साधनाच्या सासुबाई आज त्यांच्या माहेराहून परतल्या होत्या. दरवर्षी त्या अगदी नियमाने वर्षातून पंधरा दिवस तरी माहेरी जायच्या. यंदाही गेल्या होत्या. आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी तिथून आपल्या नातवंडांना भरपूर खाऊ आणि भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या माहेराला सोनं चांगलं मिळतं असा लौकिक होता.
म्हणून त्या येताना आपल्यापरीने चारही नातवंडांना काहीतरी सोन्याची वस्तू आणत. यंदाही चौघांसाठीही त्यांनी छान सोन्याचे एक एक ग्रामचे लॉकेट आणले होते. साधनाच्या दोन मुली होत्या. जुई आणि सिया. साधनाच्या लहान जावेला रागिणीला दोन मुलं होती. अनय आणि अबीर. सासूबाईंनी संध्याकाळी सर्वांना सोबत बोलावले आणि चौघांनाही चार सोन्याची लॉकेट दिली.
साधलाला खूप आनंद झाला. मुलांनी ती लॉकेट आपापल्या आईच्या हाती दिली आणि आजीने दिलेला दुसरा खाऊ खायला लागले. रागिणीने साधना जवळची दोन लॉकेट पाहीली आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. काहीशी रागानेच ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला राग आलाय हे साधनाला कळले होते पण त्या रागाचे नेमके कारण तिला माहिती नव्हते.
त्यानंतर सासूबाईंनी आणलेला खाऊ सुद्धा रागिणीने थोडा जास्तच काढून घेतला आणि तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. आजकाल रागिणी अशीच वागत होती. आधी दोघीही जावा एकमेकींशी चांगल्या वागायच्या. पण रागिणीला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून रागिणी काहीशी बदलली होती. ती प्रत्येक बाबतीत मी, माझं करायला लागली होती. घराच्या कोणत्याही निर्णयात ती आपलीच बाजू धरून ठेवायची.
तशी पाहता साधना घरातील मोठी सून होती. आणि रागिणी तीच्यानंतर दोन वर्षांनी या घरात सून बनून आली होती. दोघींनाही थोड्याफार फरकाने मुले झालीत. पण साधनाला दोन्ही मुली झाल्यात आणि आपल्याला दोन्ही पण मुलं झालेत ह्या विचाराने रागिणी स्वतःला घरात वरचढ समजायला लागली होती. पण रागिणीच्या अशा वागण्याचे कारण न कळलेल्या साध्याभोळ्या साधनाला मात्र अजून हे लक्षात येत नव्हते.
रागिणीच्या अशा वागण्याचे कारण सुद्धा तसेच होते. रागिणीच्या आईला एका पाठोपाठ एक अशा चार मुलीच झाल्या होत्या. त्यामुळे तिच्या आईला खूप सासुरवास सहन करावा लागला होता. तिच्या आईला घरात अगदी कुणी काडीचीही किंमत देत नसे. त्यातच रागिणी सर्वात मोठी मुलगी असल्याने तिने हे सगळं खूप जवळून पाहिले होते. शेवटी जेव्हा चार बहिणी नंतर तिच्या आईला मुलगा झाला तेव्हा तिच्या सासुरवासाचा अंत झाला होता. आणि ह्या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर खूप जास्त परिणाम झाला होता.
त्यामुळे जेव्हा तिला कळले की ती आई होणार आहे त्या दिवशीपासूनच ती रोज देवाला प्रार्थना करायची की तिला मुलगाच व्हावा. तिच्या सासुबाई नेहमीच म्हणायच्या की मुलगा किंवा मुलगी काहीही झालं तरी चालेल पण सुदृढ असावं. तेव्हा रागिणी म्हणायची की तिला तर मुलगाच हवाय.
तेव्हा सगळ्यांना वाटायचं की रागिणीला मुलाची आवड असेल म्हणून ती हे सर्व म्हणत असेल. पण रागिणीचे याबाबतीत विचार जरा वेगळेच होते. म्हणूनच जेव्हा रागिणीच्या आधी साधनाची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगी झाली आणि त्यानंतर चार महिन्यांनी रागिणीला मुलगा झाला तेव्हा रागिणीला खूप आनंद झाला होता.
तेव्हापासून रागिणी घरात जरा तोऱ्याने वागू लागली होती. पण स्वभावाने सध्या आणि सरळ असणाऱ्या साधनाला तिच्या मनात हे सर्व आहे ह्याची जराही कल्पना नव्हती. साधना आणि तिच्या सासूबाईंचे विचार मात्र असे नव्हते. त्यांना मुलगा किंवा मुलगी दोघेही समान होते.
त्यानंतर जेव्हा साधनाला दुसरीही मुलगीच झाली आणी रागिणीला मुलगा झाला तेव्हा मात्र रागिणी पूर्णपणे बदलून गेली. आधी मनमोकळेपणाने साधनाशी बोलणारी रागिणी आता तिच्याशी मोजकेच बोलायची. त्यानंतर रागिणीला नेहमीच वाटायचे की घरच्यांनी सुद्धा तिच्या मुलांचा साधनाच्या मुलींपेक्षा जास्त लाड करावेत. प्रत्येक बाबतीत त्यांना मुलींपेक्षा चांगलं मिळावं ह्याकडे तिचा ओढा असायचा. तिला वाटायचं की साधनाच्या मुली आज ना उद्या परक्यांच्याच घरी जातील त्यामुळे सासू सासर्यांच्या सगळ्या संपत्तीवर फक्त आपल्या मुलांचाच हक्क आहे.
रागिनीची सासू जेव्हा बाहेरून मुलांसाठी काहीतरी आणायची तेव्हा रागिणीला वाटायचं जणू आपल्या मुलांची संपत्ती खर्च करून साधनाच्या मुलींना सोन्याच्या वस्तू दिल्या जात आहेत. पण ती काही बोलून दाखवता नव्हती.
त्यानंतर एके दिवशी रागिणी चा नवरा राजेश रात्री झोपताना रागिणीला म्हणाला.
” रागिणी…हे काही महत्त्वाचे पेपर्स आहेत…हे मी इथे कपाटात ठेवत आहे…उद्या जाताना मला आठवण करून देशील की हे पेपर्स उद्या सोबत न्यायचे आहेत…खूप महत्त्वाचे आहेत…”
” ठीक आहे…मी आठवण करून देईल…पण इतके महत्त्वाचे कशाचे पेपर्स आहेत हे..” तिने सहज विचारले.
” अगं…आम्ही बरेच दिवसांपासून आपल्या दुकानासमोर असणारी जागा विकत घेण्याचा प्रयत्न करत होतो…पण जमत नव्हतं…पण आता मात्र त्या जागेचा मालक स्वतःहून जमीन विकायला तयार झालाय…किंमत थोडी जास्त मागतोय…पण काही हरकत नाही…त्या संबंधीचे कागदपत्र आहेत…परवा दोघा भावांच्या नावाने खरेदी होणार आहे…” राजेश म्हणाला.
” पण दोघा भावांच्या नावाने का…? माझं म्हणणं आहे की एकाच्या नावावर खरेदी झाली तरी काय फरक पडतो…?” रागिणी म्हणाली.
” हो ग…मला काही फरक नाही पडत…मी तर बाबांना म्हटलं होतं की सुरेश दादाच्या नावाने करा पण तेच म्हणाले की दोघांच्याही नावावर असलेली बरी…” राजेश म्हणाला.
” पण फक्त तुमच्याच नावाने खरेदी झाली तर…?” रागिणी ने विचारले.
” म्हणजे.. ?” सुरेश ने विचारले.
” म्हणजे…सुरेश दादांना दोन्ही मुलीच आहेत…आणि आज ना उद्या त्या परक्यांच्या घरी लग्न करून जाणार आहेत…आपलं जे काही आहे ते आपल्या दोन मुलांचच आहे ना…मग कशाला उगाच दादांच्या नावावर करतायत बाबा खरेदी…?” रागिणी म्हणाली.
रागिणीचे बोलणे ऐकून राजेश ने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि रागाने म्हणाला…
” आज तू हे बोललीस…पण यापुढे असा विचारही मनात आणू नकोस…आम्ही दोघा भावांनीही कधी असा विचार केला नाही…हे तुझं ते माझं असं कधीच केलेलं नाही…आणि असे करायला आपल्याला काहीच कमी नाही…देवाने दिलेलं सगळंच आहे…अशा गोष्टींनी घरात दुफळी निर्माण होते…म्हणून सांगतोय असे काही विचार असतील तर ते आताच झटकून टाक…नाहीतर पुढे खूप भारी जाईल आपल्याला…”
राजेशचे बोलणे ऐकून रागिणी गप्प बसली. पण एवढ्याने शांत बसणारी ती नव्हती.
पुढे काही दिवसांनी रागिणी दिवाळीच्या कपडे खरेदी साठी बाहेर गेली होती. सासूबाईंना बरे नसल्याने साधना त्यांच्याजवळ घरीच थांबली होती. चारही मुले घरीच होती. रागिणी राजेश सोबत खरेदीला गेली. राजेशने तिला मार्केट मध्ये सोडून दिले आणि स्वतः एक काम करण्यासाठी बाहेर निघून गेला.
थोड्या वेळाने राजेश रागिणीला घ्यायला परत आला आणि दोघेही घरी परतले. थोड्या वेळाने रागिणी ने सगळ्यांसाठी आणलेले कपडे दाखवायला सुरुवात केली. सासुबाई आणि तिच्यासाठी तिने जरा भारीतली साडी आणली होती. पण साधना साठी मात्र थोडी साधी साडी आणली होती.
मुलांच्या कपड्यांच्या बाबतीतही तिने तेच केले होते. तिच्या मुलांना चांगले महागातले ड्रेस आणले होते आणि जाई आणि सिया साठी मात्र खूप हलके ड्रेस घेऊन आली होती.
मुलांचे कपडे पाहून मात्र साधनाला खूप राग आला. ती रागिणीला म्हणाली.
क्रमशः
तू पण एक मुलगीच आहेस – भाग २ (अंतिम भाग )