भाग २
सासुबाई श्रेया ला प्रत्येक बाबतीत टोकायची. तिने घातलेल्या कपड्यांवरून. तिच्या जेवणाच्या पद्धती वरून. तर कधी त्यांना तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आवडायच्या नाहीत. मग तिच्या मैत्रिणींसमोरच त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. श्रेयाला आजीचे हे वागणे अजिबात आवडत नसे. पण आईने सक्त ताकीद दिलेली होती की आजीला कधीही उलटून बोलायचे नाही म्हणून ती नाईलाजाने गप्प बसायची.
वरून तिची आत्या प्रतिभा सुद्धा यायची आणि आईच्या सोबतीने ती सुद्धा श्रेयाच्या हात धुवून मागे लागायची. आमच्या वेळी तर आम्ही असेच करायचो. आम्हाला नव्हती बाई असे कपडे घालायची सवय. आम्ही तर मोठ्यांना कधीच उलटून बोलायचो नाही. असे एक ना अनेक बोल ऐकवायची. प्रतिकचा मात्र खूप लाड करायची प्रतिभा.
पण आता श्रेयाच्या उच्च शिक्षणाच्या गोष्टी घरात सुरू झाल्या आणि आजीला कळले की पुढे शिक्षण घेण्यात खूप खर्च होणार आहे. आजीला वाटले हिचे लग्न झाले आणि ही घरातून निघून गेली तर हिच्या शिक्षणाचा जास्तीचा खर्च करावा लागणार नाही आणि त्यांच्या नातवाच्या वाट्याचे काहीही श्रेयाला द्यावे लागणार नाही. म्हणून त्यांनी स्वतःहूनच सगळ्या नातेवाईकांमध्ये श्रेयाचे लग्न करणार असल्याचे सांगितले. आणि मग तिला बरेच स्थळ येऊ लागले.
सगळ्यांना नकार देताना सुरेश आणि सुषमा ची दमछाक होत होती. स्थळ आणणारे म्हणायचे की मुलींना शिकवून काय करणार आहात. हे जे स्थळ आहे असे या जन्मात पुढे कधीच मिळणार नाही. सासुबाई मात्र हट्टाला पेटल्या होत्या. शेवटी त्यांच्या मुलीने म्हणजे प्रतिभाने श्रेया साठी एक स्थळ आणले. मुलाला नोकरी होती पण मुलगा वयस्कर होता. सुरेश आणि सुषमाला मुळात श्रेयाचे लग्न इतक्यात करायचेच नव्हते. पण सासुबाई मात्र हट्टाला पेटल्या होत्या. निदान बघण्याचा कार्यक्रम तरी कराच.
आता लग्नच करायचे नाही तर बघून काय उपयोग. आणि ह्याचा श्रेयाच्या मनावर सुद्धा परिणाम झालाच असता. तिच्या पुढील शिक्षणात तिची मनस्थिती चांगली असणेही गरजेचे होते. पण सासुबाई काही ऐकायलाच तयार नव्हत्या. रागारागाने त्या दोन दिवस घरात जेवल्याच नाहीत. दोनही दिवस गावातच राहणाऱ्या त्यांच्या एका चुलत बहिणीकडे जेवायला गेल्या त्या.
सुरेशने त्यांना खूप समजावले पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी बातमी सगळ्याच नातेवाईकांत पसरली आणि या सगळ्याचा अर्थ त्यांनी असा करून घेतला की सासूबाईंना सुषमा छळत असावी. घरी त्यांना पुरेसे खायला सुद्धा मिळत नसावे. त्यावर सासूबाईंनी सुद्धा तिखट मीठ लावून सगळ्यांना सुषमा बद्दल भडकावले होते. आणि प्रतिभा तर या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायला टपलेलीच होती.
म्हणून आजची ही बैठक सुरू होती. सुरेशने सुषमाला आधीच सांगितले होते की कुणी काही बोलले तर गप्प बसून ऐक म्हणून. पण कितीही झालं तरी सुषमाला आता श्रेया च्या बाजूने ठामपणे उभे राहायची गरज वाटतं होती. त्यामुळे नाईलाजाने का होईना ती आज सासूच्या प्रत्येक प्रश्नाला उलट उत्तर देत होती.
दोघींच्या बोलण्यातून हे मात्र स्पष्ट होत होते की जर श्रेयाला पुढचे शिक्षण घ्यायचे आहे आणि तिच्या आई बाबांना एवढ्यातच तिचे लग्न करायचे नाही तर मग इतरांनी सुद्धा या बाबतीत एवढी घाई करू नये. आपली बाजू कमजोर होत आहे हे पाहून प्रतिभा म्हणाली.
” फक्त हा लग्नाचा विषय नाही आहे…या आधी सुद्धा सुषमाने अनेक बाबतीत आईला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे…हे सगळे जण बाहेर जेवायला जातात आणि आईला मात्र घरी ठेवतात…”
” कारण त्यांना आता बाहेरचे जेवण सहन होत नाही…त्यांची तब्येत बिघडते… आणि त्यांनी स्वतःच नकार दिलाय बाहेर यायला…आणि वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा जातो बाहेर जेवायला…हो की नाही आई…?” सुषमा तिच्या सासूबाईं कडे पाहून म्हणाली.
यावर सासुबाई गप्पच होत्या. बोलायला त्यांच्या जवळ काहीच नव्हते. मग प्रतिभा पुन्हा म्हणाली.
” आणि तू कुठेही बाहेर जाताना आईला विचारत नाहीस…तू आईला विचारून जायचं ना कुठेही बाहेर…”
” अहो प्रतिभा ताई…माझं काय वय आहे का हे कुठेही जायचं तर त्यांची परवानगी घ्यायला…आणि घरा समोर भाजी घ्यायला जायला त्यांची परवानगी घ्यायची गरज आहे का…?” सुषमा म्हणाली.
” मागच्या वेळी मी जेव्हा दिवाळीला माहेरी येणार होते तेव्हा तू बरोबर आधीच तुझ्या माहेरी निघून गेली होतीस…” प्रतिभा म्हणाली.
” बावीस वर्षात असे फक्त एकदा झाले ना…ते ही माझ्या बाबांची तब्येत बरी नव्हती म्हणून थोडी लवकर गेले होते…पण त्या आधी कधीतरी मी तुमचं माहेरपण झाल्याशिवाय माहेरी गेले होते का…?” सुषमा म्हणाली.
सुषमा चे बोलणे ऐकुन प्रतिभा गप्पच बसली. कारण सुषमा ने तक्रार करायची कधी संधीच दिली नव्हती तिला. नणंद म्हणून प्रतिभाचा मान पान तिने नेहमीच केला होता. ह्या व्यतिरिक्त सुषमा ला बोलण्या साठी तिच्याकडे काहीच नव्हते. म्हणून मग सुषमाच पुढे म्हणाली.
” प्रतिभा ताई…हे तुम्हालाही माहिती आहे की मी आजवर कधीही सासूबाईंना उलट उत्तर दिले नव्हते…इतकेच नाही तर आजवर घरात फक्त त्यांचाच शब्द चालला आहे…पण म्हणून माझ्या मुलीच्या बाबतीत त्या असा निर्णय एकट्या नाही घेऊ शकत…त्यांनी आजवर नेहमीच श्रेया आणि प्रतीक मध्ये फरक केला आहे…श्रेयाच्या जागी तुम्ही असत्या आणि तुमच्याशी कुणी असे वागले असते तर तुम्हालाही वाईट वाटलेच असते…माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सासूबाईंनी आता तरी त्या दोघांमध्ये फरक करू नये…” सुषमा म्हणाली.
” पण तू माझ्या आईला व्यवस्थित सांभाळत नाहीस त्याचे काय करायचे…?” प्रतिभा म्हणाली.
” त्याचं असं आहे ना प्रतिभाताई…निदान जी व्यक्ती स्वतःच्या सासूला चांगली वागवत नाही तिने मला हे सांगणे बरे वाटत नाही…इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमची सासू जेव्हा आजारी होती तेव्हा तुम्ही त्यांना वेगळं राहायला सांगितलं होतं…त्यांची मुलगी येऊन त्यांना घेऊन गेली म्हणून बरे…नाहीतर तुम्ही तर त्यांना मरायलाच सोडून दिलं होतं…”
सुषमा प्रतिभा कडे पाहून म्हणाली. यावर्बोरतिभा मात्र गप्पच बसली. सुषमा पुढे म्हणाली.
” आणि आई…तुम्हाला माहिती आहे ना प्रतिभाताईंच्या सासूला त्यांच्या घरी काय किंमत आहे ते…तरीही त्या स्वभावाने फार गरीब आहेत…मी तर आजपर्यंत तुमच्याबद्दल एकही चुकीचा विचार सुद्धा मनात आणला नाही…पण जर प्रश्न श्रेयाच्या आयुष्याचा असेल तर मी गप्प बसू शकत नाही…” सुषमा म्हणाली.
त्यावर तिच्या सासुबाई जे समजायचं ते समजून गेल्या. त्यांना कळून चुकले की सुषमा जे बोलतेय त्यामध्ये तथ्य आहे. प्रतिभा आणि प्रकाशराव सुद्धा नरमले. तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना आता नेमका प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर सुषमाच्या विरोधात कुणी काहीच बोलले नाही. सगळ्यांनी चहापाणी घेतले आणि सगळेच निघून गेले. सुषमा च्या सासुबाई सुद्धा या प्रकारानंतर नरमल्या होत्या. त्यांनी पुन्हा श्रेयाच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही हस्तक्षेप केला नाही.
जोवर सुषमा गप्प राहून सहन करत होती तोवर तिच्या सासूबाईंनी तिला गृहीत धरले होते पण जेव्हा तिने स्वतःच्या मुलीसाठी आवाज उठवला तेव्हा मात्र तिने परिस्थितीत सुधारणा घडवून आणली. बरेचदा गप्प राहिल्याने समस्या सुटत नाहीत तर त्या आणखीनच वाढत जातात. त्यामुळे वेळच्या वेळी व्यक्त होणे केव्हाही चांगले असते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
very nice stories, i’ve read almost everyone and shared with my friends and relatives