कार्तिक आणि मयुरी घरी आले आणि कार्तिकने रागातच स्वतःचा कोट काढून सोफ्यावर भिरकावून दिला. त्यासरशी मयुरी जरा घाबरलीच. कार्तिक मोठ्याने तिला म्हणाला.
” काय ग…एवढीही अक्कल नाही का तुला की पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत…गावंढळ कुठली…”
” मला खरंच माहिती नव्हतं की सगळ्या जणी पार्टीत वन पिस घालून येणार आहेत…म्हणून मी साडी घातली…” मयुरीने कसेबसे स्पष्टीकरण दिले.
” अगं मग माहिती ठेवायची ना…फक्त शहरातला नवरा पाहिजे ह्यांना…पण स्वतः मात्र कसलाही क्लास मेन्टेन करायचा नाही…मी कंटाळलो आहे तुझ्या या सततच्या बावळटपणाला…मला तुला कुठेही बाहेर फिरायला न्यायची खूप लाज वाटते…पण नशिबाने अशी गाठ बांधून ठेवलीय की नीट बांधून ठेवताही येत नाही आणि सोडून सुद्धा टाकताही येत नाही…” कार्तिक हताशपणे सोफ्यावर बसून मोबाईल चाळवत म्हणू लागला.
त्याला तसे बोलताना पाहून मयुरीला खूप वाईट वाटले. आपण आपल्या नवऱ्याला ओझं वाटतो ह्याची तिला पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली. इतक्यात सोशल मीडिया वर एका मित्राचा त्याच्या मॉडर्न बायकोसोबत फोटो पाहून पुन्हा एकदा स्वतःच्या नशिबावर दोष देत होता.
मयुरी आणि कार्तिक एका पार्टीत गेले होते. तिथे जाताना मयुरीने छान वर्कची साडी घातली होती. पदर हातावर मोकळा सोडला होता. केस अर्धे बांधून पाठीवर मोकळे सोडले होते. हातात ब्रेसलेट आणि गळ्यात छोटासा नेकलेस. मुळातच नाकी डोळी नीटस असणारी मयुरी तयार झाल्यावर आणखीनच सुंदर दिसत होती. तिला पाहून कार्तिक आधी मनातल्या मनात खुश झाला होता.
पण पार्टीत गेल्यावर जेव्हा त्याने सगळ्याच बायकांना वन पिस गाऊन मध्ये पाहिले तेव्हा मात्र त्याला मयुरीच्या अवताराची लाज वाटायला लागली. स्पेशली जेव्हा त्याने त्याच्या सोबत एकाच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या शनायाला पाहिले तेव्हा त्याने लगेच मनातल्या मनात दोघींची तुलना सुरू केली. त्याला सगळ्यात वेगळी आणि विचित्र मयुरीच वाटत होती. पार्टीत सुद्धा तो मयुरी पासून जरा दूर दूर राहत होता आणि या सगळ्याचा राग त्याने घरी आल्यावर मयुरीवर काढला होता.
कार्तिक एका लहान शहरात राहणारा मुलगा. चांगला शिकला आणि चांगली नोकरी मिळवली. नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात आला आणि त्याचे राहणीमान बदलले. मोठमोठ्या लोकांसमवेत उठणे बसणे सुरू झाले. आणि तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राहणीमानावरून जज करू लागला.
अशातच त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी शनाया त्याला आवडायला लागली. चांगली मॉडर्न राहणारी, अवखळपणे इंग्रजी बोलणारी शनाया पाहताक्षणीच त्याला भावली होती. तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला लागला होता. पण तिच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती.
शेवटी एके दिवशी हिम्मत करून त्याने तिला प्रपोज केलेच. पण आपण आधीपासूनच रेलेशनशिप मध्ये असल्याचे सांगून तिने त्याचे प्रेम नाकारले. आणि त्या क्षणापासून त्याने ठरवले की आपण हीच्यापेक्षा जास्त मॉडर्न आणि सुंदर असलेल्या मुलीशी लग्न करून हिला दाखवून द्यायचे. जेणेकरून तिचा जळफळाट होईल. प्रेमाची जागा आता मत्सराने घेतली होती.
त्याच्या लग्नाच्या वेळी त्याने त्याच्या आई बाबांना सांगितले की त्याच्यासाठी मुलगी बघताना मॉडर्न मुलगी बघा म्हणून. पण आईवडिलांना भीती होती की मॉडर्न मुलगी म्हातारपणी आपल्याला सांभाळणं की नाही. शिवाय पूर्वापार चालत आलेल्या रीती परंपरा सुद्धा पुढे चालू ठेवणार नाही. म्हणून त्यांनी कार्तिकची त्यांच्या परीने समजूत काढली आणि स्वतःच्या साच्यात फिट होणारी मुलगीच सून म्हणून घरी आणायची ह्या उद्देशाने वधू संशोधन सुरू केले. आणि अशातच त्यांना मयुरी पसंत पडली.
मयुरी एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी होती. घरी आई वडील, दोन काका, काकू, आजी, आजोबा आणि खूप सारे भावंडं अशा वातावरणात वाढलेली. आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं होतं. दिसायला सुंदर, नाकी डोळी रेखीव, साधी राहणी आणि उत्तम विचार असलेली मयुरी कार्तिकच्या आई बाबांना खूप आवडली. शिवाय घर सुद्धा तोलामोलाच होतं. मयुरीच्या वडिलांची मुलीच्या लग्नात भरपूर काही द्यायची तयारी होती.
मग आई बाबांनी कार्तिकला खूप समजावून सांगितले. लग्न झाल्यावर तू तिला तुला हवं तसं राहायला सांग वगैरे वगैरे. मग कार्तिकने सुद्धा काहीसा नाईलाजाने च लग्नाला होकार दिला. आणि मयुरी कार्तिकची बायको बनून घरी आली. सुरुवातीला मोठ्या शहरात येताना मयुरी मनातून आनंदली होती.
पण इथले मोठमोठाले रस्ते, ट्रॅफिक आणि भल्यामोठ्या इमारती पाहून मनातून थोडी घाबरली देखील. अशातच कार्तिकचा नेहमीच एक धोशा सुरू असायचा. तू मॉडर्न राहायला शिक म्हणून. आजवर पंजाबी ड्रेस आणि साधी वेणी यावर वावरलेल्या मयुरीसाठी अचानक मॉडर्न बनणे जरा कठीणच होते.
नवीन लग्न झालेले असताना आधी मयुरीच्या मनाचा थांग न घेता कार्तिकने स्वतःचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली. मयुरीला सुद्धा कार्तिक जे म्हणतोय ते करायची मनापासून इच्छा होती. पण तिला या सगळ्यासाठी वेळ लागणार होता. आणि कार्तिकला सगळ्याच गोष्टींची खूप घाई होती. त्याला वाटायचे मयुरी ने सगळ्याच गोष्टी अगदी चुटकी सरशी अंगीकाराव्यात.
आणि यावरूनच कार्तिक मयुरीशी वाद घालायला लागला. आणि हळूहळू मयुरीचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला. यामुळे कार्तिक आणि मयुरी मधील संवाद कमी आणि वाद जास्त व्हायला लागले. मयुरी तिच्या परीने खूप प्रयत्न करायची. पण कुठे बाहेर गेलेले असले की कार्तिक मयुरीची तुलना इतर बायकांशी करत राहायचा आणि त्याला मयुरी कुठे ना कुठे कमी वाटायची. आजही तसेच झाले होते.
सुरुवातीला जेव्हा कार्तिकने तिला तयार झालेले पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली होती. पण पार्टीत गेल्यावर जेव्हा इतर बायकांना पाहिले तेव्हा त्यांच्या तुलनेत त्याला मयुरी जरा जास्तच गावंढळ वाटू लागली होती. आणि म्हणूनच तो आज मयुरी शी काहीही बोलत नव्हता.
कार्तिकने बेडरूम मधून चादर आणि उशी आणली आणि तो हॉल मध्येच जाऊन झोपला. मयुरी मात्र रात्रभर मुसमुसत रडत होती. आधी मोठ्या कुटुंबात तिला कधीच एवढा एकटेपणा जाणवला नव्हता म्हणून कार्तिकने तिच्याशी अबोला धरलेला तिला सहन होत नव्हता. आणि त्यातच आपण कार्तिकच्या लायकीचे नाही ही अपराधी भावना सुद्धा तिला आतून बोचत होती.
सकाळी सुद्धा कार्तिक तिच्याशी फक्त कामापुरते बोलून टिफीन घेऊन ऑफिसला निघून गेला. दिवसभर मयुरी उदास होती. इतक्यात दुपारी त्यांच्या घराची बेल वाजली. मयुरी ने दर उघडुन बघीतले तर समोर तिचे बाबा आलेले होते. तिला सरप्राइज द्यायचे म्हणून मयुरीचे बाबा तिची भेट घेण्यासाठी म्हणून मुद्दाम तिला न सांगता आलेले होते.
त्यांना पाहून मयुरीला खूप आनंद झाला. बापलेकीची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती. मयुरीच्या बाबांना घरी जाण्याची घाई होती म्हणून त्यांनी कार्तिकचा फोन वरच निरोप घेतला. ते जायला निघणार इतक्यातच मयुरीने सुध्दा त्यांच्याजवळ काही दिवसांसाठी माहेरी येण्याची इच्छा बोलून दाखवली आणि तिच्या वडिलांनी सुद्धा अगदी आनंदाने होकार दिला.
मयुरीने फोन करून कार्तिकला घरी जाण्याची परवानगी मागितली तेव्हा कार्तिकने अगदी कोरडेपणाने हो म्हटले. आपण असल्याचा वा नसल्याचा कार्तिकला जास्त फरक पडणार नाही ह्याची जाणीव मयुरीला झाली होती. ती तिच्या वडिलांबरोबर माहेरी निघून गेली.
क्रमशः
तिला समजून घेताना – भाग २ (अंतिम भाग)