” आई…मला प्रीती खूप आवडते गं…माझं खूप प्रेम आहे तिच्यावर…आणि मी तिला आजच नाही ओळखत… मागच्या सात वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो…ती खरंच खूप चांगली मुलगी आहे…” ऋषी आईला समजावत म्हणाला.
” अरे तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी…मी चांगलीच ओळखते अशा मुलींना…आपलं घर पाहून भाळली असेल तुझ्यावर…नाहीतर तिचं घर बघितलंस का…? किती लहान आहे…अन् तिच्या वडिलांची परिस्थिती पण काही फारशी चांगली नाही…चांगला कमावता मुलगा अन् इतके चांगले घर पाहून तिने फसवलय तुला…” आई म्हणाली.
” नाही आई…तुझा खरंच गैरसमज होतोय…प्रीती खरंच अशी मुलगी नाही…आणि माझी नोकरी लागून फक्त तीन वर्ष होत आहेत…त्या आधी आपली परिस्थिती एवढी चांगली नव्हती…किंबहुना तिच्यापेक्षा कमीच होती…पण तिने कधीच असा विचार केला नाही…तेव्हा जर माझ्या आर्थिक परिस्थितीने तिला काही फरक पडत नव्हता तर आज सुद्धा काहीच फरक पडणार नाही…मुळात आज माझ्याजवळ काहीच नसते तरीसुद्धा तिने माझी साथ सोडली नसती…” ऋषी काकुळतीला येत म्हणाला.
” असे असेल तर मग हे सिद्ध कर…हे घर जे तुझ्या नावाने आहे ते ओमीच्या नावाने कर…मग बघ ती तुझ्याशी लग्न करायला तयार होते की नाही…”
प्रीती सोबत लग्न करण्यासाठी ऋषी काहीही करायला तयार होता. ओमी त्याचा लहान भाऊ होता. त्याच्यावर ऋषी चा स्वतःपेक्षा ही जास्त विश्वास होता. आणि हे केल्यावर आईची आपल्या आणि प्रितीच्या लग्नाला काही हरकत नसेल असे वाटून त्याने घर ओमिच्या नावाने करायचे ठरवले. ठरवल्याप्रमाने त्याने घर ओमीच्या नावाने केले सुद्धा. अर्थातच त्याने याबद्दल प्रीतीला कल्पना दिली. पण यामागचे कारण मात्र सांगितले नाही. अर्थातच प्रीतीला ह्या गोष्टीने काही फरक पडला नाही. आणि हे पाहून ऋषी प्रितीच्या बाबतीत आणखीनच आश्वस्त झाला.
ठरल्याप्रमाणे आईने सुद्धा ऋषी अन् प्रितीच्या लग्नाला परवानगी दिली. दोघांचे थाटामाटात लग्न झाले. प्रीती आणि ऋषी एकमेकांसोबत खूप खुश होते. ऋषी चांगल्या नोकरीवर असला तरी सध्या त्याला जास्त पगार नव्हता.त्यातच घरची जबाबदारी आणि लग्नासाठी घेतलेले गृहकर्ज. त्यामुळे संसार रेटताना त्याची होणारी तारांबळ प्रितीच्या लक्षात येत होती.म्हणून ती काटकसरीने संसार करायची. पण ऋषीची आई मात्र तिला टोमणे मारायची एकही संधी सोडत नव्हती.
काही दिवसांनी ऋषीची बदली जवळच्याच शहरात झाली. यथावकाश तो प्रीतीला सुद्धा आपल्या सोबत घेऊन गेला. तिथे दोघांचा नव्याने संसार सुरू झाला. काही दिवसातच प्रीतीने गोड बातमी दिली आणि लवकरच दोघेही एका गोड मुलीचे आई बाबा झाले.
इकडे अचानकच ओमी ने त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केले. त्याच्या प्रेमविवाहाला मात्र ऋषीच्या आईने काहीच हरकत घेतली नाही. उलट मोठ्या उत्साहाने त्यांनी ओमीचे लग्न लावून दिले. जेवढे दागिने ऋषीच्या लग्नात प्रीतीसाठी केले होते तेवढेच दागिने त्यांनी ओमीच्या बायकोसाठी सुद्धा ऋषीकडून हट्टाने करवून घेतले. ऋषीच्या थोडे वाईट वाटले पण आपला लहान भाऊ आनंदात आहे हीच गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्वाची होती. त्याच्या आनंदातच ऋषीने आनंद मानला.
एके दिवशी ऋषीची आई त्याच्याकडे आलेली असताना त्या ऋषीला म्हणाल्या..
” ऋषी…ओमी म्हणत होता की आता आपलं कुटुंब वाढतंय…तर एखादी कार हवी…बघ ना आता त्याचंही लग्न झालंय…आम्हाला सगळ्यांना एकत्र बाहेर जायचं म्हटलं की जाता येत नाही…दुरून रिक्षा बोलवावी लागते…एखादी कार घ्यायचं दादाच्या कानावर घाल म्हणत होता…घरी काम नसेल तेव्हा भाड्याने सुद्धा देता येईल… तसंही ओमीला सध्या काही नोकरी नाही…आणि आपल्या शेतीच्या उत्पन्नावर आजकाल काही भागत नाही…”
” आई…तुला तर माहिती आहे ना सध्या घरासाठी घेतलेलं कर्जच फिटलेल नाहीय…त्यामुळे आता तरी नवीन कर्ज घेणं बरं नाही…पुढे मागे बघता येईल कार घ्यायचं…” ऋषी म्हणाला.
” अरे पण मागेच प्रमोशन झालं ना तुझं…मग पगार पण वाढलाच असेल ना…” आई म्हणाली.
” थोडाफार वाढलाय पगार…पण खर्च पण तेवढेच वाढले आहेत आई…महागाई बघतेस ना…” ऋषीने आईला समजावले.
” महागाई तर बहाणा आहे तुझा…तुला आता तुझ्या घरच्यांवर खर्च करायची इच्छा होत नाही ना…” आई रागाने म्हणाली.
” अस काहीच नाहीय आई…मी पूर्ण प्रयत्न करतोय माझ्यापरीने…पण खर्चाचा सध्या ताळमेळ बसत नाही आहे…खरंच सध्या जरा कठीण आहे…” ऋषीने आईला पुन्हा समजावून सांगितले.
यावर आई काही बोलली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी रागाने गावी निघून गेली. ऋषी आता बायकोच्या म्हणण्यानुसार वागतो आणि प्रितीच त्याला ओमीची मदत करण्यापासून थांबवत आहे अशी त्यांची ठाम समजूत झाली. गावी गेल्यापासून त्या ऋषी सोबत तुटकपणे वागू लागल्या होत्या. ओमी सुद्धा नीट बोलायचा नाही.
या सगळ्यामुळे ऋषी खूप दुखी झालं होता. पण त्याला खरंच पैशांची जुळवाजुळव करणे कठीण होते म्हणून तो सध्या ओमीला चारचाकी घेऊन देऊ शकत नव्हता. घरासाठी घेतलेलं कर्ज फिटायला सुद्धा अजून दीड वर्ष बाकी होते.
काही दिवसांनी अचानक आई कपड्यांची बॅग घेऊन ऋषिकडे आली. त्या खूप अस्वस्थ दिसत होत्या. ऋषीने विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ओमीने त्यांना काहीही पूर्वकल्पना न देता घर विकले म्हणून. ऋषीने आईला फार प्रश्न विचारले नाहीत. कारण त्याला माहिती होतं की यावेळेला तिला सगळ्यात जास्त दुःख झालं असेल.
ऋषीने ओमीला फोन करून याबाबत जाब विचारल्यावर ओमी उद्धटपणाने म्हणाला की घर माझ्या नावावर होतं. त्यामुळे की काहीही करेन. ओमी असे काहीतरी करेन अशी कल्पना सुद्धा ऋषीने कधी केली नव्हती. पण आता काही करू शकत नव्हते.
ऋषी झालं गेलं सर्व विसरून आईची मनापासून सेवा करायला लागला. आई पण ओमीच्या कृत्याने खजील झाली होती. त्यांनी जर ऋषीच्या नावावर असणारे घर ओमीच्या नावावर करायला भाग पाडले नसते तर असे काही झालेच नसते हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस त्या घरात जरा गप्प गप्पच वावरत होत्या.
पण प्रीतीने त्यांना बोलते केले. नात सुद्धा आजी आजी करत त्यांच्या मागेमागे फिरायची. मग काहीच दिवसात त्यांचे अवघडलेपण सुद्धा दूर झाले. मग त्या सुद्धा हक्काने घरात वावरू लागल्या. प्रीतीने सुद्धा मागच्या एकाही घटनेचा साधा उल्लेख सुद्धा त्यांच्या समोर केला नाही. ह्या घटनेला सहा महिने उलटून गेल्यावर एक दिवस अचानकच ओमी ऋषीच्या घरी आला. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले. ऋषीने त्याला घरात बोलावले आणि त्याला विचारले.
” ओमी…तू अचानक…इतक्या दिवसांनी…?”
” हो दादा…तुझ्याकडे नाही येणार तर कुठे जाणार…? तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण…?” ओमी म्हणाला.
” काही घडलंय का ..?” ऋषी ने प्रश्न केला.
” मी खूप मोठी जोखीम उचलून एका मित्रासोबत भागीदारीत दुकान सुरू केले होते…तो मित्र मला फसवून सगळं भांडवल घेऊन पळून गेला दादा…” ओमी रडवेला होत म्हणाला.
” काय…?” ऋषीला धक्का बसला.
” अरे काय बोलतोस तू…तू नीट चौकशी नव्हती का केलीस आधी…?” आई काळजीने म्हणाली.
” नाही आई…तेवढीच चूक झाली बघ…” ओमी खाली मान घालून म्हणाला.
” अन् तुझी बायको सुगंधा…ती कुठे आहे…?” आईने विचारले.
” भांडणं करून माहेरी निघून गेली आहे आई…आणि मला म्हणाली की आता परत येणार नाही…आणि माझ्याजवळ आता घरभाडे द्यायला सुद्धा पैसे नाहीत…” ओमी म्हणाला.
” झालं ते खूप वाईट झालं…पण आता काय तरी करणार…जाऊदे…तू आता इथेच रहा आमच्याजवळ…फार काळजी करू नकोस…” आई ओमीला म्हणाली.
यावर ऋषी आणि प्रीतीने एकमेकांकडे पाहिले. ओमी ने आपल्याला एवढे फसवल्यावर सुद्धा आई त्याला पुन्हा घरी राहायला सांगतेय हे दोघांना सुद्धा पटले नव्हते. पण आजच आल्यापावली त्याला परत पाठवणे त्यांना बरे वाटत नव्हते. दोन चार दिवसात आईशी बोलू म्हणून ऋषी ने तात्पुरता तो विषय टाळला होता.
इकडे ओमी मागचं सगळं काही विसरून घरात राहू लागला. रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे हा त्याचा नित्यक्रम सुरू झाला. सकाळी सगळ्यांच्या जेवणाची वेळ व्हायची तेव्हा ओमीच्या नाश्त्याची वेळ व्हायची. नाश्ता सुद्धा त्याला गरम गरमच लागायचा.
जेवताना सुद्धा सगळ्यांसाठी केलेली भाजी त्याला नको असायची. वेळेवर सांगायचा की मला ही नको दुसरी भाजी करून दे. यामुळे प्रीतीचा कामाचा रूटीन पूर्णपणे विस्कळीत झाला होता. आईला सुद्धा ओमीच्या कामात दिरंगाई केलेली चालायची नाही. त्याच्या कामात जराही उशीर झाला की त्या प्रीतीला ऐकवायच्या. प्रितीची होणारी ओढाताण ऋषी पाहत होता. पण आईशी कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं. एक दिवस आईच त्याला म्हणाली.
” ऋषी… ओमीसोबत खूप वाईट घडलं बघ…पण आता करणार तरी काय म्हणा… नशिबात असेल असं समजायचं अन् विसरून जायचं…पण आता त्याच्या भविष्याचा विचार आपल्यालाच करावा लागेल ना…”
” म्हणजे आई…?”
” म्हणजे आता ओमी ला स्थिरस्थावर करण्याची जबाबदारी तुझीच आहे…तू मोठा भाऊ आहेस त्याचा…”
” मी काय करू शकतो आई…?”
” त्याला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय टाकून दे ना…म्हणजे तो बोलला मला की एखादं गॅरेज टाकून द्यायला सांग दादाला म्हणून…ह्या वेळेला चांगल काम करेन म्हणत होता…”
” त्याने आधी एवढ्या चुका केल्यावर सुद्धा तू अशी कशी म्हणू शकतेस आई…?”
” अरे पण काहीही झालं तरी तुझा लहान भाऊ आहे ना तो.. त्याला असं वाऱ्यावर सोडून देणार आहेस का तू…?”
” त्याने जे केलंय ते मी अजून विसरलो नाही आई…आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी त्याला एखादा व्यवसाय टाकून देईन… आपल्या गावातल्या घरासाठी घेतलेलं कर्ज सुद्धा अजून फिटलं नाही…आणि मी आणखी पैसा कुठून उभा करणार आहे…”
” अरे पण तू बघतोस ना…त्याच्याजवळ काही काम नाही म्हणून त्याची बायको सुद्धा माहेरी निघून गेली आहे… त्याचं सगळं सुरळीत झालं तर ती सुद्धा परत येईल आणि त्याच आयुष्य पुन्हा सुरळीत होईल…”
” आई…त्याच्यासाठी जे करायचं ते मी करून बसलो आहे आई…आणि तो आता लहान नाही…त्याच लग्न झालंय आणि स्वतःची अन् बायकोची जबाबदारी तो उचलू शकतोच…” ऋषी आईला म्हणाला.
” तुझी बायको शिकवते ना तुला हे सगळं…आधी तर तू असा नव्हतास… ती आल्यापासून पार बदललास….लहान भावापेक्षा अन् आईपेक्षा जास्त जवळची झाली ना तुला ती…” आई तावातावाने म्हणाली.
” तू काय बोलतेस आई…ओमी इतकं वाईट वागल्यावर सुद्धा तिने त्याच्याविरोधात एक शब्द सुद्धा नाही उच्चारला…लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी कधीच चैनीत आयुष्य जगलो नाही…माझं लग्न होऊन चार वर्ष झालीत पण आतापर्यंत तिला फक्त एक साडी घेऊन दिली मी… दागदागिने तर अजिबात नाही…माझी परिस्थिती पाहून तिने पण कधी कशाचा हट्ट केला नाही…
आजवर एकदा सुद्धा तिने मला विचारले नाही की मी घरी किती पैसे पाठवतो…मी माझ्या आधी माझ्या घरच्यांचा विचार केला…पण तुम्ही मला सतत गृहितच धरले….घर विकून त्याचे पैसे गुंतवण्या आधी त्याला मोठ्या भावाचा सल्ला घ्यावा नाही वाटला…पण मी मात्र मुर्खासारखा कर्तव्य आहे म्हणत त्याच्यासाठी सगळं करतच गेलो…
पण आता मलासुद्धा माझ्या कुटुंबाचा विचार करायचा आहे…माझी मुलगी आता शाळेत जायला लागेल…पण तिच्या शिक्षणासाठी म्हणून काहीच बचत करून ठेवलेली नाही मी…आणि माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून मी ओमिला मदत केली तरीपण तो सगळं काही पुन्हा गमावेल… कारण त्याला त्याच्या चुकांची अजूनही जाणीव झालेली नाही…आणि आता पुढच्या आयुष्यात त्याला जे काही करायचे ते त्याचे त्यालाच करू दे… माझ्याच्याने काहीही मदत होणार नाही…” ऋषी ठामपणे म्हणाला.
ऋषी चे बोलणे ऐकून आज मात्र आईला स्वतःची चूक कळली. कर्ता मुलगा म्हणून त्यांनी आजवर ऋषीला गृहितच धरले होते. त्याच्या अडचणी कधी समजूनच घेतल्या नव्हत्या. ओमीला मात्र नेहमीच पाठीशी घातले होते. त्यांना सतत वाटायचे की प्रीती बाहेरची आहे. ती ऋषीचे पैसे उधळेल. म्हणून ऋषीने जास्तीत जास्त पैसे ओमीवर खर्चावेत असे त्यांना वाटायचे. त्यामुळे आपल्या मागण्या अवास्तव आहेत हे त्यांच्या लक्षात आलेच नाही.
त्यांचे हेच वागणे ओमीला आणखी निष्क्रिय बनवत गेले. ओमीला वाटायचे की दादा असताना त्याला कष्ट करायची गरजच पडणार नाही. आईला तिची चूक कळून आल्यावर खूप पश्चात्ताप झाला. त्यांनी प्रीतीला चुकीचे समजल्याबद्दल मोठ्या मनाने तिची माफी मागितली.
ओमीला सुद्धा त्याच्या जबाबदारीची जाणिव करुन देत स्वतःची आणि स्वतःच्या संसाराची जबाबदारी स्वतः घ्यायला सांगितली. थोड्या उशिराने का होईना ओमी ला सुद्धा आईचे बोलणे पटले आणि त्याने नोकरी शोधायला सुरुवात केली. काही दिवसातच ओमी ला चांगली नोकरी मिळाली सुद्धा.
पुढे त्याने त्याच्या बायकोची समजूत घातली आणि तिला परत घेऊन आला. ऋषी आणि प्रितीच्या घरापासून थोड्या अंतरावर त्याने भाड्याचे घर घेतले अन् नव्याने स्वतःचा संसार सुरू केला. ओमीचे कष्ट पाहून ऋषीने सुद्धा त्याला त्याच्या जुन्या चुकांसाठी माफ केले आणि नव्याने नात्याची सुरुवात केली.
कधीकधी आपल्याला आपल्याच लोकांकडून गृहीत धरले जाते. पण एका मर्यादेपलीकडे गेल्यावर मात्र आपल्याला बोलून दाखवावे लागतेच. नाहीतर नात्यांमध्ये तणाव निर्माण होत जातो. ऋषीने वेळीच आईला त्याच्या मनातले बोलून दाखवले नसते तर आईला त्याच्या परिस्थितीची जाणीव झालीच नसती अन् ऋषीने आपल्या भावाला मदत केली नसल्याचा राग त्यांच्या मनात राहिला असता. पण वेळीच बोलून दाखवल्याने आईला सुद्धा जाणीव झाली आणि तिने ओमीला सुद्धा योग्य मार्गावर आणले.
समाप्त.