मधुराचे आई बाबा घरी आले तशी ती आनंदाने त्यांच्यासमोर गेली आणि तिने विचारले.
” आई…मला दाखव ना…माझ्यासाठी कुठला ड्रेस आणला आहेस तू…काव्याताईच्या लग्नात घालायला…?”
तसा आईने तिच्यासाठी आणलेला ड्रेसचा कापड तिच्या हातात दिला. ड्रेसचा कापड पाहून मधुराने नाक मुरडले…
” काय आई…किती साधा ड्रेस आहे हा…आणि आजकाल असा पंजाबी ड्रेस घालून कोण जातं लग्नात… काव्या ताई बघ…किती छान छान ड्रेस घालते नेहमी…आणि मला तू कधीच काही चांगलं घेऊन देत नाहीस…” मधुरा नाराजीने म्हणाली.
” मधुरा…जास्त बोलू नकोस…जे आणलं ते घाल…आणि आईला असे उलटून बोलणे मला आवडणार नाही…” बाबा म्हणाले.
तशी मधुरा थोड्या रागातच खोलीत निघून गेली. तिला असे नाराज पाहून आईला वाईट वाटलं पण तिचाही नाईलाज होता. त्यांच्या परिस्थितीला जे शक्य होतं तेच त्यांना वापरावं लागणार होतं.
ही आहे आपल्या कथेची नायिका मधुरा. सतरा वर्षांची अल्लड मुलगी. जी नुकतीच वयात येऊ लागलीय. शहरात राहणाऱ्या तिच्या आत्याच्या मुलीला पाहून आपणही चांगले कपडे घालावे आणि सुंदर दिसावं असं तिला हल्ली सतत वाटू लागलंय. त्यामध्ये आत्या सुद्धा तू माझ्या घरी असतीस तर तुला छान छान कपडे घेतले असते असे सतत म्हणायची. त्यामुळे मधुराला आता आपण घरिब घरचे आहोत म्हणून वाईट वाटू लागले होते. तिच्या मनात सतत हा विचार असायचा की आपण आत्यासारखे श्रीमंत का नाही आहोत. तशी त्यांची परिस्थिती फारशी वाईट नव्हती.
मधुराचे बाबा शेतकरी होते. आणि हे दिवस पेरणीचे होते. त्यामुळे होते नव्हते ते सारे पैसे पेरणी साठी खर्च झाले होते. आणि त्यांच्या एकुलत्या एका बहिणीच्या मुलीचं लग्न असल्याने त्या लग्नासाठी सुद्धा पैशांची सोय लावावी लागणार होती. काव्याला काहीतरी मोठं आंदण ( लग्नात मुलीला दिली जाणारी भेटवस्तू ) द्यावं लागणार होतं.
शिवाय आहेर सुद्धा चांगला महागतला लागणार होता. अशात मधुराला जो ड्रेस आवडला होता तो चार – पाच हजारांपर्यंत तरी आला असता. पण सध्या एवढा महाग ड्रेस परवडत नसल्याने तिच्या आईने स्वतःच्या मर्जीने तिच्यासाठी एक छानसा ड्रेसचा कापड आणला होता. आणि तिची आई घरीच शिलाईचे काम करायची त्यामुळे शिलाईचा वेगळा खर्च येणार नव्हता.
पण मधुरा मात्र ह्यासाठी रुसून बसली होती. काव्याच्या लग्नाला अजुन एक महिना बाकी होता. काव्या तिच्या मीना आत्याची मुलगी होती. मीना आत्या घरी चांगलीच श्रीमंत होती. आत्याचे मिस्टर चांगल्या नोकरीवर होते. आत्याला दोन मुलं होती. एक काव्या जीचे लग्न ठरले होते. आणि दुसरा कबीर जो तिच्यापेक्षा लहान होता.
मीना आत्या नेहमीच मधुराला म्हणायची की तू माझ्या घरी राहायला ये…मी तुला असेच कपडे घेत जाईल. तुझे खूप लाड करेन. मधुरा ला सुद्धा आता असच वाटायचं की आपण आत्याच्या घरी जन्माला आलो असतो तर किती छान झालं असतं.
काव्या खूप चांगले, महागातले कपडे वापरायची. मधुराला तिचे कपडे खूप आवडायचे. पण तिच्या इतकी चांगली परिस्थिती नसल्याने मधुराला जे आहे त्यावरच समाधान मानायचि. तशी मधुरा समजदार मुलगी होती पण कधी कधी तिला ह्या सर्वांचा राग येई. ती सतत तिच्या आईला बोलून दाखवायची की देवाने मला आत्याच्या घरी का नाही जन्माला घातले. आईला तिच्या बोलण्याचे वाईट वाटायचे पण मधुरा आपल्याला कधीतरी समजून घेईल हे तिला माहिती होते.
आजही मधुरा अशीच रागात होती. घरातील कामे आटोपल्या नंतर तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली.
” रागात आहेस बाळ…?”
” हो…” मधुरा रागातच म्हणाली.
” तू वाईट वाटून नको घेऊ…बाबा जवळ खरंच जास्त पैसे नव्हते…आणि पुढे लग्नात पण बरेच पैसे खर्च होणार आहेत…तू खूप समजुतदार आहेस ना…पैसे आले की तुला हवा तसा ड्रेस घेऊयात आपण…” आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
मधुरा मात्र काही बोललीच नाही. ती रागातच होती. ती तशीच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिची आत्या काही कामानिमित्ताने बाजूच्या गावात आली होती. भावाची भेट घ्यावी म्हणून आत्या तिथलं काम झाल्यावर मधुराच्या घरी आली. मधुरा आणि तिचा लहान भाऊ शुभम आत्याला पाहून खूप खुश झाले.
सगळ्यांच्या भेटी झाल्यावर आत्या घरी जायला निघाली तेव्हा जाताना आईला म्हणाली.
” वहिनी…मधुराला माझ्यासोबत पाठवशिल का…तेवढीच लग्नापर्यंत काव्याला सोबत होईल…”
मधुरा तर आत्याच्या घरी जाण्याच्या विचारानेच खूप खुश झाली होती. तिची आई मात्र आतापासूनच तिला पाठवावे की नाही या विचारात होती कारण लग्नाला अजुन एक महिना शिल्लक होता. मधुरा मात्र आत्याच्या घरी जायला खूपच उतावीळ होती. शेवटी नणंदेच्या आग्रहापुढे आणि मधुराच्या हट्टापुढे त्यांचे काहीच चालले नाही त्यांनी मधुराला आत्यासोबत जायला परवानगी दिली.
मधुरा खूप खुश झाली. तिने पटपट तिची बॅग भरली आणि आत्याच्या घरी जायला निघाली.
आत्याच्या घरी आल्यावर काव्याताईला भेटून मधुराला खूप आनंद झाला. पहिला दिवस खूप मजेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा झोपेत असताना आत्या आली आणि मधुराला गदगद हलवून झोपेतून उठवले. किलकिल्या डोळ्यांनी ती आत्याकडे पाहत होती. इतक्यात तिची आत्या म्हणाली.
” अगं…घड्याळात बघ…साडेसहा वाजले आहेत…घरी पण एवढा वेळ झोपत असतेस का…आईने हेच शिकवले का तुला…?”
” नाही आत्या… झोप उघडली नाही बघ माझी…”
” उद्यापासून रोज साडेसहाला उठत जा…” आत्या म्हणाली.
तशी मधुरा झोपेतून उठली. तिने अंघोळ वगैरे उरकली. रूम मध्ये येऊन पाहते तर आत्याची मुलगी अजूनही झोपलेली होती. इतक्यात तिच्या आत्याने तिला आवाज दिला.
” अगं मधुरा…आज काव्याच्या सासरची मंडळी घरी येणार आहेत…खरेदीला केव्हा आणि कुठे जायचं हे ठरवायचं आहे…तू घरातील केर वगैरे काढ…आणि मी चहा नाश्त्याच बघते…आपण पटापट घरातील कामे आवरून घेऊ…” आत्या म्हणाली.
तशी मधुरा कामाला लागली. त्यानंतर काव्या उठली. घरच्या सर्वांचा चहा नाश्ता झाला तोवर मधुराला साफसफाई केली. सर्वांचा नाश्ता झाल्यावर मधुराने सुद्धा नाश्ता केला. त्यानंतर बराच वेळ घरातील कामे पुरली तिला. काव्या मात्र दिवसभर आज हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू हे ठरवत होती. त्यानंतर दुपारच्या वेळेला काव्याच्या सासरकडील मंडळी आली. त्यांच्यासाठी आत्याने मधुराच्या मदतीने स्वयंपाक केला होता.
क्रमशः
तिच्या साधेपणातील सौंदर्य – भाग २ (अंतिम भाग)