“साकेत…आज मला बरं नाही…आज तू घरीच थांब ना…निदान आज आपल्या अथर्वला तरी सांभाळ…” स्नेहलने बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या साकेतला दुरूनच आवाज दिला.
” काय ग तुझी नेहमीचीच कटकट आहे…आज आम्ही सगळे मित्र रिसॉर्ट वर फिरायला जाणार आहोत…मी नाही थांबू शकणार… एखादं औषध घे आणि आराम कर… अथर्व ला सुद्धा काही खाऊ घालून झोपवून दे…मी निघत आहे आता…” साकेत एवढे बोलून गाडीची चावी घेऊन बाहेर निघाला देखील.
स्नेहल मात्र अजूनच विचारात पडली. एवढं काय असतं ह्याला मित्रांचं म्हणून आज पुन्हा तिचे मन खट्टू झाले. ह्याचं हे नेहमीचच झालंय म्हणून नाईलाजाने का होईना तिने ते सगळं तिच्या बाबतीत स्वीकारले होते. बायको म्हणून त्याने तिला कधीच पुरेसा वेळ दिलेला नव्हता. पण निदान मुलाच्या बाबतीत त्याचे असे वागणे तिला नेहमीच खटकायचे.
साकेत आणि स्नेहलच्या लग्नाला जवळपास आठ वर्ष पूर्ण होत आली होती. दोघांचंही अरेंज मॅरेज. दोघेही चांगल्या जॉब वर होते. घरची परिस्थिती सुद्धा चांगली संपन्न होती. लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष एकमेकांना समजून घेण्यातच गेलं. दोघेही एकमेकांसोबत खूप फिरून आले. ऑफिस, त्यानंतर आठवड्यातून दोन तीनदा बाहेर डिनर, मित्र मैत्रिणींसोबत गेट टुगेदर, आणि पार्टीज यामध्येच पहिले दोन वर्ष निघून गेलीत.
त्यानंतर मात्र स्नेहल आई होण्याचे स्वप्न पाहू लागली. तिने एकदा त्याला म्हटले…
” साकेत…आता आपण बेबी प्लान करुयात ना…मला लहान मुलं खूप आवडतात…आणि आजकाल कुठेही लहान मूल पाहिलं की मलापण वाटत आपल्याला पण लवकर मुल व्हावं…” स्नेहल उत्साहाने म्हणाली.
” अग आताच काय घाई आहे…अजुन थोडी लाईफ एन्जॉय करुयात ना…आणि मुलाबाळांच काय ग…ते होतीलच ना पुढे…तू आता फक्त तुझ्या कामात लक्ष दे…पुढे बघुयात ना..”
एवढे बोलून साकेतने विषय टाळला होता. स्नेहल सुद्धा मग जास्त काही बोलली नाही. असेच आणखी एक वर्ष निघून गेले. पुन्हा स्नेहल ने साकेत समोर बाळाचा विषय काढला. पुन्हा तो म्हणाला की तो अजुन बापाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. पुढे कधीतरी बघू.
यावर मात्र स्नेहल खूप चिडली. आणि म्हणाली.
” अरे पण मला हवंय ना मुल…तू फक्त तुझा निर्णय सांगतो आहेस…माझ्या मनाचा तर विचारच करत नाही आहेस…”
” अग पण पुढे होतीलच की मुलं…आताच काय आहे…?” साकेत पुन्हा बेफिकिरीने म्हणाला.
” पुढे केव्हा विचार करायचा…मी आता एकोणतीस वर्षांची आहे…जसजसं वय वाढत जातील तसतसे कॉम्पलिकेशन सुद्धा वाढत जातील…मला नाही वाटत की आता घाई होतेय म्हणून…” स्नेहल म्हणाली.
” पण मी सध्या वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीय…” साकेत म्हणाला.
” एवढंच ना…तू काळजी नको करुस…मी आईला बोलावून घेईल इकडे काही दिवसांसाठी…आणि शक्य तोवर मीच सांभाळेल बाळाला…” स्नेहल काहीशा रागातच म्हणाली.
त्यानंतर काहीच दिवसात स्नेहलला मातृत्वाची चाहूल लागली. स्नेहल खूप आनंदात होती. तिने तिच्या आईला सुद्धा काही दिवसांसाठी तिच्याकडे बोलावून घेतले होते. स्नेहल चे माहेर आणि सासर एकाच शहरात असल्याने तिच्या इतर घरच्यांची सुद्धा ये जा होतीच.
दिवस अगदी पंख लावल्याप्रमाने उडून गेले आणि स्नेहल च्या आयुष्यात तिच्या मुलाचे अथर्वचे आगमन झाले. त्या इवल्याशा बाळाला पाहून स्नेहल ची गरोदरपणातील सगळी मरगळ दूर झाली. स्नेहल काही दिवस बाळाला घेऊन माहेरी राहिली. त्यानंतर आईला घेऊन पुन्हा तिच्या घरी आली. काही दिवस साकेत चे आईवडील सुद्धा तिथे राहून पुन्हा त्यांच्या गावातील घरी निघून गेले होते.
स्नेहल आणि तिची आई मिळून बाळाची पुरेपूर काळजी घेत होत्या. पण साकेत मात्र आपल्याच दुनियेत मग्न होता. स्नेहल ला वाटले होते की आधी बाळाची जबाबदारी घ्यायला तयार नसलेला साकेत एकदा बाळाला पाहिले की सगळं काही विसरून त्याच्यात हरवून जाईल. पण साकेत मात्र तिच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध वागायचा.
रात्री अपरात्री बाळ उठून रडायला लागले की साकेत त्याच्या बेडरूम मधून निघून सरळ हॉल मध्ये जायचा आणि झोपून जायचा. बाळाला त्याच्याकडे दिलं आणि बाळाने शी सू केली की नाक मुरडायचा. स्नेहलला मात्र साकेतचे वागणे पटत नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी स्नेहल ची आई तिच्या घरी निघून गेली. स्नेहल ने आधीच ठरवून टाकले होते की बाळ थोडे मोठे होईपर्यंत ती नोकरी करणार नाही. त्यामुळे तिचा सगळा वेळ आता अथर्वला सांभाळण्यात जाऊ लागला. पण तरीही बरेचदा तिला साकेतच्या मदतीची गरज पडायची. पण साकेत मात्र अजूनही आपल्याच दुनियेत होता.
अथर्व थोडा मोठा झाल्यावर तो त्याच्या बोबड्या बोलीत बाबा बाबा म्हणून साकेतच्या अवती भवती फिरायचा. साकेत मात्र सतत फोन वर चिकटलेला असायचा. कधी एखाद्या मित्राचा कॉल, कधी सोशल मीडिया तर कधी एखादा गेम. साकेत ने स्वतःहून अथर्व ला कुठे बाहेर खेळायला नेल्याचे तर स्नेहल ला आठवायचे सुद्धा नाही. अथर्व जरा जास्तच त्याच्यासोबत खेळायचा हट्ट करायला लागला की त्याला ओरडायचा.
आजही तो असाच वागला होता. अगदी बेजबाबदारपणे. स्नेहलला काल ताप आला होता. आज ती ठीक होती पण अजून पूर्णपणे ठीक झालेली नव्हती. थोडा अशक्तपणा ही जाणवत होता. साकेत चा मात्र आधीच मित्रांसोबत एका रिसॉर्ट वर जाण्याचा प्लॅन ठरला होता. असे प्लान करण्याआधी तो स्नेहल ला सांगणे किंवा विचारणे महत्त्वाचे समजत नसे. स्नेहल ला मात्र उगीच वाटायचे की निदान शनिवार रविवार तरी ह्याने आपल्याला आणि अथर्व ला वेळ द्यावा. ती बरेचदा तसे बोलून दाखवायची. प्रसंगी अबोला ही धरायची. पण अजून त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता.
तो बाहेर गेला आणि स्नेहल उदास झाली. आधीच तब्येत बरी नव्हती आणि त्यातही साकेतचे वागणे तिला दुखावून गेले होते. साकेत आज गेला तो उद्या परतणार होता. तोपर्यंत घरात फक्त स्नेहल आणि अथर्व दोघेच राहणार होते. अगदी नेहमीप्रमाणेच.
स्नेहलने अथर्वला जेवण भरवले आणि स्वतः ही जेवण केले. अथर्व थोडा खेळला आणि झोपी गेला. मग स्नेहलने तिच्या गोळ्या घेतल्या आणि ती सुद्धा झोपी गेली. त्यानंतर संध्याकाळी घरातील कामे कशीबशी आटोपली. अथर्व तिला बाहेर खेळायला चल म्हणून खूप हट्ट करत असल्याने ती त्याच्यासोबत सोसायटी मधील गार्डन मध्ये आली. बाहेर येऊन तिलाही थोडं बरं वाटलं.
त्यानंतर संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक, जेवण वगैरे आटोपून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी स्नेहलला पुन्हा ताप आला. आता मात्र तिने साकेतला फोन लावला. पण साकेतने फोन उचलला नाही. मग तिने तिच्या भावाला फोन लावला आणि सांगितले की तिला बरे नाही म्हणून. तिची आई आणि भाऊ तिच्याकडे यायला निघाले.
अंगात ताप असताना ही तिने अथर्व साडी नाश्ता बनवला. आणि तो त्याला भरवला. पण मध्येच तिला अस्वस्थ वाटायला लागले. ती काहीतरी घ्यायला किचन मध्ये जाणार इतक्यातच तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. तिला खाली पडलेली पाहून अथर्व घाबरला. तो लगेच आईजवळ येऊन आईला उठवू लागला. आणि आई लवकर उठली नाही म्हणून तो रडायला लागला.
पण सुदैवाने तेवढ्यात स्नेहलची आई आणि भाऊ तिथे पोहचले. त्यांनी स्नेहलच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि लगेच तिला घेऊन हॉस्पिटलला गेले. या सर्वात अथर्व खूप घाबरलेला होता. डॉक्टरांनी स्नेहल ला तपासून सांगितले की तापी मुळे जरा अशक्त पण आला होता म्हणून स्नेहल ला चक्कर आली. पण हातावर पडल्याने तिच्या हाताला थोडासा मार लागला होता. डॉक्टरांनी तीच्यांकाही टेस्ट केल्या आणि टेस्ट चा रिपोर्ट येईपर्यंत तिला हॉस्पिटल मध्येच थांबायला सांगितले.
क्रमशः
तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग ३ (अंतिम भाग)
Uplay changala aahe. But she was lucky tila maher hot ani tyat same city madhe hot.