नुकतीच कपडे वाळत घालून आलेली स्नेहल किचन मध्ये आली आणि तिने सासूबाईंना विचारले.
” माझे कपडे वाळू घालून झालेत सासुबाई…आता काय करू…?”
” मी पुरण पोळ्या केल्यात…आता तू या साध्या पोळ्या टाकून घे…तोवर मी तळणाची तयारी करते…” सासुबाई म्हणाल्या.
” ठीक आहे…” स्नेहल म्हणाली. आणि पोळ्या करायला सुरुवात केली.
आज दिवाळीचा दिवस असल्याने दोन्ही सासू सूना सकाळपासून कामात होत्या. स्नेहलची ही पहिली दिवाळी असल्याने नेमकं काय कसं करावं ह्याचा तिला अंदाज येत नव्हता. म्हणून ती तिच्या सासूबाईंना विचारून सगळं काही करत होती.
स्नेहल आणि दीपकचे लग्न होऊन वर्ष होत आलं होतं. पण सासुबाई गावी राहायच्या आणि हे दोघे नोकरी निमित्ताने बाहेरगावी. त्यामुळे दोघी सासू सुनांचा एकमेकींशी फारसा संबंध आलाच नाही कधी. स्नेहलच्या मनात सासू या व्यक्तीबद्दल बरेच पूर्वग्रह होते. कधी एखाद्या मैत्रिणीकडून ऐकलेले तर कधी टीव्ही सिरियल मध्ये पाहिलेले.
म्हणून स्नेहल तिच्या सासुशी जरा मर्यादितच बोलायची. एवढंच नाही तर त्यांच्याशी बोलताना त्यांना आई ऐवजी फक्त सासुबाई असे म्हणायची. तिच्या मते सासू ही फक्त सासुच असते. ती कधीच आईसारखी वागू शकत नाही तर मग सासूबाईंना आईची जागा का द्यायची हा विचार करून ती सासूला सासुबाई म्हणूनच हाक मारायची.
सासुबाई सुद्धा जितक्याला तितकंच बोलायच्या. सासुबाई जरा तापट स्वभावाच्या होत्या पण मनाने खूप चांगल्या होत्या. दोघींचं ट्यूनिंग एकदम चांगलं जरी नसलं तरी वाईट सुद्धा नव्हतं. आणि मुख्य म्हणजे आजवर कधीच दोघींचं भांडण सुद्धा झालं नव्हतं. आज सुद्धा स्नेहल सासूबाईंच्या मागे मागे राहून सगळी कामं करत होती.
पोळ्या लाटून झाल्यावर स्नेहल जरा वेळ बसायला म्हणून दिवाणखाण्यात जायला निघाली आणि जाताना किचनच्या उंबऱ्यात पाय अडकून तिचा पाय मुरगळला. स्नेहल वेदनेने जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकून तिच्या सासुबाई लगेच तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या.
” काय गं…काय लागलंय तुला…?”
” काही नाही … पाय थोडा उंबरठ्यात अडखळला आणि पाय मुरगळला…” स्नेहल म्हणाली.
” अशी कशी ग वेंधळी तू…नीट पाहून चालता येत नाही का…आता जर जास्त लागलं असेल तर काय करायचं…ह्या आजकालच्या मुली म्हणजे ना…नुसता बेजबाबदारपणा भरलाय ह्यांच्यात…” सासुबाई तिला कुठे लागलं ते पाहत म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकुन खरं तर स्नेहल ला राग आला होता. एकतर तिला आधीच त्रास होत होता आणि सासुबाई तिला धीर द्यायचा आईची तिलाच बोलत होत्या. स्नेहलला वाटले की सासूबाईंना एकदा बोलून दाखवावे. पण तरीही ती गप्प बसली.
मग सासूबाईंनी तिला आधार दिला आणि तिला तिच्या रूम मध्ये जायला मदत केली. स्नेहल रूममध्ये आली. आधीच पाय दुखत होता. आणि त्यात भर म्हणजे सासूबाईंचा सुद्धा राग आला होता. यावेळी तिला तिच्या आईची खूप आठवण आली. आई असती तर अशी बोललीच नसती. शेवटी सासू ती सासूच असते असा मनाशी विचार करत होती.
इतक्यात स्नेहलचा फोन खणानला. तिने बघितले तर तिच्या मोठ्या ताईचा फोन होता. तिने फोन उचलला. तर समोरून ताई म्हणाली.
” दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्नेहल…झाली का तयारी…?”
” कसली तयारी अन् कसलं काय ग ताई…इथे पायाला लागलंय माझ्या…आणि त्यातच सासुबाई ओरडल्या…आजचा ना दिवसच वाईट आहे बघ…” स्नेहल म्हणाली.
” अशी काय बोलतेस…आणि पायाला काय झालंय…?” ताईने विचारले.
” अगं सकाळपासून सासूबाईंना मदत करतेय कामात…काम करतानाच उंबरठ्यात पाय अडकला आणि पाय मुरगळला…तर सासुबाई मलाच वेंधळी म्हणाल्या…” स्नेहल म्हणाली.
” अगं वेडाबाई कुठली…एवढ्याशा गोष्टीने का कुणी नाराज होत असतं का…आणि सारखं असं का म्हणतेस की सासूबाईंना कामात मदत करते आहेस म्हणुन…ते घर सासूबाईंच्या इतकंच तुझं सुद्धा आहे…तुझी सुद्धा तितकीच जबाबदारी आहे…त्या स्वतःहून पुढे येऊन सगळी कामे करतात आणि तुला फक्त हलक्या फुलक्या कामात मदत करायला सांगतात हा त्यांचा मोठेपणा आहे…
नाहीतर माझी सासू दिवाळीत मला फक्त आदेश देते…फराळाला हे कर आणि नाश्त्याला ते कर म्हणून…पण तुझ्या सासुबाई अजिबात तशा नाहीत…त्यामुळे असा राग नको धरुस… मूड फ्रेश कर आणि दिवाळीची तयारी आनंदाने कर…” ताई म्हणाली.
स्नेहल मात्र ताईचे म्हणणे नुसतीच ऐकत होती. काय बोलू नि काय नको हे तिला कळत नव्हते. मग तात्पुरते ताईला हो ला हो म्हणून स्नेहल ने फोन ठेवला आणि स्वतःशीच विचार करायला लागली. आपण सासुबद्दल जरी खूप काही ऐकलेलं असलं तरी सासुबाई मात्र आपल्याशी नेहमीच चांगल्या वागतात. ती जेव्हा जेव्हा इथे घरी असते तेव्हा तेव्हा त्या कधीच पूर्ण घराची कामे तिच्या एकटीवर टाकत नाहीत. उलट स्वतः सगळी कामे करून तिला फक्त हलकी फुलकी कामे करायला सांगतात.
तिचा राग आता कमी होत होता. आणि राग कमी झाल्याने तिचे लक्ष तिच्या दुखणाऱ्या पायाकडे जास्त होते. इतक्यात तिच्या सासुबाई हातात गरमागरम हळदीच्या लेपाची वाटी घेऊन आल्या. आणि तिला म्हणाल्या.
” दाखव… कुठं लागलंय ते…”
स्नेहलला काही कळले नाही. ती सासूबाईंना म्हणाली.
” का…काय झालंय…”
” काही नाही…हा लेप आणलाय तुझ्या पायाला लावायला…आताच नाही लावला तर उगाच त्रास होईल तुला…तू जरा नीट बस मी लावते…” सासुबाई म्हणाल्या.
त्यासरशी स्नेहल पलंगावर टेकून बसली आणि सासुबाई तिच्या पटलं लेप लावू लागल्या. तसं स्नेहल ला आठवलं की सासुबाई वयाने आणि मनाने तिच्यापेक्षा मोठ्या असल्याने त्यांनी तिच्या पायाला स्पर्श करणे चुकीचे आहे म्हणून. त्यासरशी तिने पुन्हा पाय मागे घेतला. इतक्यात सासुबाई तिला रागावून म्हणाल्या.
” काय हा धांदरटपणा…दाखव तो पाय इकडे…”
” पण सासुबाई…तुम्ही माझ्या पायाला हात लावणे बरे दिसत नाही…” स्नेहल जर अडखळून म्हणाली.
” अच्छा…आणि जर माझ्याजागी तुझी आई असती तर…तिला पण लावू दिलं नसतं का…?” सासुबाई म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकुन स्नेहल ने पुन्हा सासूबाईंच्या पुढे पाय केला आणि त्यांनी तिला लेप लावला. सासूबाईंना लेप लावताना पाहून स्नेहलला भरून आलं. आपल्या सासूबाईंच्या ओरडण्या मागे असलेली त्यांची काळजी तिला कळून चुकली. आपण नेहमीच सासूबाईंना पूर्वग्रह दूषित नजरेने पाहिले असल्याने आपल्याला कधीच त्यांच्या बोलण्या मागील काळजी व प्रेम दिसले नाही ह्याची जाणीव स्नेहलला झाली.
पण तिच्या सासूने मात्र स्नेहलला नकळतपणे मुलगी मानले सुद्धा होते. आणि त्याच हक्काने त्या तिच्यावर ओरडायच्या. तिला समजावून सांगताना कधीतरी त्यांचा आवाज मोठा व्हायचा. तसाच आजही झाला होता. आणि तिच्या काळजीने आणि मायेने त्यांनी तिच्या पायाला हळदीचा लेप लावला होता.
लेप लावल्यावर त्या बाहेर जाणार इतक्यात तिला पुन्हा थोड्या मोठ्या आवाजातच म्हणाल्या.
” थोडावेळ आराम कर…कामांची काळजी करू नकोस…आणि उगाच इकडे तिकडे करत बसू नकोस…”
” हो आई…तुम्ही म्हणाल तसं…” स्नेहल हसून म्हणाली.
तिच्या तोंडून सासुबाई ऐवजी आई ही हाक ऐकून सासुबाई गालातच हसल्या. आणि आज आपल्याला आणखी एक आई मिळाली ह्या आनंदाने स्नेहलच्या चेहऱ्यावर सुद्धा मनमोकळे हसू आले. दोघींच्या नात्यातला धागा आज अजूनच घट्ट झाला.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.