शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

 

साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.

 

गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम करत, थोडीफार शिवणकामाची ऑर्डर घेत आणि घर चालवायला गणेशरावांना मदत करत.

 

रोहन त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासूनच अभ्यासू आणि शांत स्वभावाचा. आईवडिलांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांनी कधीही त्याच्यावर आपल्या अपेक्षा लादल्या नाहीत. कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही.

 

रोहन लहान असताना सुमित्राताई त्याच्यासाठी रोज डब्यात वेगवेगळे पदार्थ करायच्या. कधी पोहे, कधी उपमा, तर कधी पराठे. शाळेत जाण्यापूर्वी त्या नेहमी म्हणायच्या,

 

“बाळा, आधी नीट खाऊन जा. रिकाम्या पोटी अभ्यास होत नाही.”

 

रोहन कधी कधी घाईत असायचा तेव्हा म्हणायचा.

 

“आई, उशीर होतोय. नंतर खाईन.”

 

तेव्हा सुमित्राताई त्याच्या मागे धावत एक घास तरी तोंडात घालायच्या.

“हा शेवटचा घास, बस्स!” त्या हसत म्हणायच्या.

तो “शेवटचा घास” रोहनच्या म्हणजे आयुष्यातील मायेची ऊब होती… पण त्याला ते तेव्हा समजलं नव्हतं.

 

काळ हळूहळू पुढे सरकत गेला. रोहनने बारावी उत्तम मार्कांनी पास केली. गावात सगळे त्याचं कौतुक करत होते.

गणेशराव अभिमानाने म्हणाले,

“माझा मुलगा इंजिनियर होणार.”

रोहनला पुण्यातील चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण होता, पण सुमित्राताईंच्या डोळ्यात मात्र हलकीशी चिंता होती.

 

“माझं बाळ इतकं दूर राहणार…त्याच्या खाण्यापिण्याची काळजी कोण घेईल…” हा विचार करून त्या काळजीत पडायच्या.

रोहन पुण्याला जाण्याच्या दिवशी सुमित्राताईंनी खूप पदार्थ करून ठेवले. तो पुण्याला जायच्या दिवशी त्यांनी स्वतः त्याला जेवण भरवले.

“आता तिकडे गेल्यावर स्वतःची काळजी घे. वेळेवर खा,” त्या काळजीने म्हणाल्या.

रोहन हसत आईला म्हणाला,

“आई, मी लहान मुलगा नाही आता. मी माझी काळजी घेईन नीट. तू काळजी नको करुस…”

 

पण सुमित्राताईंनी नेहमीप्रमाणे शेवटी त्याला एक घास हाताने भरवला.

“हा शेवटचा घास… माझ्या हातचा,” त्या डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाल्या.

 

पुण्यात गेल्यावर रोहनचं आयुष्य पूर्ण बदललं. कॉलेज, मित्र, प्रोजेक्ट्स, पार्टटाईम जॉब… या सगळ्यात तो खूप व्यस्त झाला.

आईचा फोन आला की कधी कधी तो पटकन म्हणायचा,

“आई, नंतर बोलतो. आत्ता क्लास आहे.”

सुमित्राताई फक्त “ठीक आहे बाळा” म्हणायच्या

फोन ठेवताना त्या रोहनला नेहमी विचारायच्या.

“जेवलास ना?”

“हो हो,” रोहन पटकन उत्तर द्यायचा.

 

खरं तर कधी कधी तो जेवायलाही विसरायचा. पण आईची काळजी नको म्हणून तो खोटं बोलायचा. असेच वर्ष सरत होते. रोहन सुट्ट्यांमध्ये गावी जायचा. सुमित्राताईंना खूप आनंद व्हायचा. त्याला काय करून खाऊ घालू आणि काय नको असे व्हायचे त्यांना.

 

रोहन पुण्यात असताना एके दिवशी रोहनला वडिलांचा फोन आला.

आवाज थोडा चिंताग्रस्त होता.

“रोहन, आई थोडी आजारी आहे. डॉक्टरांकडे दाखवलंय.”

 

रोहन थोडा काळजीत पडला, पण त्याला दुसऱ्या दिवशी महत्त्वाची परीक्षा होती.

“बाबा, दोन दिवसात येतो,” तो बाबांना म्हणाला.

पण दोन दिवस आठवड्यात बदलले.

दरम्यान सुमित्राताईंची तब्येत खालावत होती.

एका संध्याकाळी रोहनला अचानक शेजारच्या काकांचा फोन आला.

“रोहन, शक्य असेल तर लगेच घरी ये.”

आता मात्र आवाज गंभीर होता.

 

रोहनचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो लगेच बसने गावाकडे निघाला.

संपूर्ण प्रवासात त्याच्या डोक्यात फक्त आईचं हसतं चेहरं होतं.

घरी पोहोचल्यावर बाकीचे बरेच नातेवाईक आलेले पाहून त्याचं हृदय थरारलं. घरात प्रवेश करताच त्याने आईला पलंगावर शांत पडलेलं पाहिलं.

सुमित्राताईंचा श्वास मंद होता.

रोहन त्यांच्या जवळ बसला.

“आई…” त्याचा आवाज थरथरत होता.

सुमित्राताईंनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं.

“आलास बाळा…” त्या हळू आवाजात म्हणाल्या.

रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

 

त्या पुढे म्हणाल्या. “दुरून आलास बाळा. भूक लागली असेल ना…आधी दोन घास खाऊन घे…”

रोहन उदास होऊन म्हणाला,

“आई, आत्ता काही खायची इच्छा नाही.”

 

” थांब मी माझ्या हाताने भरवते तुला..” सुमित्राताई म्हणाल्या. मग कुणीतरी जेवणाच ताट वाढून आणलं आणि सुमित्राताईंनी आपल्या हाताने त्यांना घास भरवला. रोहनच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याने तो घास खाल्ला.

 

त्या क्षणी त्याला जाणवलं – हा नुसता घास नाही. ही एक आईची काळजी आहे. ती स्वतः मृत्युशय्येवर असूनसुद्धा तिला लेकराची एवढी काळजी आहे ह्या जाणिवेने भावूक झाला.

थोडा वेळ सुमित्राताईंनी त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि शांतपणे झोपी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झोपेतच हे जग सोडून निघून गेला. रोहनला खूप दुःख झाले. त्याची आई आता या जगात नव्हती. आईच्या आठवणी येऊन रोहन रडवेला झाला होता.

 

आई गेल्यानंतर घर खूप रिकामं वाटायला लागलं. पण स्वयंपाकघरात जणू तिचा वास अजूनही होता. भिंतीवर तिच्या शिवणकामाचं मशीन शांत उभं होतं.

रोहन अनेकदा त्या टेबलाजवळ बसून राहायचा.

त्याला आठवायचं — आईचा आवाज, तिचं हसणं, आणि तो “शेवटचा घास”.

 

काही महिन्यांनी रोहन पुन्हा पुण्यात गेला. पण आता तो बदलला होता. आईविना लेकरू लवकर समजदार होतं तसा रोहन पण कमी वयात समजदार झाला होता. तो रोज वेळेवर जेवायचा.

कधी कधी तो मित्रांना स्वतः स्वयंपाक करून खायला द्यायचा. हट्ट करून  जेवायला लावायचा.

 

जेव्हा कोणी विचारायचं,

” अरे तू मित्रांना इतकं का जपतोस?”

 

तो हसून म्हणायचा,

” प्रेम व्यक्त करायची प्रत्येकाची एक पद्धत असते…प्रेम करायची ही पद्धत मी माझ्या आईकडून शिकलोय.”

 

त्याच्या या कृतीतून त्याला खूप समाधान मिळायचं. जणू आई आपल्या जवळच आहे असा भास व्हायचा.

 

जीवनात आपण मोठी स्वप्नं पाहतो, धावपळ करतो, यश मिळवतो. पण त्या धावपळीत अनेकदा आपल्या जवळच्या माणसांचं प्रेम दुर्लक्षित होतं.

आईवडिलांचं प्रेम मोठ्या शब्दांत व्यक्त होत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टीत असतं — वेळेवर केलेला फोन, बनवलेलं जेवण, आणि कधी कधी हाताने भरवलेला एक साधा घास.

कारण कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो…

जेव्हा आपल्याला कळतं की आईच्या हातचा तो शेवटचा घासच सर्वात मौल्यवान होता.

 

त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा. त्यांच्या प्रेमाची कदर करा. कारण नाती ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असतात.

 

समाप्त.

 

आई आणि मुलाची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. ही आयुष्यात अशी काही नाती असतील ज्यांनी तुम्हाला प्रेम करायची एक वेगळी पद्धत शिकवली असेल तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा.

 

धन्यवाद 😊

©®आरती निलेश खरबडकर.

अशीच एक हृदयस्पर्शी कथा वाचा 👇

https://mitawaa.com/aichi-mamata-pai…hi-marathi-katha/

Leave a Comment