परवा रियाच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता. रियाचे आईवडील आज तिच्या मामाच्या गावी जाण्यासाठी निघणार होते. रियाच्या मामाचे गाव पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर होते. उद्या रियाचा पेपर असल्यामुळे रिया जाऊ शकणार नव्हती. रिया तिच्या आजी आजोबा सोबत घरीच थांबणार होती.
तिचे आईबाबा दुपारी गावाला निघून गेले. तिचे आईबाबा गेल्यावर तिला घरी अजिबात करमत नव्हते. तो दिवस अन ती रात्र रियासाठी खूप कंटाळवाणी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया पेपर देऊन घरी आली. अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना आली. साखरपुडा उद्या होता. अन मामाचं गाव सुद्धा जास्त दूर नव्हतं. मग आपण तिथे जाऊन आई बाबा आणि सर्वांना सरप्राईज दिले तर…
रिया तडक आपल्या आजी आजोबांकडे गेली आणि आपल्याला आईबाबांना सरप्राईज द्यायचं म्हणून त्यांना मामाच्या गावी जायची परवानगी मागितली. दुपारची ४ वाजले होते आणि तिच्या मामाचे गाव फार दूर नव्हते. आता निघाली तर रिया एका तासात पोहचेल हा विचार करून आजोबांनी तिला जायची परवानगी दिली.
तिची तयारी आटोपून ती घरून निघेपर्यंत साडेचार वाजले होते. तिने मामाच्या गावची बस पकडली. बस साडेपाच पर्यंत गावाच्या फाट्यार्यंत पोहचली. आणि तिथे रिया उतरली. फाट्यापासून गाव थोडं आत होतं. साधारण दीड किलोमीटर तिला पायी जायचं होतं. बस गावापर्यंत जात नाही याची तिला कल्पना नव्हती.
मामाच्या घरून कोणाला घ्यायला बोलावलं असत तर तीच सरप्राईज द्यायचं राहून गेलं असतं. अजून अंधार पडला नव्हता. भरभर चालत निघाले तर वीस मिनिटात ती मामाच्या घरी पोहचली पोहचणार होती. तिने आजूबाजूला बघितले. सोबतीला कोणीच नव्हते. तिने एक मोठा श्वास घेतला आज ती भरभर चालायला लागली.
ती जसजशी पुढे जात होती तसतसे तिच्या मनात भीती दाटून येत होती. यापूर्वी ती जेव्हा मामाच्या घरी आली तेव्हा ती आईबाबांसोबत कार ने आली होती. इथून पायी पायी चालत जायची तिची ही पहिलीच वेळ. लहानपणी ती जेव्हा मामाच्या गावी यायची तेव्हा ती तिथल्या लोकांच्या तोंडून भुतांच्या गोष्टी ऐकायची. या रस्त्यावर एक स्त्री रात्रीच्या वेळी फिरते म्हणून. तेव्हा तिला हे ऐकून गम्मत वाटायची.
पण आज या निर्जन रस्त्यावरून चालताना तिला कमालीची भीती वाटली. चालता चालता अंधार पण व्हायला लागला होता. आता मात्र रिया फार घाबरली. तिने आईला फोन करायचे ठरवले. ती बॅगेत ठेवलेला फोन घ्यायला गेली इतक्यात मागून कोणीतरी भरभर तिच्या दिशेने चालत असल्याचा आवाज आला. तिचा भीतीने थरकाप उडाला.
ती मोठ्याने ओरडणार इतक्यात एक तिशीच्या वयाची महिला तिच्या समोर येऊन उभी राहीली. त्या बाईला बघून तिला खूप बरे वाटले. साधारण तीस वर्षांची होती ती. दिसायला सुंदर होती. हातभार बांगड्या अन कपाळावर मोठं कुंकू लावलं होतं. गावापर्यंत जायला कोणाचीतरी सोबत होईल म्हणून रियाला हायसे वाटले.
” कुठं जायचं ओ तुम्हाला ताई ?” त्या महिलेने विचारले.
” मी इथे माझ्या मामाच्या घरी जात आहे.” रिया म्हणाली.
” असं होय.” ती म्हणाली.
” तुम्ही कुठे जाताय ?” रियाने विचारले.
” मी या गावचीच आहे. जरा कामाच्या साठी शेजारच्या गावात गेली होती.” ती म्हणाली.
” बरं झालं तुम्ही भेटलात ते. नाहीतर मी तर घाबरलेच होते.” रिया म्हणाली.
” तुम्हाला कशाची भीती वाटली ओ ताई ?…गाव तर इथून जवळच आहे बघा. अन अजून अंधारबी झाला नाही.” ती म्हणाली.
” तसं नाही…मी लहानपणी भुतांच्या गोष्टी ऐकायचे ना म्हणून…या रस्त्यावर एक बाई रात्रीची फिरत असते म्हणून.” रिया म्हणाली.
” तुम्ही बी ऐकली हाय ती गोष्ट.” ती म्हणाली.
” हो…लहानपणी ऐकली होती. तुम्हाला माहिती आहे का ती पूर्ण गोष्ट.” रियाने सहज विचारले.
” हो. मला बी ठाऊक हाय ती गोष्ट.” ती म्हणाली.
” मग मला सांगा ना.” रियाने विनंती केली.
” मग ऐका… रमा नावाची एक बाई या गावात राहत होती. एके दिवशी ती तिच्या कामासाठी जवळच्या गावात गेली होती. तिथून निघताना तिला उशीर झाला. ती गावाकडे परतत असताना दोन दारुडी माणसे तिचा पाठलाग करायला लागली. त्यांना पाहून ती भीतीने पळत सुटली. पण त्या दोन नराधमांनी तिला गाठलेच. ती त्यांना हात जोडून तिला घरी जाऊ देण्याची विनंती करत होती. पण ती दोन माणसे म्हणजे माणसांच्या रुपात हैवान होती. त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिचा खून केला.” ती बाई सांगत होती.
” मग काय झाले.” रियाने विचारले.
” तेव्हापासून ती इथे रस्त्यावर लोकांना दिसते. कुणी एकटी बाई असेल तर तिला घरी जाईपर्यंत सोबत करते. आणि कुणी रस्त्यावर एकट्या बाईला पाहून तिच्यासोबत काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिक्षा करते.” ती बाई सांगत होती.
त्यांच्या गोष्टी सुरू होत्या. आता गाव जवळ आलं होतं. रियाच्या मामाचं घर दूरवरून दिसू लागलं होतं.
” ते माझ्या मामाचं घर दिसत आहे.” तिच्या मामाच्या घराकडे बोट दाखवत रिया म्हणाली.
” सॉरी हं… गडबडीत मी तुम्हाला तुमचं नाव तर विचारलेच नाही. तुमचं नाव काय ?”
” रमा.” ती उत्तरली.
रियाने चमकून तिच्याकडे बघितले तर समोर कुणीच नव्हतं. ती बाई गायब झाली होती. आता मात्र रियाला झालेला प्रकार लक्षात आला. तिला दरदरून घाम फुटला. आतापर्यंत आपल्याला सोबत असलेली बाई ही एक भूत होती ह्या कल्पनेनं ती थरारली. तिच्या मामाचं घर समोरच होतं. तिने मागे वळून न बघता तिच्या मामाच्या घराच्या दिशेने धूम ठोकली.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो साभार – google
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.
Khup chan story aahe 😊👍