आपल्याच जगात रमणाऱ्या राजेश आणि राजश्री ला राजेशची आई आता भार वाटायला लागली होती. आणि राजेशच्या आईची मात्र एकाकीपणा मुळे तब्येत खालावत जात होती. आजारी आईची सेवा करणे दोघांनाही जमत नव्हते. त्यांनी चोवीस तास एका नर्सला त्यांची काळजी घेण्यासाठी नेमले होते.
पण राजेशच्या आईला सतत राजेशची आठवण यायची आणि नर्स वारंवार राजेशला कॉल करायची की आईला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे. राजेशला मात्र आईच्या ह्या गोष्टीचा राग यायचा. राजश्री सुद्धा आईच्या तक्रारी सांगून त्याच्या रागात भर घालायची.
एके दिवशी तो आईला घरी येऊन खूप बोलला. तुला या घरात कशाचीच कमी नाही. तरी तू मला वारंवार त्रास देतेस. तुला माझी प्रगती बघवत नाही वगैरे वगैरे. हे ऐकून राजेशच्या आईला खूप दुःख झाले. आपल्या मुलासाठी आपण फक्त भार आहोत हे त्या माऊलीला कळून चुकले होते.
शेवटी त्याने आईला एका चांगल्या वृद्धाश्रमात ठेवायचे ठरवले. त्याच्या आईने वृद्धाश्रमात जायला नकार दिला पण राजेशने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला वृद्धाश्रमात ठेवलेच. काही दिवस तो महिन्या दोन महिन्यातून आईला भेटायला जायचा. पण नंतर त्याला आईला भेटायला जायचा वेळच मिळाला नाही. पण वृद्धाश्रमात डोनेशन मात्र वेळच्या वेळी द्यायचा. आणि त्यानंतर तो आज आईला इथे पाहत होता. त्याच्या जुन्या घरात. जे त्याने काही दिवसांपूर्वीच सदाला विकले होते. त्याला काहीच कळत नव्हते.
समोर जाऊन आईला भेटायची त्याची हिम्मत झाली नाही. तो मागे जायला वळणार इतक्यातच त्याला समोरून सदा येताना दिसला. त्याला इकडे आलेले पाहून सदा सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. न राहवून राजेशने सदाला विचारलेच…
” माझी आई काय करतेय इथे…?”
” हे घर मी त्यांच्यासाठीच विकत घेतलंय तुमच्याकडून…?”
” पण तू माझ्या आईला कसा ओळखतोस…?” राजेशने आश्चर्याने विचारले.
” मी आधी तुमच्या घराच्या मागेच राहायचो…आमची परिस्थिती खूप हलाखीची होती…माझा बाप दारुडा होता…दारूच्या व्यसनापायी त्यांनी आईला खूप त्रास दिला…तेव्हा तुमच्या आईने माझ्या आईला खूप आधार दिला…जेव्हा ती उपाशी असायची तेव्हा तुमची आई तिला जेवण द्यायची…
मी आईच्या पोटात असताना कित्येक वेळा आईला मायेने जवळ घेऊन भरवले होते त्यांनी…पुढे माझा बाप दारूच्या व्यसनाने लवकर वारला तेव्हा मला वाढवण्यासाठी आईला बाहेर जाऊन काम करणे भाग होते…पण मी लहान असल्याने मला सोडून बाहेर जायची आईची इच्छाच होत नव्हती तेव्हा तुमच्या आईंनी स्वतःहून माझी जबाबदारी घेतली होती…
मी अवघा तीन वर्षांचा होतो तेव्हापासून आई लोकांच्या घरी धुणीभांडी करायला जायची तेव्हा ह्याच मला सांभाळायच्या…अगदी स्वतःच्या मुलासारख्याच मला वागवायच्या…आई नेहमीच सांगायची की ह्या तुझ्या दुसऱ्या आई आहेत…पुढे आम्ही कामानिमित्ताने मामाच्या गावी राहायला गेलो…पण मध्ये मध्ये इथे येणं व्हायचं तेव्हा आम्ही इथे तुमच्या घरी यायचो…
पुढे मी पंधरा वर्षांचा होतो तेव्हा एका आजाराने आई गेली आणि मी पोरका झालो…त्यानंतर मी मामाच्या घरी राहायचो पण आईचं प्रेम मला कुणीच दिलं नाही…मामी माझ्याकडून घरातली सगळी कामे करून घ्यायची आणि रात्रीचं उरलेलं अन्न जेवायला द्यायची…मामाने मला एका गॅरेज वर कामाला लावलं…गॅरेज चा मालक खूप चांगला होता…तिथे मी काम शिकलो आणि काही दिवसानंतर मी मालकांच्या मदतीने स्वतःच एक लहानस गॅरेज सुरू केलं…
त्यानंतर लग्न झालं आणि एक मुलगा पण झाला…पण आईची आठवण सतत यायची…माझी बायको पण अनाथ होती…ती लहान असतानाच तिची आई हे जग सोडून गेली होती… एकेदिवशी एका साहेबांची गाडी दुरुस्त करण्यासाठी एका वृद्धाश्रमात गेलो तेव्हा अचानकच तुमच्या आईला बघितलं…त्यांची विचारपूस केली तेव्हा कळलं की त्या खूप दुःखी होत्या…मुलाच्या आठवणीने कधीकधी व्याकूळ होऊन जायच्या…
माझ्या मनात विचार आला की मी आईसाठी तळमळतो आहे आणि ह्या मुलासाठी…जर ह्या माझ्यासोबत माझ्या घरी आल्या तर…मग मी घरी जाऊन याबद्दल बायकोशी बोललो तर तिला खूप आनंद झाला…मग मी तिला आणि माझ्या मुलाला घेऊन आईंकडे आलो…आईला स्वतःची ओळख करून दिली…
त्यांना म्हणालो की मी अनाथ आहे… माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवनार कुणीच नाही…बायकोने सुद्धा त्यांना विनंती केली…त्या हो म्हणतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण त्या लगेच तयार झाल्या…त्यांना मुलगा मिळाला…मला आई मिळाली…अन् माझ्या मुलाला आजी मिळाली…
आईच्या येण्याने माझ्या घरात नुसता आनंदच आनंद आला होता…पुढे आईच्या बोलण्यातून कळलं की त्यांना या जुन्या घराची खूप आठवण येते…माहिती काढली तेव्हा कळलं की तुम्ही हे घर विकणार आहात… मग काय…हिम्मत केली आणि घर घेण्याचे ठरवले…आधी जवळ इतका पैसा जमा नव्हता…पण घर घेण्याचे नक्की केले होते…
आणि देवाच्या कृपेने त्या कळत गॅरेज खूप चाललं…लवकरच पैसा जमा झाला आणि आईला हे घर विकत घेऊन दिलं…आईला खूप आनंद झाला…आता आम्हीसुद्धा इथेच राहतो…आईसोबत…आईच्या येण्याने आमचं कुटुंब परिपूर्ण झालं…” सदा मंत्रमुग्ध झाल्यासारखा बोलत होता.
आणि आपण काय गमावलंय ह्याची अजूनही कल्पना नसलेला राजेश मात्र सदाने उगीच आईची जबाबदारी घेतली म्हणून त्याला मनातल्या मनात मुर्खात काढत होता…
ज्याला आईचं प्रेम मिळू शकलं नाही अशा सदाला आईच्या प्रेमाची किंमत आणि जाणीव दोन्ही होती. पण ज्याला देवाने मातृत्वाच दान भरभरून दिलं त्याला मात्र आईची किंमत अजूनही कळली नव्हती. कधीतरी राजेशला त्याची चूक नक्कीच लक्षात येईल आणि तेव्हा पश्चात्ताप करण्यावाचून इतर कोणताही पर्याय त्याच्याकडे नसेल हे ही तितकेच खरे.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान आणि हृदयस्पर्शी