केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून हात फिरवत तिने खोल श्वास घेतला. आत बाळाची हलकीशी हालचाल जाणवली आणि क्षणभर तिच्या ओठांवर हसू उमटलं.
“तू आहेस ना… एवढंच पुरेसं आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.
केतकी आणि केदारचं लग्न होऊन आता एक वर्ष झालं होतं. सुरुवातीचं आयुष्य साधं, सरळ आणि प्रेमळ होतं. केदार एका खासगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता. केदार कामात खूप प्रामाणिक, पण स्वभावाने थोडा अबोल होता. लहानपणी वडील वारल्यानंतर खूप कष्टाने अभ्यास करून त्याने आज आपलं आयुष्य सावरलं होतं. त्याला एक मोठी बहीण होती. तिचं लग्न जवळच्याच एका गावात झालेलं होतं.
आई – सरिताताई – गावात एकट्याच राहत होत्या. नवरा गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य केदार आणि त्याची बहिणी किर्तीसाठीच घालवलं होतं. त्यामुळे केदारसाठी आई म्हणजे देवासारखी होती. केदारला नोकरी लागली आणि घरी केदारच्या लग्नाची घाई सुरू झाली. केतकीला केदारच्या आईनेच केदार साठी पसंत केले होते. केतकी आणि केदारचे लग्न झाले आणि थोड्याच दिवसात तो केतकीला घेऊन शहरात राहायला आला होता. त्यामुळे केतकीला सासूबाईंचा जास्त सहवास लाभला नव्हता. तिने सासूबाईंना आधी सुद्धा बरेचदा आपल्याजवळ रहायला बोलावलं पण अजून सासूबाई शहरात आल्या नव्हत्या.
आता जेव्हा केतकीला गरोदरपणाची बातमी कळली, तेव्हा घरात आनंदाचं वातावरण होतं. तिच्या सासूला हे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला. सरिताताईंनी फोनवरूनच केतकीला हजारो सूचना द्यायला सुरुवात केली होती.
“जपून रहा गं… फार काम करू नकोस… खाणंपिणं वेळच्या वेळी कर…”
केतकीला वाटलं, “सासूबाई आपली किती काळजी घेत आहेत. त्या इथे सोबत असल्या तर किती बरे होईल.”
डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच केतकीला सांगितलं होतं की तिचं गरोदरपण थोडं नाजूक आहे. पहिलं बाळ, कमी हिमोग्लोबिन, सतत थकवा—सगळ्याची काळजी घ्यावी लागणार होती. केतकीला या अवस्थेत शहरात एकटेपणा जाणवत होता. केदार सकाळी लवकर निघायचा आणि रात्री उशिरा यायचा. तिला वाटलं, “आई आल्या तर आपल्याला आधार मिळेल. गरोदरपणात त्यांची मदत होईल… आणि मी थोडी निवांत राहू शकेन.”
म्हणून एक दिवस आईला इथे बोलावून घेण्याबाबत तिने केदारशी बोलून घेतलं. .
“केतू, तुला खरंच वाटतं का आई आली तर तुला बरं वाटेल?” केदारने विचारलं.
“हो ना केदार…या अवस्थेत मला त्यांचा सहवास हवा आहे. आणि आपल्या बाळाची आईसारखं कोण काळजी घेणार?” हे म्हणताना केतकीच्या डोळ्यांत विश्वास होता.
केतकीच्या आग्रहाखातर सरिताताई शहरात आल्या. पहिले दोन दिवस सगळं ठीक होतं. पण तिसऱ्या दिवसापासून वास्तव बदलायला लागलं. इथे शहरात असलेल्या सुखसोयी पाहून त्यांना वाटायला लागलं की माझा मुलगा काम करतो आणि त्याच्या कमाईवर सून मज्जा मारते. त्यांना वाटायला लागलं की केतकीच्या जीवाला किती सुख आहे आणि माझी मुलगी किर्ती मात्र तिकडे खेड्यात घरकामात राब राब राबते. आणि ह्या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. मग आपोआपच त्यांचा केतकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला.
” केतकी…मला सकाळी मला पाच वाजता चहा लागतो. अंगवळणी आहे माझ्या…” सरिताताईंनी केतकीला थेट सांगितलं.
पण केतकीला वाटलं आई सहजपणे सांगत आहेत. म्हणून तिने फारसं लक्ष दिलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी 5 वाजता तिच्या रूमच्या दारावर ठकठक झाली. ती गाढ झोपेत होती. पण एकदोन वेळा ठकठक झाल्यावर कसेतरी डोळे चोळत ती उठली आणि तिने दार उघडले तर समोर सासूबाई उभ्या दिसल्या. त्यांना पाहून आश्चर्याने ती म्हणाली.
” आई…तुम्ही इतक्या सकाळी सकाळी काय करताय…?”
” तुला सांगितलं होतं ना मला 5 वाजता चहा लागतो…”
” करून घ्या ना मग आई…किचन मध्ये काही सामान दिसत नाहीये का…? मी शोधून देऊ का..?”
” तू असताना मी घरातील कामं करायची का..?” सासूबाई म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकून केतकीची झोप पार उडून गेली. कालपर्यंत सौम्य शब्दात बोलणाऱ्या सासूबाई आज चक्क रागात दिसत होत्या. केतकी लगेच आवरुन खोलीतून बाहेर आली आणि सासूबाईंना चहा करून दिला. त्यानंतर संपूर्ण दिवसभर सासूबाई काही ना काही काम सांगतच राहिल्या तिला. अगदी दुपारी झोपायला सुद्धा मिळालं नाही.
त्यानंतर रोजचा नित्यक्रम झाला. सकाळी पाचला उठणं, चहा, नंतर नाश्ता.
“नुसता पोहे नको… आज उपमा कर.”
“आज भाजीत एक कोरडी भाजी आणि एक रस्सा भाजी कर.”
” फरशी बसून पुसत जा.”
अशा सूचना सासूबाई दिवसभर देत असायची.
केतकी दिवसभर स्वयंपाकघरात उभी राहायची. पाय सुजलेले, पाठ दुखणारी, डोकं जड झालेलं.
एकदा न राहवून तिने हळूच सासूबाईंना म्हटलं,
“आई मी थकून जाते एवढं काम करून. सकाळी इतक्या लवकर उठायची इच्छा होत नाही. दिवसा आराम पण होत नाहीय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. जास्त काम करू नको असं पण सांगितलं आहे.”
हे ऐकून सरिताताईंनी तोंड वाकडं केलं.
“आमच्या काळात आम्ही गरोदरपणात शेतात राबलो. काहीच झालं नाही. उलट काम केल्याने डिलिव्हरी नॉर्मल होते. नाहीतर आजकालच्या बायका नुसत्या सिझेरियन करतात. डॉक्टरांना सुद्धा ते हवं असतं. म्हणून मी जे सांगत आहे ते ऐकशील तर डिलिव्हरी नॉर्मल होईल.” त्या म्हणाला.
हे ऐकून केतकी गप्प झाली.
तिने केदारशी याबाबत बोलायचा प्रयत्न केला.
” केदार, मला खूप थकवा येतोय. आपण घरकामाला एखादी मदतनीस ठेवूया ना…”
पण केदारला माहिती होते की हे आईला आवडणार नाही. म्हणून केदारने विषय टाळला. तो केतकीला म्हणाला,
“अगं सध्या आई आहे ना घरी. ती करतेच की तुला मदत. मग उगाच पैसे का खर्च करायचे?”
आई कामात मदत करत नाही उलट आहे तेच काम वाढवून मला करायला सांगते हे केतकी केदारला सांगूच शकली नाही. कारण तिला माहित होते की केदारचा आपल्या पेक्षा आईवर जास्त विश्वास आहे. शिवाय आईसमोर केदारचं काहीच चालायचं नाही. केतकी हळूहळू आतून तुटत होती. तिची तब्येत पण आता बरी वाटत नव्हती आणि तिला बराच एकटेपणा सुद्धा जाणवत होता.
एक दिवस ती चक्कर येऊन सोफ्यावर पडली.
सरिताताईंनी ते पाहिलं. त्यांना वाटलं ती सोफ्यावर झोपली आहे.
“अशी दिवसा झोपू नकोस. मला आळशीपणा अजिबात चालणार नाही.”
केतकीने त्यांना सांगितले की तिला चक्कर येत आहे पण त्यांनी केतकीच्या सांगण्याला गंभीरपणे घेतलेच नाही.
काही दिवसांतच केतकीची तब्येत खूप बिघडली. रक्तदाब वाढला. डॉक्टरांनी तिला सक्त बेडरेस्ट सांगितली.
घरकाम अजिबात नाही. स्ट्रेस नको हा सूचना सुद्धा डॉक्टरांनी दिल्या. एक दिवस ऍडमिट ठेवून केतकी घरी आली. तिला वाटले की आता तरी सासूबाई आपली काळजी घेतील. पण तिची ही आशा फोल ठरली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पाच वाजता पुन्हा सासूबाईंनी तिच्या दारावर टकटक करून तिला उठवले. आता मात्र केतकी सासूबाईंच्या वागण्यामुळे निराश झाली.
ती परत एकदा सासूबाईंशी बोलली पण त्या म्हणाल्या की डॉक्टर काहीही सांगतात. बेडरेस्ट म्हणजे सिझेरियनला आमंत्रण आहे. त्यामुळे काम करत रहा. मग तिने सगळं काही केदारला सांगितले. पण केदारला वाटले की ती आईबद्दल चुकीचा विचार करत आहे आणि आई केतकीच्या चांगल्यासाठीच सांगत आहे. त्याने सुद्धा तिचे काहीच ऐकून घेतले नाही. केतकी एकटी असताना रडायची. पण ऐकणारा कोणीच नव्हता.
आणि मग तो दिवस आला.
सकाळी स्वयंपाक करताना अचानक केतकीला तीव्र वेदना झाल्या. पोटात कळ आली. पायातून रक्त वाहू लागलं.
ती जोरात ओरडली.
“आई… केदार…लवकर या”
तिला अशा अवस्थेत पाहून
सरिताताई घाबरल्या. केदार सुद्धा धावत आला. केतकी बेशुद्ध पडली. तिला लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला तपासले तेव्हा त्यांना तिची स्थिती लक्षात आली. त्यांनी केदार आणि सरिता ताईंना केबिन मध्ये बोलावलं आणि ते म्हणाले.
“तुम्ही वेळेत आणलं नसतं तर आई आणि बाळ दोघांचाही जीव गेला असता.”
डॉक्टरांनी सरिताताई आणि केदारला खडसावलं. डॉक्टरांचा आवाज कडक होता.
” मी आधीच समजावून सांगितले होते की तिला आरामाची आवश्यकता आहे. गरोदर स्त्री म्हणजे मशीन नाही. काम, ताणतणाव, दुर्लक्ष—याची किंमत फार मोठी असते.”
हे ऐकून मात्र सरिताताईंच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांना जाणीव झाली की आपल्या वागणुकीमुळे आपल्या सुनेच्या आणि नातवंडाचा जीव धोक्यात आला असता. केदार सुद्धा आपल्या वागण्यावर शरमिंदा झाला होता. केतकी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या हातात केदारचा हात होता.
“केतू… मला माफ कर. मी तुझं ऐकलं नाही.”
सरिताताई सुद्धा हळूच जवळ आल्या.
” सूनबाई…मला माफ कर. मी चुकले. मला माहिती होतं की मी चुकीचं वागत आहे…पण तरीही मी तसं वागत राहिले. माझ्यामुळे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते.”
त्या क्षणी केतकीला पहिल्यांदा मायेची ऊब जाणवली. पण आता तिचं मन नाराज झालेलं होतं. माफीसाठी आता उशीर झाला होता. तिच्या तब्येतीचे ऐकून तिच्या माहेरची माणसं जेव्हा तिला भेटायला आली तेव्हा ती केदारला म्हणाली की तिला सुद्धा त्यांच्यासोबत माहेरी जायचे आहे. केदार नाही म्हणू शकला नाही. मग केतकी माहेरी निघून गेली. ती गेल्यावर सरिता ताईंना खूप पश्चात्ताप झाला पण आता खूप उशीर झाला होता.
मग काही दिवस शहरात राहून त्या सुद्धा गावी निघून गेल्या. पुढे काही महिन्यांनी केतकीने एका गोड मुलीला जन्म दिला. सगळ्यांना आनंद झाला. काही महिने माहेरी राहून केतकी पुन्हा तिच्या घरी परतली. आता सासूबाई अधून मधून ह्यांना भेटायला शहरात यायच्या. काही महिने इथे रहायच्या आणि काही महिने गावी राहायच्या. केतकी सासूबाईंशी छान वागायची पण मनात कटू आठवणी अजूनही होत्याच. सरिताताईंना सुद्धा जाणीव होती की केतकीने आपल्यात आई बघितली पण आपण मात्र तिच्याशी सासू सारखंच वागलो म्हणून.
“आमच्या काळात आम्ही खूप काम केलं” हा युक्तिवाद प्रत्येक स्त्रीसाठी लागू होत नाही. प्रत्येक गरोदरपण वेगळं असतं. डॉक्टरांचा सल्ला
आणि आई-बाळाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.





