आयुष्यभर त्या एका शब्दाला धरून बसलो!

सुधीरचे डोळे पाण्याने भरले. त्याला संपूर्ण चित्राची दुसरी बाजू स्पष्ट दिसू लागली.

 

काकूंनी पेरलेले विष, आत्याने लावलेली काडी, अण्णांचा तापट स्वभाव आणि या सगळ्याच्या मध्ये पिसली गेलेली ती निष्पाप स्त्री! जिने स्वतःचे मूल नसतानाही, पहिल्या नवऱ्याने टाकून दिल्यानंतर, या घरात येऊन प्रत्येकाचा जुलूम सहन केला. लग्नात तिला मिरवू दिले नाही, घरात तिला मान दिला नाही, आणि जेव्हा सुधीर मोठा झाला, तेव्हा तोही तिला सोडून निघून गेला.

 

“मी किती वाईट वागत आलोय तिच्याशी आजवर…” सुधीर स्वतःशीच पुटपुटला. त्याचे पाय थरथरले आणि तो जमिनीवर बसला.

 

त्याच्या मनात काल गावाहून निघताना जानकीने त्याच्याकडे पाहिलेली ती आशेची नजर तरळली. ती नजर म्हणत होती—”मला इथे कुणाच्या भरवशावर सोडून चाललास पोरा”

 

सुधीरला आता एका क्षणाचाही विलंब करायचा नव्हता. त्याची चूक त्याला समजली होती, आणि ती दुरुस्त करण्याची हीच शेवटची संधी होती.

 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सुधीर उठला. त्याने संध्याला उठवले.

“संध्या, उठ. आपल्याला आत्ताच्या आत्ता गावी जायचे आहे,” सुधीरचा आवाज कापरा होता.

 

“गावी? काय झाले सुधीर? अण्णांचे विधी तर संपले ना?” संध्या आश्चर्याने म्हणाली,

 

“संध्या, मी आयुष्यभर एका मोठ्या गैरसमजात जगलो. मी माझ्या आईचा, जानकीचा खूप छळ केला तिला माझ्या अबोल्याची शिक्षा देऊन. आता अण्णाही नाहीत. त्या घरात त्या राक्षसांच्या मध्ये ती एकटी आहे. मला जायलाच हवे,” सुधीर गहिवरून म्हणाला.

 

सुधीरने संध्याचे हात हातात घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने काल रात्री त्याला झालेला साक्षात्कार आणि लहानपणीच्या त्या तेलाच्या घटनेचे सत्य संध्याला सांगितले.

 

“तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे. मी तुमच्यासोबत आहे. चला, आपण आत्ताच गावाला निघूया.” संध्या म्हणाली.

 

दोघांनी सोहमला उठवले आणि गाडीत बसवून थेट गावाचा रस्ता धरला.

सुमारे चार तासांच्या प्रवासानंतर सुधीरची गाडी गावातील घरापुढे थांबली.

 

घराच्या अंगणात नेहमीसारखीच शांतता होती, पण ती शांतता आता सुधीरला भयावह वाटत होती. सुधीर, संध्या आणि सोहम घरात शिरले.

पडवीत दोन्ही काकू आणि चुलत भाऊ बसले होते. चहा पित गप्पा मारत होते. सुधीरला अचानक आलेले पाहून ते आश्चर्यचकित झाले.

 

“अरे सुधीर? तू आज अचानक कसा काय आलास?” मोठ्या काकूने बनावट हसत विचारले.

 

सुधीरने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्याची नजर संपूर्ण घरात जानकीला शोधत होती. स्वयंपाकघर रिकामा होता. नेहमी तुळशीजवळ बसणारी जानकी तिथे नव्हती.

 

“काकू, आई कुठे आहे?” सुधीरने गंभीर आवाजात विचारले.

 

इतक्या वर्षानंतर जानकीसाठी आई असा उच्चार करणाऱ्या सुधीरकडे काकूने डोळे विस्फारत बघितले

 

“आई? जानकी ? असेल कुठेतरी मागे अडगळीच्या खोलीत. आता अण्णा गेल्यावर तिचे इथे काय काम? आम्ही तिला सांगून ठेवले आहे, गपचूप मागे पडून राहायचे. इथे पुढे येऊन जास्त मिरवायचे नाही.” मोठ्या काकूचा चेहरा जरा कडू झाला.

 

सुधीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला.

 

तो थेट घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या खोलीकडे गेला. ती खोली म्हणजे जुन्या तुटलेल्या वस्तू, शेतातली पोती आणि कोळ्याची जाळी साचलेली जागा होती. त्या दमट, अंधाऱ्या खोलीत, एका कोपऱ्यात, जमिनीवर पसरलेल्या एका जुन्या चटईवर जानकी बसली होती. तिच्यासमोर एका जुनाट ताटलीत उरलेली थोडी भाकरी आणि वरण ठेवले होते.

 

हे दृश्य पाहून सुधीरचे हृदय पिळवटून निघाले.

क्रमशः

सावत्र आई – भाग ४

Leave a Comment