आज वरदच्या बॉसच्या घरी पार्टी होती. वैभवी पार्टीसाठी छान तयार झाली होती. मागच्याच महिन्यात घेतलेली महागडी साडी नेसून वैभवी खुलून दिसत होती. तिच्या गोऱ्यापान अंगावर गुलाबी रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. गळ्यात तिने महागडा हार घातला होता. हातात मॅचिंग ब्रासलेट आणखीनच शोभा वाढवत होते. बऱ्याच वेळा पासून ती स्वतःलाच आरशात न्याहाळत होती. आणि तिने मनातल्या मनातच तिच्या सौंदर्याला पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा देऊन टाकले होते.
इतक्यात वरद तिथे आला आणि वैभवीला पाहून म्हणाला…
” किती सुंदर दिसते आहेस…असे वाटते नुसते तुला पाहत राहावे…”
” पाहायला काही हरकत नाही…पण पार्टी मध्ये लेट व्हायला नको म्हणून सांगतेय…चल लवकर…” वैभवी म्हणाली.
आणि दोघेही पार्टीला निघाले. निघताना त्यांची कामवाली बाई संध्याकाळच्या पोळ्या करण्यासाठी घरी आली होती. तिला पाहून वैभवी म्हणाली.
” शांताबाई…जाताना सगळं नीट आवरून ठेवा…नाहीतर मी नाही म्हटल्यावर स्वतःच्या मर्जीने काहीही कराल…आणि सासूबाईंना नीट वाढूनही द्या…”
शांताबाई नुसत्या मानेने हो म्हणाला. पण वैभवीचे बोलणे ऐकुन त्यांचा चेहरा मात्र उतरला. घरातून बाहेर पडल्यावर वरद तिला म्हणाला.
” अगं शांता काकू खूप वर्षांपासून आपल्या इथे कामाला येतात…आजवर कामात कुठलीही चूक केली नाही त्यांनी…त्यांना इतक्या कठोर शब्दात बोलणे बरे नाही वाटत…निदान त्यांच्याशी बोलताना त्यांना काकू तरी म्हणत जा…”
” अहो या नोकर माणसांना काही वाटत नाही आपण काहीही बोललो तरीही…आणि काकू म्हटल्याने काय त्या विनापगार काम करणार आहेत का आपल्याकडे…” वैभवी बेफिकिरी ने म्हणाली.
” अगं पण…”
” चला आता…नाहीतर उशीर होईल आपल्याला…” वैभवी म्हणाली.
आणि वरद गप्प बसला. दोघेही पार्टी च्या ठिकाणी पोहचले. तिथे पोहचताच तिथली सजावट पाहून वैभवी म्हणाली.
” अरे वा…पार्टीची तयारी तर खूपच चांगली केलेली आहे…तुझा नवीन बॉस तर एकदम क्लासी वाटतोय…”
” आहेतच त्या कमाल…एवढ्या लहान वयात त्यांनी इतकी प्रगती केलीय ना की आम्हा पुरुषांना सुद्धा लाजवेल असे त्यांचे कर्तृत्व आहे…” वरद म्हणाला.
” पुरुषांनाही लाजवेल म्हणजे…तुझी बॉस एक महिला आहे…?” वैभवीने प्रश्नार्थक नजरेने विचारले.
” हो…आता बघशीलच तू त्यांना…” वरद म्हणाला.
तिच्याबद्दलची स्तुती ऐकून वैभवीला आता वरदच्या बॉस ला पाहायची उत्सुकता वाढली होती. ती आत गेली. वरद त्याच्या काही मित्रांशी बोलायला निघून गेला आणि वैभवी तिच्या काही ओळखीच्या मैत्रिणींना भेटायला निघून गेली.
वरदच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या बायका एव्हाना वैभवीच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या. त्या सगळ्या जणी एकमेकींच्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या चर्चांमध्ये गुंतल्या होत्या. गप्पांना अगदी उधाण आले होते.
इतक्यात वैभवीची नजर एका स्त्री वर पडली. एक साधी पण महागातली साडी घालून ती एका बाईशी बोलत होती. तिला कुठेतरी पाहिल्याचे वैभवीला आठवत होते. इतक्यात तिच्या लक्षात आले. ही तर भावना. दोघीही एकाच शाळेत शिकायच्या बारावी पर्यंत.
भावना त्यांच्या घरी कामाला येणाऱ्या मोलकरणीची मुलगी होती. म्हणून एकाच शाळेत आणि एकाच वर्गात आली तरीही वैभवी नेहमी तिच्याशी एक अंतर ठेवूनच वागली होती. किंबहुना भावनाला ती सतत तिची पायरी दाखवायला कधीच चुकली नाही. भावना अभ्यासात खूप हुशार होती. आणि वैभवी जेमतेम.
भावना बरेचदा तिच्या आईसोबत वैभवीच्या घरी कामाला यायची. वैभवी मात्र तिच्याशी कशी एका शब्दानेही बोलत नसे. शाळेतही सगळ्या मैत्रिणींना ही आमच्या घरी कामाला येते असे सांगून सारखे हिणवायची. ती समोर आली तर वैभवी नाक मुरडून निघून जायची.
कधी भावनाच्या उसवलेल्या ड्रेस ला मारलेला रफु पाहून मैत्रिणींसोबत फिदीफिदी हसायची तर कधी तिच्या सावळ्या रंगाचा पाहून दुरूनच ए काळी आहे हाक मारून तिची टर उडवायची. भावना मोळकरणीची मुलगी असूनही आपल्यासोबत एकाच शाळेत शिकतेय हे वैभवीला अजिबात आवडत नसे.
पण भावनाचे आईवडील मात्र खूप मेहनत करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ह्यासाठी झटायचे. भावना सुद्धा आपल्या आईवडिलांचे कष्ट आठवून मन लावून अभ्यास करायची. शाळेतील मुलींच्या चिडवण्याला कधीच तिने महत्त्व दिले नव्हते. आपण बरं नी आपला अभ्यास बरा हेच तत्व तिने अंगीकारले होते.
भावना आणि वैभवी ची एक कॉमन फ्रेंड होती सुजाता. एकदा तिच्या वाढदिवसा निमित्त ती संध्याकाळी सगळ्या मैत्रिणींना पार्टी देणार होती. तिने आधी वैभवी ला निमंत्रण दिले आणि तिच्याच समोर भावना ला निमंत्रण दिले. तिने भावना ला सुद्धा पार्टीला बोलावलंय हे ऐकून वैभवी जरा मोठ्यानेच सुजाता ला म्हणाली होती.
” आपल्या सोबत हिला सुद्धा कशाला बोलावते आहेस तू…हीचा क्लास काय आणि आपला क्लास काय…हिच्याकडे कपडे तरी असतील का पार्टीसाठी…तुला जर हिला सोबत घ्यायचं असेल तर मी येणार नाही…मला काही स्वतःची फजिती करून घ्यायची नाहीय हिच्यासोबत हॉटेल मध्ये पार्टीला जाऊन…”
असे म्हणत वैभवी दात काढून फिदीफिदी हसायला लागली. तिच्यासोबत तिच्या एक दोन मैत्रिणी सुद्धा हसायला लागल्या. सुजाताला खूप वाईट वाटले पण त्यापेक्षाही जास्त वाईट भावनाला वाटले होते. त्या दिवशी तिला पहिल्यांदा वैभवीचा मनापासून राग आला होता. त्यानंतर ती कधीच तिच्या आईसोबत वैभवीच्या घरी गेलेली नव्हती. त्यानंतर बारावी झाली आणि सगळ्या मैत्रिणी आपापल्या मार्गाने गेल्या.
त्यानंतर कित्येक दिवसांनी आज वैभवीला भावना दिसली होती. वैभवी बायकांच्या गराड्यातून भावना कडे गेली. भावना ने तिला पाहताक्षणीच ओळखले आणि तिच्याशी हात मिळवायला हात पुढे केला आणि हसत म्हणाली…
” तू वैभवी आहेस ना…?”
वैभवीने मात्र तिला हस्तांदोलन करण्याचे टाळले आणि म्हणाली.
” हो…बरोबर ओळखलेस…तसेही मला कशी विसरणार ना तू…कितीतरी वेळा माझ्या घरी काम करायला यायची तू…?” वैभवी तूच्छपणे म्हणाली.
” हो ते तर आहेच…पण आपण एकाच वर्गात शिकायला देखील होतो…” भावना शांततेने म्हणाली.
” असेल…पण तू इथे काय करत आहेस…इतक्या मोठ्या पार्टीत तुला कोण बोलवणार म्हणा…आली असशील विना आमंत्रण…किंवा इथे पण काहीतरी काम करत असशील… नाही का..?” वैभवी म्हणाली.
आता मात्र भावनाला कळून चुकले की वैभवी अजूनही आधी होती तशीच आहे. ती वैभवी ला म्हणाली.
” माझं सोड…तू कशी काय आलीस इथे…तू ओळखतेस का ह्यांना…?”
” हो मग…माझ्या मिश्टरांच्या बॉस ची पार्टी आहे ही…” वैभवी म्हणाली.
भावना यावर फक्त गालातल्या गालात हसली. इतक्यात पार्टीची अनाउन्समेंट सुरू झाली. अनाउन्समेंट करणारा म्हणाला.
” मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आज आपण आपल्या नवीन बॉसच्या वेलकम साठी हि पार्टी आयोजित केली आहे…त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत…त्यांनी कामाचा परफॉर्मन्स नेहमीच शंभर टक्के दिलाय…आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला अत्यंत उत्सुक आहोत…आता तुमचा जास्त वेळ न दवडता मी त्यांना इथे बोलवतो…
आणि त्याने भावना कडे पाहिले आणि म्हणाला.
” भावना मॅम… प्लिज कम…”
आणि भावना अत्यंत आत्मविश्वासाने स्टेज वर चालत गेली. वैभवी तिच्याकडे नुसती आश्चर्याने पाहतच होती. नेमकं काय होतंय हे तिला कळतच नव्हते. इतक्यात भावना म्हणाली.
” थँक यू सो मच गाईज…पण माझ्या यशात माझ्या इतकाच वाटा माझ्या टीम मेंबर चा सुद्धा आहे…त्यांच्या सहकार्यानेच मी अनेक माईलस्टोन पार करू शकले…आणि त्याच टीम वर्क ची जादू आताही पाहायला मिळेल हीच मला आपणा सर्वांकडून आशा आहे…आणि तुमच्या इतकीच मी देखील तुम्हा सर्वांसोबत काम करायला उत्सुक आहे…” भावना म्हणाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
भावना वरदची नवी बॉस आहे हे कळताच वैभवीचे तोंडच उतरले. ती भावनाला नुकतीच नको ते बोलून बसली होती. भावनाने तर आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला होता पण वैभवी ने मात्र तिच्या गर्विष्ठ स्वभावामुळे एका चांगल्या मैत्रिणीला गमावले होते.
इतक्यात वरद तिच्या जवळ आला आणि म्हणाला.
” वैभवी…तुला आमच्या बॉस ला भेटायचं आहे ना…चल…”
आणि वैभवी ने काही बोलायच्या आत तिला भावना कडे घेऊन गेला. आणि भावनाला म्हणाला.
” हॅलो मॅम…मी वरद…वरद लोणकर…आणि ही माझी मिसेस…मिसेस वैभवी लोणकर…”
भावना ने वैभवी कडे पाहिले. वैभवीने नजर चोरतच तिच्याशी हात मिळवायचा म्हणून हात पुढे केला. भावनाने मात्र तिच्याशी हात मिळवणे तळून हात जोडून तिला नमस्कार केला. आणि म्हणाली.
” नाइस टू मीट यू मिसेस लोणकर…”
तेवढ्यात वरद कुणाशी तरी बोलयला म्हणून तिथून निघून गेला आणि भावना वैभवी ला म्हणाली.
” मला वाटले होते की इतक्या वर्षानंतर तू बदलली असशील…पण तू आजही लोकांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्याशी मैत्री ठेवतेस…मी आधी इतकी कठोर कुणाला बोललेली नाही आणि यापुढे ही मला बोलायची गरज न पडो…पण इतरांना कमी लेखण्या आधी तू हा विचार करायला हवास की इतरांना कमी लेखण्या जोगे तुझे कर्तृत्व तरी काय…तू फक्त एका श्रीमंत वडिलांची मुलगी आणि श्रीमंत नवऱ्याची बायको आहेस एवढंच…मला वाटतं तू माणसाला माणूस म्हणून वागवलं तर ते तुझ्यासाठीच चांगले असेल…” भावना म्हणाली.
आणि तिथून निघून गेली. वैभवी मात्र तिथेच मान खाली घालून उभी होती. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप करत. आज तिला तिच्या स्वभावातील उणीव कळून चुकली होती.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
अप्रतिम कथा…👌👌
अप्रतिम लिखाण👌😘