वृषाली घराच्या बाल्कनी मध्ये चहा घेत बसली होती. इतक्यात तिला दुरून भाजीची जड पिशवी घेऊन उन्हात चालत येणाऱ्या सुरेखाताई दिसल्या. या वयात त्यांना एकटीने सगळी कामे करताना पाहून वृषालीला वाईट वाटले. वृषाली इथे नवीनच होती. नवऱ्याच्या नोकरीतील बदलीमुळे ते नव्यानेच इथे शिफ्ट झाले होते. तिला इथे राहायला येऊन जवळपास महिना झाला होता.
आली तेव्हापासून तिची इथे जवळपास थोडीफार ओळख झाली होती. तिचा नवरा ऑफिसला गेला की ती निवांत बाल्कनीत चहा प्यायची. नेमके याच वेळेला सुरेखाताई काही ना काही काम करताना तिच्या नजरेस पडायची.
या वयातही, जेव्हा शरीराला आधीपेक्षा जास्त विश्रांतीची गरज असते, तेव्हा सुरेखाताईंना इतके श्रम करताना पाहून वृषालीला रोजच नवल वाटायचे. तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक अनामिक कुतूहल निर्माण झाले होते.
एका दुपारी, शेजारच्या दुसऱ्या एका काकूंकडून वृषालीला सुरेखाताईंच्या घराची पार्श्वभूमी कळाली. तिने ऐकले की, सुरेखाताईंचे यजमान, मधुकरराव, पाच वर्षांपूर्वीच अचानक आजारपणाने देवाघरी गेले होते. त्यांना एक मुलगा, जयेश, आणि सून, श्वेता आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते दोघेही याच शहरात, अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर दुसरं घर घेऊन वेगळे राहत होते.
हे ऐकून वृषालीचा जीव चांगलाच तुटला. ती विचार करू लागली, “इतक्या वृद्ध आईला या वयात असं एकटं सोडून मुलगा आणि सून वेगळे कसे राहू शकतात? आजकालच्या मुलांना आई-वडिलांची काही काळजीच उरली नाहीये का?”
एका संध्याकाळी सुरेखाताई तुळशीपाशी दिवा लावत असताना, वृषाली सहज कुंपणाजवळ आली आणि हळूवार आवाजात म्हणाली,
“काकू, मी रोज बघते तुम्हाला. एवढं सगळं काम एकटीने करताना तुमची दमछाक होत असेल ना? खरं सांगू तर मला राहवत नाही म्हणून बोलते. तुमच्या मुलाला आणि सुनेला थोडी तरी जाणीव असायला हवी होती. या वयात तुम्हाला असं एकटं सोडून जाणं योग्य नाही. आजकालची मुलं किती स्वार्थी आणि वाईट वागतात ना आई-वडिलांशी”
सुरेखाताईंनी तुळशीच्या दिव्यावर हात धरून नमस्कार केला. त्यांनी वृषालीच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ना चेहरा बदलला, ना डोळ्यांत राग आला, ना दुःखाची लकेर दिसली. त्या फक्त शांतपणे एक क्षण तिच्याकडे बघून मंद हसल्या आणि हळूच घराच्या आत निघून गेल्या.
वृषाली निघून गेली, पण तिचे शब्द मात्र सुरेखाताईंच्या मनात खोलवर जाऊन आदळले. त्या शांत घरात, खांबाला टेकून बसल्यावर सुरेखाताईंच्या मनात आठवणींचे वादळ उठले. भिंतीवरील जुन्या फोटोंकडे पाहताना त्यांना जाणीव झाली की, वृषाली ज्या ‘आजकालच्या वाईट मुलांना’ दोष देत होती, त्या परिस्थितीच्या खऱ्या कारणीभूत तर त्या स्वतःच होत्या.
सुरेखाताईंचा स्वभाव सुरुवातीपासूनच असा होता—अलिप्त, काहीसा रुक्ष आणि स्वतःच्याच कोषात राहणारा. कोणाशी मनमोकळेपणाने बोलणे, गप्पा मारणे, किंवा कोणाच्या सुखादुखात मनापासून सामील होणे त्यांना कधी जमलेच नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागतही त्या केवळ औपचारिकतेने, चेहऱ्यावर कोणताही आनंद न दाखवता करत असत.
त्यांचे यजमान मधुकरराव मात्र अगदी उलट स्वभावाचे होते. त्यांना घरात पाहुणे आलेले आवडायचे, नातेवाईकांना बोलावून आदरातिथ्य करायला आवडायचे. “सुरेखा, आज भाऊजी येणार आहेत, जरा अळूची वडी कर,” असं मधुकररावांनी उत्साहाने सांगितलं की सुरेखाताईंचा चेहरा लगेच कडू व्हायचा. त्या कसलाही उत्साह न दाखवता, त्रासिकपणे काम उरकून टाकायच्या.
लग्नानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्या दोन्ही नणंदा मंगला आणि सुशीला सुरेखाताईंशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न करायच्या. “वहिनी, चला आपण बाजारात जाऊ,” किंवा “वहिनी, आज आम्ही स्वयंपाक करतो, तुम्ही बसा,” असं म्हणत त्या सुरेखाताईंच्या मागेपुढे करायच्या. पण सुरेखाताईंनी त्यांच्याभोवती अविश्वासाची आणि अलिप्ततेची एक अदृश्य भिंत उभारली होती. त्या कधीच नणंदांशी मनापासून जुळल्या नाहीत.
काही वर्षांनंतर, मधुकररावांच्या लहान भावाचे लग्न झाले आणि लहान जाऊ सुमन घरात आली. सुमन अत्यंत साधी, निष्पाप आणि प्रेमळ होती. दोन्ही नणंदांची सुमनशी लगेच गट्टी जमली. सुमनने सुरेखाताईंना नेहमीच मोठ्या बहिणीचा मान दिला. ” ताई, मला हे कसं करायचं ते शिकवा ना,” असं हक्काने विचारत ती लहान बहिणीसारखी त्यांच्यावर प्रेम दाखवू लागली.
पण सुरेखाताईंना तिचे हे हक्काने वागणेसुद्धा सोसले नाही. त्यांना वाटायचे की सुमन घरात आल्यापासून आपल्यावर हक्क गाजवते आहे. घरातील लहान-सहान गोष्टींवरून त्या सुमनवर आणि सासरच्यांवर चिडायच्या.
एका दिवशी, सणादिवशी देवघरातील पूजेच्या मांडणीवरून सुरेखाताईंनी अत्यंत क्षुल्लक कारणावरून मोठा वाद घातला. त्या मधुकररावांना थेट म्हणाल्या, “मला या एकत्र कुटुंबात राहायचं नाही. तुम्ही मला वेगळं घर घेऊन चला, नाहीतर मी माहेरी निघून जाईन!”
मधुकररावांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, “सुरेखा, माझं कुटुंब एकत्र आहे, भाऊ-बहिणी माझ्यावर खूप प्रेम करतात, असं करू नकोस.” पण सुरेखाताईंच्या हट्टापुढे शेवटी मधुकररावांचा नाईलाज झाला. त्यांनी दुखी मनाने वेगळे घर घेतले आणि ते वेगळे राहू लागले.
त्यानंतर नातेवाईकांचे त्यांच्याकडे येणे-जाणे पूर्णपणे थांबले. सुरेखाताईंनीही कधी कोणाला मनापासून बोलावले नाही. हळूहळू, नातेवाईकांच्या शुभकार्यातून सुरेखाताईंचे नाव आणि अस्तित्व मागे पडत गेले.
काळाच्या ओघात त्यांचा मुलगा जयेश मोठा झाला. जयेश स्वभावाने अगदी वडिलांसारखाच नम्र, सोशिक आणि समंजस होता. आईचा स्वभाव तापट आणि अलिप्त आहे हे ठाऊक असल्यामुळे तो नेहमी तिच्या कलाने घ्यायचा, तिचे मन जपायचा प्रयत्न करायचा.
योग्य वय झाल्यावर जयेशचे लग्न श्वेताशी झाले. श्वेता एका सुसंस्कृत आणि मनमिळावू कुटुंबातून आली होती. तिने सासरच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा तिचे स्वप्न होते की, ती सासूला आई मानून आनंदाने संसार करेल.
श्वेताने सुरुवातीला खूप प्रयत्न केले. “आई, तुम्हाला कोणती भाजी आवडते ते सांगा ना” तर कधी “आई, आपण एकत्र मंदिरात जाऊया का?” अशी प्रेमळ विचारपूस ती रोज करायची.
पण सुरेखाताईंनी श्वेताच्या कोणत्याही प्रयत्नाला प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी श्वेतावर स्वतःचे कडक नियम लादले. “माझ्या घरात सकाळी आठ वाजेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे,” “हे भांडं इथेच ठेवायचं, तिथे नाही हलवायचं,” “माझ्या घरात जास्त बोललेलं मला चालत नाही,” अशा अटी त्यांनी तिच्यावर लादल्या.
जयेशने एकदा आईला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, “आई, श्वेता नवीन आहे या घरात, ती तुझ्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतेय. तू जरा प्रेमाने वाग ना तिच्याशी.”
यावर सुरेखाताई जयेशवरच डाफरल्या, “बघितलंस! महिना नाही झाला लग्नाला आणि ती माझे कान तुझ्याविरोधात भरायला लागली! तू आईपेक्षा बायकोचाच झालास!”
क्रमशः