” अग लग्न मोडल्याचा पुरुषांवर काहीच परिणाम होत नाही…त्यांना तर आरामात दुसरी बायको मिळते…कठीण असतं ते बायकांसाठी…त्यांना समाजाचे दूषण मिळतात…” काकू म्हणाल्या.
” नाही काकू…आजकाल जग बदलतंय…आधी पुरुषाचे दुसरे लग्न असेल तरीही त्याला आरामात मुलगी मिळायची लग्नाला…पण आता मात्र मुलीकडचे खूप चौकशी करतात…आधीच लग्न का मोडल…वगैरे वगैरे…आणि डिव्होर्स घेणे हा काही अपराध नाही ज्यामुळे घटस्फोटित बायकांना काही वेगळी वागणूक मिळेल…” नेहा म्हणाली.
” पण थोडं सहन करायला काय जातं बायकांना…आमच्या वेळी का नवरे बायकांवर अत्याचार नाहीत का करायचे…बायका सगळं सहन करत…हळूहळू पुरुष सुद्धा बदलायचे मग…शेवटी व्हायचं सगळं नीट…” काकू म्हणाल्या.
” शेवटी म्हणजे अगदी शेवटी ठीक व्हायचं सगळं…जेव्हा ते पुरुष म्हातारे व्हायचे…अनेक गरजांसाठी आपल्या बायकोवर अवलंबून राहावं लागायच तेव्हा कुठे ते बायकांशी नीट वागायचे…आणि ज्या बायकांनी आयुष्यभर सहन केले तरीही त्यांचे नवरे कधीच बदलले नाहीत असेही उदाहरण असेलच की तुमच्याकडे…” नेहा म्हणाली.
तेव्हा मात्र काकू विचारात पडल्या.
नेहा पुढे म्हणाली.
” आता माला काकूंच्या सुनेचं उदाहरण घेऊ ना…लग्न झाल्यावर तब्बल तीन वर्षे ती नवर्यासोबत राहिली…तिला सुद्धा आशा असेलच की थोडं सहन केलं की सगळं ठीक होईल…नंतर वाटलं असेल की एक मूल झाल्यावर सगळं ठीक होईल…पण तो सुधरलाच नाही… त्याचं दारू पिऊन घरी येणं सुरूच राहिलं… सगळा पगार दारूवर खर्च करायचा…वरून बायकोला शिवीगाळ मारहाण तर रोजचीच असायची…” नेहा म्हणाली.
” अगं पण तिने आणखी काही दिवस प्रयत्न करायला हवे होते…आज ना उद्या सुधारलाच असता तो…शेवटी नवऱ्याला सुधारणे हे देखील बायकोचेच काम नव्हे का..?” काकू म्हणाल्या.
” अहो काकू…ज्या मुलाला त्याचे आईवडिल इतक्या वर्षात सुधारू शकले नाहीत त्याला बायको दोन तीन वर्षात कशी सुधारणार…आणि मुळात तिने का म्हणून त्याला सुधारावे…तो मोठा आहे…त्याला त्याचं चांगलं वाईट कळतंच ना…मग आपण लग्न करणार आहोत, आपल्यावर बायकोची जबाबदारी असणार आहे हे माहिती पडल्यावर त्याने आधीच दारू सोडून द्यायची असती…
आणि सुटली नाही तर मग नैतिक जबाबदारी म्हणून निदान मुलिकडच्यांना आपल्या व्यसनाची माहिती तरी द्यायची…म्हणजे मग मुलिकडचे ठरवतील की पुढे काय करायचे…उगाच लग्न झालं की सुधारेल म्हणून एखाद्या चांगल्या मुलीचं आयुष्य का बरबाद करावं अशांनी…लग्न करताना मुलींचे किती स्वप्न असतात…आपल्या जोडीदाराबद्दल किती अपेक्षा असतात…
आणि लग्न झाल्यावर जेव्हा हे वास्तव समोर येतं तेव्हा मुलींची काय अवस्था होत असेल हे तर त्यांनाच माहिती असेल ज्यांनी हे सहन केलंय…हेच माला काकूंच्या सूनेनी सुद्धा सहन केलंय…पदरात एक मुलगी असताना तिला काय आनंद झाला असेल का नवऱ्याला घटस्फोट देताना…तिनेही आधी सहनच केलं असेल…
जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असेल तेव्हाच तिने हा इतका कठीण निर्णय घेतला असेल…एक स्त्री म्हणून आपण तिची व्यथा समजून घ्यायला नको का…आपण तिच्या दुःखावर फुंकर घालायला हवी की तिच्या निर्णयावर उगाच प्रश्नचिन्ह निर्माण करून ती किती चुकीची आहे हे दाखवून द्यायला हवं…” नेहा म्हणाली.
” तू बरोबर बोलत आहेस नेहा…अगदी बरोबर… खरंतर मी स्वतःच्या डोळ्याने बघितले आहेत तिचे हाल…तिच्या नवऱ्याने कधी म्हणून चांगले वागवले नसेल ग तिला… माला ताईंनी सुद्धा सून आल्यावर लगेच मुलाची जबाबदारी सूनेवर सोपवली…आधीच आपल्या आई वडिलांना सोडून फक्त तिच्या नवऱ्यावर असणाऱ्या विश्वासाने या घरात आली होती…पण तिची सतत अवहेलना झाली इथे…तिने सासुकडे त्याच्या दारूच्या व्यसनाची तक्रार केली तर सासू उलट तिलाच म्हणाली होती की तू आल्यापासून जास्त पितोय म्हणून…” मीना काकू म्हणाल्या.
” आता कसं बरोबर बोलल्यात काकू… कुणीही आनंदाने घटस्फोट देत अथवा घेत नाही…आणि त्यात बायका तर नाहीच नाही…त्या शक्य तितका प्रयत्न करतात स्वतःचा संसार वाचवायचा…पण जेव्हा त्यांना असह्य होतं तेव्हा मग हा निर्णय घेतात…आणि बंधन हे जीवघेणं असेल तर ते झुगारून मनासारखं जगण्यात गैर काय आहे…
तिच्यासाठी हा निर्णय आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय झाला असेल…पण तिने हिम्मत केली आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात केली…एक स्त्री म्हणून आपण तिचं कौतुकच करायला हवं…पण आपण मात्र एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रियांना नावे ठेवतो…अशा बायकांना नावे ठेवायला पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त समोर येतात…
आपण अशा स्त्रियांचा आधार का नाही बनू शकत…आधार नाही बनू शकत तर निदान त्यांना पळपुटेपणा चे लेबल तरी लावू नयेत ना आपण…आणि जो प्रसंग आज तिच्यावर आलाय तोच जर उद्या आपल्या घरच्या लेकी आणि सूनांवर आला तरीही आपण हेच म्हणणार का की ती पळून गेली…?” नेहा म्हणाली.
” हो बाई…मला कळली माझी चूक… मी आजवर जे तिच्यासाठी बोलले त्याबद्दल मला स्वतःला मनातून इतकं वाईट वाटतंय ना म्हणून सांगू…तू आता आणखी नको ऐकवू मला…आधीच मी पुरती खजील झाली आहे…तू सांगितलेलं कळलय मला…आधीच कुणीतरी अशी कानउघडणी करणारं भेटलं असतं तर फार बरं झालं असतं…” काकू म्हणाल्या.
” कोई बात नहीं काकू…मी आहे ना…देर आहे दुरुस्त आये…मी करत जाईल ना वेळोवेळी तुमची कानउघडणी…” नेहा हसून म्हणाली.
” चल आगाऊ कुठली…” काकू लटक्या रागाने म्हणाल्या.
आणि दोघीही खळाळून हसल्या. त्या हास्याने दोघींच्या ही मनात एक नवीन विचार रुजवला होता. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्री ला समजून घेण्याचा. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आधार बनण्याचा.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका