आज दिनकर काका आणि सरला काकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मोठा मुलगा प्रशांत आज शासकीय सेवेत मोठ्या पदावर रुजू झाला होता. गावातील लोक सकाळपासून घरी या दोघांचेही अभिनंदन करायला येतच होती. आणि गावातील लोकांना प्रशांतचा आजवरचा संघर्ष सांगताना काका काकूंचा उर अभिमानाने भरून येत होता.
काका आणि काकू दोघेही साधे माणसं. त्यांच्याकडे शेतीचा लहानसा तुकडा होता. कधी आपल्या शेतीत राबायचे तर कधी दुसऱ्यांच्या शेतीत मजुरीला जायचे. दोघेही अशिक्षित होते आणि त्यामुळेच त्यांना शिक्षणाबद्दल खूप आदर होता. त्यांना वाटायचे आपणसुद्धा थोडफार शिकलो असतो तर बरे झाले असते. पण त्यांनी त्यांच्या मुलांना मात्र शिक्षण घ्यायला प्रोत्साहन दिले.
मोठा मुलगा प्रशांत लहानपणी पासूनच अभ्यासात हुशार होता. थोडा मोठा झाल्यावर तो सुट्टीच्या दिवशी आईवडिलांना शेतात मदत करायचा अन् शाळेच्या दिवसांमध्ये मन लावून अभ्यास करायचा. त्याची हुशारी पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याला स्पर्धा परीक्षेबाबत माहिती दिली आणि त्याने स्पर्धा परीक्षेला त्याचे स्वप्न बनवले. आणि आज त्याचे ते स्वप्न त्याने पूर्ण करून दाखवले होते.
प्रशांतला चांगली नोकरी लागली होती. आता त्याच्या आईवडिलांनी मात्र त्याचे लग्न करायचे मनावर घेतले. प्रशांत ने मात्र घरच्यांना सांगून ठेवले होते की त्याचे आईवडील ज्या मुलीला निवडतील त्याच मुलीशी तो लग्न करणार म्हणून.
दिनकर काकांचे विचार आधीपासूनच स्पष्ट होते. आपल्याला जर मुलगी द्यायची असेल तर आपल्यापेक्षा संपन्न घरात द्यावी आणि सून करून आणायची असेल तर आपल्यापेक्षा गरीब घरातून आणावी. जेणेकरून मुली सुखात नांदतील. आणि ह्याच विचाराने त्यांनी त्यांच्याच दूरच्या नात्यातील एका गरीब घरच्या मुलीला प्रशांत साठी पसंत केली. प्रीती तिचे नाव.
प्रीती बारावीपर्यंत शिकलेली होती. दिसायला सुंदर आणि नाकी डोळी छान होती. काका आणि काकू दोघांनीही आधी प्रीतीला पसंत केले आणि नंतर प्रशांत ने देखील प्रीतीला पसंत केले. आणि काहीच दिवसात दोघांचेही साध्या पद्धतीने लग्न लाऊन देण्यात आले.
प्रीती आणि प्रशांत लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात शहरात स्थायिक झाले. काका काकूंना गावातील वातावरणाची सवय असल्याने आणि गावातील शेती सुद्धा पाहायची असल्याने प्रशांत ने त्यांना सोबत चालण्यासाठी विनवण्या करून देखील ते त्यांच्या सोबत गेले नाही. त्यांनी अधूनमधून भेटीला येण्याचे आश्वासन दिले आणि ते दोघेही शहरात निघून गेले.
शहरात गेल्यावर प्रीती आणि प्रशांतचा राजाराणीचा संसार सुरू झाला. प्रशांत सोबत ती बाहेर फिरायला जायची. आता तर अनेक पार्ट्यांना दोघांची हजेरी असे. दोघेही उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांबरोबर उठबस करत. त्यामुळे प्रीती ने तिचे राहणीमान पूर्णपणे बदलले होते. तिथे तिच्या काही मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत कीट्टी पार्टी आणि आऊ टिंग आता नेहमीचेच झाले होते.
प्रीती आता एका वेगळ्याच दुनियेत रमत होती. तिला तिचे गरिबीचे दिवस आठवत देखील नव्हते. सासू सासर्यांचा फोन आला तरी ती घ्यायला टाळायची. पण कधी कधी प्रशांत समोर असला तर नाईलाजाने त्यांच्याशी बोलायची. प्रीती तिच्या मैत्रिणींनो समोर आपल्या श्रीमंतीचा देखावा करायची. घरी काम करणाऱ्या नोकरासोबत नेहमीच फटकून वागायची. तिच्यात आता खूप अहंकार आला होता.
एकदा प्रितीच्या सासरेबुवांची तब्येत अचानक बिघडली. गावातील डॉक्टरांना दाखवून थोडा आराम पडला मात्र डॉक्टरांनी त्यांना शहरात जाऊन काही टेस्ट करायला सांगितल्या. त्यांना वाटले की टेस्टच्या निमित्ताने मुलाची आणि सुनेची भेट सुद्धा होईल म्हणून त्यांनी शहरात जायचे ठरवले. त्यांनी प्रशांतला ते येणार असल्याचे फोन करून कळवले देखील. पण प्रशांत कामांच्या घाईगडबडीत असल्याने तो प्रीतीला सांगायचे विसरला की त्याचे बाबा येणार आहेत.
इकडे प्रीतीने तिच्या घरी आज किट्टी पार्टी ठेवली होती. तिच्या घरी तिच्या सर्व मैत्रिणी जमल्या होत्या. आणि नेमके त्याचं वेळेला तिचे सासरे टेस्ट आटोपून तिच्या घरी यायला निघाले होते. इतक्यात प्रशांत ला देखील आठवले की त्याचे बाबा आज घरी येणार आहेत. त्याला दुपारी ऑफीस मध्ये विशेष काही काम नसल्याने त्याने दुपारी बाबांच्या भेटीला घरी यायचे ठरवले आणि तो ऑफिसमधून निघाला.
इकडे प्रितीचे सासरे तिच्या घरासमोर ऑटोमधून उतरले आणि बाहेरून आवाज द्यायला लागले. थोड्या वेळाने प्रीतीला त्यांचा आवाज गेल्यावर प्रीतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता तिला तिचे सासरे बाहेर उभे असलेले दिसले. तिच्या सासऱ्यांचा उन्हातून एवढ्या दूर प्रवास केल्याने पार अवतार झाला होता.
त्यांच्या डोक्यावरील मळकट टोपी, मळकट कुर्ता आणि धोतर, अंगातून घाम आल्याने ते मळकट कपडे ओले होऊन शरीराला चिकटले होते. दिनकर काका गावातच राहत असल्याने त्यांना त्यांच्या या अवताराच काहीच वाटत नव्हतं. पण प्रीतीला मात्र त्यांना आतमध्ये घेण्याची शरम वाटत होती.
इकडे दाराबाहेर त्यांचा आवाज ऐकुन तिची एक मैत्रीण तिला म्हणाली.
” प्रीती…बाहेर कुणीतरी म्हातारा माणूस उभा आहे…आणि तो बहुतेक तुलाच आवाज देतोय…”
” अगं…कुणी काहीतरी मागायला आलं असेल…प्रशांतला सवय आहे कधीही कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत…त्यामुळे सतत कुणीतरी येतच असत दारावर…जाऊदे…जाईल थोड्यावेळाने परत…” प्रीती म्हणाली.
” प्रितीचे बोलणे बाहेर उभे असलेल्या तिच्या सासऱ्यांच्या कानावर पडले आणि त्यांना जे समजायचं ते समजून गेले. त्यांना कळून चुकले होते की नाही आपण उभे आहोत हे माहिती असूनही सूनबाई ने आपल्यासाठी दरवाजा उघडला नाही म्हणजे नक्कीच तिला तिच्या मैत्रिणींसमोर आपल्याला ओळख द्यायला लाज वाटतं असेल म्हणून.
ते आल्यापावली तिथून परत जायला निघाले. समोर बघतात तर प्रशांत त्यांच्या भेटीला घरी आलेला असतो. तो बाबांना अशा थकलेल्या आणि घामाने डबडबलेल्या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याला वाईट वाटते की आपण स्वतःहून गावी जाऊन बाबांना गाडीमध्ये बसवून इथे आणायला पाहिजे होते. इतक्या उन्हात बसने आल्यामुळे त्यांना खूप दगदग झाली होती. पण त्याला त्याच्या बाबांनीच गावी यायला नाही म्हटले होते. कारण त्यांना बस ने ये जा करायची सवय होती.
प्रशांतने त्यांना पाहताच त्यांना मिठी मारली. आणि त्यांना आपल्यासोबत घरात घेऊन गेला. प्रशांतला घरी आलेला पाहून आणि सासरेबुवांना त्याच्या सोबत पाहून प्रीती घाबरली. तिला वाटले ह्यांनी प्रशांतला सर्व काही सांगितले असेल. पण त्यांनी प्रशांतला काहीच सांगितले नव्हते. आणि सांगणार देखील नव्हते. पण इतक्यातच तिची एक मैत्रीण म्हणाली..
” ए प्रीती…जिजू पण कसले भारी आहेत ना ग…बाहेर मागायला आलेल्या माणसाला ते सरळ घरात घेऊन आले..आजकाल गरीब लोकांसाठी इतकं कोण करतं गं..”
” काय म्हणालात तुम्ही…बाहेर मागायला आलेले म्हणजे…?” प्रशांतने विचारले.
” ज्यांना तुम्ही सोबत आणले आहे ना ते केव्हापासून बाहेरून आवाज देत होते आणि बाहेरच उभे होते. तेव्हाच प्रीतीने सांगितले की ते काहीतरी मागायला आले आहेत म्हणून…”
प्रितीच्या मैत्रिणीकडून हे ऐकताच प्रशांतची तळपायातील आग मस्तकात गेली. तो रागारागाने म्हणाला…
” हे काही मागायला आलेले नाहीत… हे पूर्ण घर ह्यांचच आहे…हे माझे वडील आहेत…खबरदार ह्यांच्या बद्दल एक अवाक्षर जरी काढले तर…”
प्रशांतला रागात बघून प्रितीच्या सर्व मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या. प्रीती मात्र एका जागी खाली मान घालून उभी होती. तिच्या हातून केवढी मोठी चूक झाली हे तिला कळून चुकले होते. पण आता फार उशीर झाला होता.
प्रशांतने दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला तिच्या माहेरी सोडून दिले. झालेल्या घटनेपासून तो प्रीतीशी एक शब्द देखील बोलला नव्हता. प्रीतीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
इकडे दिनकर काकांनी प्रशांतला समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत काही ऐकण्याच्या मनःस्थिती मध्ये नव्हता. त्याच्यासाठी त्याचे वडील देवासमान होते. त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या. अगदी आयुष्यभर त्याच्या आईवडिलांनी स्वतःसाठी काहीही केले नाही. फक्त त्यांच्या मुलांचा विचार केला आणि त्यांच्याशी आपल्या बायकोने असे वागावे हे प्रशांतच्या मनाला लागले होते.
तिकडे प्रीती मात्र तिच्या माहेरी जाऊन खूप दुखी झाली होती. तिच्या सासू सासऱ्यांनी तिला एका गरीब घरातून त्यांच्या मुलासाठी पसंत केले होते. लग्नातही वधुपक्षाकडून कसलीही अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घेऊन तिला मोठ्या मनाने स्वीकारले होते. उशिरा का होईना प्रीतीला आपल्या वागण्याचा खूप पश्चात्ताप झाला. पण प्रशांत मात्र आता तिचा कॉल सुद्धा उचलत नव्हता.
शेवटी प्रशांतच्या आईवडिलांनी प्रशांतला दोन दिवसांसाठी गावी बोलावले आणि त्याला समजावून प्रीतीला पुन्हा त्याच्यासोबत घेऊन जायला सांगितले. सुरुवातीला प्रशांत ने नकार दिला. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला निक्षून सांगितल्यावर तो त्यांना नकार नाही देऊ शकला. प्रीतीने सुद्धा सर्वांची माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही असा प्रशांतला शब्द दिला.
नंतर प्रशांत प्रीतीला सोबत घेऊन पुन्हा शहरात गेला. त्यांच्यासोबत काही दिवसांकरिता प्रशांतचे आईवडील सुद्धा गेले होते. प्रितीची बदललेली वागणूक पाहून प्रशांत ने सुद्धा तिला माफ केले. दोघांचा संसार पुन्हा नीट बसवून प्रशांतचे आईवडील पुन्हा गावी परतले.
अशा तऱ्हेने प्रशांतच्या आईवडिलांनी प्रितीची चूक पोटात घेऊन आपल्या मुलाचा तुटणारा संसार वाचवला.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.