तेव्हा मात्र वसंतरावांनी मयंककडे मधुराला सोबत नेण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मात्र मयंकने त्यांच्याशी बोलणे थोडे कमी केले असल्याचे त्यांना जाणवले. मधुरा सुद्धा मयंक ची खूप आतुरतेने वाट पाहत होती.
हो नाही करत शेवटी लग्नाला दहा महिने झाले तेव्हा मयंक भारतात परतला. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मधुराला तर जणू पंखच लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता. सगळ्यांच्या सोबतीने मयंक सुद्धा खूप एन्जॉय करत होता. एके दिवशी सकाळी सकाळी मयंक त्याच्या वडिलांकडे दोन कॉफीचे मग घेऊन गेला. त्याला पाहताच वसंतराव म्हणाले.
” गूड मॉर्निंग चिरंजीव…आज काय बायकोबरोबर कॉफी न घेता वडिलांबरोबर कॉफी प्यायचा विचार दिसतोय तुमचा…”
” हो बाबा…मला काही बोलायचं सुद्धा होतं…म्हणून म्हटलं की कॉफी पिता पिता बोलू…” मयंक म्हणाला.
” बोल ना…” वसंतराव म्हणाले.
” बाबा…माझ्या डोक्यात एक बीजनेसची आयडिया आहे…जवळपास सगळंच जमतंय फक्त पैशाचं काही जमत नाही आहे…तर तुमच्याकडून काही पैसे मिळाले असते तर बरे झाले असते….” मयंक म्हणाला.
” अरे पण इतके पैसे तर जमा नसतील माझ्याकडे… बिजनेस करायचा म्हणजे त्याला भांडवल सुद्धा तेवढंच लागतं…” वसंतराव म्हणाले.
” तरीही तुम्ही मला मदत करू शकता बाबा…” मयंक म्हणाला.
” ती कशी काय…?” वसंतरावांनी विचारले.
” आपली शेती आहे ना हायवेवर…आणि शेतात सुंदर फार्महाऊस देखील आहे…त्याला खूप किंमत मिळेल आताच्या घडीला…माझ्या एका मित्राने तर त्याला एक गिऱ्हाईक सुद्धा आणलय…तुम्ही एकदा भेटून घेतले असते तर चांगलं झालं असतं…” मयंक म्हणाला.
” अच्छा तर तू सगळं ठरवून सुद्धा ठेवलं आहेस…” वसंतराव म्हणाले.
” हो बाबा… ऑल मोस्ट सगळाच प्लान तयार आहे माझा…” मयंक म्हणाला.
” पण आमचा उदरनिर्वाह सद्ध्या त्यावरच चालतो…शिवाय म्हातारपणी निसर्गाच्या सान्निध्यात थोडेफार राहता यावे म्हणूनच तिथे फार्महाऊस सुद्धा बांधून घेतलं तुझ्या आईने हौसेने…आमची म्हातारपणाची काठी आहे ती…ती विकणे सध्यातरी माझ्याच्याने शक्य नाही…आजकाल दवाखान्याचे आणि इतर खर्च इतके वाढले आहेत की माझ्या पेंशन वर सगळेच खर्च भरून निघणे कठीण आहे…अशात त्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं आणि आम्ही दोघेही नवरा बायको आरामात त्यावर जगतो…” वसंतराव म्हणाले.
” पण बाबा…तुम्ही इतकी का काळजी करताय…मी आहे ना…मी दर महिन्याला तुम्हा तिघांनाही पैसे पाठवत जाईलच की…आणि मधुरा घेईलच ना तुमची काळजी…त्यासाठीच तर लग्न केलंय तिच्याशी…तुम्ही कशाला काळजी करताय…” मयंक म्हणाला.
” आम्हा तिघांना म्हणजे…?” वसंतरावांनी विचारले.
” म्हणजे आई, तुम्ही अन् मधुरा सुद्धा…?” मयंक म्हणाला.
” पण मधुराला तर तू तुझ्यासोबत जर्मनी ला घेऊन जाणार ना यावेळेला…” वसंतराव म्हणाले.
” नाही बाबा…आतातरी ते शक्य नाही…एकदा का बीजनेस सुरू झाला की मग मला जास्त वेळ मिळणार नाही…आणि ती सुद्धा तिथे एकटी बोअर होऊन जाईल…त्यापेक्षा ती इथेच तुमच्या सोबत राहिलेली बरी…आणि नंतर मलाही जास्त वेळा इथे येत येणार नाही…अशा वेळी ती इथे तुमच्याजवळ असलेली बरी….” मयंक म्हणाला.
” अरे पण ती तुझी बायको आहे…तुला सोडून इथे कशी राहील…आधीच जवळपास वर्ष होत आहे तुमच्या लग्नाला…बिचारी इथेच आहे…आम्ही आमचं बघून घेऊ…तू तिला घेऊन जा सोबत…” वसंतराव म्हणाले.
” सॉरी बाबा…पण तिला मी माझ्यासोबत घेऊन जाणार नाही… मी तिच्यासारख्या साध्या मुलीशी याचसाठी लग्न केलं की ती मी नसताना तुमची काळजी घेऊ शकेल आणि माझ्या मागची काळजी मिटेल…” मयंक म्हणाला.
” अरे पण ती तुला सोडून काही राहणार इथे…” वसंतराव म्हणाले.
” तिला एखादं मुल झालं की मग इथे राहण्या वाचून काही पर्याय उरणार नाही तिच्याकडे…मी सगळा विचार करूनच तिच्याशी लग्न केलंय बाबा…तुम्ही नका काळजी करू…” मयंक म्हणाला.
” कोणता विचार केला होता तू तिच्याशी लग्न करण्यापूर्वी…?” वसंतरावांनी विचारले.
” हाच की एखादी खेड्यातल्या मुलीशी लग्न केलं तर ती आयुष्यभर काहीही न बोलता माझ्या घरी राहील…माझ्या आईवडिलांची सेवा करेन…आणि इथे इंडियात मुली जास्त वरचढ नसतात…स्पेशली खेड्यातल्या मुली…लग्न तर मला कधीच करायचं नव्हतं पण माझ्या मागे तुमच्यासाठी कोणीतरी असावं म्हणून मी लग्न केलं तिच्याशी…नाहीतर तिच्या पेक्षा कितीतरी चांगल्या मुलींना डेट केलय मी…” मयंक म्हणाला.
आणि त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच वसंतरावांनी त्याच्या एक कानाखाली वाजवली. मयंक आता पुरता भांबावला होता. लहानपणी पासून आजवर त्याच्या वडिलांनी कधी त्याला मोठ्या शब्दात सुनावले ले सुद्धा आठवत नव्हते आणि आज बाबांनी चक्क त्याच्या कानाखाली लगावली होती. मयंक गाल चोळत उभा राहिला.
” बाबा…हे काय केलंत तुम्ही…मी तर फक्त बोलत होतो तुमच्याशी…” मयंक म्हणाला.
” तू जे बोलतोयस ते बोलताना तुला जराही लाज वाटतं नाही नाही…मधुरा तुझी साता जन्माची सोबती आहे…तू जिथे राहशील ती सुद्धा तिथेच राहील… आईवडिलांच्या म्हातारपणाची सोय म्हणून स्वतःच्या बायकोला कायम स्वतःपासून दूर ठेवणे हे कुठून शिकून आलास…तू तर चक्क तिची फसवणूक करत आहेस…ती मागच्या वर्षभरापासून याच आशेवर आहे की तू येशील आणि तिला सोबत घेऊन जाशील…” वसंतराव म्हणाले.
” पण मी दरवर्षी तुला भेटायला येत जाईलच की…त्यात काय मोठं आहे एवढं रिऍक्ट व्हायला…आणि ती तुमची सून आहे पण मी तर मुलगा आहे ना…त्यामुळे तुम्ही माझ्या बाजूने बोलायला हवं…आणि मी तुमचा विचार करूनच तिच्याशी लग्न केलंय ना…मी दरवर्षी येऊ नाही शकणार म्हणून…पण तुला दर महिन्याला घरखर्च पाठवत जाईल मी…” मयंक म्हणाला.
” तू आम्हाला घरखर्च पाठवशिल एवढे वाईट दिवस नाही आलेत आमचे अजुन…आणि तुला मधुराला तुझ्या सोबत न्यावेच लागेल…” वसंतराव म्हणाले.
” नाही नेऊ शकत…” मयंक म्हणाला.
” पण का ?” वसंतरावांनी विचारले.
” कारण मी तिथे माझ्या मैत्रिणीसोबत राहतो…” मयंक म्हणाला.
तसा वसंतरावांना धक्काच बसला. ते रागाने थरथरू लागले. ते मयंकला काही बोलणार इतक्यात त्यांचे लक्ष मागे गेले. मागे मधुरा उभी होती. ती एखाद्या निर्जीव वस्तुसारखी न हलता तिथे उभी होती. तिच्या उद्धवस्त डोळ्यांकडे पाहून तिने सर्वकाही ऐकले आहे हे कळायला वसंतरावांना उशीर लागला नाही. ते तिला काही बोलणार इतक्यात ती मटकन खाली बसली. सुरुवातीला शांत दिसणारी ती थोड्याच वेळात मोठमोठ्याने रडायला लागली. तिचा आवाज ऐकून नीलिमा ताई सुद्धा पटकन तिथे आल्या. तिचा विलाप ऐकून नेमकं काय झालंय ते त्यांना कळत नव्हतं पण काहीतरी वाईट झालंय हे तिला सगळ्यांचे चेहरे पाहून कळलं होतंच. मग त्यांना वसंतरावांनी सगळं काही खरं सांगितलं. तेव्हा त्यांनी सुद्धा मयंक ला दोन थप्पड लगावल्या.
त्यानंतर घरात सगळ्यांनी मयंक ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कुणाचेच काही ऐकले नाही. मधुरा च्या मनात आधी मयंक बद्दल जितके प्रेम होते त्याची जागा आता त्यापेक्षा कितीतरी जास्त पट रागाने घेतली होती. घरचे त्याला तिला सोबत ने म्हणून विनवत असले तरी तिच्या मनातून मात्र तो उतरला होता.
ती थोडी सावरली तेव्हा तिने ही मयंक च्या कानाखाली जाळ काढला. आणि तिला त्याच्यापासून घटस्फोट हवंय हे सुद्धा ठणकावून सांगितले. मधुरा ला खेड्यातील साधिभोळी मुलगी समजणाऱ्या मयंक ला तिच्या घटस्फोटाची मागणी ऐकून नवल वाटले. त्याला वाटले होते की ती तशीच त्याच्या नावावर समाजाच्या भीतीने त्याच्या घरातच राहील. पण तिने मात्र त्याचा हा गैरसमज लवकरच दूर केला होता.
ही गोष्ट जेव्हा मधुराच्या माहेरच्यांना कळली तेव्हा त्यांनी सर्व दोष वसंतराव आणि नीलिमाताईंना दिला. त्यांनी त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला तेव्हा मधुराने स्वतःहून पुढे येत तिच्या माहेरच्या लोकांना समजावून सांगितले.
क्रमशः
जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)