भाग २- किंमत नात्यांची
भावाने घरच्या कामात मदत व्हावी म्हणूनच तिला आग्रहाने पंधरा दिवस आधी बोलावून घेतले होते. आणि म्हणूनच वहिनी सुद्धा कधी नव्हते इतकी गोड वागत होती तिच्याशी. त्या दिवशी सरिता खूपच उदास झाली होती.
तरीपण जड मनाने ती दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून लग्नात जायला तयार झाली. मुलांना सुद्धा तयार केले. प्रभाकर घरूनच लग्नाच्या ठिकाणी पोहचणार होता. मोरपंखी रंगाच्या साडीत गव्हाळ वर्ण असलेली सरिता खूप सुंदर दिसत होती. सरिता ला पाहून तिची वहिनी तिच्याजवळ आली आणि म्हणाली.
“सरिताताई…आम्ही सगळे निघतोय लग्नासाठी…तुम्ही घराची नीट काळजी घ्या…थोडा पसारा झालाय तो आवरून ठेवा…म्हणजे नवरी आल्यावर घर अस्ताव्यस्त दिसायला नको…”
” म्हणजे…मला कळलं नाही…आता लगेच निघाव लागेल ना आपल्याला…उशीर होतोय…” सरिता जरा गोंधळून म्हणाली.
” त्याचं काय आहे ना ताई…लग्न जरा साध्याच पद्धतीने करतायत मुलीकडचे…आपल्याला सुद्धा फक्त पन्नास लोकांना आणायचं सांगितलय…मी आधीच सांगणार होते पण लक्षात नाही राहिलं…आणि गाडीत जागा पण नाही आहे…शिवाय घरी कुणीतरी विश्वासातलं आणि जवळच माणूस पाहिजे ना….तुम्ही घरीच थांबा…आम्ही येतोच संध्याकाळपर्यंत…” वहिनी म्हणाली आणि सरिताच्या उत्तराची वाट न पाहता निघायला लागली.
सरिता तिला मध्येच अडवून म्हणाली.
” थांब वहिनी…”
वहिनी मध्येच थांबली. सरिता लगेच आत गेली आणि तिची भरलेली बॅग घेऊन परत आली. आणि म्हणाली.
” मी निघते माझ्या घरी…काय आहे ना माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत…लग्नाला म्हणून इथे आले होते पण इथे ना तुमच्या मनात माझ्यासाठी जागा आहे ना तुमच्या गाडीत जागा आहे…त्यामुळे मी इथून गेलेलेच बरे…” सरिता म्हणाली.
” अहो पण ताई…तुम्ही अशा कशा जाऊ शकता मध्येच…लग्न घर आहे…अजुन खुप कामे पडलीत…अशा अर्ध्यातून कशा काय जाऊ शकता…अजुन चार पाच दिवस तरी थांबा…” वहिनी म्हणाली.
” आलंच ना शेवटी मनातलं बाहेर…तुम्हाला इथे मी नवरदेवाची आत्या म्हणून नाही तर एक कामवाली म्हणून हवी आहे…इतर आलेल्या पाहुण्यांना तुम्ही खूप मान दिलात…कारण ते चांगले श्रीमंत आहेत…आणि माझी परिस्थिती तुमच्या इतकी चांगली नाही म्हणून मला फक्त घरकामासाठी गृहीत धरलं तुम्ही…
जर प्रेमाने बहीण मानून हक्काने मला काम सांगितले असते तर मी सगळं काही आनंदाने केले असते…पण जिथे माझ्या स्वाभिमानाला काही किंमत नाही तिथे मी यानंतर थांबणार नाही…तुम्ही श्रीमंत आहात म्हणून नाही तर माहेर म्हणून मला फक्त दादाच आहे म्हणून दर वेळी तुम्ही माझा अपमान केल्यावर सुद्धा मी परत आले…पण यावेळी नाही…” सरिता म्हणाली.
आणि मुलांना घेऊन तिथून निघून गेली. तिची वहिनी तिच्याकडे नुसती बघतच राहिली होती. तिचा दादा सुद्धा खाली मान घालून उभा होता. कारण त्याला सुद्धा जाणीव होती की आपल्याकडून चूक झालेली आहे आणि सरिता ला थांबवणार तरी कुठल्या तोंडाने. एव्हाना इतर नातेवाईक सुद्धा तिथे जमा झाले होते.
नवऱ्या मुलाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने सुद्धा आपल्या आईवडिलांना याबाबतीत नाराजी दर्शवली. कारण त्याला माहिती होते की आत्या मनापासून त्याच्यावर प्रेम करायची आणि त्याच्या लग्नासाठी तिने सगळ्या तयाऱ्या खूप मनापासून केल्या होत्या. त्याच्या आईचे वर्तन त्याला सुद्धा आवडलेले नव्हते. आणि वहिनी पण आता स्वतःच्या वागणुकीवर खूप जास्त खजील झाली होती. पण सरिता मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम होती.
ती घराबाहेर पडली तेव्हा तिला प्रभाकर समोरून गाडीवर येताना दिसला. त्याला पाहताच तिला आनंद झाला. पण तिला अशी हातात बॅग आणि मुलांसोबत एकटीला पाहून त्याच्या मनात वेगळीच शंका आली. त्याने सरीताला विचारले.
” तू हातात बाग घेऊन एकटीच बाहेर काय करत आहेस…आता तर सगळे लग्नाला निघत असतील ना..?”
” मी नाही जाणार लग्नाला…आपण घरी जाऊयात…घरी सुनिता आणि सुधाकर भाऊजी असतील ना…त्यांना सुद्धा भेटायचं राहिलय यावेळेला…” सरिता म्हणाली.
” अगं पण नेमकं झालंय तरी काय…तू तुझ्या भावाच्या घरचं लग्न सोडून घरी जायला का निघाली आहेस…?” प्रभाकर ने विचारले.
” कारण मला कळलंय की जिथे आपली किंमत नाही तिथे थांबून श्रीमंतीचे चार घास खाण्यापेक्षा जिथे आपली किंमत आहे तिथे आपुलकीच्या दोन शब्दांमध्ये जे समाधान आहे ते आणखी कशातच नाही…” सरिता म्हणाली.
ती नेमकं काय म्हणतेय हे प्रभाकरला कळले नाही. पण तिचे डोळे पश्चात्तापाच्या अश्रूंनी भरून आलेले त्याला दिसले. त्याने आणखी प्रश्न न विचारता तिला गाडीवर बसवले आणि दोघेही आपल्या मुलांसह घरी परतले.आज घरात पाय ठेवताना ती खूप समाधानी होती. कारण दरवेळी फक्त आपल्या माहेरचे कौतुक घेऊन घरी यायची पण यावेळी मात्र आपल्या सासरच्यांबद्दल असणारा अभिमान उराशी बाळगून तिने गृहप्रवेश केला होता.
घरात येताच तिला सुनिता दिसली. तिला पाहताच सुनिता म्हणाली.
” जाऊबाई…आल्यात का…मी लगेच तुमच्यासाठी चहा ठेवते…” एवढे बोलून सुनिता स्वयंपाकघरात जाणार इतक्यात सरिता तिच्या जवळ गेली आणि म्हणाली.
” जाऊबाई नाही…आजपासून ताईच म्हणत जा…”
सरिताच्या तोंडून हे शब्द ऐकून सुनीताला भरून आले. काय बोलावे हे तिला कळत नव्हते. तिची अवस्था ओळखून सरिताने स्वतःहून तिला मिठी मारली आणि दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले.
कधीकधी आपल्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांची आपल्याला किंमत कळत नाही. म्हणूनच कितीतरी चांगल्या नात्यांना आपण फुलूच देत नाही. आणि ज्यांना आपली किंमत नाही अशा लोकांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. म्हणून वेळेवर चांगल्या माणसांची पारख करणे खूप गरजेचे असते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.