लहानपणी पासूनच कष्टाळू स्वभाव असलेल्या मधुरा ला इतक्या लवकर हार मानायची नव्हती. तिने ठरवले की आपण महेशला समजावून सांगायचे. आपल्या भविष्या साठी त्याचे काम करणे इतके गरजेचे का आहे हे त्याला पटवून द्यायचे ठरवले. आज नाहीतर उद्या महेश सुद्धा आपले ऐकेल आणि एखादी चांगली नोकरी शोधणार अशी आशा अजूनही तिला वाटत होती.
तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू केले. तिने स्वतःच महेश साठी नोकरी शोधायला सुरुवात केली. चांगले शिक्षण घेतलेल्या महेश ला जॉब मिळणे काही कठीण बाब नव्हती. पण त्याच्यात इतका आळस भरलेला होता की कुठल्याही नोकरीत तो महिना भराच्या वर टिकायचाच नाही. पण ह्यावेळी मात्र मधुरा ने ठरवले होते की ती महेशला जॉब मध्ये व्यवस्थित सेटल व्हायला मदत करेन म्हणून.
तिने महेश साठी एक चांगला जॉब शोधून त्याला सरप्राइज दिले. पण तो तिच्यावरच ओरडला. तो म्हणाला की त्याचे इतके सुद्धा वाईट दिवस आलेले नाहीत की त्याच्या बायकोला त्याच्यासाठी नोकरी शोधावी लागेल. आणि घरी सगळं आयतं मिळत आहे तर तू सुद्धा आरामात राहा आणि की सुद्धा राहतो असे तिला म्हणाला.
तिला वाटले होते की महेश खुश होईल. पण घडले उलटच. मधुरा निराश झाली. तिने त्या नंतरही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळेच प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी तिने ठरवले की ती स्वतःच नोकरी करेल. निदान दोघांचा खर्च भागून काहीतरी शिल्लक उरेल असा विचार करून तिने शेवटी स्वतःसाठी नोकरी शोधली. आणि तिला नोकरी मिळाल्यावर तिने घरी सांगितले की तिला चांगली नोकरी मिळाली आहे. आणि ती उद्यापासून नोकरीवर जाणार आहे.
हे ऐकून घरातील सर्वजण रागावले. मधुराचे सासरे बुवा म्हणाले की…
” आमच्यात घरच्या बायकांनी बाहेर जाऊन नोकरी करायची पद्धत नाही…तुझ्या माहेरी तुझ्या वडिलांनी तुला नोकरी करायला लावली असेल पण आमच्या इथे ही थेर चालणार नाही…आमच्यावर इतकेही वाईट दिवस आले नाहीत की आम्ही बायकांना काम करायला बाहेर पाठवू…”
” पण बाबा…आजकाल बायका सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने बाहेर जाऊन काम करतातच की…दोघेही संसाराला हातभार लावतात…आणि इथे तर महेश घरीच असतात…मग आमच्या भविष्याचा विचार करून मी नोकरी करणे हा एक चांगला पर्याय आहे…आणि उद्या जर आपल्याला पैशांची गरज पडली तर काय करायचं…” मधुरा समजावणीच्या सुरात म्हणाली.
” बाबा सांगत आहेत ते कळत नाहीय का तुला…मुळात ते असताना आपल्याला कशाचीच काळजी नाही…आणि उद्या गरज पडली तरी आम्ही आहोत सांभाळायला…तुला काळजी करायची गरज नाही…” महेश म्हणाला.
त्यानंतर सुद्धा मधुराने त्याला तिच्या नोकरी करण्याचे फायदे समजावून सांगितले पण महेश ने काहीच ऐकले नाही. आणि घरातील सगळ्यांनीच तिच्या बाहेर जाऊन नोकरी करण्याला तीव्र विरोध केला. आणि परिणामस्वरूप ती नोकरी करू शकली नाही.
आणि आता तर महेश ने ड्रायव्हर म्हणून कामाला जायचे सुद्धा बंद केले. मधुराला खूप काळजी वाटत होती. पण घरात कुणालाच काहीच पडलेली नव्हती.
पुढे काही दिवसांत मधुराच्या सासरे बुवांची रिटायर मेंट जवळ आली होती. आणि आता त्यांना हे सरकारी क्वार्टर सोडून स्वतःची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार होती. मात्र या गोष्टीचा त्यांनी आधी अजिबातच विचार केलेला नव्हता. त्यांचा सगळा पगार हौसमौज करण्यातच खर्च व्हायचा. त्यामधून सणवार, पै पाहुणे सुद्धा दणक्यात व्हायचे. म्हणून आजवर बचत म्हणून काही नव्हतेच त्यांच्याकडे.
पण आता राहायला घर सुद्धा हवे असल्याने त्यांनी घरात असलेले सगळे दागिने विकायला काढले. मधुरा ला सुद्धा तिचे दागिने मागितले. आधी तर तिने नकार दिला पण नंतर ह्यांच्या दबावा पुढे तिला झुकावेच लागेल आणि तिचे नुकतेच काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी लग्नात केलेले दागिने तिच्या सासरच्या मंडळींनी घर घेण्यासाठी म्हणून विकले होते.
तरीही पैसे खूपच कमी पडत होते. म्हणून मग इकडून तिकडून काही कर्ज घेतलं त्यांनी. तरी सुद्धा आणखी पैसे हवेत म्हणून मग मधुराच्या वडिलांना पैसे मागितले. मधूराचे वडील साधी नोकरी करायचे. पण घरातील सगळेच जण काही ना काही काम करून घराला हातभार लावत असल्याने त्यांची परिस्थिती चांगली होती.
पण तरीही त्यांच्याजवळ इतकी जास्त बचत नव्हती की मुलीच्या सासरच्यांना घर घ्यायला पैसे देतील. त्यांनी नम्रपणे मधुराच्या सासर्यांना नकार दिला. मग मधुराच्या सासर्यांनी मधुराच्या माहेर कडील आणखी काही नातेवाईकांना फोन करून पैशांची मागणी केली. पण कुणीच पैसे द्यायला तयार झाले नाहीत.
आता मात्र मधुरा चे सासरे चिडले आणि त्यांनी सगळं दोष मधुराला च द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की त्यांनी महेश चे लग्न एखाद्या चांगल्या श्रीमंत मुलीशी लावले असते तर आता त्यांना पैशांचा जरा सुद्धा प्रॉब्लेम झाला नसता. आणि रागाने त्यांनी मधुराला तिच्या माहेरी जाऊन तिच्या बाबांकडून पैसे घेऊन यायला सांगितले. मधुरा ने ह्याला नकार दिला पण घरच्यांनी जबरदस्ती ने तिला तिच्या माहेरी पाठवलेच.
तिच्या माहेरी गेल्यावर सुरुवातीला मधुरा ने झाल्या प्रकाराबद्दल वा ती इथे का आली आहे त्याबद्दल घरच्यांना काहीच सांगितले नाही. पण तिच्या उदास चेहऱ्या कडे पाहून हिचं काहीतरी बिनसलंय हे तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलंच. शेवटी त्यांनी मधुरा ला खोदून खोदून विचारले तेव्हा मधुरा ने सगळे सत्य तिच्या आई वडिलांना सांगितले.
खरं ऐकून मधुराच्या बाबांना खूप राग आला. आपली आणि आपल्या मुलीची फसवणूक झालीय हे त्यांना कळून चुकले होते. आणि मधुरा ला हे माहिती असून सुद्धा तिने केवळ समाजाच्या भीतीने आणि आपल्या घरच्यांच्या विचाराने सगळे काही सहन केले ह्याचे जास्त वाईट वाटत होते.
त्यांनी मधुराला आधार दिला. तिच्या माहेरी परतण्याचे त्यांना अजिबात वाईट वाटणार नाही हे तिला सांगितले.. आम्हाला लोकं काय म्हणतील ह्यापेक्षा आमच्या मुलीचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे हे तिला पटवून दिले. त्यानंतर मधुरा ने स्वतःचे मन घट्ट केले आणि फसवणुकीच्या आरोपाखाली महेशकडून घटस्फोटाची मागणी केली.
मधुरा हे असे काहीतरी करेल ह्याची अजिबात कल्पना नसलेल्या महेश आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा एक मोठा धक्का होता. त्यांना वाटले होते की आपल्या मुलीचा संसार मोडू नये म्हणून मधुराच्या घरचे त्यांची मागणी पूर्ण करतीलच. पण मधुराच्या घरच्यांनी जे केले ते त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते. त्यानंतर त्यांनी मधुराला अनेक प्रकारे समजावून घरी घेऊन यायचा प्रयत्न केला पण यावेळेला मधुरा तिच्या निर्णयावर ठाम होती.
लवकरच मधुरा आणि महेशचा घटस्फोट झाला आणि मधुराने मोकळा श्वास घेतला. आता ती पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करणार होती. आणि ह्यात तिला तिच्या आई वडिलांचा भक्कम पाठिंबा होता. महेशला मात्र आपले काय चुकले हे अजूनही कळले नव्हते.
लग्न जुळवताना खोटी माहिती सांगणे ह्याला अनेक लोक अजूनही खूप सामान्य बाब समजतात. त्यांना वाटतं की एकदा लग्न झाले की समोरच्या व्यक्तीला त्याचा स्वीकार करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. पण ही सुद्धा एक मोठी फसवणूकच आहे. नवीन नाती जुळवताना पारदर्शकता असली तर ती नाती अजून घट्ट होतात.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
बापरे किती भयानक फसवणूक