आम्हाला नवीन क्वार्टर मध्ये शिफ्ट होऊन महिना झाला होता. एव्हाना आजूबाजूच्या दोन चार घरांशी चांगली ओळख सुद्धा झाली होती. कधीतरी दिसल्यावर बोलणं व्हायचं. मुलगा सुद्धा इतर मुलांसोबत खेळायला जात होता. पण एकाच बिल्डिंग मध्ये अगदी दारासमोर दार असणाऱ्या तिच्याशी अजुन एकदाही बोलणं झालेलं नव्हतं.
तशी बोलायला ती नेहमी नेहमी दिसायची सुद्धा नाही. कधीतरी बाहेरचा पॅसेज स्वच्छ करायला यायची तेव्हा दिसायची. दिसल्यावर अवघडल्या प्रमाणे एखादी स्माईल द्यायची आणि खाली मान घालून काम करून घरात निघून जायची.
दिवसभर घरातच असायची. बाहेर निघणे एकदमच कमी. कुठे बाहेर जायचं असेल तर बाहेर निघायची फक्त. किंवा कचरा फेकायला निघायची. आपण समोर दिसल्यावर साधं नमस्ते सुद्धा बोलली नव्हती इतक्या दिवसात. त्यामुळे मला ती जरा शिष्ट वाटली.
चार घरांची बिल्डिंग होती. आणि त्यामध्ये तळमजल्यावर फक्त आम्हीच राहत होतो. वरची दोन्ही क्वार्टर रिकामीच होती. आम्ही यायच्या आधी ते बिल्डिंग मध्ये एकटेच राहायचे. त्यामुळे आम्ही राहायला आल्यावर तिला आनंदच व्हायला पाहिजे होता.
पण तिला पाहून आनंद वगैरे झाला असेल असे अजिबात वाटत नव्हते. तिला असे एकाकी राहणे आवडत असेल असे वाटून मग मी सुद्धा जास्त प्रयत्न केला नाही. फक्त दिसल्यावर एकमेकींना हसून नमस्ते बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला अवघडून हसणारी ती आता मोकळेपणाने हसायला लागली होती.
हसली की ती फार सुंदर दिसायची. तेवीस – चोवीस वर्षांची असेल. नितळ गोरा रंग, कमरेपर्यंत येणारे लांब केस, चाफेकळी सारखे नाक, मोठे डोळे, उंच, सडपातळ बांधा आणि नाजूक आवाज. तिला पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटायचे. पण तिच्या न बोलण्यामुळे ती स्वभावाने गर्विष्ठ असावी असा की अंदाज बांधलेला. आता ती सुंदरच इतकी होती की त्यामुळे तिला त्यावर गर्व वगैरे वाटणे साहजिकच होते.
पण बाहेरच अंगण वा घरामागचा परिसर खूप खूप दिवस स्वच्छ करायची नाही. कधीतरी तिचा नवरा झाडू मारताना दिसायचा. त्यामुळे ती खूप आळशी( माझ्यापेक्षाही) असावी हा सुद्धा एक समज मी तिच्या बाबतीत करून घेतला होता. तिच्या मानाने तिचा नवरा मला स्वभावाने जरा बरा वाटला.
बाहेर दिसला की नमस्ते पासून सुरू व्हायचा तो महाराष्ट्रात हवामान कसे आहे त्यापासून ओडिशातील राजकारणापर्यंत कोणत्याही विषयावर मनमोकळा बोलत बसायचा. हळूहळू त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा रोहन सुद्धा माझ्या मुलासोबत खेळायला येऊ लागला. दोघेही एकाच वयाचे असल्याने दोघांचे छान पटू लागले होते.
रोहन आमच्याच घरी राहायचा हट्ट करायला लागायचा. त्याचे आई बाबा कसेतरी त्याला घेऊन जायचे. पण आता तो रोज घरी येण्याचा हट्ट करायला लागला होता. मग ती सुद्धा आता तिच्या मुलाला बिनधास्त आमच्या घरी पाठवायला लागली. आता माझी आणि तिची जरा जास्त ओळख व्हायला लागली होती.
तिचा नवरा ऑफिसमधून ही तिला न चुकता आठ तासांच्या अवधीत तीनदा व्हिडिओ कॉल करायचा. त्याचं ओडिया भाषेतील संभाषण मला कळायचं नाही पण दोघांचं फार कौतुक वाटायचं की लग्नाला इतकी वर्षे झाल्यावरही दोघे अगदी प्रियकर आणि प्रेयसी सारखे एकमेकांना व्हिडिओ कॉल करतात.
मला ही कल्पनाच फार रोमँटिक वाटली. म्हटलं खूप नशीबवान आहे ही बाई. नवरा घरातील अर्ध्या अधिक कामांमध्ये तिची मदत करायचा. मुलाला खेळायला सुद्धा एकटाच बाहेर घेऊन जायचा. तिला ऑफिसमधून व्हिडिओ कॉल करायचा. आणखी काय हवं असेल हिला आयुष्यात.
आमची मुलं एकमेकांसोबत खेळायला लागली आणि त्या माध्यमातून आमच्यात बोलणं व्हायला लागलं. आणि मग मला कळलं की तिच्या कमी बोलण्याचे कारण म्हणजे तिचा गर्विष्ठ पणा नसून तिला हिंदी भाषा फारशी न कळणे आहे.
ती मूळची ओडिशाची. त्यातही ग्रामीण भागात राहिलेली. त्यामुळे तिची हिंदी भाषेवर फारशी पकड नव्हती. आणि मोडक्या तोडक्या भाषेत ती जी हिंदी बोलायची त्यावरून अनेक बायका तिला हसायच्या. त्यामुळे तिचा आत्मविश्वास जरा कमीच झालेला होता. पण माझं मराठी मिश्रित हिंदी ऐकल्यावर तिला जरा हायसे वाटले असावे.
मग दुपारी घरी दोघीच असलो की ती स्वतःहून बोलायला यायला लागली. मग तिच्या बोलण्यातून कळले की त्यांनी नवीन घर घेतलंय आणि लवकरच ते क्वार्टर सोडून नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. मग आणखी बऱ्याच गोष्टींवर ती माझ्याशी बोलायला लागली. एकदा बोलायला सुरू झाली की पुढचे दीड दोन तास सतत बोलत राहायची.
मला नवल वाटायचं. आधी एकदम शांत वाटणारी ही इतकी बोलकी आहे ह्याचं. मनात म्हटलं आपण कधीकधी कुण्या व्यक्ती बद्दल मत बनवायला जरा घाईच करतो. कुठे ती इतकी गोड स्वभावाची होती आणि मी तिला शिष्ट समजत होते. मलाच माझं हसू येत होतं.
एकदा दुपारी रोहन ने तिच्याजवळ बाहेर जाण्याचा हट्ट केला. तिने नकार दिला पण तो मात्र ऐकतच नव्हता. मग मीच तिला म्हटले की मुलगा एवढा हट्ट करतोय तर थोडावेळ समोरच्या ग्राउंड वर जायला काय हरकत आहे. तुला सोबत हवी असेल तर मी येते. त्यावर ती पुन्हा अवघडून म्हणाली की समोरच जायचं आहे तर मी जाईल एकटीच त्याला घेऊन.
आणि त्या दिवशी मुलाच्या हट्टापायी तिने त्याला समोरच्या मैदानात नेले. मी गेट च्या आत मधून तिच्याकडे पाहत होते. तिला जाऊन दहा पंधरा मिनिटे झाली असतील. तेवढ्यात तिचा नवरा बाहेरून घरी आला. एरव्ही बाहेर सतत हसरा चेहरा करून वावरणारा तो आज तिला बाहेर पाहून रागाने लाल झाला होता.
तिने सुद्धा त्याला पाहिले आणि घरी यायला निघाली. मुलगा काही केल्या तिथून यायला तयार नव्हता तेव्हा तिने अक्षरशः ओढत आणले त्याला. नवरा बाहेरच उभा राहिला. ती गेटच्या आत आली आणि पटकन घराच्या आत गेली. मग तो सुद्धा लगेच तिच्या मागे आत निघून गेला. एरव्ही दिसल्यावर नमस्ते करणारा तो आज चक्क काहीही न बोलता आत निघून गेला.
त्यानंतर की सुद्धा आत निघून आले. नेमका त्याला राग कशाचा आला असेल असा एक दोनदा माझ्या मनात विचार येऊन गेला पण त्यांच्या नवरा बायकोचं असेल काहीतरी म्हणून मी तो विचार झटकून टाकला. म्हटलं उद्या ती दिसली की तिलाच विचारू काय ते.
पण त्या दिवशी नंतर तिने बाहेर येणे अगदीच बंद केले होते. पुन्हा पूर्वीप्रमाणे घरातच राहायची. आता तर बाहेर झाडू मारायला सुद्धा दिसत नव्हती. आत मधून मुलाच्या रडण्याचा आवाज यायचा. ती तिला खेळायला बाहेर ने म्हणून हट्ट करायचा. पण हिने मात्र एकदाही त्याला बाहेर आणले नाही. मला थोडे विचित्र वाटत होते. कारण आताशा तर ती खूप छान बोलायला लागली होती. आणि अचानक काय झाले असणार तिला.
शेवटी न राहवून मी आमच्या बाजूलाच राहणाऱ्या एका शेजारणीला तिच्याबद्दल विचारले. ती देखील ओडिशा चीच होती. तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. ती म्हणाली की तिचा नवरा खूप संशयी आहे. बायको सुंदर आहे म्हणून तिला जास्त बाहेर जाऊच देत नाही. सतत तिच्यावर लक्ष ठेवून असतो. तिला कुणाशीही बोलायची मुभा नाही. इतकंच काय तर तिने कपडे काय घालावेत, वेणी कशी घालावी ह्यापासून सगळं तोच ठरवतो.
हे सगळं ऐकून डोकं सुन्न व्हायची वेळ आली होती. आता त्याचं ऑफिसमधून तिला सतत व्हिडिओ कॉल करण्यामागचं कारण सुद्धा चांगलंच लक्षात येत होतं. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे तिच्या मानाने तो अतिशय सुमार दिसायचा.
ती एखाद्या कोरियन मुलीप्रमाणे नितळ सुंदर दिसायची. आणि तो काहीसा ठेंगणा आणि काळा. रेखीव म्हणायला चेहऱ्यात असे काहीच नव्हते. कुठेच मेळ बसत नव्हता. आई वडिलांनी ह्याची सरकारी नोकरी पाहून ह्याला मुलगी दिली आणि ह्याने स्वतःच्या न्यूनगंडापायी तिला बंदिस्त करून ठेवली.
त्या दिवसापासून ती फारच कमी बाहेर दिसायला लागली होती. मी सुद्धा मग तिच्या अडचणींमध्ये भर न टाकता तिला बाहेर येण्याचा फार आग्रह नाही करायचे. काही दिवसांनी ते त्यांच्या नवीन घरात राहायला निघून गेले. आणि मग फारसा काही संपर्क राहिला नाही.
माझ्या मनात तिच्याविषयी अपार सहानुभूती दाटून आली होती. हेच तिचं वय होतं मोकळा श्वास घेण्याचं. भरभरून जगण्याचं. पण तिच्या नशिबी आला तो बंदिस्तपणा आणि सततचा संशय. ती सुंदर होती ह्यात तिची काय चूक होती. खरंच तिचं सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरलं होतं.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.