” अगं सरिता…अजून वेळ आहे लग्नाला…आताच जाण्याचा हट्ट का करत आहेस तू…” प्रभाकर सरिताला म्हणाला.
” अहो मला जायलाच हवं…दादाने दोनदा फोन केला मला… म्हणाला लग्नाच्या पंधरा दिवस आधी तरी ये म्हणून…” सरिता उत्साहाने म्हणाली.
” अगं पण मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस का तू…मला तरी वाटतं की तू लग्नाच्या एक दोन दिवस आधी जावं म्हणून…” प्रभाकर समजावून सांगत म्हणाला.
” अहो…मागच्या वेळेला वहिनी ची चुकी होती…दादा तर मला काहीच बोलला नव्हता…आणि वहीनीची चूक असताना त्याची शिक्षा दादाला कशाला…” सरिता म्हणाली.
” ते जाऊदे पण डिसेंबर महिन्यात सुधाकर, सुनिता आणि मुलं येतील आपल्याकडे….मुलाच्या शाळेला सुट्टी असते म्हणून..शिवाय सुनिताची नुकतीच डिलिव्हरी झालीय महिनाभरापूर्वी… तिलासुद्धा गरज लागेल तुझी…दोन चार दिवस राहून मग जा हवं तर…” प्रभाकर म्हणाला.
” त्यांचं काय नेहमीचच आहे…सुट्टीत येतात आणि सगळं उच्छाद मांडून ठेवतात पोरं…आणि घरातली सगळी कामे माझ्यावर येऊन पडतात…आणि आता तर लहान मुलीचं पण मलाच करायला लावतील…पण यावेळी मी नाही थांबणार…” सरिता म्हणाली.
सरिताचे बोलणे ऐकून प्रभाकर गप्पच बसला. त्याला माहिती होते की सरिता उत्साहाच्या भरात त्याचे काहीच ऐकणार नाही म्हणून. पण सरिताने मात्र आपली बॅग भरायला सुरुवात केली सुद्धा होती.
सरिताच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. सरिताच्या भावाची परिस्थिती सरीताच्या मानाने खूपच चांगली होती. चांगलाच श्रीमंत होता तिचा भाऊ. सरीताचे लग्न होईपर्यंत घरची परिस्थिती फार चांगली नव्हती पण नंतर भावाची परिस्थिती पालटली. त्याला नोकरी लागल्याने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे राहणीमान एकदमच उंचावले.
सुरुवातीला सरितावर मनापासून माया करणारा तिचा भाऊ परिस्थिती प्रमाणेच बदलत गेला. आणि मग फक्त सणवार असेल तेव्हाच दोघा बहीण भावाची भेट व्हायची. भावाची बायको म्हणजे सरिताची वहिनी सुद्धा सरिताशी तोलून मापून बोलायची. पण सरिताला यातलं काहीच अजिबात वाईट वाटायचं नाही. तिला आपल्या भावाच्या प्रगतीचे खूप कौतुक होते. त्याचे कौतुक करताना ती अजिबात थकायची नाही. माहेरचा विषय निघाला की सरिता बोलायची थांबतच नसे.
पण याऊलट तिच्या सासरच्या लोकांचं तिला अजिबात कौतुक नव्हतं. घरात सासू, नवरा, दोन मुलं आणि ती असे पाच जण होते. एक दिर त्याच्या बायको मुलासह शहरात राहायचा. साधीच नोकरी होती पण सगळेच समाधानी होते. सुधाकर अधून मधून कुटुंबासोबत गावी यायचा. त्याला सगळ्यांच्या सहवासात राहायला आवडायचं.
सुनिता सुद्धा स्वभावाने खूप गोड होती. सतत ताई ताई करून सरीताच्या मागेपुढे करायची. पण सरिता मात्र त्या सगळ्यांशी अंतर ठेवूनच वागायची. तिने अगदी कोरडेपणा ने सुनीताला बजावून सांगितलं होतं की मला ताई म्हणायचं नाही. फक्त जाऊबाई म्हणूनच हाक मारायची. तिला फक्त अन् फक्त तिच्या माहेरच्यांच कौतुक होतं. आपला भाऊ श्रीमंत आहे ह्या विचाराने आपल्या नवऱ्याच्या भावाच्या गरिबीची तिला लाज वाटायची. प्रेमळ सासूचा ती उठल्या बसल्या अपमान करायची.
दिराशी तर कधीच दोन शब्द मायेने बोलली नसेल. आणि सुनिता शी तर सतत भांडण उकरून काढत असे. सुनिता मात्र काहीही न बोलता सगळं काही चुपचाप ऐकुन घ्यायची. कारण तिला माहिती होते की दोघा भावांमध्ये खूप प्रेम होते आणि बायकांमधल्या वादामुळे दोघा भावात अंतर येऊ नये असेच तिला सतत वाटत राहायचे.
शिवाय चुलत भावंडे सुद्धा एकमेकांशी खूप छान वागायची. सगळ्याला अपवाद फक्त एक सरिताच होती. सुधाकर आणि सुनिता मुलासोबत घरी येतात हे तिला अजिबात आवडत नसे. फक्त तिला ते बोलून दाखवत येत नसे.
पण यावेळी मात्र त्यांच्या येण्याच्या आधीच सरिता मुलांसोबत तिच्या भावाच्या घरी निघून जाणार होती. सरिताने निघायच्या आधी भावाच्या घरच्यांसाठी आहेर म्हणून चांगले उंचीतले कपडे घेतले. स्वतः लग्नात घालायची साडी घेतली. मुलांना चांगले कपडे घेतले. आणि भावाच्या घरी निघून गेली.
भावाने सरिताचे स्वागत केले. मुलांना हवं नको ते विचारले. वहिनीने पण यावेळी सरिताचे चांगले स्वागत केले. वहिनी सरीताशी खूप गोड बोलत होती. सरिता अगदीच भारावून गेली. थोडावेळ आराम करून सरिताने पदर खोचून लग्न घर आहे म्हणून कामाला सुरुवात केली.
आधीच कामाची असलेली सरिता लग्नघर असल्याने जरा जास्तच कामे करत होती. घरी येणाऱ्या पै पाहुण्यांचे जेवण असो की घरात निघणारी दिवसभरातील भांडी घासायची असो. सरिता प्रत्येक काम मन लावून करत होती. वहिनी सुद्धा गोड बोलून सगळी कामे करून घेत होती.
लग्नाला थोडेच दिवस बाकी होते. घरातील सगळेच या ना त्या निमित्ताने घराबाहेर जायचे. सरिता सगळं घर व्यवस्थित सांभाळायची. लग्नाला दोन दिवस बाकी असताना वहिनी सरीताला म्हणाली.
” सरिताताई…सचिनचे बरेच जुने ड्रेस आहेत घरी…मी वरच्या खोलीत काढून ठेवलेले आहेत…चांगलेच आहेत…त्यातील एखादा होत असेल मुलांना तर बघा…लग्नात कामी येतील घालायला…”
वहिनीचे बोलणे ऐकून सरिताला नवल वाटले. कारण ते जुने कपडे त्यांनी कामवाल्या बाईला देण्यासाठी काढले होते हे त्यांनी काल ऐकले होते. सरिताने मनात विचार केला की त्यातील एखादा ड्रेस काढायला मी काय कुणी कामवाली आहे का. माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाचं लग्न आहे आणि स्वतःच्या मुलांना चांगले कपडे घेण्याइतपत चांगली परिस्थिती नक्कीच आहे माझी.
पण वहिनीचा स्वभाव ओळखून असल्याने उगीच लग्न दोन दिवस राहिलेले असताना वाद कशाला घालायचा म्हणून सरिता जास्त बोलली नाही. तिने फक्त नकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेली. पण मनात मात्र सतत वहिनीचे बोलणे आठवत होती. फक्त आपल्या भावावर असणाऱ्या प्रेमापायी ती वहिनीला काहीच बोलायची नाही.
मागच्या वेळी सुद्धा जेव्हा सरिता साखरपुड्याला आली होती तेव्हा वहिनीची एक साडी मिळत नव्हती. आणि ती सारखी सारखी सरिता जवळ जाऊन म्हणत होती की तुमच्या बॅग मध्ये ठेवली असेल तुम्ही चुकून. सरिताने पूर्ण बॅग तिला उघडुन दाखवली तरीपण वारंवार सरीताच्या जवळ येऊनच ती साडी शोधायचा प्रयत्न करत होती.
त्यानंतर ती साडी वहिनीला तिच्याच कपाटात सापडली तेव्हा कुठे सरिताने मोकळा श्वास घेतला. पण वहिनीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ती तिच्या भावासाठी पुन्हा माहेरी धाव घ्यायची. प्रभाकर तिला बरेचदा समजावण्याचा प्रयत्न करायचा पण सरिता तिच्या माहेरच्यांबद्दल अजिबात ऐकून घ्यायची नाही. मग प्रभाकर सुद्धा जास्त बोलायचा नाही. यावेळी सुद्धा प्रभाकरला धाकधूक होतीच.
पण सरिता मात्र निश्चिंत होती. कारण तिला विश्वास होता की वहिनी जरी अशी असली तरी तिचा भाऊ मात्र चांगला आहे म्हणून. लग्नाच्या एक दिवस आधी जेव्हा आहेर देण्यात येत होते तेव्हा सरिताने दादा आणि वहिनी साठी आणलेला सगळाच आहेर तिच्या वहिनीने तिच्या दादा समोरच कामवाल्या बाईला दिला. सरिताच्या भावाने सुद्धा काहीच म्हटले नाही.
तेव्हा मात्र सरिताला खूप वाईट वाटले. आपला भाऊ नेहमीच आपल्या बाजूने असतो हा तिचा विश्वास फोल ठरला होता. आज खऱ्या अर्थाने सरिताचे डोळे उघडले होते. आणि आधी तिने ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते त्या सगळ्याच गोष्टी तिला राहून राहून आठवत होत्या.
क्रमशः
किंमत नात्यांची – भाग २ ( अंतिम भाग)