रविवार असल्याने सुधीर आणि सुजाता बाहेर फिरायला गेले होते. घरी कावेरीताई आणि सुधाकरराव दोघेच होते. तसेही त्यांना आता या एकटेपणाची बऱ्यापैकी सवय झालेली होती. आधी नोकरीच्या निमित्ताने दोघेही सतत माणसांच्या गर्दीत असायचे. कावेरी ताई सरकारी इस्पितळात नर्स होत्या तर सुधाकरराव जिल्हा परिषदेत क्लर्क होते. पण आता मात्र रिटायरमेंट नंतर दोघेही एकमेकांच्या सोबतीने स्वतःचे एकटेपण दूर करण्याचा प्रयत्न करत.
सुधीर एका चांगल्या कंपनीत नोकरीवर होता. दिवसभर कामानिमित्ताने घराबाहेर असायचा. रात्री उशिरा घरी यायचा. सुजाता गृहिणी होती. पण सुधीर एकदा कामावर गेला की ती सुद्धा दिवसभर घराबाहेरच असायची. कधी कुण्या मैत्रिणीकडे तर कधी तिच्या माहेरी. तिचं माहेर सुद्धा त्याच शहरात होतं.
सुजाता दोन वर्षांपूर्वी जेव्हा कावेरीताईंची सून बनून घरात आली तेव्हा जेमतेम महिनाभर घरात थांबली असेल. त्यानंतर तिने बाहेर फिरणे सुरू केले ते आजतागायत सुरूच होते. सकाळी जायची आणि सुधीर घरी यायच्या आता परत यायची. सुधीरला सुद्धा यात काही गैर वाटायचं नाही. घरी कावेरी ताई बरीच कामे स्वतःच करायच्या. आणि काही कामांना मदत म्हणून एक मावशी यायच्या.
सुधीर च्या कामाच्या अनियमित वेळांमुळे त्यांचा आता एकमेकांशी फारसा संवाद होत नसे. रविवारी सुद्धा दोघे बाहेरच कुठेतरी फिरायला जायचे आणि तिकडून च जेवण करून परत यायचे. सुजाता ला तर सासू सासऱ्यांसोबत राहायला जास्त आवडायचं नाही. पण दोघांनाही चांगली पेन्शन मिळत असल्याने तिने अजूनही सासू सासर्यांशी जुळवून घेतले होते. तसा तिचा त्यांच्याशी फारसा संवाद नव्हताच पण जेव्हा केव्हा ती त्यांच्याशी बोलायची तेव्हा खूपच गोड बोलायची.
कावेरी ताई एवढ्यावरच समाधानी होत्या. निदान या वयात मुलं सोबत आहेत हीच गोष्ट त्यांच्यासाठी लाख मोलाची होती. या वयातही त्यांना त्यांच्या मुलासाठी काय करू आणि काय नको असे व्हायचे. सुधाकर राव सतत त्यांना म्हणायचे की आता या वयात थकायला होतं लवकर त्यामुळे किचन मध्ये जरा कमी काम करत जा. पण कावेरी ताई मात्र सकाळ आणि संध्याकाळचे जेवण स्वतःच तयार करायच्या. सगळं सुधीरच्या आवडीच.
एव्हाना सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण एकदा अचानकच सुजाता तिच्या आईच्या घरून परत आली ती एकदमच रडका चेहरा करून. तिला पाहून कावेरी ताईंनी विचारले.
” काय ग सुजाता…काय झालंय…तू खूप उदास दिसते आहेस…?”
” काय सांगू आई…मला खूपच वाईट वाटतंय हो…” सुजाता उदासपणे म्हणाली.
” अगं सांग ना काय झालंय ते…” कावेरी ताईंनी विचारले.
” आज मी एका मोठ्या सिद्ध महाराजांना भेटले…त्यांना सांगितले की मागच्या दोन वर्षांपासून मला बाळ होत नाहीय म्हणून…तर ते म्हणाले की तू ज्या घरात राहतेस ती वास्तू ठीक नाहीय म्हणून…आपल्या घरात वास्तुदोष आहे म्हणून मी अजून आई बनू शकले नाही…” सुजाता रडकुंडीला येत म्हणाली.
” अगं असे काय बोलतेस सुजाता… असं काहीच नसतं… बाळ होत नाही तर आपण चांगल्या दवाखान्यात जायला पाहिजे…असे वास्तुदोष वगैरे मनाला लावून घेऊन नकोस…” कावेरी ताईंनी तिला समजावत म्हटले.
” नाही आई…सगळं व्यवस्थित असतं तर मी या आधीच आई झाली असते ना…नक्कीच या वास्तूत दोष आहे म्हणूनच मी अजून आई नाही बनू शकले…” सुजाता म्हणाली.
त्यानंतर कावेरी ताईंनी सुजाताची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळेच व्यर्थ ठरले. सुजाता कुणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. कावेरी ताईंनी तिला स्वतःचे उदाहरण दिले. याच वास्तूत सुधीरचा जन्म झाला आणि याच वास्तूत आम्ही अनेक वर्षे सुखाने संसार केला म्हणून. पण सुजाता मात्र अजूनही तिच्या मतावर ठाम होती.
सुधाकर रावांना सुद्धा सुजाताचे म्हणणे पटत नव्हते. पण विषय असा नाजूक असल्याने ते कुणाशीच काहीच बोलू शकत नव्हते. शेवटी सुधीरने सुद्धा आई वडिलांना म्हटले की सुजाता एवढी म्हणतेच आहे तर एकदा घर बदलून पाहू. तसही आपलं हे घर आता खूप जुनं झालयं. हे विकून ह्यात आणखी पैसे टाकून एखादा नवीन बंगला घेता येईल हे सुधीर ने त्याच्या आई वडिलांना समजावून सांगितले होते.
सुधाकरराव मात्र स्वतःच घर सोडून जाण्याच्या अगदीच विरोधात होते. कावेरी ताईंना सुद्धा ह्यातलं काहीच पटत नव्हतं. पण आता सुजाता सोबत सुधीर सुद्धा हे घर सोडून नवीन घरात जायच्या मताचा बनला होता.
सुजाता आणि सुधीर दोघेही काहीच ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते म्हणून मग शेवटी कावेरी ताईंनी सुद्धा त्यांच्यापुढे हार मानली. एकीकडे त्यांना इतक्या वर्षांचा सहवास असलेली वास्तू सोडवत नव्हती. पण दुसरीकडे मुलावरच प्रेम आणि नातवंडाची आस सुद्धा त्यांना आपल्याकडे खेचत होती. शेवटी पुत्रप्रेम जिंकले आणि त्यांनी सुद्धा हे घर सोडून दुसरीकडे जायला होकार दिला.
आणि सुधीरने नवीन घर पाहणे सुरू केले. सुजाताच्या आईच्या घराजवळच एक चांगले चार बेडरूम असणारे घर सुजाता ने आधीच पाहून ठेवले होते. फक्त आता जुन्या घराचा सौदा व्हायचा तेवढा बाकी होता. जुन्या घराचा सौदा होईस्तोवर आपण कुठेतरी भाड्याने राहावे असे सुजातानेच सुचवले. सुधाकर रावांना हे फारसे पटत नव्हते पण इतक्या सगळ्यांसमोर ते काही बोलू शकले नाहीत.
सुजाता खूपच उत्साहात होती. दुसरीकडे शिफ्ट व्हायचं म्हणून ती सामानाची आवरा आवर करत होती. कावेरी ताई तिच्या मदतीला होत्याच. जवळपास सगळच आवरल होतं. इतक्यात कावेरी ताई अचानकपणे सुजाता आणि सुधीर जवळ गेल्या आणि म्हणाल्या.
” सुधीर…मी ठरवलंय की आम्ही दोघे ही हे घर सोडून कुठेच जाणार नाही…तुम्हाला इथल्या वास्तूचा त्रास होत असेल तर तुम्ही दोघेही खुशाल जा दुसरी कडे राहायला…”
” आई…अगं अचानक हे काय बोलत आहेस…? आपलं आधीच ठरलंय ना…”
” पण मला आता नाही जायचं…?” कावेरीताई निर्धाराने म्हणाल्या.
कावेरी ताईंचे बोलणे ऐकून सुधीर विचारात पडला तर सुजाता ला खूप राग आला.
” ऐन वेळेवर असे अचानकच का सुचले तुम्हाला…आतापर्यंत तर तयार होतात ना दोघेही…का तुम्हाला वाटतच नाही आम्हाला मुलं व्हावीत म्हणून… तसंही तुम्हाला कधीच आमचं भलं पाहवणार नाहीच…शेवटी आहे तर की सूनच ना…मला मुल होवो किंवा न होवो…ह्यांना काहीच फरक पडत नाही…” सुजाता खूपच रागात म्हणाली.
सुजाता चा आवाज ऐकून सुधाकर राव सुद्धा तिथे आले आणि म्हणाले.
” काय झालं सुजाता…तू इतक्या मोठमोठ्याने का बोलत आहेस कावेरीशी…?”
” त्यांनाच विचारा ना काय झालंय ते…आतापर्यंत ठीक होत्या…आता म्हणत आहेत की हे घर सोडून दुसरी कडे येणार नाहीत म्हणून…” सुजाता म्हणाली.
सुजाताचे बोलणे ऐकून सुधाकर रावांनी चमकून कावेरी कडे पाहिले. कालपर्यंत आपण हिला समजावत होतो की आपण दोघे इथेच राहू यात पण हिने काहीच ऐकले नाही आणि आज अचानक काय झालंय हे त्यांना सुद्धा कळत नव्हते.
” काय झालंय कावेरी…तू अशी अचानक का नाही म्हणत आहेस…कालपर्यंत मी जेव्हा म्हणत होतो की आपण दोघे इथेच राहुयात तेव्हा तूच नकार देत होतीस…आणि आता ऐन वेळेला काय झालंय ते तरी सांगशील का…?” सुधाकर रावांनी विचारले.
क्रमशः
वास्तू – भाग २ (अंतिम भाग)