वेगळे राहणार याचा समिधाला खूप आनंद झाला. तिला वाटले की तिच्या मागणीपुढे सुबोध झुकला. आणि यामुळेच तिचा अहंकार खूप सुखावला. पण त्याला वेगळे राहायला नीलीमाताईंनी तयार केले असेल हे तिच्या ध्यानीमनी देखील नव्हते.
सुबोध आणि समिधा जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन वेगळे राहू लागले. इथे सुद्धा सगळी कामे समिधालाच करावी लागत असे. पण आता तिला त्याचे काही वाटत नव्हते. सुबोध मात्र रोज घरी जाऊन आई बाबांची भेट घ्यायचा. बाबांसोबत दवाखान्यात सुद्धा जायचा.
पण समिधाला त्याचे फारसे काही वाटत नसे. इतकंच नव्हे तर इतक्या जवळ राहूनसुद्धा ती तिच्या सासरी फारशी जात नसे. नीलिमाताईंना वाईट तर वाटायचे पण निदान आपल्या मुलाचा संसार तरी सुरळीत सुरू आहे हे पाहून त्यांना बरे वाटायचे.
असेच दिवस जात होते. दिनकर रावांच्या तब्येतीत आता सुधारणा होत होती. समिधाला सुद्धा नववा महिना लागला होता. सातव्या महिन्यातच समिधा डिलिव्हरी साठीवतीच्या माहेरी निघून गेली होती. हळुहळु दिवस भरत होते. आणि लवकरच समिधाची डिलिव्हरी झाली. समिधाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. बाळाला पाहून सगळेच आनंदाने हरखले.
नीलिमाताई आणि दिनकररावांनी दवाखान्यात जाऊन जेव्हा आपल्या नातवाला पाहिले तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. अगदी काय करू आणि काय नको असे झाले. दोन तीन दिवस ते दवाखान्यात रोज यायचे. पण समिधाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली आणि नीलिमाताई पुन्हा उदास झाल्या. कारण त्यांच्या नातवाला पुन्हा त्यांच्यापासून दूर घेऊन जात होते. आणि रोज रोज आपले बाळाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणे समिधाला आवडणार की नाही असा त्यांना प्रश्न पडला.
काही दिवस माहेरी राहून समिधा पुन्हा आपल्या भाड्याच्या घरात राहायला आली. बाळ झाल्याने समिधा खूप आनंदात होती. एके दिवशी बाळाला झोपवताना ती सहज पणे सुबोधला म्हणाली.
” बरं झालं ना सुबोध…आपल्याला पहिला मुलगाच झाला…माझी आधीपासूनच इच्छा होती की पहिला मुलगाच व्हावा…म्हणजे आपल्याला म्हातारपणाची काळजी नाही…हा आपला मुलगाच आपल्या म्हातारपणाची काठी होईल…आपल्याला सांभाळेल…”
” पण तो आपल्याला सांभाळेल असे कशावरून…?” सुबोध ने तिला प्रश्न केला.
” का नाही सांभाळणार…मुली लग्न करू परक्या घरी जातात पण मुलांचं तर कामच असतं ना आईवडिलांची काळजी घेणं…त्यांना सांभाळणं…” समिधा म्हणाली.
” पण हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असे नाही ना…?” सुबोध म्हणाला.
” कशावरून…?” समिधा ने विचारले.
” मी झालो तेव्हा माझ्या आई वडिलांनी सुद्धा हाच विचार केला असेल…पण आज मी खरंच तसा वागतोय का…माझ्या आई वडिलांना माझी आता सगळ्यात जास्त गरज आहे आणि मी बायकोसोबत वेगळा राहत आहे…आणि माझी लहान बहीण त्यांची सेवा करत आहे…
त्यामुळे उद्या चालून जर चुकून तू किंवा मी आजारी पडलो आणि तो आपल्याला आहे त्या परिस्थितीत सोडून निघून गेला तर…म्हणून तुला सांगतोय…मुलांकडून नको त्या अपेक्षा बाळगू नको…” सुबोध खिन्न पणे म्हणाला.
आज सुबोध च्या डोळ्यातील वेदना समिधा ला स्पष्ट दिसली आणि क्षणात तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. आपल्या वेगळं राहण्याच्या हट्टापायी आपण एका मुलाला त्याच्या आईवडिलांपासून तोडलय हे समिधाला कळून चुकले. आज जेव्हा समिधा एका मुलाची आई होती तेव्हा तुला दुसऱ्या आईचं दुःख कळलं होतं.
उद्या चालून आपला मुलगा सुद्धा आपल्याशी असाच वागला तर हा विचार करून सुद्धा तिचा थरकाप होत होता. स्वतःची चूक कळल्याने तिने क्षणाचा ही विलंब न होऊ देता सुबोध ची माफी मागितली. समिधा ला तिची चूक कळली हे पाहून सुबोध ला खूप आनंद झाला.
दोघेही दुसऱ्याच दिवशी नीलिमा ताई आणि दिनकर रावांकडे गेले आणि समिधा ने त्या दोघांचीही मनापासून माफी मागितली. त्या दोघांनी मोठ्या मनाने समिधाला माफ केले सुद्धा. आणि समिधा व सुबोध बाळासह पुन्हा घरी परतले.
घरी पुन्हा आनंदी आनंद झाला. लवकरच दिनकर राव सुद्धा पूर्णपणे बरे झाले. कल्याणीसाठी एक चांगले स्थळ पाहून तिचे सुद्धा लग्न लावून दिले. बाळाच्या येण्याने घराचे गोकुळ झाले होते. दोघेही आजी आजोबा नातवाचे लाड करण्यात हरवून जायचे. पुढे बाळ जरा मोठं झाल्यावर नीलिमा ताई आणि दिनकर राव मनसोक्त फिरले. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र अशा अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.
आई वडिलांना त्यांचा मुलगा परत मिळाला आणि समिधाच्या बाळाला त्याचे आजी आजोबा मिळाले. समिधाला तिची चूक लवकर लक्षात आल्याने एक कुटुंब पुन्हा सुखी झाले होते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
असं फक्त गोष्टीतच होतं. खरं परत गेल्यावर कोणी माफ करत नाही.