” अगं अबोली मी काय जीजूंना ना ओळखत नसेल का…? मी त्यांना पाहिलंय म्हणूनच तुला सांगायला आली असेल ना…” प्रीती म्हणाली.
” अगं पण असं कसं होऊ शकतं…?” अबोलीच्या बोलण्यातून आता काळजी झळकत होती.
” असेच आहे बघ…” प्रीती म्हणाली.
” पण मग ते माझ्याशी खोटे बोलत असतील का…?” अबोली स्वतःशीच विचार करत म्हणाली.
” हो.. निदान मलातरी त्यात काहीच शंका नाही…” प्रीती म्हणाली.
” पण असे का करतील ते..?” अबोली ने विचारले.
” कारण त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण सुद्धा आहे तिथे…” प्रीती म्हणाली.
” बस कर आता…काहीपण नकोस बोलू…माझ्या नवर्यावर विश्वास आहे माझा…” अबोली म्हणाली.
” पण मी हे सिद्ध करू शकते…” प्रीती म्हणाली.
” खोटं बोलतेयस तू…अरुण असे कधीच नाही वागू शकत…” अबोली प्रीती सोबतच स्वतःलाही समजावत म्हणाली.
” तर मग चल माझ्यासोबत…मी स्वतःच दाखवते तुला खरं काय अन् खोटं काय ते…सांग आहेस का तयार…” प्रीतीने विचारले.
” हो…मी यायला तयार आहे…पण तुला खोटं आणि ह्यांना खरं सिद्ध करायला…पण जेव्हा माझी खात्री पटेल ते अरुण नाहीयेत त्यानंतर मात्र मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही..” अबोली म्हणाली.
” ठीक आहे…मी सुद्धा तयार आहे…” प्रीती म्हणाली.
आणि दोघीही प्रीतीने सांगितलेल्या फार्महाऊस वर जायला निघाल्या. अबोली प्रीती सोबत आली तर खरी पण क्षणाक्षणाला तिच्या हृदयाची धडधड वाढतच होती. पण ती स्वतःला समजावत होती. अरुण वर आपला विश्वास आहे हे स्वतःच्या मनाला समजावत होती. शिवाय अरुण चे प्रितीबद्दलचे बोलणे आठवून प्रीतीचा रागही येत होता.
थोड्या वेळाने शेवटी त्या दोघीही त्या फार्महाऊस कम हॉटेलमध्ये वर पोहचल्या. सर्वात आधी रिसेप्शनिस्ट ला गाठून प्रीतीने तिला विचारले.
” इथे कुणी अरुण कदम नावाचे व्यक्ती थांबले आहेत का…?”
रिसेप्शनिस्टने तिचे रजिस्टर चेक केले आणि म्हणाली.
” नाही मॅम…इथे अरुण कदम म्हणून कुणीही चेक इन केलेले नाही…शिवाय अरुण या नावाने सुद्धा कुठलीच बुकिंग नाहीये…”
रिसेप्शनिस्ट चे बोलणे ऐकुन अबोलीचा जीव भांड्यात पडला आणि लगेच त्या क्षणाला प्रीती वर असलेला राग उफाळून आला. प्रीती काही बोलणार तितक्यात अबोली ने तिचा हात हातात घेतला आणि अक्षरशः तिला खेचतच बाहेर आणले आणि जोरात तिला म्हणाली.
” काय ग… काय चालवले आहेस हे…वारंवार माझ्या मनात अरुण बद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेस…अगं बहिण आहेस ना तू माझी…पण कुणी शत्रूही वागणार नाही असे का वागत आहेस माझ्याशी…कुठल्या जन्माचा बदला घेत आहेस…?”
” अगं मी खरं बोलतेय…मी त्यांना इथेच पाहिले होते…” प्रीती जीव तोडून सांगत होती.
” माझंच चुकलं…तुझं ऐकून मी इथवर यायलाच नको होतं…तुझ्यामुळे माझ्या नवऱ्यावर अविश्वास ठेवल्यासारखे केले मी….तरीही त्यांनी मला तुझ्याबद्दल सावध केलं होतं तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला…ह्यानंतर कधीच मला स्वतःच तोंड दाखवू नकोस…” अबोली म्हणाली.
आणि तिथून तणतणत निघून गेली.
या घटनेला दीड वर्ष उलटलं पण अबोली प्रितीशी एका शब्दानेही बोलत नव्हती. अरुण मात्र प्रीती आणि प्रशांत सोबत आधी प्रमाणेच बोलत होता. अबोलीने त्याला अनेकदा बजावून सांगितले होते की प्रीती आपल्यात भांडणे लावू पाहतेय. तुम्ही तिच्याशी बोलत नका जाऊ म्हणून. पण अरुण मात्र त्यांच्याशी चांगलेच बोलायचा. जाऊन येऊन असायचा. अबोलीला सुद्धा समजवायचा की मनात राग धरून नकोस ठेवू.
पण अबोलीच्या मनात मात्र राग अजूनही धुमसत होता. तिच्या मते प्रीती तिचा संसार मोडायचा प्रयत्न करत होती. एखाद्या कार्यक्रमात दोघी भेटायच्या. प्रीती तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायची पण काहीच फायदा व्हायचा नाही. मग प्रीतीने सुद्धा जास्त प्रयत्न करणे सोडून दिले.
अबोलीला सगळं काही आठवत होतं. गाडीत बसल्यावर तिच्या मनात नुसते तेच विचार घोळत होते. इकडे अरुणला सुद्धा त्या दिवशीचा घटनाक्रम आठवत होता.
त्या दिवशी प्रीती तिथेच उभी राहून तिला पाहत बसली होती. असं कसं होऊ शकतं हे तिचं तिलाही कळत नव्हतं. कारण तिने स्वतःच्या डोळ्यांनी अरुणला तिथे पाहिले होते. अबोलीचे बोलणे ऐकुन ती खूप दुखावल्या गेली होती. ती तिथेच एका खुर्चीवर बसून राहिली. नंतर अचानक तिला काय सुचले देव जाणे. ती एकदमच उठली आणि पुन्हा त्या रिसेप्शनिस्ट जवळ गेली. तिच्या फोन मधून अरुणचा फोटो शोधून काढला आणि तो फोटो तिला दाखवत म्हणाली.
” मला सांगा…हे फोटोत जे व्यक्ती आहेत ते इथेच थांबले आहेत का…?”
रिसेप्शनिस्ट ने ती फोटो नीट पाहिला आणि म्हणाली.
” हो…हे इथेच आहेत…सोबत त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत…”
” काय…?” प्रीती जवळजवळ किंचाळलीच.
त्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं. ते पाहून प्रीती एका बाजूला जाऊन बसली. प्रीती चा विश्र्वासच बसत नव्हता की अरुण असा वागू शकतो म्हणून. नेमकं काय करावं आणि काय नाही ते तिला कळत नव्हतं. आणि तितक्यात समोरून अरुण त्या मुलीसोबत बाहेर जात असताना तिला दिसला.
ती लगेच अरुणच्या समोर आली. अरुण तिला पाहून आधी ते घाबरलाच. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना ही प्रीती अचानक इथे काही आली ते त्याला कळतच नव्हतं. तो प्रीतीला म्हणाला.
” तू इथे कशी काय…?”
” हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा ना…” प्रीती म्हणाली.
” मी…मी…मी…” नेमकं काय बोलावं ते अरुणला सुचत नव्हतं.
” सांगा ना…की अबोलीला विचारू…?” प्रीती म्हणाली.
” नको…तिला नकोस सांगू प्लिज…” अरुण गयावया करत म्हणाला.
” आता काय झालं…ह्या सगळ्यांचा विचार तुम्ही आधी करायला हवा होता…” प्रीती म्हणाली.
आता मात्र अरुण काहीच बोलला नाही. प्रीती पुढे म्हणाली.
” मुळात तुमचं लग्न झालेलं असताना तुम्ही असे दुसऱ्या बाईवर कसं काय प्रेम करू शकता…?” प्रीती ने विचारले.
इतक्यात अरुण सोबत असलेली मुलगी त्याला म्हणाली.
” हे सगळं काय सुरू आहे…आणि ही कोण आहे…?”
” तू प्लिज हा सगळ्यात नकोस पडू…हा माझ्या संसाराचा प्रश्न आहे…तू जा इथून…मला प्रितिशी बोलायचंय…” अरुण तिला म्हणाला.
हे ऐकून ती बाई रागाने तिथून निघून गेली. अरुण प्रीतीला म्हणाला.
” हे बघ प्रीती…मी तुला सविस्तर सांगतो…”
” अजूनही सविस्तर सांगायला काही आहे का तुमच्याकडे जीजू…?” प्रीतीने रागाने विचारले.
” ऐक ना…मीना फक्त माझी कलिग आहे…ती सुद्धा विवाहित आहे…माझं तिच्यावर किंवा तिचं माझ्यावर प्रेम वगैरे नाहीये…आम्ही फक्त टाईमपास म्हणून आपापल्या घरून कॉन्फरन्सचा बहाणा करून घरून इथे आलोय…दोन दिवस सोबत राहायला…” अरुण म्हणाला.
” हा कसला टाईमपास आहे…तुम्ही अक्षरशः आपापल्या जोडीदारांना फसवताय…आणि तुमच्या जागी अबोलीने असला टाईमपास केला असता तर चालला असता का तुम्हाला…?” प्रीती मुद्देसूद बोलली.
आता मात्र अरुण शरमेने मान खाली घालून उभा होता. प्रीती पुढे म्हणाली.
” अबोलीला हे समजलं तर तिची काय अवस्था होईल ते माहिती आहे ना…तिच्या मनाचा कधी विचार केलात का तुम्ही…मी तिला खूप चांगली ओळखते…खूप हळवी आहे ती…तिचा विश्वास तुटला तर ती एक क्षण सुद्धा तुमच्यासोबत राहणार नाही…” प्रीती म्हणाली.
” माझी चूक झाली…माझं प्रितीवर खरंच प्रेम आहे…प्रितिवाचून राहण्याचा मी विचारही करू शकत नाही…पण मी वाहवत गेलो…माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही…पण प्लिज तू अबोलीला काहीच सांगू नकोस…” अरुण म्हणाला.
त्यानंतर प्रीतीने सुद्धा याचा खूप विचार केला. अरुणला जर एक संधी दिली तर तो आपली चूक दुरुस्त करेन आणि अबोलीचा संसार सुद्धा वाचेल. पण अबोलीला हे सगळं कळलं तर मात्र ती एक क्षणही अरुण सोबत राहणार नाही हे तिला ठाऊक होते. म्हणून तिने हे सगळे अबोलीला सांगायचे नाही असे ठरवले. शिवाय अरुणने जर आपली चूक सुधारली नाही तर आपण अबोलीला विश्वासात घेऊन सगळं सांगू असे तिने ठरवले.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार
कथेचा दुसरा भाग यायला बराच विलंब झाल्याबद्दल क्षमस्व. कथेचा तिसरा लवकरच प्रकाशित होईल.