लग्नाचा दिवस उजाडला. प्रकाशराव वधुपिता म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवून होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नंदिनीचं लग्न होतं. मांडव सजला होता, पाहुणे आले होते, नंदिनी सुद्धा तयार होत होती.
नवरदेवाकडील मंडळी अजूनही आली नव्हती. मारुतीच्या मंदिरातून तर ते केव्हाच निघाले होते. पण रस्त्याने नवरदेव आणि त्याचे मित्र नाचत असल्याने उशीर होत होता. मुहूर्ताची वेळ निघून जात होती. पण नवरदेवाकडील मंडळींच नाचणं काही थांबत नव्हतं.
शालूताई मात्र आज सकाळीच लग्नघरी आली होती. घरी येऊन सगळ्या तयारी नीट झाल्यात ना ह्याची खात्री करून घेत होती. नंदिनीची आजी आलेल्या पाहुणे मंडळींकडे तोंडभरून शालूचे कौतुक करत होत्या. शालूमुळेचे आज नंदिनीचं लग्न एवढ्या मोठ्या घरात होत आहे ह्याचा पाढा त्यांनी सकाळपासून दहा वेळा तरी वाचला असेल.
सगळेजण नवरदेवाची वाट पाहत असताना नवरदेव मात्र अजूनही पोहचला नव्हता. दूरवर गाण्यांचा आवाज येत होता. बहुतेक अजूनही सगळी मंडळी नाच्ण्यात गुंग होती. प्रकाशराव शालू ताईजवळ आले आणि त्यांना म्हणाले.
” ताई…मुहूर्ताची वेळ झालीय…त्यांना सांग ना वेळेवर यायला…”
” येतील ते…तसेही मुलाकडील मंडळींना आजकाल उशीरच लागतो यायला…आणि इतका महागडा डिजे सांगितल्यावर नाचणार नाहीत तर काय करणार आहेत…येतीलच इतक्यात…” शालूताई म्हणाली.
शालूताईंचे बोलणे ऐकून प्रकाशराव गप्प बसले. थोडा वेळ झाल्यावर वरात लग्नमंडपी पोहचली. पण जसे सगळ्यांचे लक्ष वराती कडे गेले तसे सगळे जण अवाक झाले. सगळ्यांचीच कुजबुज सुरू झाली. नवरदेव फोटोत होता तसा अजिबात दिसत नव्हता. फोटोत चांगला सुदृढ दिसत होता आणि प्रत्यक्षात मात्र खूपच बारीक अंगकाठीचा होता.
खोल गेलेले गाल, लालसर डोळे, चेहऱ्यावर वाढलेल्या वयाच्या खुणा, चालण्या बोलण्यात एकप्रकारचा धुंदपणा दिसत होता. त्याला पाहून तरी असे वाटत होते की त्याने भरपूर प्यायलेली असावी. त्याला पाहताच मांडवात लोक दबक्या आवाजात कुजबुज करू लागले. कारण सगळ्यांना नवरदेवाचा जो फोटो दाखवण्यात आला होता तो तर एकदमच वेगळा दिसत होता. सरला ताई, नकुल, नंदीनीची मावशी आणि इतर नातलगांना तर एकदम धक्काच बसला.
प्रकाशराव सुद्धा एकदमच चमकले. हे नेमकं काय आहे ते त्यांना कळतच नव्हते. ते तसेच शालू ताईजवळ गेले. त्यांना एका बाजूला घेऊन गेले आणि विचारले.
” हे काय ताई…फोटोत तर वेगळाच दिसत होता ना मुलगा…आता तर एकदमच वेगळा दिसतो आहे…अन् दारू पण खूप पिलेला आहे…अगदी त्याचं त्यालाच सुचत नाहीये काही…हे सगळं काय चाललंय…?”
आता मात्र शालूताईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या प्रकाशरावांना म्हणाल्या.
” तू मला प्रश्न विचारतो आहेस…आपल्या बहिणीला…तुला माझ्यावर विश्वास नाहीये का…?”
” विश्वास ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि आता जे दिसतंय त्यावर तर बोलावच लागेल ना… ” प्रकाशराव म्हणाले.
” अरे…त्याच काय झालं ना…लग्नाच्या गडबडीत बारीक झालाय बिचारा…एकुलता एक आहे ना…त्यामुळे सगळ्या व्यवस्था त्यालाच पाहाव्या लागल्या…वरून कामाचा ताण…त्यामुळे जरा झटकला आहे तब्येतीने…” शालूताई म्हणाली.
” इतका बारीक होतो का कामाच्या ताणाने…?” प्रकाशराव स्वतःशीच पुटपुटले पण शालूताईंना ते ऐकायला गेलेच. त्या म्हणाल्या.
” तू ना खूप जास्त विचार करतोयस म्हणून तुला असं वाटतंय…आणि वजनच तर कमी झालंय ना…बायकोच्या हातचं खायला लागला की वाढेल हो वजन…आता सगळं आपल्या नंदिनीच्या हाती आहे…”
” आणि दारू किती प्यायला आहे तो…ते ही ऐन स्वतःच्या लग्नाच्या दिवशी…?” प्रकाशराव पुन्हा म्हणाले.
” असते एकेकाला हौस…नाहीतर मित्रांनी पाजली असेल जबरदस्ती…आणि दारू पिणे काही नवीन नाही आजकालच्या मुलांसाठी…कधीतरी घेतात…आजकाल तर मुलीसुद्धा दारू प्यायला लागल्यात…मग ह्याने एखादेवेळी घेतली तर काय होतं…” शालूताई म्हणाली.
प्रकाशराव काही बोलणार इतक्यात त्यांची आई तिथे आली आणि म्हणाली.
” काय झालंय तुला प्रकाश…? तिकडे लग्न लावायला आधीच उशीर झालाय आणि तू इथे बोलत बसला आहेस…काही नाही होत एखादेवेळी दारू प्यायला तर…अन् शालू ओळखते ना त्यांना…मग कशाला विचार करायचा जास्त…सगळे खोळंबलेत…जा अन् पुढच्या विधिंना सुरुवात कर…”
प्रकाशराव मात्र आता काय करावे आणि काय नको या विवंचनेत होते. अगदी यांत्रिकपणे ते तिथून निघाले. त्यांना काही म्हणून काहीच सुचत नव्हतं. पण इतक्या सगळ्या पाहुण्यांसमोर मुलाकडच्यांना जाब विचारणार तरी कसा. शिवाय आई अन् शालू ताईंच सुद्धा हेच म्हणणं आहे की सगळं काही नीट होईल. असा विचार करून त्यांनी पाणेरी ला सुरुवात केली.
इतक्यात सरला ताईंजवळ मुलाकडच्या मंडळींमधील एक पाहुणी आली. काही औपचारिक बोलणी झाल्यानंतर त्यांनी सरळ सरला ताईंना प्रश्न केला.
” तुम्ही कोण नवरीच्या…?”
” मी आत्या आहे तिची…म्हणजे चुलत आत्या…?” सरलाताईंनी सांगितले.
” अस्स होय…”( म्हणजे एवढी सुद्धा सख्खी नाही ) असे ती मनात पुटपुटली. मग म्हणाली. ” तुम्हाला एक विचारू का…?” ती म्हणाली.
” विचारा ना…” सरलाताई म्हणाल्या.
” नाही म्हणजे मुलीचं लग्न जुळत नव्हतं का कुठे…की मुलगी पळून बोलून गेली होती कुण्या मुलाचा हात धरून…?” ती म्हणाली.
” अहो असे काय बोलताय तुम्ही…” सरलाताई जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या.
” नाही म्हणजे तसं काही नाही…पण ह्या मुलाला का म्हणून त्याचे आईवडील एखादी चांगली मुलगी देतील…म्हणून आपली शंका विचारली मी… तसंही याशिवाय का सोयरिक झाली असेल ही…” ती म्हणाली.
” तुम्हाला काय म्हणायचय…या मुलाला मुलगी दिली नसती म्हणजे…?” सरला ताईंनी अस्वस्थपणे तिला विचारले.
” तुम्हाला जसं काही माहीतच नाही बुवा…” ती म्हणाली.
” मला खरंच माहीत नाही…तुम्हाला काय बोलायचं ते जरा स्पष्टपणे सांगता का…?” सरलाताईंनी विचारले.
त्या पाहुणीने शालूताईंना सरलाताईंशी बोलताना नाक मुरडून जाताना पाहिले होते. त्यामुळे ही काही सख्खी आत्या नाही आणि हीचं ह्यांच्याशी जास्त पटत नसेल असे वाटून त्या पाहुणीने सरलाताईंना सांगायला सुरुवात केली.
” अहो मुलाला अगदी बारावी पासूनच दारूचं व्यसन लागलेलं आहे ह्यांच्या…श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा म्हणून घरच्यांनी खूपच लाड केलेत ह्याचे…म्हणूनच बिघडला… बारावीनंतर शिकला सुद्धा नाही…त्याचे आई वडील म्हणायचे की आमच्या जवळ इतका पैसा असताना हा पुढे शिकला नाही तरी काही फायदा नाही…अजुन चार पिढ्या घरी बसून खातील एवढी संपत्ती आहे आमची…
मग ह्याला तर रान मोकळं झालं ना…पुढे शिकलाच नाही…दारूचं व्यसन वाढतच गेलं… मग काय ओळखीले लोक ह्याला लग्नासाठी मुलगी द्यायला नकारच द्यायचे…मुलगी पाहता पाहता वय वाढू लागलं…अन् मागच्या वर्षी ह्याची तब्येत खूपच खराब झाली होती…दवाखान्यात भरती होता पंधरा दिवस…डॉक्टरांनी सांगितले की आता तर ठीक झालाय पण यापुढे दारुपासून दूर ठेवा…
तेव्हा पासून जरा कमी झालंय…पण व्यसन काय इतक्या सहजासहजी सुटतं का… त्याचं आपला कधीमधी चालूच होतं…मग लोकांनी सल्ला दिला की ह्याचं लग्न करून द्या…बायको आली की सुटेल ह्याची दारू…पण ओळखीत ह्याचं लग्न जुळण कठीण होतं म्हणून मग दूरच्या नातेवाईकांमधून मुली पाहायला सुरुवात केली…अन् ही सोयरिक झाली…” त्या पाहुणीने न थांबता एका दमात सांगितले.
” काय…?” सरलाताईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
” हो…म्हणूनच तर म्हणाली ना की ही सोयरिक कशी झाली ते…पण मुलीच्या घरच्यांनी पण काहीतरी विचार करूनच दिली असेल ना मुलगी त्यांना…आजकाल चे लोक फक्त श्रीमंत सासर पाहतात…बाकीचं काही देणंघेणं नसतं त्यांना…पण आपल्याला काय…बायको आल्यावर तो सुधारला तर चांगलंच आहे म्हणा…” ती म्हणाली.
इकडे नवरदेव त्याच्या जागेवर जाऊन बसला. विधींना सुरुवात झाली. इतक्यात भटजींनी नवरीला बोलावण्याची सूचना केली. नवरी बाहेर यायला लागली. आधीच अवघडलेली नंदिनी खाली मान घालून मैत्रिणींच्या सोबतीने मंडपात चालून येत होती. पण येऊन जेव्हा ती नवरदेवाच्या जवळ जाऊन बसली तेव्हा नवरदेवाच्या वेशात असलेल्या मुलाला पाहून तिचा चेहरा पांढराफटक पडला.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर सरलाताई हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतील का…? शालूताईंना सगळं काही माहिती असून सुद्धा हे लग्न जुळवण्यामागे त्यांचा काय हेतू असेल…? नंदिनीच्या आयुष्यात पुढे काय लिहिलेलं असेल…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.