दिवसामागून दिवस जात होते. पण राजेशच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा दिसत नव्हती. राधाचे देवाला साकडे घाल नेणे सुरूच होते. दोन महिने निघून गेले पण राधाला मात्र हे दोन महिने खूप कठीण गेले. या दोन महिन्यात तिच्या मनाची नुसती घालमेल होत होती. तिला सारखी राजेशला भेटायची इच्छा व्हायची पण कुणी तिचे काही ऐकायला तयार नव्हते. घरची पुरुषमंडळी वरचेवर त्याला बघून यायचे आणि राधाला त्याच्या तब्येती बद्दल माहिती द्यायचे. राजेश लवकर बरा होईल या आशेवर राधा कसतरी आला दिवस पुढे ढकलत होती.
राजेशच्या तब्येतीत सुधारणा होत नाहीय आणि दवाखान्याचे बिल पण वाढत आहे हे पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला घरीच शिफ्ट केले. अधूनमधून डॉक्टर त्याला तपासायला येत असत. पुढे राजेशच्या घरच्यांनी राजेश ची सेवा करायला म्हणून कुणीतरी हवे ह्यासाठी राधाला घरी आणायचा विचार केला.
ते तडक राधाच्या माहेरी गेले आणि तिला घरी घेऊन जाण्याची तयारी दाखविली. राजेशच्या तब्येतीत सुधारणा नाही हे माहिती असल्याने राधा च्या घरच्यांनी राधाला पाठवायला थोडे आढेवेढे घेतले पण राधा मात्र सासरी जाण्याच्या निर्णयावर ठाम होती. तिने राजेशला मनोमन आपले मानले होते. सप्तपदी घेताना तिने राजेशला साथ देण्याचे वचन दिले होते. आणि आता काहीही झाले तरी ती त्याला अशा अवस्थेत एकटे सोडायला तयार नव्हती.
शेवटी राधा तिच्या सासरी गेलीच. तिने राजेश ची मनोभावे सेवा सुरू केली. तिने डॉक्टरांना काय करायचे आणि काय नको हे विचारून घेतले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पथ्यपाणी ती व्यवस्थित सांभाळायची. शिवाय घरची सर्व कामे ती एकटीच करायची. आता घरच्यांनी सर्व कामे राधा वर टाकली होती. आणि ती अगदी मनापासून सर्वांची कामे करायची. अगदी कुठल्याही तक्रारीला जागा न ठेवता.
आणि देवाच्या कृपेने राजेश लवकरच कोमा मधून बाहेर आला. पण अजूनही त्याला पलंगावरून आधारा विना उठता ही येत नव्हते. राजेश नुकताच कोमातून बाहेर आला होता पण त्याला लागलेल्या इतर मारामुळे त्याच्या हातापायांची नीट हालचाल होत नव्हती. पण राधाने हार मानली नाही. तिने डॉक्टरांकडून हातापायांचे व्यायाम शिकून घेतले आणि रोज त्याच्याकडून व्यायाम करून घेऊ लागली.
हळूहळू राजेशच्या तब्येतीत फरक दिसत होता. मात्र त्याला पूर्णपणे बरे वाटायला तब्बल एक वर्ष एवढा कालावधी लागला. तो बरा झाल्यावर मात्र राधाला त्याच्या जवळपास न राहू देता त्याची कामे त्याची आई आणि बहिण करायला लागले. जणू त्याला हे जाणवायला हवे की त्याची पूर्ण सेवा सुश्रुषा राधाने न करता आम्हीच केलीय. आणि बहिणीला सतत असे वाटायचे की दादा आणि वहिनी चे चांगले पटायला लागल्यास वहिनी तिच्यावर आपला हुकुम चालवेल.
राधा मात्र राजेशच्या चांगल्या तब्येती कडे पाहून खूप आनंदी होती. आपण राजेशची सेवा केलीय हे त्याला कळण्यापेक्षा तो ठीक होणे महत्त्वाचा आहे असे राधाला वाटायचे. पण आता राधाची सासू आणि नणंद तिला थोडा त्रास द्यायला लागले होते. हे काम असेच करायचे. ही वस्तू इथेच ठेवायची ह्यावरून तिला बोलायला लागल्या होत्या.
राधा मात्र गुपचूप सर्वकाही सहन करायची. माहेरी सावत्र आईच्या हाताखाली राहून तिच्यात आपसूकच इतकी सहनशक्ती आली होती. एकदा मात्र तिच्या हातून चहाचा कप खाली पडून फुटला आणि तिच्या नणंदेला राजेश समोर तिला घालून पाडून बोलायची नामी संधी मिळाली होती. ती राधाला म्हणाली…
” काय ग वहिनी…तुला एकही काम नीट जमत नाही का..? नुसता वेंधळेपणा करत राहतेस जेव्हा बघावं तेव्हा…?”
” सॉरी ताई…चुकून पडला…पुन्हा नाही होणार असे…मी काळजी घेईल. “
” बघ ना दादा…ह्या तुझ्या बायकोला एकही काम धड जमत नाही…स्वयंपाकघरात तर मदत नसतेच पण बाकीही काही काम येत नाही…” नणंद बाई म्हणाल्या.
तू आजारी असताना सुद्धा काहीच नाही करायची ही…आणि तिला एखाद्या कामासाठी बाहेर पाठवलं की चांगली नीटनेटकी होऊन बाहेर पडायची…आधीच तर हिच्या पायगुण मुळे तुझा अपघात झाला…आणि हिला त्याचं काहीच वाटत नाही…बघ बाबा…आताच आवर हिला…नाहीतर डोक्यावर बसेल…” सासूबाईंनी सुद्धा राधाबद्दल राजेशचे कान भरवण्यात कुठलीही कसर ठेवली नाही.
” अच्छा…मग माझी इतके दिवस सेवा कुणी केली तर…?” राजेश म्हणाला.
” आई आणि मी रात्रंदिवस तुझी सेवा करायचो…ही वहिनी सुद्धा कधी कधी यायची मदत करायला…पण जास्तीत जास्त वेळ मात्र हीचा स्वतःचे काम करण्यात जायचा…” नणंद बाई म्हणाल्या
राजेशने राधाकडे पाहिले. तिच्या टपोऱ्या डोळ्यात आसवांची दाटी झाली होती. तो त्याच्या बहिणीला म्हणाला.
” मला माहिती आहे की ती या घरात नवीन आहे…तिला रुळायला आणि आपल्याला समजून घ्यायला वेळ लागेल…पण हे मात्र साफ खोटं आहे की तिने माझी सेवा नाही केली.
अगं…एकदा तिला बघ तरी…किती निरागस आहे ती…मी इतके दिवस तिला बघत आलोय…आजारी असलो तरीही हीचा स्पर्श जाणवायचा मला…तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल ची काळजी तेव्हाही जाणवायची मला…फक्त मी तिला कधीच बोलून दाखवू शकलो नव्हतो…पण मी आज म्हणतोय… राधासारखी बायको मला सात जन्म देखील मिळाली नसती…नशिबाने मला अशी बायको दिलीय आणि मी तिला आयुष्यभर जपेन…अगदी तिची सावली होऊन…
आणि माझा अपघात हिच्या पाय गुणामुळे झाला नसून मी त्या दिवशी हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि माझ्याच विचारात गाडी चालवत होतो… हिच्या पायगुणामुळे काही झालं असेल तर ते म्हणजे इतक्या भयानक अपघातातून माझा जीव वाचला…
माझ्या पहिल्या बायकोच्या विरोधात सुद्धा तुम्ही नेहमीच माझे कान भरत आलात आणि म्हणूनच आमच्यातील वाद विकोपाला जाऊन आमचा संसार तुटला. पण एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाही… राधाच्या रूपाने मला आयुष्याने दुसरी संधी दिली आहे…आणि की त्या संधीचे सोने करणार आहे…आजपासून मी आयुष्यातील प्रत्येक वळणावर राधासोबत आहे… राजेश म्हणाला.
राजेशचा प्रत्येक शब्द राधा कानात प्राण आणून ऐकत होती. आणि त्याच्या प्रत्येक शब्दाने कृतार्थ होत होती. आताही तिच्या डोळ्यात आसवे दाटून आली होती. पण ती आसवे आनंदाची होती. आयुष्यभर तिने जो काही संघर्ष केला होता त्याचा शेवट हा असा गोड झाला होता.
राजेश चे बोलणे ऐकून त्याच्या आईला आणि बहिणीला त्यांची चूक कळून आली होती. राधा ने त्यांच्या घरासाठी, त्यांच्या मुलासाठी इतके काही केलेले असताना त्यांनी राधाला बोल लावणे किती चुकीचे होते ह्याची जाणीव दोघींनाही झाली होती.
राजेश आणि राधाने नजरेनेच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. आणि इथूनच त्यांचा राजा राणी च्या गोड संसाराला सुरुवात झाली.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
Chaan story👌
खुपच छान आणि हृदयस्पर्शी.