अमृताच्या लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करून घरी यायला सगळ्यांना बराच उशीर झाला होता. सगळेच थकलेले होते. पण शरीराने. ह्या सगळ्यांपासून वेगळी अमृता मनाने थकली होती. ती खूप उदास होती. घरात लग्नाच्या जोरदार तयारी चाललेल्या होत्या.
पण ही मात्र मनाने कुठेतरी दूर हरवलेली होती. हिला काहीच करायची इच्छा नव्हती. तिला राहून राहून वाटत होते की हे लग्न केल्यापेक्षा मेलेले बरे. पण एक मुलगी म्हणून आपल्या आई वडिलांना ती इतके मोठे दुःख देऊ इच्छित नव्हती. त्यांनी खूप लाडात वाढवले होते तिला. थकलेल्या डोळ्यांनी दाराकडे शून्यात नजर लावून बघताना तिला तो दिवस आठवला जेव्हा अनिकेत तिला मागणी घालायला घरी आला होता.
त्यादिवशी अमृताच्या हृदयाची धडधड वाढतच होती. राहून राहून लक्ष बाहेरच्या गेट वर जात होतं. कशीबशी घरच्यांसमोर ती नॉर्मल वागायचा प्रयत्न करत होती. इतक्यात गेटचा आवाज झाला आणि तिच्या हृदयाची धडधड जास्तच वाढली. तिने जाऊन दरवाजा उघडला आणि समोर अनिकेतला पाहून आनंद आणि भीती असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर दाटून आले. अनिकेत आत आला आणि समोरच सोफ्यावर बसलेल्या अमृताच्या वडिलांना जाऊन त्याने नमस्कार केला. अमृताचे वडील त्याला म्हणाले.
” तू अनिकेत आहेस ना…अमृताच्या शाळेतील मित्र…”
” हो काका…मी अनिकेत…” अनिकेत उत्तरला.
” ये बैस…” अमृताचे वडील त्याला प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाले. “आज खूप दिवसांनी आलास…”
” हो…तुमच्याशी जरा बोलायचं होतं…” अनिकेत म्हणाला.
” बोल…” अमृताचे वडील म्हणाले.
” काका…माझं अमृतावर खूप प्रेम आहे…आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे…मी तुमच्याजवळ अमृताला मागणी घालायला आलो आहे…” अनिकेत म्हणाला.
तसे अमृताचे बाबा रागातच उठले. आणि त्याला म्हणाले.
” काय करतोस तू…घरचे काय करतात तुझे…आमच्याशी बरोबरी करू शकणार का…?”
” हो काका…मला नुकतीच सरकारी नोकरी लागलीय…माझ्या घरचे शेती करतात…आमचं सगळं कुटुंब गावीच राहते…” अनिकेत म्हणाला.
” तुला माहिती आहे मी कोण आहे… क्लास टू ऑफिसर होतो मी…घरी भरपूर शेती आहे…स्वतःचा कारखाना आहे…आणि हे सगळं फक्त माझ्या दोन मुलींचच आहे…आणि माझ्या मुलींसाठी मला आमच्या तोलामोलाचा मुलगा हवाय…तुझ्यासारखा तुटपुंज्या पगारात घर चालवणारा नाही…तू काय माझ्या मुलीला खुश ठेवणार आहेस…” अमृताचे वडील रागातच म्हणाले.
अमृताचे वडील आढेवेढे घेतील असे अनिकेतला आणि अमृतालाही वाटत होते. पण ते ह्या कारणासाठी नकार देतील असे त्या दोघांनाही वाटले नव्हते. त्यांच्या नकाराने दोघेही मनातून घाबरले.
” माझं प्रेम आहे तिच्यावर काका…आणि मी खूप खूष ठेवेन तिला…तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही…” अनिकेत हात जोडत म्हणाला.
मध्येच अमृता देखील म्हणाली.
” तो खरं बोलतोय बाबा…तो खूप चांगला आहे…आणि माझी खूप काळजी घेईल…”
अमृताने असे म्हणताच तिच्या बाबांनी तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले.
” म्हणजे…तू पण…?”
” हो बाबा…माझं सुद्धा अनिकेतवर खूप प्रेम आहे…शाळेत असल्यापासूनच…केवळ मला सुखी ठेवायचं म्हणून अनेक वर्ष अभ्यास केलाय बाबा त्याने…आणि आता चांगली नोकरी मिळाल्यावरच तो तुमच्याकडे आलाय बाबा…खरंच अनिकेत खूप चांगला आहे…” अमृता म्हणाली.
” तुला काय कळतंय…तुला दुनियादारी माहीत नाही अजुन…तुझ्या बापाजवळचा पैसा पाहून ह्याने तुला जाळ्यात अडकवलय…तुझ्यासाठी अनेक चांगली आणि गर्भश्रीमंत स्थळ आली आजवर…पण फक्त तुला पुढे शिकायचं म्हणून मी नकार देत आलोय…पण मी दिलेल्या स्वातंत्र्याचा तू दुरुपयोग केलास…पण यापुढे नाही…यापुढे या मुलाशी तू कोणताही संबंध ठेवायचा नाहीस…” अमृताचे वडील म्हणाले.
” पण बाबा…अनिकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे…मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय…मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे…” अमृता म्हणाली.
” तसा विचार जरी केलास माझं मेलेलं तोंड पाहशील…तुला माझ्यात आणि ह्याच्यात एकाची निवड करावी लागेल…” अमृता चे बाबा तिला म्हणाले.
त्यानंतर अनिकेत आणि अमृता दोघेही त्यांना विनवणी करत राहिले. पण त्यांनी दोघांचेही काहीही न ऐकुन घेता अनिकेतला घराबाहेर काढले आणि अमृताला स्वतःच्या शपथा देऊन गप्प बसायला सांगितले.
अमृता आणि अनिकेत लहानपणी पासूनचे मित्र. मोठे होत असताना कधी प्रेमात पडले त्यांचं त्यांना सुद्धा नाही कळलं. पण जेव्हापासून प्रेमात पडले तेव्हापासून दोघांनीही ठरवले होते की आधी करिअर कडे लक्ष द्यायचे.
दोघांनाही जसजशी समज येऊ लागली होती तसतशी ही जाणीव सुद्धा होऊ लागली होती की त्यांच्या परिस्थिती तील विषमता भविष्यात त्यांच्या लग्नाच्या आड येऊ शकते म्हणून. आणि म्हणूनच अनिकेतने त्याच्या अभ्यासावर सगळे लक्ष केंद्रित केले. त्याला अमृताला गमवायचे नव्हते.
त्याने रात्र रात्र जागून अभ्यास केला. ज्यावेळी त्याचे मित्र मिळून पार्टी करायचे, मजा करायचे तेव्हा अनिकेत अभ्यासात असायचा. आणि त्याच्या मेहनतीची जाणिव अमृताला होती. म्हणूनच तिने सुद्धा तिच्या परीने त्याला साथ दिली. इतर प्रेमीयुगुलांसारखे सतत एकमेकांसोबत न राहता एकमेकांसाठी राहिले. दोघांनीही एकमेकांना समजून घेतले.
आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणून अनिकेत चांगल्या नोकरीवर लागला होता. म्हणूनच तो अमृताच्या वडिलांना भेटायला गेला होता. पण अमृताच्या वडिलांनी दोघांचे प्रेम सपशेल नाकारले होते. त्यांच्या मते अनिकेत त्यांच्या बरोबरीचा नव्हता. त्याने फक्त त्यांची संपत्ती पाहून अमृताला प्रेमाच्या जाळ्यात ओढले असेच त्यांना वाटले होते.
त्यांनी अमृताला अनेक प्रकारे समजावून सांगितले. प्रसंगी हात सुद्धा उचलला. तरीही अमृता अनिकेत शिवाय इतर कुणाशीही लग्नाला तयार होत नव्हती म्हणून मग तिच्या बाबांनी धमकीच दिली की अमृता त्यांच्या मनाविरुद्ध वागली तर ते आत्महत्या करतील. त्यांच्या या धमकीने अमृता मनातून घाबरली.
कारण ती तिच्या बाबांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखायची. त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मान होता. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते.
सुरुवातीला अमृताला वाटले होते की आपण हट्ट केला तर बाबा आपलं ऐकतील. पण तिच्या बाबांचे हे निर्वाणीचे बोल ऐकुन तिच्या मनातली आशा संपली.
म्हणून मग तिनेही एक टोकाचा निर्णय घेतला. अनिकेत सोबत पळून जाण्याचा. पण अनिकेतशी बोलणं सुद्धा कठीण झाले होते तिच्यासाठी. कारण बाबांनी तिचा फोन काढून घेतला होता. नेमकं काय करावं ह्या काळजीत असताना त्याच दिवशी अमृताची एक मैत्रीण तिला भेटायला तिच्या घरी आली आणि अमृताला आशेचा किरण दिसून आला.
नेमके त्याच वेळी तिचे बाबा घरी नव्हते. आणि आईने तिच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या भेटीला जास्त गंभीरतेने घेतले नव्हते. तिकडे आई किचन मध्ये काम करत असल्याचे पाहून अमृताने तिच्या मैत्रिणीच्या फोन मधून अनिकेतला कॉल केला.
अमृताचा आवाज ऐकून अनिकेत ला सुद्धा आनंद झाला.
एकमेकांची ख्यालखुशाली विचारल्यावर अमृता ने सरळ विषयालाच हात घातला. ती म्हणाली.
” बाबा आपल्या लग्नाला कधीच होकार देणार नाही…ते मला जीव देण्याची धमकी देत आहेत…ते आता काहीच ऐकणार नाही…त्यापेक्षा आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं तर…”
” मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो अमृता…पण मी असे नाही करू शकत…” अनिकेत म्हणाला.
” अरे पण का…का नाही करू शकत…?” अमृता ने चिडून विचारले.
” कारण मी तुला जितका ओळखतो त्यावरून मी एकच सांगू शकतो की असे पळून जाऊन लग्न केल्याने तू आता तर खुश राहू शकली तरी पुढे तुला आयुष्यभर तुझ्या वडिलांना दुखावल्याचे शल्य टोचत राहील…आणि जर तुझ्या वडिलांनी खरंच जिवाचं काही बरं वाईट केलं तर तू स्वतःला आयुष्यभर कधीच माफ करू शकणार नाहीस…” हे बोलताना अनिकेतला अतीव दुःख होत होते.
अनिकेतने हे बोलताच अमृताला आपण काय करत आहोत ह्याची जाणीव झाली. अनिकेत बरोबरच बोलत होता. आज पळून जाऊन लग्न केलं तरीही आयुष्यभर बाबांसाठी वाईट वाटलं असतं. कारण बाबा जे म्हणतायत ते त्यांनी कदाचित करूनही दाखवलं असतं.
आता जरी तिच्या बाबांनी तिचं काहीच ऐकून घेतलेलं नाही तरीही आजवर त्यांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलेली होती. त्यांना मुलगा नव्हता पण त्यांनी ह्या दोघींना त्या गोष्टीची साधी जाणीव सुद्धा होऊ दिलेली नव्हती. आता त्यांची काही स्वतःची मते होती.
आणि अमृता आणि तिच्या बाबांची मते आणि विचार आता जुळत नसले तरीही तिचं बाबांवर आणि बाबांचं तिच्यावर खुप प्रेम होतं. आणि त्याच प्रेमासाठी ती सगळं काही विसरायला तयार झाली होती. काळजावर दगड ठेवून तिने बाबांना त्यांच्या मर्जीने लग्न करण्यासाठी होकार दिला.
अनिकेत आणि अमृता दोघेही खूप जास्त दुःखी होते पण अमृताच्या बाबांसाठी दोघांनीही आपल्या प्रेमाची आहुती दिली होती. दुसऱ्याशी लग्न करायला अमृताने होकार जरी दिलेला असला तरी अनिकेतला ती अजिबातच विसरलेली नव्हती. आणि जसजसा दुरावा वाढत होता तसतशी आठवण आणखीनच गहिरी होत चालली होती.
क्रमशः
रंग माळीयेला – भाग २(अंतिम भाग)