” तू मला का टाळत आहेस…?” त्याने विचारले.
” मी कुठे टाळतेय तुला..?” स्नेहल त्याच्याकडे न बघता म्हणाली.
” मग माझ्याकडे बघून बोल ना…तू इथे माहेरी आली तेव्हापासून ती एकदाही मला स्वतःहून कॉल केला नाहीस…मी तीनदा तुला घ्यायला इथे आलो पण तू सोबत आली नाहीस…आणि आधी माझ्या शिवाय कुठेही एकटी न जाणारी तू आता मला सोडून चक्क मैत्रिणीबरोबर फिरत आहेस…ह्याला टाळणे नाही म्हणत तर काय म्हणतात…?” साकेत म्हणाला.
” जर ह्याला टाळणे म्हणत असतील तर आजवर तू मला आणि अथर्वला टाळतच आहेस…नाही का..?” स्नेहल त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली.
स्नेहल असे काही बोलेल ह्याची जराही अपेक्षा नसलेला साकेत तिच्या या प्रश्नावर भांबावला.
” माझी गोष्ट वेगळी आहे…मी कुठे माहेरी गेलो होतो का तुला सोडून…ऑफिस मधून रोज रात्री घरीच यायचो ना…आधी मित्रांसोबत फक्त रविवारीच तर जायचो…” साकेत म्हणाला.
” रोज सकाळीच ऑफिससाठी निघायचा…तिकडून येताना बरेचदा बाहेरचं जेवण करून यायचास…बरेचदा घरी यायला अकरा वाजायचे तुला…तोवर अथर्व झोपलेला असायचा आणि की थकलेली…तू आल्यावर लगेच झोपून जायचास…मला मात्र खूप इच्छा व्हायची तुझ्याशी बोलायची…दिवसभर काय घडलं ते तुला सांगायची…तुझा दिवस कसा गेला ते ऐकण्याची…तुला मात्र ह्याच्याशी काहीच मतलब नव्हता…
तू सतत स्वतःच्याच दुनियेत मग्न…मित्र मैत्रिणी काय फक्त तुलाच आहेत का…सगळ्यांनाच असतात…मलापण आहेत…मग म्हणून काय मी माझा संसार सोडून मित्र मैत्रिणीं मध्येच राहायचं का… तो लहानगा अथर्व सतत तुझ्या अवती भोवती असायचा…तुला मात्र त्याच्याशी खेळायला सुद्धा वेळ मिळायचा नाही…कसा ओरडायचा त्याच्यावर…अरे हेच दिवस असतात ना मुलांनी खेळायचे…ते मोठे झाल्यावर हे दिवस थोडीच परतून येतील…” स्नेहल म्हणाली.
” पण मी आधीच तुला सांगितले होते ना की मी मुलांची जबाबदारी घ्यायला सध्या तयार नाही म्हणून…” साकेत काहीसा खजील होऊन म्हणाला.
” ही गोष्ट पाच वर्षांपूर्वीची होती ना…पण तेव्हापासून आतापर्यंत तू अजूनही जबाबदारी घ्यायला तयार नाही झालास का…मी सगळं काही सहन करते म्हणून तू मला सतत गृहीत धरणार आहेस का…तू मला आताच तुझा निर्णय काय आहे तो सांग…कारण तुला जर आम्ही फॅमिली न वाटता जबाबदारी वा ओझं वाटत असू तर मग आपल्या सोबत राहण्याला काहीच अर्थ नाही…मी चांगली शिकलेली आहे…
अथर्वची जबाबदारी एकटीने सुद्धा लीलया पार पाडू शकते हे तुला माहीतच आहे…माझ्या बाबतीत तुझे सतत दुर्लक्ष होणे मी सहन करू शकते पण माझ्या सोन्यासारख्या मुलाशी सुद्धा तू जबाबदारीने बागत नाहीस…आणि यापुढे मी हे सहन करू शकत नाही…तुझ्यापासून काही दिवस वेगळं राहिल्यावर मला कळलं की वेगळं राहणे इतकेही कठीण नाही…तुला जर तुझे स्वातंत्र्य प्रिय असेल तर मलाही माझा स्वाभिमान प्रिय आहेच की…आपण वेळेवर आपापल्या मार्गाने गेलेले बरे…” स्नेहल म्हणाली.
” म्हणजे…तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे…?”
” हेच…की जर तुला तुझ्या मित्रांसोबतच राहायला आवडतं…आम्हा मायलेकांची तुझ्या आयुष्यात काही जागा नसेल तर आपण घटस्फोट घेतलेला बरा…त्या दिवशी जेव्हा मला बरे नव्हते आणि मी तुला फोन केल्यावरही तू उचलला नाहीस आणि त्यानंतर मी चक्कर येऊन पडले तेव्हा अथर्व ची जी अवस्था झाली होती त्याने माझे काळीज पिळवटून निघाले होते…
सुदैवाने माझी आई आणि दादा वेळेवर आला आणि वेळ निभावून नेली…नाहीतर अथर्वने एकट्याने काय केले असते…मला जर काही झाले असते तर माझ्या मुलाचे काय झाले असते ह्या विचारानेच माझ्या काळजात धस्स झालं…मला काही झालं तर तू अथर्वला सांभाळू शकला असता की नाही ह्याची सुध्दा खात्री नव्हती मला…आणि तेव्हाच मी ठरवलं…तुझ्यापासून वेगळं राहायचं…स्वतःच आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि आनंदाने जगायचं…माझ्या मुलासाठी…” स्नेहल एका श्वासात बोलून गेली.
घटस्फोट हा शब्द ऐकून साकेत गडबडला. काय बोलू आणि काय नको हे त्याला सुचत नव्हते.
” स्नेहल…हे काय बोलते आहेस तू…माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर…आणि अथर्व वर सुद्धा…ही गोष्ट वेगळी आहे की मी तुम्हा दोघांना जास्त वेळ देऊ शकलो नाही…तू नेहमीच माझ्या मागेपुढे करायचीस त्यामुळे मला तुझी काहीच कदर नव्हती…पण आता मला माझी चूक कळलीय…इतक्या दिवसांच्या दुराव्याने मला तुमची माझ्या आयुष्यातील जागा कळली आहे…मी तुम्हा दोघांशिवाय जगू शकणार नाही ग…इतके दिवस तू माझ्याजवळ नव्हती तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं…मी तुला वचन देतो की मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही… मी माझ्या कुटुंबाला आता पूर्ण वेळ देत जाईल…” साकेत काकुळतीला येऊन म्हणाला.
” पण असं ठरवून जबाबदारीने वागता येत का…तू राहू शकणार का तुझ्या जुन्या लाईफ स्टाईल पासून दूर…हे इतके सोपे ही नाही…तुझ्या मनात आजवर एकदाही असे आले नाही की एकदा घरच्यांना वेळ द्यावा…आणि अचानक हे जमेल तुला…” स्नेहल साशंकतेने म्हणाली.
” तू मला एक चान्स तर देऊन बघ…मी एक चांगला नवरा आणि चांगला बाबा होऊन दाखवेन…आधीच्या चुका मी पुन्हा कधीच करणार नाही…मी हात जोडतो तुझ्यापुढे…मला एवढी मोठी शिक्षा नको देऊ…हवं तर मी तुझ्या अपेक्षेवर खरा उतरलो नाही तर मग मी काहीच बोलणार नाही…पण तुम्ही दोघं माझ्या जगण्याचे कारण आहात…आणि मला एक चूक सुधारण्याची संधी दे…किंवा मी म्हणेन की मला तुमच्या सोबत जगण्याची एक संधी दे…” साकेत स्नेहल चा हात हातात घेऊन म्हणाला. बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याच्या डोळ्यात स्नेहलला पश्चात्ताप दिसत होता. एका क्षणाला तिला वाटले की त्याला मिठी मारावी आणि आधार द्यावा. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरले आणि त्याला म्हणाली.
” ठीक आहे…तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला पुन्हा एक संधी देत आहे…पण यावेळेला मला निराश नको करुस…” स्नेहल म्हणाली. आणि साकेत ला खूप आनंद झाला.
त्यानंतर सकाळी स्नेहलने घरच्या सर्वांना सांगितले की ती आणि साकेत आज घरी जाणार आहेत. त्यावर वहिनी ने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि तिला किचन मध्ये यायची खूण केली. स्नेहल किचन मध्ये गेली आणि जाताच तिने वहिनी ला मिठी मारली. आणि म्हणाली.
” थँक यू वहिनी…मला तर कळतच नव्हते की मी काय करू…पण तुझी आयडिया फार भारी होती बरं का…मला तर वाटले होते की साकेत कधीच बदलणार नाही…त्याला त्याची चूक कधीच कळणार नाही…म्हणूनच तर माझ्या मनात घटस्फोटाचा विचार सुद्धा आला…पण तू मला समजावून सांगितले… आज तुझ्यामुळेच साकेतला त्याची चूक लक्षात आली आणि माझा आधीचा साकेत मला परत मिळाला…खरंच थँक यू…”
” मी काहीच विशेष केलेलं नाहीय बरं का…तुमच्यात आधीपासूनच खूप प्रेम होते…फक्त ते प्रेम काळाच्या ओघात थोडे झाकोळले गेले होते…आणि त्याच प्रेमाची जाणीव साकेतरावांना होणे गरजेचे होते म्हणून आपण हे केले…घटस्फोट ही खूप पुढची पायरी आहे…काही गोष्टी वेळेनुसार आपोआप सुद्धा ठीक होत असतात…तर काही गोष्टींची आपल्यालाच आपल्या जोडीदाराला जाणीव करून द्यावी लागते…” वहिनी म्हणाली.
त्यानंतर सर्वांची जेवणे आटोपली आणि थोड्या वेळाने स्नेहल, साकेत आणि अथर्व जायला निघाले.
मामाच्या घरून जाणार म्हणून अथर्व थोडा हिरमुसला होता. पण स्नेहलने त्याला सांगितले की आपण पुन्हा लवकरच सगळ्यांना भेटायला येऊ तेव्हा तो घरी जायला तयार झाला. नंतर ते तिघेही घरी गेले.
आणि तेव्हापासून साकेत मध्ये खूप बदल झाला. बायको आणि मुलाच्या दुराव्याने साकेतला त्यांचे महत्त्व लक्षात आले होते. त्या दिवशीपासून ती जास्तीत जास्त वेळ या दोघांना देऊ लागला. सुट्टीच्या दिवशी तिघेही बाहेर फिरायला जाऊ लागले. आपल्या कुटुंब समवेत वेळ घालवण्याचा आनंद खरंच किती मोठा असतो हे साकेतला कळून चुकले होते. आपण आजवर कोणत्या आनंदाला मुकलोय हे त्याच्या लक्षात आले होते. पण वेळीच आपली चूक दुरुस्त केली ह्याचे मात्र त्याला खूप समाधान होते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.