” ह्या मुलाशी राधाचं लग्न झालं तर ती आयुष्यभर सुखात नांदेल…आयुष्यभर शोधत बसाल तरीही इतकं चांगलं स्थळ मिळणार नाही पोरीला…” गोदाक्का राधाच्या वडिलांना सांगत होत्या.
” पण त्या पोराचं हे दुसरं लग्न आहे…अन् तो वयाने पण मोठा आहे राधापेक्षा…राधा नुकतीच एकोणविस वर्षांची झालीय…मला वाटतं इतक्यात तिचं लग्न केलं तर घाई होणार ना ती…” राधाचे वडील म्हणाले.
” पण मी म्हणते काय हरकत आहे…आज ना उद्या करावच लागणार आहे ना तिचं लग्न…मग आताच काय वाईट आहे…आणि दुसऱ्या लग्नाचं म्हणाल तर तुम्ही पण केलंय की दुसरं लग्न माझ्याशी…आपलं बरं टिकून आहे आजवर… तिचं पण टिकेल…आणि मुलाकडच्याना हुंडा वगैरे काही नकोय…उलट लग्नाचा खर्च पण तेच करणार आहेत…आणखी किती चांगलं स्थळं पाहिजे तुम्हाला…मी तर म्हणते ह्या स्थळाला होकार देऊन द्या…” राधाची सावत्र आई तिच्या वडिलांना म्हणाली.
राधाचे वडील त्यांच्या बायको आणि गोदाक्का समोर जास्त काहीच बोलू शकले नाहीत. कदाचित हे लग्न केल्याने पोरीची सावत्र आईच्या जाचातून सुटका होईल असे राधाच्या वडिलांना वाटले. नात्या गोत्यातील लोकांनी देखील ह्या स्थळाला दुजोरा दिला आणि राधाचं लग्न राजेश सोबत ठरलं.
राजेश सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत होता. त्याच्या घरी त्याचे आई बाबा, आणि एक घटस्फोट झालेली बहीण राहायचे. त्याच्या पहिल्या बायकोशी घटस्फोट झाल्यानंतर घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली होती. राधा त्यांना बरी मुलगी वाटली. म्हणजे जी मुलगी सावत्र आईच्या हाताखाली मोठी झालीय तिच्यामध्ये सोशिकपण खूप असेल असाही विचार त्यांनी केला होता.
राधा जेमतेम चार वर्षांची असेल जेव्हा तिची आई हे जग सोडून देवाघरी निघून गेली. राधाला आई मिळावी म्हणून पुढच्या दोन महिन्यातच तिच्या वडिलांचे दुसरे लग्न लावण्यात आले. पण या नवीन आईने राधा ची आई न बनता सावत्र आई बनायचे ठरवले होते. सुरुवातीपासूनच ती राधाला बरे पाहायची नाही आणि जेव्हा तिला स्वतःची मुलं झाली तेव्हापासून तर राधाला छळायलाच लागली. राधा मात्र लहानपणी पासूनच आईचा पदर पकडून नुसती तिच्या मागे मागे करायची. आईने सांगितलेले प्रत्येक काम मन लावून करायची.
राधाला मात्र आता आपण आपलं माहेर सोडून दुसरीकडे जाणार ह्या विचारानेच रडू आले. पण तिच्या वडिलांनी आणि तिच्या आजीने तिला समजावून सांगितले. मुलगा चांगला आहे आणि शिवाय सरकारी नोकरीत उच्चपदावर कार्यरत आहे. तुला सुखात ठेवेल. यापुढे गरिबीची झळ बसणार नाही तुला.
मुळातच समजुतदार असणारी राधा यावेळीसुद्धा तिच्या बाबांचे म्हणणे समजली होती. आपले बाबा केवळ आपल्या भल्यासाठीच हे लग्न ठरवत आहेत हे ती जाणून होती. बाबांच्या होकाराला स्वतःचा होणार समजून तीसुद्धा लग्नाच्या तयारीला लागली. काहीही हुंडा न देता राधाचं लग्न होतंय म्हटल्यावर तिच्या सावत्र आईला फार आनंद झाला होता. तशीही तिला राधा तिच्या डोळ्यांसमोर खपतच नसे. नवर्यासमोर ती राधाला छळू शकत असे पण तिला कधीच घरातून बाहेर काढू शकली नाही कारण राधा चे बाबा आणि आजी तिला फार जपत असत.
महिन्याभरा नंतर राधा आणि राजेशच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. आणि बघता बघता राधा च्या लग्नाचा दिवस उजाडला देखील. राधा आणि राजेशचे लग्न झाले. आणि राधा तिच्या सासरी निघून गेली.
दुसऱ्या दिवशी राधाला मांडव परतणी साठी माहेरी घेऊन आले होते. पुढचे दोन दिवस राधा माहेरी राहणार आणि तिसऱ्या दिवशी राजेश तिला तिच्या सासरी घेऊन जाणार असे ठरले. माहेरी आल्यावर राधाचे दोन दिवस कसे निघून गेले हे तिला कळलेच नाही.
आज राजेश तिला घ्यायला येणार होता. राधा ने सकाळी लवकरच तिची तयारी आटोपली आणि तिच्या आईला स्वयंपाकात मदत करू लागली. तिच्या मनाला अनोखी हुरहूर लागली होती. माहेर सोडून जावे लागणार म्हणून ती थोडी उदास होती पण नवऱ्याच्या घरी परतायची एक अनामिक ओढ तिला लागली होती. ती राहून राहून दाराकडे बघत होती. आणि तिला तसे करताना पाहून घरात असलेली पाहुणे मंडळी तिला चिडवत होती. आणि ती असे काहीच नाही असे सांगून खाली मान घालून कामात मदत करत होती.
आणि इतक्यात कुणीतरी लगबगीने घराचे दार ढकलून घरात आले आणि म्हणाले…
” राधाच्या घरच्या पाहुण्याचा अपघात झालाय…बराच मार लागला आहे…लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलंय…आता सर्व काही देवाच्या हातात आहे…”
त्या माणसाने बोललेला एक एक शब्द ऐकताना राधाला कुणीतरी कानात शिसे ओतल्यासारखे वाटले. क्षणात तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. तिचं डोकं बधीर झालं होतं. हातावरची मेहेंदी सुद्धा उतरली नव्हती आणि तिचं सौभाग्य धोक्यात आलं होतं. काय करावे आणि काय नको हे तिला काहीच सुचत नव्हतं.
ती देवासमोर गेली आणि तिने आर्तपणे देवाला विनवणी केली. देवा माझ्या सौभाग्याचं रक्षण कर म्हणून. राधा ला आता शेवटचा आधार देवाचाच वाटत होता. इकडे घरी सगळे नातेवाईक मात्र राधा समोर हळहळ व्यक्त करत होते. आणि सगळा दोष राधाच्या नशिबावर देऊन मोकळे होत होते. राधा ची सावत्र आई जिला आता राधा कायमची तिच्या सासरी जाणार म्हणून आनंद होत होता तिला तर वेगळाच घोर लागला होता.
घरची पुरुषमंडळी लगोलग दवाखान्यात पोहचली. राजेशला खूप लागलं होतं. सुदैवाने त्याचा जीव वाचला होता पण तो कोमात गेला होता. दुसऱ्या दिवशी सर्वजण राधाला दवाखान्यात घेऊन गेले. लग्नात अगदी राजबिंडा दिसणाऱ्या राजेशला या अवस्थेत पाहून राधाला मनातून गहिवरून आले. तो कोमात आहे हे ऐकुन राधाला खूप वाईट वाटले पण त्याचा जीव वाचलाय हे सुद्धा तिच्यासाठी कमी नव्हते.
राजेशच्या घरच्या मंडळींनी राजेशच्या या अवस्थेचे खापर राधावर च फोडले. तिचा पायगुण वाईट म्हणून राजेश वर हा प्रसंग ओढवलाय असे तिच्या मनावर बिंबवण्यात आले. आधीच दुःखात असलेली राधा तिच्या सासरच्या मंडळींनी दिलेल्या या वागणुकीमुळे आणखीनच दुखावली गेली.
राधाला तिच्या घरचे दवाखान्यातून घरी तिच्या माहेरच्या घरी घेऊन आले. प्रसंग सुद्धा असा विचित्र होता की राधाला त्यांच्या घरी आता पाठवायचे की नाही, किंवा पाठवले तर कसे पाठवावे, कारण तिच्या सासरच्या लोकांनी तिला दिलेली वागणूक बघून ते तिला त्यांच्या घरी नेतील ह्याची काही खात्री नव्हती.
(राधा च्या आयुष्यात पुढे काय होईल..? राजेश ठीक होईल का..? हे पाहूया पुढील भागात…)
वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग २