अरुण हात जोडत त्यांना म्हणाला. तेव्हा त्याचे दोन्ही हात हातात घेत अबोलीचे वडील म्हणाले.
” मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय अरुणराव…तुमच्या डोळ्यात मला पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता…तुमची चूक तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही ती सुधारली सुद्धा…शिवाय वेळेसोबत सगळं काही ठीक होतंच…पण अबोली काही ऐकायला तयार नाहीये म्हटल्यावर माझा सुद्धा नाईलाज झाला…तुम्हा दोघांना ही असं वेगळं झालेलं पाहून माझं मन किती तुटतय ते माझं मला माहित…पण मला अबोली वर माझे निर्णय लादायचे नाहीत म्हणून मी काहीच बोलू शकत नाही…”
” मला सगळं कळतंय बाबा…तुमची अन् अबोली दोघांचीही मनस्थिती कळतेय…म्हणूनच मला हे जास्त ताणून धरायचं नाहीये… मी अबोलीला तिच्या मनासारखं जगता यावं म्हणून डिव्होर्स साठी तयार झालो…पण माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे…” अरुण म्हणाला.
त्यासरशी अबोली च्या वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. अबोली तिथे जवळच बसलेली होती. पण बाबा आणि अरुण मधील संभाषण तिला ऐकू आले नाही. अबोलीला वाटले होते की आज निदान अरुण तरी येऊन तिला पुन्हा एकदा डिव्होर्स घ्यायचा नाही म्हणून समजावेल पण असे काहीच झाले नाही. अरुण आज तिच्याजवळ बोलायला आलाच नाही. इतक्यात ह्यांचा वकील आला आणि अबोलीला म्हणाला.
” पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला बोलवतील…तुम्ही तयार रहा…”
पण अबोली चे मात्र त्यांच्यावर जराही लक्ष नव्हते. तिचं सगळं लक्ष अरुणकडे होतं. मात्र अरुण ने आज तिच्याकडे पाहिले सुद्धा नव्हते. आता मात्र अबोली अस्वस्थ झाली. अबोली चे बाबा आणि भाऊ दुसरीकडे बोलत असताना अबोली मात्र अरुण कडे गेली. तिला आपल्या जवळ आलेलं पाहून तो गोंधळला. तो तिला म्हणाला.
” अबोली…काय झालंय…काही बोलायचं आहे का…?”
” हो…बोलायचं आहे मला…” अबोली मोठ्याने म्हणाली.
” अगं मग बोल की…”
अबोली ने त्याचा हात पकडला आणि त्याला कोर्टाच्या बाहेर घेऊन आली. पण नेमकं काय बोलावं हे तिलाही कळत नव्हते.
अबोली काहीच बोलत नाहीये हे पाहून तो तिला म्हणाला.
” लवकर सांग ना काय झालं…”
” का…कसली घाई आहे का…? की नवीन आयुष्याची सुरुवात करायची म्हणून उत्साहात आहात…?” अबोली रागाने म्हणाली.
” उत्साहात…अगं काय बोलतेस तू…?” अरुण गोंधळून म्हणाला.
” तेच जे घडतंय….” अबोली म्हणाली.
” तुला काय बोलायचंय ते मला काहीच कळत नाहीये…” अरुण म्हणाला.
” हाच तर प्रॉब्लेम आहे…काही कळतच नाही तुम्हाला…” अबोली पुन्हा रागाने म्हणाली.
” हे बघ अबोली…मला सांग काय झालंय…मला उगाच नको ते विचार येत आहेत…” अरुण अजूनही गोंधळलेलाच होता.
” नको ते विचार की हवेहवेसे विचार…” अबोली पुन्हा कोड्यात बोलली.
” कसले विचार…?” अरुण ने विचारले.
” दुसऱ्या लग्नाचे…” अबोली म्हणाली.
” अगं…काय बोलत आहेस तू…कुणी सांगितलं तुला…?” अरुण ने विचारले.
” कुणी का सांगो मला…पण मला कळलंय…सगळंच कळलय मला…” प्रीती नाक मुरडत म्हणाली.
” अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय अबोली…माझं फक्त अन् फक्त तुझ्यावर प्रेम आहे…” अरुण तिला समजावत म्हणाला.
” अच्छा…मग तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार तरी कसा केलात…?” अबोली ने विचारले.
” अगं मी नाही केलाय असा विचार….” अरुण स्पष्टीकरण देत म्हणाला.
” अच्छा…पण तुमच्या वागण्यावरून असं वाटतं नाहीये….” अबोली म्हणाली.
” म्हणजे…?” अरुण ने तिला प्रश्न केला.
” आज आपला डिव्होर्स होणार आहे…आजवर अनेकदा मला समजवायला आलात ना तुम्ही…मग आज का नाही आलात…कारण तुम्हाला सुद्धा डिव्होर्स हवाय…आयुष्याची नवीन सुरुवात त्या शिवाय कशी करू शकणार ना तुम्ही…” अबोली एका श्वासात बोलून गेली.
” नाही ग…मला खरंच हा डिव्होर्स नकोय…” अरुण काकुळतीला येत म्हणाला.
” मग मला तसं सांगितलं का नाही…” अबोली म्हणाली.
” आजवर अनेकदा सांगितलं पण तू तुझ्या निर्णयावर ठाम होतीस म्हणून नाही बोललो आज…” अरुण म्हणाला.
” का नाही बोललात आज…पुन्हा एकदा बोलायला काय जातं…का नाही समजावून सांगितलं मला….का मला मनवण्याचा प्रयत्न सोडून दिलात…” अबोली म्हणाली.
” मी तुला विनवले असते तर तू ऐकलं असतं का…?” अरुण च्या डोळ्यात आता वेगळीच चमक आली होती.
” तुम्ही साधा प्रयत्न सुद्धा नाही केलात आज…तुम्हाला कसे कळणार की मी ऐकलं असतं की नाही…” अबोली म्हणाली.
आणि तिथून रागारागाने जायला निघाली. अरुण तिला मागून म्हणाला.
” थांब अबोली…नको जाऊस…मला सोडून कुठेच नको जाऊस…या क्षणी सुद्धा तू मला हवी आहेस आणि संपूर्ण आयुष्यभर सुद्धा तू मला हवी आहेस…”
अरुणने असे म्हणताच अबोली धावतच त्याच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारली.
” मला सुद्धा तुम्ही हवे आहात…आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मला तुमची साथ पाहिजे…” अबोली म्हणाली.
” मी तुझ्या सोबतच आहे…अगदी तुझ्या जवळ नसलो तरी माझ्या मनात फक्त तुझाच विचार असतो अबोली…” अरुण म्हणाला.
” अच्छा…मग म्हणूनच माझ्यापासून एवढे दूर चालला होतात…?” अबोलीने नाराजीनेच विचारले.
” मी कुठे जाणार तुला सोडून…आणि तुला हे सगळं कुणी सांगितलं…” अरुण ने विचारले.
” कुणी म्हणजे काय…? प्रीती ने…” अबोली ने स्पष्टीकरण दिले.
” काय…? अगं पण मी कुठेच जाणार नव्हतो…” अरुण म्हणाला.
” काय… मग प्रीती ने असे का सांगितले असेल मला…” अबोली कोड्यात पडली.
दोघेही विचार करत असतात तेव्हा समोरून प्रीती चालत आली आणि म्हणाली….
” त्या शिवाय तुमचं पुनर्मिलन झालं नसतं अबोली बाईसाहेब…”
” म्हणजे…?” अबोलीने विचारले.
” म्हणजे मी तर फक्त एक प्रयत्न केला होता तुम्हाला एकत्र आणण्यासाठी…आणि जीजुंच्या दूर जाण्याच्या कल्पनेनेच तुझी काय अवस्था झाली ते पाहिलंस का…?” प्रीती म्हणी.
आता मात्र अबोली स्वतःशीच हसली. अरुणला सुद्धा सगळं काही लक्षात आलं. अबोली प्रीतीला म्हणाली.
” थँक्यू प्रीती…फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज मला माझी चूक समजली…नाहीतर आज मी अरुणला कायमचे गमावले असते…”
” तसे अजूनही वकील साहेब तुम्हा दोघांना शोधत आहेत…तुमचा काय विचार आहे ते ठरवा…” प्रीती मिश्किल हसत म्हणाली.
तसे दोघांनी ही एकमेकांना डोळ्यांनी इशारा केला आणि दोघेही अरुणच्या बाईक वर बसून तिथून निघून गेले. इकडे वकील आणि घरचे मात्र दोघांना शोधत आले. प्रीतीला पाहून अबोलीच्या भावाने तिला विचारले.
” प्रीती…अबोली आणि अरुण भाऊजी दिसले का…?”
” हो…दोघे ही एकत्रच निघून गेलेत इथून…” प्रीती म्हणाली.
“काय…? कुठे गेलेत…? वकील साहेब बोलवत आहेत त्यांना…” अबोलीचा भाऊ म्हणाला.
” त्यांना जाऊन सांगा….म्हणावं हा डिव्होर्स काही आता होणार काही…” प्रीती हसत म्हणाली.
” म्हणजे…?” काहीच न कळल्याने अबोलीच्या भावाने विचारले.
” म्हणजे त्या दोघांची बट्टी झालीय पुन्हा…” प्रीती म्हणाली.
हे ऐकून तिच्या भावाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिचे वडील सुद्धा खूप खुश झाले. पुन्हा आनंदी आनंद झाला. इतक्यात प्रशांत मागून येऊन प्रीतीला म्हणाला.
” मानलं पाहिजे तुला प्रीती…अगदी बरोबर अंदाज आहे तुला अबोली वहिनीच्या स्वभावाचा…तुझ्यामुळेच आज ह्या दोघांचा संसार वाचलाय…मला खूप कौतुक वाटतं तुझ्या हुशारीचं…”
” तसं काही विशेष सुद्धा नाही केलं मी…या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे…हे भांडू शकतात पण वेगळे व्हायच्या नावानेच ह्यांना धडकी भरते…मी तर फक्त अबोलीला ह्याची जाणीव करून दिली फक्त…” प्रीती म्हणाली.
आणि दोघे समाधानाने हसले.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह…😊