- ऋषिकेश ऑफिस साठी निघणार इतक्यातच त्याच्या आईने त्याला हाक मारली आणि म्हणाली.
” ऋषी…सुशांत च्या लग्नाला आता फक्त 10-12 दिवस उरलेत…आणि तू अजूनही ऑफिसमधून सुट्टी घेतलेली नाही…”
” अगं पण आई अजुन बराच वेळ आहे…लग्नाला चार पाच दिवस राहिले की घेईल सुट्टी…तसेही लग्नाची तयारी तर बऱ्यापैकी झालेली आहे…तू आणि मीनल स्वतः सगळ्या तयारी करत आहात…शिवाय बाबा सुद्धा सगळ्या गोष्टीत जातीने लक्ष देत आहेत…” ऋषी म्हणाला.
” ते होईल रे…पण मला ना कुठल्याच गोष्टीत काहीच कमी ठेवायची नाहीय…सगळं काही परफेक्टच असायला हवं…म्हणून तू सुद्धा लवकरच सुट्टी घे…”
आई म्हणाली.
ऋषी नुसता मानेनेच हो म्हणाला आणि ऑफिसला जायला निघाला. इतक्यात मीनलने धावतपळत त्याच्यासाठी जेवणाचा डबा आणून दिला. तिला पाहून ऋषी म्हणाला.
” अगं सावकाश…दिवसरात्र काम करते आहेस…थोडा आराम पण करत जा…नाहीतर उगाच आजारी पडशील…”
” त्यात काय हो एवढं…आपल्या सुशांत भाऊजीच लग्न म्हटल्यावर एवढं तर करायलाच हवं ना…सगळं कसं एकदम छान व्हायला हवं…” मीनल हसून म्हणाली.
ऋषीने टिफीन घेतला आणि ऑफिसला निघाला. पण मनात मात्र विचार सुरूच होता. सुशांतच्या लग्नासाठी सगळे जण किती एक्साईट आहेत. अगदी एकेका समारंभासाठी खूप मेहनत घेतली जात आहे. त्याला ते दिवस आठवले जेव्हा त्याने घरात त्याच्या आणि मीनल विषयी सांगितले होते. त्यावेळी घरातल्या सगळ्यांनी ह्या दोघांच्या लग्नाला कडाडून विरोध केला होता.
अनेक दिवस घरच्यांना मनवून पाहिले. पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी ऋषीने घरच्यांना निक्षून सांगितले की आमच्या लग्नाला नाही म्हटलं तर आणि कोर्टात जाऊन लग्न करून येऊ. तेव्हा कुठे नाईलाजाने ऋषीच्या घरच्यांनी दोघांचे साध्या पद्धतीने लग्न लावून दिले होते. मीनल या घरची सून तर झाली पण तिला कधीच घरच्यांनी मनापासून स्वीकारले नाही.
मीनल दिवसरात्र घरातील काम करायची. मीनल घरात आल्यापासून तिच्या सासूबाईंनी कामवाल्या मावशींना कायमची सुट्टी दिली होती. मीनल हसून सगळ्यांसाठी राब राब राबायची. दिवसभर सासूच्या मागेपुढे आई आई करून फिरायची. पण सासुबाई मात्र कधीच तिच्यावर खुश झाल्या नाहीत. तरीही आजवर कधीच मीनलने या बाबतीत ऋषिकडे तक्रार केली नव्हती.
सासुबाई तर नेहमीच तिला सुनावत राहायच्या की तिच्या
बापाने चांगला मुलगा पाहून ही धोंड त्यांच्या गळ्यात बांधून
दिली म्हणून. ऋषीला बऱ्याचदा आईच्या बोलण्याचा राग
यायचा पण पण मीनल त्याला शांत राहायला सांगायची. आपलं आणि ऋषीचं लग्न झालंय आणि दोघेही सोबत आहोत या एका गोष्टीवर मीनल खूप समाधानी होती. तिला खुश राहायला एवढंच कारण पुरेसं होतं.
ऋषिला आठवत होते की आई नेहमीच मीनलचा पाहुण्यांसमोर अपमान करते. हिने माझ्या मुलाला प्रेमात फसवले आणि या घरची सून झाली हे तर तिच्या रोजच्या वापरातील वाक्य झालेलं. पण जेव्हा सुशांतने त्याच्या आणि सायलीच्या प्रेमप्रकरणाबद्दल घरी सांगितलं तेव्हा त्यांच्या लग्नाला कुणीच विरोध केला नाही.
उलट आई बाबा स्वतःहून सायली च्या घरी गेले आणि तिला लग्नाची मागणी घातली. सुशांतचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर होत आहे ह्याचा ऋषीला खूप आनंद होता पण आईबाबांच्या वागण्यातला फरक पाहून त्याला आश्चर्य सुद्धा होत होते. आई बाबा प्रेम विवाहाच्या विरोधात नाहीत तर मग त्यांनी अजूनपर्यंत मीनलला का स्वीकारले नाहीत हा प्रश्न त्याला राहून राहून सतावत होता.
पण तो काहीही बोलला नाही. लग्नाला पाच – सहा दिवस राहिले असतील तेव्हा त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मीनल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत होती. सासूबाईंच्या सुचने प्रमाणे सगळं करायची. लग्नातील सगळेच समारंभ अगदीच धूमधडाक्यात झाले. लग्न सुद्धा थाटामाटात पार पडले.
सायली लहान सूनबाई म्हणून घरी आली. सासूबाईंनी तिचे स्वागत मोठे धूमधडाक्यात केले. तिने घरी आल्यावर सगळ्यांना नमस्कार केला. आणि ती मीनल जवळ जाऊन तिला नमस्कार करणार इतक्यात सासुबाई म्हणाल्या.
” तिला नमस्कार करायची काही गरज नाही…एवढे काही मोठे काम केलेले नाहीत तिने आयुष्यात…”
हे ऐकून सगळेच नातेवाईक मीनलकडे उपहासाने पाहू लागले. मीनल तिथेच एका जागी अवघडून उभी होती. ऋषीला मात्र आता सहन झाले नाही. तो आईला म्हणाला.
” का आई…? मीनलला का नाही करायचा नमस्कार…?…आणखी काय करणे अपेक्षित आहे तुला…”
ऋषी असे काही बोलेल असे त्याच्या आईला अजिबात वाटले नव्हते. मीनलने ऋषीला डोळ्यांनीच काहीही न बोलण्याची विनंती केली. आणि तिची आर्जवी नजर पाहून ऋषी तेवढ्यापुरता गप्प बसला. पण सगळं काही आटोपल्यावर तो आईच्या खोलीत गेला आणि आईला म्हणाला.
” आई…मीनलने काय नाही केले ग आपल्या घरासाठी…दिवसरात्र न थकता काम करते…तुझा एकही शब्द खाली पडू देत नाही.. कधीही कुठलीही तक्रार करत नाही…लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या केल्या तिने…तरीही तू सतत सगळ्यांसमोर तिला घालून पाडून बोलत असतेस…असे का करतेस तू आई…?”
” अच्छा…बायकोने चांगलंच शिकवलंय तुला बोलायला…खाली मुंडी अन् पाताळधुंडी कुठली…माझ्याविरोधात कान भरलेत माझ्या मुलाचे…” सासुबाई फणकाऱ्याने बोलल्या.
” तिने मला काहीच सांगितलं नाही आई…इतक्या दिवसांपासून मी स्वतःच बघतोय ना…आजही तू सगळ्या नातेवाईकांसमोर आणि नव्या नवरी समोर तिला अशी वागणूक दिलीस…आज तू अशी वागली तर उद्या सायली सुद्धा तिला मान देणार नाही…” ऋषी कळवळून बोलत होता.
” आणखी कोणता मान हवाय तिला अजून…सून करून घेतलं तेवढं पुरेसं नाही का तिला…?” सासुबाई म्हणाल्या.
” पण तू तिला कधीच या घराची सून म्हणून मनापासून स्वीकारलं नाहीस…आज मला जाणून घ्यायचंय ह्याचं कारण…तू म्हणाली होतीस की तुला प्रेमविवाह मान्य नाही…आणि मी आतापर्यंत समजत होतो की आम्ही प्रेमविवाह केला म्हणून तू तिला आजवर स्वीकारू शकली नाहीस…पण सुशांतने सुद्धा प्रेम विवाह केलाय ना…तू तर त्याला अजिबात विरोध केला नाहीस…खुल्या मनाने स्वीकारले तू त्यांना…स्वतः जाऊन सायलीला लग्नाची मागणी घालून आलीस…मग आजवर मीनलला का नाही स्वीकारू शकलीस…?” ऋषीने शेवटी आईला कारण विचारलेच.
” मीनल आणि सायलीची बरोबरी होऊच शकत नाही…कुठे सायली श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी…आज कुठे ती मीनल गरीबा घरची चार बहिणीनं पैकी एक…इतकं चांगलं लग्न करायची तिच्या बापाची लायकी तरी होती का…म्हणून फसवलं त्यांनी तुला…तू तर तिच्या नादी लागून चुकलास…पण सुशांतने मात्र चांगल्या घरातील मुलगी पसंत केली…म्हणून त्या दोघींची बरोबरी शक्य नाही…”
आईचे बोलणे ऐकून ऋषी थक्क झाला. त्याला आजवर वाटत होतं की आईला प्रेम विवाह मान्य नाही म्हणून आईने मीनलचा स्वीकार केलेला नाही. पण आज त्याला नव्याने कळले होते की आईच्या नाराजी मागचे कारण प्रेमविवाह नसून मीनलचे गरीब घरातील मुलगी असणे होते. आई असा विचार करते हे ऐकून ऋषीला धक्काच बसला. तो आईला म्हणाला.
” म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यांनी प्रेम करू नये का आई…आणि चांगलं आणि वाईट हे यावरून कसं ठरेल…फक्त तिचे वडील श्रीमंत नाही या एका निकषावरून तिच्या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे का…आणि आपल्या घरी सगळं काही असताना आपण का या गोष्टीचा विचार करावा…”
” कारण समाजात आपलं काहीतरी स्टेटस असतं…आणि त्यानुसार नातेसंबंध जोडले तरच ते मान्य होतात…”
” आणि प्रेम आणि चांगुलपणा… त्याचं काहीच मोल नसतं का…?”
” ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या वाटतात…खऱ्या आयुष्यात नाही…”
ऋषीने आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण आई मात्र आपल्या विचारांवर ठाम होती. आणि त्यावरून आई मीनलचा कधीच मनापासून स्वीकार करू शकणार नाही ह्याची जाणीव ऋषीला झाली. मीनलला आईने का स्वीकारले नाही ह्याचे खरे कारण जर मीनलला समजले तर तिला खूप वाईट वाटेल म्हणून ऋषीने मीनलला हे कधीच सांगितले नाही.
सायली घरी आल्यापासून आई दिवसरात्र तिची स्तुती करायची. घरातील सगळी कामे मीनल करायची आणि सासुबाई पाहुण्यांसमोर सगळं क्रेडिट सायलीला द्यायच्या. घरात काही चांगलं झालं की सायलीचा पायगुण आहे असे म्हणायच्या आणि वाईट घडलं की मीनल चा पायगुण आहे असे म्हणायच्या.
सासूबाईंच्या या वागण्यामुळे आता सायली सुद्धा मीनलशी नीट बोलत नव्हती. आईचे मीनल बाबत असलेले मत कधीच बदलणार नाही हे ओळखून ऋषीने मीनल सोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आणि स्वतःची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली.
त्यानंतर मीनल आणि ऋषी दोघेही दुसरी कडे राहायला गेले. मीनलच्या चांगुलपणाची जाणिव न झालेल्या ऋषीच्या आईला आधी मीनलच्या दूर जाण्याने काही फरक पडला नव्हता पण मीनल गेल्यावर त्यांना तिची किंमत कळून चुकली होती. सायली सुद्धा आता घराच्या कामांमध्ये लक्ष द्यायची नाही. शेवटी घरकामासाठी आधी येणाऱ्या मावशींना पुन्हा बोलवावे लागले.
पण त्या कामांमध्ये मायेचा ओलावा अजिबात नव्हता. सुखदुःखात साथ देणाऱ्या मीनल ची अवहेलना केल्याबद्दल आता सासूबाईंना मनापासून वाईट वाटत होते. आणि त्यांनी तसे ऋषी जवळ कबूल सुद्धा केले. पण ही जाणीव व्हायला देखील खूप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत मीनल दुसरीकडे राहायला निघून गेली होती. पण जेव्हा जेव्हा मीनल आणि ऋषी सुट्ट्यांमध्ये घरी यायचे तेव्हा तेव्हा सासुबाई मीनलचा लाड करायच्या. सासूबाईंचा बदललेला स्वभाव पाहून मीनल ला खूप आनंद झाला होता. ऋषी मात्र त्याच्या वेगळं राहण्याच्या निर्णयावर समाधानी होता. कारण त्यामुळेच त्याच्या आईला मीनलची किंमत समजली होती.
समाप्त.
®®आरती निलेश खरबडकार
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
Nice story 👌