” अग ए शालू…पोरगा केव्हापासून रडतोय…पहिल्यांदा याला बघ…राहू दे घरातली कामं…” शकू आत्याने शालूला आवाज दिला.
तेव्हा शालू जरा तणतणतच बाळा जवळ आली आणि बाळा ला जवळ घेतले आणि मनातल्या मनातच म्हणाली.
‘पोरगा लहान आहे तर रडणारच ना…आताच दूध पाजून गेली आहे…ह्यांना काय कळणार म्हणा…ह्यांना कुठे मुलबाळ आहे…ह्यांनी थोडा वेळ बाळाकडे बघितलं असतं तर काय झालं असतं…’
पण शकू आत्यांना तोंडावर हे सगळं बोलायचं धाडस तिच्यात नव्हतं. शकू आत्या तिला बाळा जवळ ठेवून स्वतः स्वयंपाक घरात कामाला निघून गेल्या.
शकू आत्या शालूच्या आतेसासुबाई. म्हणजेच तिच्या नवऱ्याची संजयची आत्या. त्यांना त्यांच्या सासरच्यांनी नीट वागवले नाही म्हणून ऐन तरुण वयात त्या माहेरी राहायला आल्या. वय कमी होतं. घरच्यांनी त्यांना खूप समजावले दुसरं लग्न कर म्हणून. पण त्यांनी कुणाचेच काही ऐकले नाही.
दुसरं लग्न करण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. आणि म्हणून सगळे आयुष्य त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांसाठी वाहून घेतले होते. संजय आणि त्याची बहीण सुलभा त्यांच्या आईपेक्षाही आत्याजवळ जास्त राहिलेले होते. आणि म्हणूनच दोघांचाही आत्यावर फार जीव होता.
आत्यासाठी सुद्धा हे दोघे बहीण भाऊ म्हणजे तिचं संपूर्ण जग होतं. सुलभाचे लग्न होऊन पाच वर्ष झाले होते. आणि संजयच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती. आता घरात संजय, शालू, तिची सासू, आतेसासू आणि सहा महिन्यांचा अथर्व एवढेच होते. सासरेबुवांना जाऊन दोन वर्षे झाली होती.
शालू जेव्हा नवीन लग्न करून या घरात आली होती तेव्हा तिला शकू आत्या फारशा आवडल्या नव्हत्या. कारण म्हणजे आजकाल जिथे एक सासू सुद्धा नकोशी असते तिथे दोन दोन सासूंच्या सानिध्यात तिला राहायचं होतं. दोन्ही सासू मिळून आपले जगणे कठीण करून टाकतील असे तिला वाटायचे.
पण जसजशी ती घरात रुळायला लागली तसतशी ती दोन्ही सासवांशी जुळवून घ्यायला लागली. आणि तिला कळले की दोन्ही सासवा स्वभावाने खूप चांगल्या आहेत. आणि शकू आत्या तर तिला खूपच आवडायला लागल्या होत्या. कारण घरातील अर्धे अधिक काम तर त्या स्वतःच करायच्या. वरून तिला सुद्धा खूप जपायच्या.
पण जेव्हापासून शालूची गोड बातमी घरात सगळ्यांना कळली होती तेव्हापासूनच शकू आत्या शालूची खूप काळजी घेऊ लागल्या होत्या. तिला अगदी असेच कर आणि असे करू नकोस असे सांगत राहायच्या. शालूला हे सगळे नकोसे वाटायचे. तिला वाटायचे की शकू आत्या जरा जास्तच करते आहे.
तिला आवडणारे पदार्थ खाण्यापासून रोखणाऱ्या आणि तिला सतत सूचना देणाऱ्या शकू आत्या आता तिला नकोशा झाल्या होत्या. त्यांच्या बोलण्याचा तिला राग येऊ लागला होता. पण घरात सगळ्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम असल्याने ती ते बोलून दाखवू शकत नव्हती.
अशातच सातव्या महिन्यानंतर ती जेव्हा बाळंतपणासाठी माहेरी गेली तेव्हा तिला सुटका झाल्यासारखे वाटले. कारण तिथे आत्या सारख्या सक्त सूचना नव्हत्या. त्यामुळे शालू मनसोक्त खायची, प्यायची. सतत इकडून तिकडे फिरायची. आणि परिणामी एके दिवशी घराच्या उंबरठ्यात धडपडली. पडता पडता वाचली पण पोटात दुखायला लागलं. नववा महिना नुकताच लागला होता.
डॉक्टरांनी तपासले आणि घरच्यांना सांगितले की काही इमर्जन्सी कारणांमुळे डिलिव्हरी आताच करावी लागेल. शालूची सिझरियन डिलिव्हरी झाली. शालूने एका गोंडस मुलाला जन्म दिला. फक्त काही तब्येतीच्या कारणांमुळे बाळाला आणि शालुला आणखी काही दिवस दवाखान्यात राहावे लागले होते.
त्यानंतर तीन महिने माहेरी राहून शालू पुन्हा सासरी आली होती. अथर्व घरी आल्यामुळे घरचे सगळेच खूप आनंदात होते. सगळे जण त्याच्याशी खेळायचे. त्याला जपायचे. पण शकू आत्या मात्र त्याला जरा जास्तच जपायची. अगदी डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष द्यायची. आणि शालूला सूद्धा बाळाची काळजी घ्यायच्या वारंवार सूचना द्यायची.
शालू मात्र त्या मानाने जरा जास्तच निष्काळजी होती. तिला वाटायचं घरात इतके सगळे असताना मी सतत बाळा जवळ राहायची गरज नाही. शकू आत्याचा जरा रागही यायचा तिला. शिवाय बाळंतपणात झालेल्या त्रासामुळे वा थकव्यामुळे ती अजूनही थोडी नैराश्याने ग्रासलेली होती.
त्यातच शकू आत्या सारखी तिला म्हणायची की हे नको खाऊ, ते नको पिऊ, अशीच राहा, बाळाच्या जवळच राहत जा. वगैरे वगैरे. पण शालू मात्र मनातल्या मनात शकू आत्याचा राग करू लागली होती. शेवटी एके दिवशी शालू संजय ला म्हणाली.
” तुम्ही बघताय ना आत्या मला दिवसभर नुसतं सांगतच असतात…हे करू नको किंवा असच कर म्हणून…मला नाही आवडत त्यांचं इतकं बोलणं…”
त्यावर संजय शालूला म्हणाला.
” अगं शालू…आत्या सगळं काही काळजीपोटी म्हणतेय ना…तू समजुन घे तिला…तिचं प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर…आणि आपल्या बाळावर तर जरा जास्तच आहे…म्हणून ती सांगते तुला…तू राग नको मानू तिच्या बोलण्याचा…”
शालूने तात्पुरते त्याच्या बोलण्याला होकार दिला. पण मनातून राग मात्र अजूनही होताच. अशातच एके दिवशी लहानगा अथर्व पलंगावर खेळत असताना अचानक पलंगावरून खाली पडणारच इतक्यात शकू आत्याने त्याला उचलून घेतले. नेमकी त्यावेळी शालू फोन वर बोलत असताना तो पडल्याने शकू आत्याचा राग अनावर झाला. अथर्व रडायचा थांबल्यावर कधी नव्हे त्या शालुवर जोरात ओरडल्या. त्या म्हणाल्या.
” काय ग…तुला कितीवेळा सांगत असते मी बाळाकडे नीट लक्ष देत जा म्हणून…पण तुझं काहीतरी वेगळंच सुरू असत नेहमी…तेवढं तरी बरं माझं वेळेवर लक्ष गेलं…आताच सांगून ठेवते…बाळाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाही…”
शकूआत्याचे बोलणे ऐकून शालूला सुद्धा राग आला. ती रागातच शकू आत्याला म्हणाली.
” मी माझ्या मुलाला कसं सांभाळायचं ते तुम्ही मला सांगायची गरज नाही…आणि तुम्हाला तरी काय माहिती आहे त्यातलं…तुम्ही तर कधी आई होऊ शकल्या नाही…सासरी सुद्धा नांदता नाही नाही तुम्हाला…आणि मला काय उपदेश देणार आहात…?”
शालूचे हे बोलणे ऐकून शकू आत्याला धक्काच बसला. त्या काहीही न बोलता तिथून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेल्या. शालू सुद्धा रागातच बाळाला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. पण शालुच्या सासुबाई मात्र झालेल्या प्रकाराने खूपच अस्वस्थ झाल्या.
थोड्या वेळाने त्या शालूच्या खोलीत आल्या. आणि शालू ला म्हणाल्या.
” आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल सगळ्या बाजूने माहिती नसेल तर त्याबाबतीत बोलू नये बाळा…तुझ्या एका शब्दाने माझंच मन इतकं दुखतंय तर शकू ताईंना कसं वाटतं असेल ह्याचा विचार करवत नाही…त्यांच्यासोबत नेमकं काय झालं हे तुला माहित नाही.. ” सासुबाई शालू ला म्हणाल्या.
” आई…तुम्हाला आत्याबद्दल बोलायचं असेल तर मला काहीच ऐकून घ्यायचं नाही…मला त्यांचं वागणं अजिबात पटत नाही…” शालू फणकाऱ्याने म्हणाली.
” मला बोलायचं नाही…फक्त तुला काहीतरी सांगायचं आहे…जे मला वाटतं तुला माहीत असायला हवं…”
” काय सांगायचं आहे तुम्हाला…?” शालूने विचारले.
” संजय लहान होता…म्हणजे अगदी पाच सहा तेव्हा त्याच्या बाबांसोबत भाऊबीज निमित्ताने शकूताईंच्या गावी त्यांना आणायला गेला होता…शकू ताईंच तेव्हा नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या… लहानपणी पासून त्यांनीच संजयला सांभाळले होते म्हणून संजय शकू ताईंचा खूपच लाडका होता…
सगळ्यांची जेवणं झाल्यावर संजय खेळत खेळत त्यांच्या घराच्या मागे असलेल्या विहिरी जवळ गेला आणि कुतूहल म्हणून विहिरीत पाहू लागला…तेवढ्यात शकू ताई त्याला पाहत पाहत तिथे आल्या आणि त्यांनी संजयला तिथे पाहिले…त्या संजय जवळ जाऊन त्याला तिथून घेऊन येणारं त्याआधीच विहिरी जवळच्या चिखलामुळे त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला…
ते दृश्य पाहून शकू ताई एकदम घाबरल्या… पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच त्या विहिरीत उडी मारली आणि संजयला खूप प्रयत्नाने पाण्याच्या वर पकडुन ठेवले…तोवर घरची सगळी मंडळी तिथे आली होती…मग त्यांनी दोघांनाही बाहेर यायला मदत केली…
संजय वाचला ह्याचा सगळ्यांना आनंद झाला पण थोड्याच वेळात सगळ्यांच्या लक्षात आलं की शकू ताईंची तब्येत बिघडली म्हणून…आणि त्यातच त्यांनी त्यांच्या पोटातल्या बाळाला गमावले…” शालूच्या सासुबाई शालूला हे सगळं सांगत होत्या तेव्हा त्यांना भरून आले. मध्येच त्या थांबल्या. शालू सुद्धा हे सगळं ऐकून स्तब्ध झाली. आणि पुढे म्हणाली.
” त्यानंतर काय झालं आई…”
” त्यानंतर शकू ताईंच्या सासरच्यांनी ह्या सगळ्याचा दोष त्यांनाच दिला…आधीच सासुरवास करणारी सासू तिच्या वंशाचा दिवा हीच्यामुळे गेला म्हणून त्यांच्या नावाने बोटे मोडायला लागल्या…तिची सासू तर म्हणाली की तुझ्या भावाचा पोरगा मेला असता चालला असता पण माझ्या घरचा वंशाचा दिवा वाचायला हवा होता…” शालू च्या सासुबाई बोलत होत्या आणि ती अवाक् होऊन सगळं काही ऐकत होती. सासुबाई पुढे म्हणाल्या..
” त्या काळी अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा बायकांचे संसार मोडायचे… सासरच्यांना एका शब्दानेही दुखावलेलं चालायचं नाही…मग इथे तर शकू ताईंच्या सासरच्यांचा सगळं रोष शकू ताईंवर होता…मग त्यांनी त्याच अवस्थेत तिला मारहाण करून घरी पाठवून दिली…त्यानंतर बरेच दिवस शकू ताई त्या धक्यातून सावरल्या नाहीत…त्यांना आता त्यांच्या सासरी जायचं नव्हतं…
संजयच्या बाबांना बहिणीची ही अवस्था बघवली गेली नाही…त्यांना माहिती होते की शकूताई पुन्हा त्या घरी गेली तर ते तिला खूप जास्त त्रास देतील…म्हणून त्यांनीही शकूताईंचा निर्णयाला पाठिंबा दिला…त्यानंतर शकू ताईंना दुसऱ्या लग्नासाठी खूप विनवले पण त्या तयार झाल्या नाहीत…त्यांनी संजय आणि सुलभाला अगदी स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले…माझ्या मुलांना माझ्यापेक्षाही जास्त जीव लावला…लाड केले…” सासुबाई म्हणाल्या.
” मला खरंच हे सगळं माहिती नव्हतं आई…मला त्या मुलाला सांभाळण्या बाबत खूप बोलायच्या म्हणून मला त्यांचा राग यायचा…” शालू अतीव पश्चात्तापाने म्हणाली.
” त्यांनी संजयला विहिरीत पडताना पाहिल्यामुळे आणि स्वतःच मूल पोटातच गमावल्यामुळे त्यांच्या मनात एका प्रकारची भीती घर करून बसली आहे…म्हणून त्या तुला मुलाला जपायला सांगतात…आणि यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही…” सासुबाई म्हणाल्या.
त्यासरशी शालूला आपली चूक उमगली. शकू आत्याचा सगळं चांगुलपणा आता तिला आठवायला लागला. तिला खूप पश्चात्ताप झाला. ती तशीच शकू आत्याच्या खोलीकडे गेली. आणि लगेच जाऊन आत्याच्या गळ्यात पडली आणि तिला रडू आले. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून शकू आत्याचा राग क्षणात ओसरला.
त्यांनी तिला जवळ घेतले. आणि डोळ्यातील पाणी पुसले. न बोलताच दोघींना एकमेकींच्या मनातले कळून चुकले आणि त्या दोघींचा समेट घडलेला पाहून शालूच्या सासूबाईंच्या मनाला समाधान वाटले.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.