सोनेरी ओवाळणी – भाग २ ( अंतिम भाग )

आज रक्षाबंधन होते. सकाळी आठ वाजल्यापासून संध्या दरवाजाकडे डोळे लावून बसली होती. अकरा वाजले, तरी आकाशचा पत्ता नव्हता, ना त्याचा कोणताही फोन आला होता. सोफ्यावर बसलेल्या सासूबाई प्रभावती यांनी संध्येकडे तिरकस नजरेने पाहिले आणि म्हणाल्या,

 

“संध्या, अजून किती वेळ त्या दाराकडे बघत बसणार आहेस? तुझा तो लाडका भाऊ काही आज येणार नाही. विनाकारण त्या ओवाळणीच्या ताटाची वाट बघत बसू नकोस.”

 

“अगं वहिनी, अजून समजलं नाही का तुला? आता वडील गेले, घर मोकळं झालं. तू माहेरी हक्क मागशील, घराचा हिस्सा मागशील या भीतीने तो तुला टाळतोय. हल्ली नातीगोती पैशांपुढे फिकी पडतात. तो कशाला येईल इथे? आला तर त्याला काहीतरी ओवाळणी द्यावी लागेल ना!” नणंद मयुरीनेही लगेच तोंड सुख घेतले.

 

त्यांचे हे शब्द संध्येच्या काळजाला लागले. तिच्या डोळ्यांतून पाणी आले. तिने थरथरत्या आवाजात म्हटले.

 

“नाही मयुरी, माझा आकाश तसा नाहीये. तो पैशांसाठी किंवा जमिनीसाठी मला टाळणार नाही कधीच. त्याच्यावर माझ्या आई-वडिलांचे संस्कार आहेत.”

 

“हो, बघितले तुमचे संस्कार! जर एवढाच प्रेमळ असता, तर निदान आजच्या सणाला तरी सकाळीच हजर झाला असता ना? साधा फोन तरी केला असता एखाद्याने.” सासूबाईंनी फणकाऱ्याने उत्तर दिले.

 

हे ऐकून संध्या काहीच बोलली नाही. आपण काहीही बोललो तरी सासूबाई ऐकणार नाही हे तिला माहित होते. तिचे मन आतून तुटत होते. एव्हाना तिच्या मनातही शंकेची एक पाल चुकचुकली होती की ‘खरंच आकाश मला विसरला का? तो इतका का बदलला?’ ती विचार करत होती.

 

दुपारचे बारा वाजत आले होते. बाहेरून अचानक एका गाडीचा आवाज आला आणि घराची बेल वाजली. सुशांतने उठून दरवाजा उघडला.

दारात आकाश उभा होता.

 

त्याच्या अंगात एक साधा पण स्वच्छ इस्त्री केलेला पांढरा सदरा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत एक विलक्षण चमक आणि ओठांवर तेच जुने, निष्पाप हास्य होते.

 

संध्या धावतच दिवाणखान्यात आली. आकाशला पाहताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने रागाने आणि प्रेमाने त्याच्या छातीवर हलकीशी चापट मारली, “कुठे होतास तू एवढा वेळ? मला वाटले तू आज येणारच नाहीस. तुला माझी आठवण तरी आहे का रे?”

 

आकाश हसला आणि म्हणाला.

 

“असा कसा विसरणार मी माझ्या ताईला? या जगात माझं तुझ्याशिवाय आहेच कोण? जरा कामात अडकलो होतो, म्हणून उशीर झाला.”

 

सासूबाई आणि मयुरी एका कोपऱ्यात उभ्या राहून चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणून पाहत होत्या. सासूबाई कुत्सितपणे पुटपुटल्या,

 

“आला एकदाचा… बघू आता काय मोठा तीर मारतोय ते.”

 

संध्याने आकाशला पाटावर बसवले. त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला, अक्षता लावल्या आणि अत्यंत प्रेमाने त्याची आरती ओवाळली. संध्याने त्याच्या मनगटावर रेशमी राखी बांधली आणि देवाला त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. ओवाळून झाल्यावर आकाशने संध्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला.

 

मग आकाशने आपल्या खिशातून एक मखमली लाल रंगाची छोटी डबी काढली आणि संध्याच्या हातावर ठेवली. “ताई, ही तुझी ओवाळणी.”

संध्येने आश्चर्याने ती डबी उघडली. डबी उघडताच तिचे डोळे विस्फारले. त्या डबीत अगदी तसेच सोन्याचे झुमके चमकत होते, जे संध्येने बाबांच्या आजारपणात विकले होते! अगदी हुबेहूब तेच नक्षीकाम, तीच घडणावळ!

 

संध्येच्या अंगावर काटा आला. तिने थरथरत्या हातांनी ते कानातले उचलले आणि आकाशकडे पाहिले, “आकाश… हे… हे कुठून आणलेस तू? हे तर मी विकले होते ना?”

 

आकाशचे डोळे पाणावले. मग डोळ्यातील पाणी लपवून तो तिला म्हणाला.

 

“ताई, ज्या दिवशी तू बाबांच्या उपचारासाठी आईने दिलेले तुझे एकमेव कानातले विकलेस ना, त्या दिवशी मी स्वतःला वचन दिले होते की, जोपर्यंत मी माझ्या ताईला पुन्हा हा दागिना परत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. बाबा गेल्यावर मी एकटा पडलो होतो, पण मी खचलो नाही. मागच्या सहा महिन्यांत मी जे तुझ्याशी नीट बोलत नव्हतो, तुला टाळत होतो, त्याचे कारण हेच होते ताई… मला तुझा सामना करायची लाज वाटत होती की मी अजून काही करू शकलो नाही.”

 

आकाश पुढे म्हणाला,

 

“मी सकाळी पाच वाजता उठून वर्तमानपत्रे टाकायचो, दुपारी एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो, रात्री उशिरापर्यंत एका डेटा एन्ट्री ऑफिसमध्ये पार्ट टाईम काम करायचो आणि उरलेल्या वेळात बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो. मी एक-एक रुपया गोळा केला ताई. सोनाराकडे जाऊन जुन्या कानातल्यांचा फोटो दाखवला आणि तसेच कानातले तुझ्यासाठी बनवून घेतले.”

 

हे ऐकताच संध्याला रडू कोसळले. पण स्वतःला सावरत ती म्हणाली.

 

” वेडा आहेस तू…तुझ्यापुढे या दागिन्याची काहीच किंमत नाही. तू एवढा त्रास का करून घेतलास ?”

 

आकाशने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला.

 

” ताई…हे सर्व मी तुझ्यासाठी करत होतो. त्यामुळे मला कष्ट जाणवले नाहीत. उलट तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लावायची प्रेरणा मिळत होती त्यातून.”

 

संध्या समाधानाने हसली.

 

“ताई, थांब, अजून एक गोष्ट सांगायची आहे.” आकाश म्हणाला.

 

त्याने त्याच्या बॅगमधून एक कागद काढला आणि त्याने तो कागद संध्याच्या हातात दिला. “ताई, हे माझे अपॉइंटमेंट लेटर आहे. मी काही दिवसांपूर्वी एक परीक्षा दिली होती. ती मी पास झालोय आणि मला नोकरी मिळाली आहे. सध्या तरी नोकरी साधीच आहे. पण मी याहून मोठ्या पोस्ट साठी अभ्यास करतोय. मी ती नोकरी सुद्धा लवकरच मिळवेन.”

 

हे ऐकताच संपूर्ण खोलीत एक निशब्द शांतता पसरली. संध्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने त्या नियुक्ती पत्राला डोळ्यांशी लावले. सुशांतने पुढे येऊन आकाशला घट्ट मिठी मारली आणि त्याचे मनापासून कौतुक केले, “आकाश, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो भाऊ! तू खरंच तुझ्या ताईचे कष्टाचे सार्थक केलेस.”

 

तिकडे कोपऱ्यात उभ्या असलेल्या सासू प्रभावतीबाई आणि नणंद मयुरी यांचे चेहरे अक्षरशः पांढरे पडले होते. ज्या भावाला त्या लाचार, स्वार्थी आणि पळपुटा समजत होत्या, तो केवळ आपल्या बहिणीच्या स्वाभिमानासाठी अहोरात्र कष्ट करून स्वतःच्या पायावर उभा राहिला होता. त्यांच्या मनातील तुच्छता एका क्षणात लज्जेत आणि आदरात बदलली.

 

प्रभावतीबाई स्वतः पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तोरा पार गळून पडला होता. त्या अत्यंत अदबीने आणि गोड आवाजात म्हणाल्या, “अरे वाह आकाश! खूप खूप अभिनंदन बाळा. मला माहितच होतं की तू काहीतरी मोठं करून दाखवशील. संध्या नेहमी सांगायची की माझा भाऊ खूप हुशार आहे. चल, आधी तोंड गोड कर. मयुरी, अगं बघतेस काय? आकाशसाठी गरमागरम चहा आणि फराळ घेऊन ये जा पटकन!”

 

मयुरीही मान खाली घालून पटकन स्वयंपाकघराकडे पळाली. संध्येने पाहिले, तिच्या सासरच्या लोकांचे आकाशच्या आणि तिच्याही बाबतीतले वागणे एका क्षणात कसे ३६० अंशात बदलले होते. कालपर्यंत टोमणे मारणारे लोक आज तिच्या भावापुढे हात जोडून उभे होते.

 

संध्याने कानात ते सोन्याचे कानातले घातले. त्या कानातल्यांच्या चकाकीत केवळ सोन्याचे तेज नव्हते, तर तिच्या भावाच्या अथांग प्रेमाचे, त्यागाचे आणि संघर्षाचे मोल सामावलेले होते. तिने आकाशच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनातल्या मनात आई-बाबांना उद्देशून म्हणाली,

 

‘आई, बाबा… जिथे कुठे असाल तिथून बघा, आपला आकाश आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे.”

 

त्या श्रावणाच्या दुपारी, संध्येच्या घराचे अंगण केवळ पावसाच्या पाण्याने नाही, तर भाऊ-बहिणीच्या पवित्र, अतुट आणि विजयी प्रेमाच्या अश्रूंनी चिंब भिजून गेले होते.

समाप्त.

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा 😊

©® आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment