आज निशाचे मामा अचानक तिच्या घरी आले होते. निषाचे मामा त्याच शहरात राहायचे पण कामानिमित्ताने जाणे येणे जरा कमीच व्हायचे. त्यांना पाहून निशाच्या आईला खूप आनंद झाला. निशाचे बाबा त्यांना म्हणाले.
” काय दिवाकर आज अचानक आलास… आताच माझं जेवण झालं बघ…आधी सांगितले असते तर सोबतच जेवलो असतो…”
” इथे जवळच काम होते मला…एका मित्राच्या घरी…तेव्हा कळलं की ते त्यांच्या भाच्या साठी स्थळं बघत आहेत.. आपण सुद्धा आपल्या निशासाठी स्थळं बघत आहोत म्हणून म्हटलं एकदा पाहण्याचा कार्यक्रम झाला तर बरंच आहे…आणि योगायोगाने आज तो त्यांच्या घरी आलेला आहे…” मामा म्हणाले.
” पण आजच्या आजच थोडी घाई नाही का होईल पाहण्याची…” आई म्हणाली.
“मी त्याला बघितलं तेव्हाच मला आवडला तो…चांगली नोकरी आहे आणि मेहनती पण खूप आहे…आत्मविश्वास तर अगदी ओसंडून वाहतो चेहऱ्यावरून…मला तर खूप चांगला वाटला मुलगा…म्हटलं आजच जर त्यांना बोलावले तर बरे होईल…अनायासे मी पण इथेच आहे…स्थळाला होकार द्यायचा की नकार हे नंतर ठरवू…आधी मुलगा पाहायला काही हरकत नाही…” मामा म्हणाले.
” बरोबर आहे…बोलावून घे त्यांना…पाहून तरी घेऊ…” बाबा म्हणाले.
बाबांचे बोलणे आतमध्ये बसलेल्या निशा ने ऐकले होते. आई रूम मध्ये येऊन तिला म्हणाली.
” निशा…आज कुठेच बाहेर जाऊ नकोस…आज तुला पाहायला घरी पाहुणे येणार आहेत…”
” मला नाही बघायचा हा मुलगा…आधी त्याची नीट चौकशी करा म्हणावं आणि मग बोलवा…आणि मला कसा मुलगा हवाय ते की आधीच सांगितले आहे ना…मग अस अचानक का ठरवता तुम्ही…?” निशा म्हणाली.
” हे बघ…मामा ने स्वतः बघितलय मुलाला…आणि फक्त एकदा पाहून घेऊयात तो म्हणतोय म्हणून…पाहायला काय हरकत आहे…तुला आवडला नाही तर तू तसं सांग आम्हाला…” आई म्हणाली.
शेवटी त्रागा करतच निशा जागेवरून उठली. आणि आईला थोडी मदत करू लागली. त्यानंतर तिच्या आईने तिला छानशी साडी नेसायला दिली. निशा तयार होईस्तोवर पाहुणे आले सुद्धा होते. मामांचे मित्र आणि त्यांचा भाचा दोघेच आले होते.
जुजबी बोलणे झाल्यावर निशाला बोलावणे झाले. निशा हातात चहाचा ट्रे घेऊन आली. सगळ्यांना चहा दिला आणि समोरच्या खुर्चीवर ती जाऊन बसली. गोऱ्या रंगाची आणि दिसायला सुंदर अशी निशा त्या पाहायला आलेल्या मुलाला निशाद ला पाहताक्षणीच आवडली. मामांच्या मित्राने निशाला एक दोन प्रश्न विचारले. त्यांनतर निशा पुन्हा तिच्या रूम मध्ये निघून गेली.
त्यानंतर हॉलमध्ये मोठ्यांच्या गोष्टी सुरू होत्या. आणि निशाला त्यांचा आवाज तिच्या रूम मध्ये स्पष्ट ऐकायला येत होता. निशाच्या वडिलांनी निशादला त्याच्या होणाऱ्या बायको कडून काय अपेक्षा आहेत ते विचारल्यावर निषाद म्हणाला.
” माझ्या काही फारशा अपेक्षा नाहीत…फक्त बायको समजुतदार हवी आणि माझ्या आईशी मिळून मिसळून वागणारी हवी…माझे बाबा गेल्यावर माझ्या आईने मला कष्टाने मोठं केलंय…त्यामुळे माझ्या बायकोने आईचे मन जपावे अशीच माझी इच्छा आहे…” निषाद म्हणाला.
त्यानंतर थोड्या वेळाने ते पाहुणे निघून गेले. मामाला काही काम असल्याने ते सुद्धा त्यांच्यासोबतच निघून गेले.
ते गेल्यावर निशाची आई तिच्या बाबांना म्हणाली.
” बघितलं ना…मुलगा किती कष्टाने इथवर पोहचला आहे…हा नक्कीच भविष्यात काहीतरी मोठं करून दाखवेन…होतकरू मुलगा आहे…विचार करायला काही हरकत नाही…” आई म्हणाली.
त्यावर बाबांनी सुद्धा मान डोलावली. त्यानंतर आई निशाला म्हणाली.
” काय मग निशा…कसा वाटला मुलगा…?”
त्यावर निशा म्हणाली.
” मला नाही लग्न करायचं त्याच्याशी…नोकरी पण साधीच आहे त्याची…आणि मला खूप श्रीमंत नवरा हवाय…जो मला महिन्यातून एकदा बाहेर फिरायला घेऊन जाईल…आठवड्यातून दोन तीनदा हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जाईल आणि माझे सगळे हट्ट पुरवणार असा नवरा हवाय मला…” निशा म्हणाली.
” असं कुठं असतय का निशा…नवरा श्रीमंत असून चालत नाही फक्त…चांगल्या स्वभावाचा सुद्धा असावा लागतो…आणि तुझ्या मनाप्रमाणे कुठे मिळेल असे स्थळ…बाईचा जन्म म्हटला की घरच्या जबाबदाऱ्या आल्याच… असं नुसतं बाहेर खायला आणि महिन्यातून एकदा फिरायला कुणी लग्न करतं का…?” आई म्हणाली.
” मिळेल ग आई…ते टीव्ही त नसतात का…त्यांना घरी काहीच काम करावं लागत नाही…नुसते चांगले कपडे घालून फिरतात त्या…” निशा म्हणाली.
” अगं ते काही खरं नसतं…आणि तुलाही कळायला हवं आता…एकटीच
म्हणून आम्ही तुझा खूप लाड केलाय…म्हणून तुला सासरी सुद्धा कुठलीच जबाबदारी उचलावी लागणार नाही असे नसते…बाई माणसाने जे मिळेल त्यातच नेटका संसार करावा…आणि तो मुलगा पण चांगला वाटला ग आम्हाला…” आई म्हणाली.
” काही चांगला नव्हता…त्याला फक्त घरकाम करणारी एक मोलकरीण हवी आहे…कसा म्हणाला होता की आईचं मन जपणारी मुलगी हवी म्हणून…त्याला फक्त त्याच्या आईची सेवा करायला मुलगी पाहिजे…” निशा म्हणाली.
निशा हे बोलली आणि मागे बघते तर निषाद उभा होता. त्याच्या बाईक ची चावी तो घरातच विसरला होता म्हणून पुन्हा घ्यायला आला होता. निशा चे बोलणे ऐकुन त्याला खूप वाईट वाटले. तो आला आणि चावी घेऊन तो निघून गेला. निशाला मात्र त्याने आपले सगळे बोलणे ऐकले ह्याचे काहीच वाईट वाटले नाही.
त्यावर निशाची आई तिला खूप रागावली आणि तिला म्हणाली…
” तुझ्या खूप चुकीच्या अपेक्षा आहेत निशा…लवकर जाणती हो आणि लक्षात ठेव की लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे…नाहीतर चांगली स्थळे नाकारशील आणि भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येईल…” आई म्हणाली.
निशाने मात्र आईचे बोलणे अजिबात मनावर घेतले नाही. निशा आधीपासूनच आही होती. तिला फक्त नटणे, मुरडणे आणि मैत्रिणींसोबत फिरणे एवढेच आवडायचे. दिसायला सुंदर पण स्वभावाने खूपच गर्विष्ठ होती. आता पंचविसाव वर्ष लागल्याने तिच्या आई बाबांनी तिच्या लग्नाचे मनावर घेतले होते. पण हिच्या अपेक्षा काही वेगळ्याच होत्या.
क्रमशः
अपेक्षा – भाग २